माझ्याबद्दल

सह्याद्री बाणा... या ब्लॉग वर आपले स्वागत आहे.

मी प्रकाश पोळ. तथागत बुद्धापासून ते फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजापासून ते छ. शिवराय यांच्या विचारानुसार वाटचाल करणारा एक बहुजन तरुण. देव-धर्मासारख्या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नाही. ज्यानी शोषितांच्या लढ्याला बळ दिले ते सर्व महापुरुष माझ्या दृष्टीने देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांचा वारसा पुढे न्यायचा हा छोटासा प्रयत्न.

बऱ्याच वेळा माझ्यावर जातीयवादाचा आरोप होतो. आरोप करणारे स्वतःला संस्कृती आणि धर्माचे ठेकेदार समजत असतात. माझ्या लिखाणाचा हेतू कुणाच्याही भावना दुखावणे हा नाही. परंतु प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लिहिले, बोलले कि ज्यांच्या भावना दुखावतात त्यांनी एकदा आत्मचिंतन करून पाहावे. ज्यांना जातीपातीच्या कुंपणामुळे जगणे अशक्य होते अशा गाव कुसाबाहेरच्या लोकांचे जीवन (?) एकदा जावून पाहावे. ते लोक कसे जगतात त्याचा थोडा अभ्यास करावा. आपण शिकलो, सुस्थितीत पोहचलो म्हणजे सर्व काही झाले अशी मानसिकता योग्य नाही. बहुतांशी समाज अजूनही गुलामगिरी, दारिद्र्य, आज्ञाय यात खितपत पडला आहे. त्याला कुठेतरी मार्ग दाखवण्याची गरज आहे. माझा ब्लॉग मुळमुळीत लिखाण करण्यासाठी अजिबात नाही. प्रस्थापित व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे ठेकेदार यांचे बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र बहुजन समाजाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे. जातीयवाद संपला, जातीच्या भिंती तुटल्या अशी आपण ओरड करतो असतो. पण खरोखरच जातीयवाद कमी झाला आहे का ? जर जातीयवाद संपला असता तर खैरलांजी घडले नसते, जेम्स लेनद्वारे छ. शिवरायांची बदनामी झाली नसती. देशातील दारिद्र्यरेषेखालचे बहुतांशी लोक मागास समाजातील आहेत. त्यांना ना उत्पनाचे साधन असते ना समाजात मान.

प्रस्थापित व्यवस्था पुन्हा नवा मनुवाद समाजावर लादण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा वेळी या मनुवादी गुलामगिरीला पुन्हा बळी पडू नये म्हणून बहुजन समाजाला विशेषता तरुणांना जागृत करणे हे माझ्या लिखाणामागचा मुख्य उद्देश आहे. 

माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी स्वीकारतो आणि लिहितो. प्रवाहाविरुद्ध पोहताना दमछाक होते याची मला जाणीव आहे. पण प्रवाहाविरोधात जे पोहतात इतिहास त्यांचीच आदराने दाखल घेत असतो. मला खात्री वाटते कि एक ना एक दिवस प्रवाहालाच जाणीव होईल कि तो उलट्या दिशेने वाहत होता आणि तो नक्की दिशा बदलेल.

माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती. जर काही मतभेद असतील तर ते चर्चेने सोडवू शकतो. कारण मी जे लिहितो ते उपेक्षितांच्या दृष्टीकोनातून लिहितोय. त्यामुळे भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करूनच माझ्या लिखाणाचा अन्वयार्थ लावावा, ही विनंती.

वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes