शुक्रवार, डिसेंबर १४, २०१८

कोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका. या तालुक्यातील जुवे एक बेट. स्वतंत्र ग्रामपंचायत. जैतापूरपासून साधारण २-३ किमी. क्षेत्रफळ ४२ हेक्टर. लोकसंख्या अवघी ७८. पण घरं १०० च्या वर. बहुतांशी लोक मुंबईला स्थायिक. चारही बाजूने समुद्राने वेढलेलं हे गाव. गावात भंडारी आणि कुणबी समाजाची प्रामुख्याने वस्ती. मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय. गावात जायला भूमार्ग नाही. समुद्रातून होडीने जायचे. जमिनीपासून साधारण ४०० मीटर आत. गावात एक प्राथमिक शाळा. पहिली ते चौथी. विद्यार्थी फक्त २. इयत्ता तिसरीतील. शिक्षक एक. पाचवीपासून पुढे जैतापूरला जावे लागते. ७ विद्यार्थी जैतापूरच्या हायस्कुलला जातात. रोज होडीतून प्रवास करून जायचे. गावातील लोकांनाही इतर ठिकाणी जाण्यासाठी होडीतून प्रवास करून जावे लागते. 

गावात एकही दुकान नाही. किरकोळ सामान आणि किराणा आणण्यासाठी जैतापूरला जावे लागते. गावात निवडणूक होत नाही. बिनविरोध निवड होते.  सर्व लोक चर्चेतून सरपंच आणि सदस्य ठरवतात. ग्रामपंचायतचे उत्पन्न अवघे ३०००० रुपये वार्षिक. विकास म्हणावा असा काहीच नाही. पर्यटनाच्या दृष्टीतून गाव विकसित होऊ शकते, मात्र अजून मूलभूत सोयी झालेल्या नाहीत. काही पर्यटक येतात. त्यांची राहण्याची व जेवणाची सोय गावातच कुणीतरी करतं. त्यातून त्यांना थोडेफार पैसे भेटतात. गावात रवळनाथांची दोन मंदिरे. एक शिम्रादेवीचे. ही देवी जुवे गावाची ग्रामदेवता. गावातील भंडारी समाज मूळचा मालवणचा. काही पिढ्यापासून ते जुवे गावात स्थायिक झाले आहेत. गावात कोणत्याही प्रकारची भांडणे अथवा वाद होत नाही. मुळातच लोकसंख्या कमी, त्यात अनेक लोक मुंबईला स्थायिक. गावातील बहुतांशी घरांना कुलूप. होळी आणि गणपतीला मात्र गाव गजबजतो. या सणाला गावातील सर्व चाकरमानी, मुंबईकर गावात येतात. या वेळी गावाशी संबंधित प्रमुख निर्णय घेतले जातात. गावातील लोक स्वभावाने अतिशय शांत. मुळात जगातील धकाधकीच्या जीवनापासून हे लोक कोसो दूर आहेत. 

स्थानिक लोकांचा मासेमारीशिवाय इतर कोणताही व्यवसाय नाही. त्यामुळे भौतिक विकासापासून हे लोक दूरच आहेत. जुवे गावात शेती केली जात नाही. शेतीसाठी पोषक जमीन येथे नाही. मात्र काही लोकांनी आंबा आणि काजूची लागवड केली आहे. पण तुरळकच. गावात सात वाड्या आहेत. ७८ लोकसंख्या आणि त्यातही कायम गावात राहणारे लोक अजून कमी. तरीही गावात सात वाड्या आहेत. सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदतात. गावाला पर्यावरण ग्राम संतुलित पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार असे काही पुरस्कारही मिळालेत. बक्षिसाच्या रकमेतून गावात थोड्याफार मूलभूत सोयी केल्या गेल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे गावात सर्वत्र आहेत. सौर ऊर्जा साठवणारी बॅटरी महाग असते म्हणून जुगाड करून वाहनातील बॅटरी वापरली आहे. एका बॅटरीतून २-३ बल्ब जोडले आहेत. गाव चारी बाजूनी समुद्राने वेढलेले आहे. परंतु बेटावरील विहिरी आणि बोअरवेलला मात्र गोडे पाणी आहे. हे एक आश्चर्यच आहे. परंतु त्यामुळे गावातील लोकांची पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली आहे. उन्हाळ्यातही गावाला पाण्याची टंचाई जाणवत नाही हे विशेष.

सरपंचपद महिला राखीव आहे. सरपंच मॅडम सौ. कांबळी आणि त्यांचा नवरा दोघेही ग्रामपंचायत सदस्य. श्री. कांबळी यांनी आपुलकीने सर्व गाव फिरवून दाखवले. आग्रह करून चहा घ्यायला लावला. पुढच्या वेळी जेवायला यायचे आमंत्रणही दिले. खूप प्रेमळ माणसं. कोकणातील माणूस फणसाच्या गऱ्यासारखा मऊ आणि प्रेमळ असतो असं ऐकलं होतं. त्याचा अनुभव आला. ही माणसं खरंच खूप सुखी आणि समाधानी आहेत. कसलाही अभिनिवेश नाही, द्वेष नाही, कोणत्याही तक्रारी नाहीत. निसर्गाने जरी यांना भरभरून दिलं तरी हाच निसर्ग यांच्या आर्थिक आणि भौतिक प्रगतीत अडथळाही ठरला. तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे लोक अनेक वर्ष इथं सुखाने राहत आहेत. बाहेरच्या दगदगीच्या जीवनातून थोडा वेळ काढून अशा ठिकाणी आल्यावर मनातील मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. खूपच शांत आणि प्रसन्न वातावरण आहे इथं. कोणतंही प्रदूषण नाही, गोंगाट नाही. जीवघेणी स्पर्धा नाही आणि म्हणूनच त्यातून येणारा अनावश्यक ताणही नाही. 

पर्यटनाच्या दृष्टीतून विकसित व्हायला जुवे बेटाला खूप वाव आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना गावातच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यांना पोटापाण्यासाठी गावापासून शेकडो मैल दूर जावे लागणार नाही. त्यांची आर्थिक आणि भौतिक प्रगती होईल. विकासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी त्यांना खूप मदत होईल.
जुवे बेटाचा लांबून घेतलेला फोटो 
1 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

अतिशय सुंदर ,वास्तववादी

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes