रविवार, ऑगस्ट ०६, २०१७

शी इज् नॉट वर्जिन…

आज खूप दिवसांनी मला माझ्या काॅलेजचा मित्र भेटला. काॅलेजनंतर तब्बल २ ते ३ वर्षानी आम्ही एकमेकांना भेटलो. अचानक घड़लेल्या भेटीत अनेक विषयांवर आमचं चर्चासत्र आणि हास्याविनोद चालू असतानाच मी त्याला काॅलेजपासून सुरू असलेल्या त्याच्या लव्ह स्टोरीबदल विचारलं, त्यावर तो काहीच न बोलता फक्त शांत बसला.

त्याच्या या शांततेने माझ्या ड़ोक्यात एकामागून एक प्रश्नाचा घड़ीमार सुरू झाला. एकमेकांशिवाय एक मिनीट ही न राहू शकणारे हे रोमियो – जूलिएट अचानक वेगळे कसे झाले? का झाले असतील आणि कशामुळे? इंग्रजीच्या व्याकरणातील ‘Wh’ टाईप प्रश्नांची रांग माझ्या ड़ोळयासमोर उभी राहिली.

स्वतःच तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतानाच त्याने उत्तर दिले “आमचा ब्रेक-अप झाला आमचं लग्न मोड़लं” मला पुढे काही बोलण्याआधीच त्यांने सांगितल “शी इज् नॉट वर्जिन…” तिने लग्न करण्याआधीच त्याला प्रामाणिकपणे आपल्या व्हर्जिनीटीबद्दल सांगितल्याने त्याने लग्नास नकार दिला. ३-४ वर्ष एकत्र घालवल्यानंतर आपली प्रियसी वर्जिन नाही म्हणून त्याने चक्क ठरलेलं लग्नच मोड़लं, ही गोष्ट ऐकतानाच किती विचित्र वाटते ना! व्हर्जिनीटी म्हणजे पवित्रता, आणि हा नालायक माणुस व्हर्जिनीटी ह्या शब्दाला फक्त शारीरिक संबंधाशी जोड़तो.

परंतु माणसाची पवित्रता त्याच्या आचार, विचार आणि वागणुक ह्यांच्याशी निगड़ीत असते, ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि ह्याच अपवित्र विचारांच्या भागीदार काही महिलासुध्दा असतात, ही सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे.

जग बदललं, विज्ञानाची प्रगती झाली आणि ह्याच विज्ञानाच्या वापराने हे जग गुगलच्या मदतीने स्त्रियांची व्हर्जिनीटी कशी चेक करायची याचा शोध घेऊ लागला. ‘लड़की की सील टूटी है या नही कैसे पता करे?’ ‘आपकी पत्नी वर्जिन है या नही और उसकी सील कैसे चेक करे?’ अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे गुगलच्या साहाय्याने ही पुरूष प्रधान संस्कृति शोधू लागली. सुरूवातीच्या काळापासून स्त्रीयांना आपण वर्जिन आहोत की नाही हे सिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टी सामोरे जावे लागत असे,त्यातच लग्नाच्या पहिल्या रात्री बेड़वर पड़लेल्या रक्ताच्या ड़ागावरून हा समाज स्त्रीची व्हर्जिनीटी चेक करत असे.

जर बेड़वर रक्त पड़लेच नाही तर ती स्त्री वर्जिन नाही असे समजले जायचे. ह्या समाजाला आपली भूक आणि गरज भागवण्यासाठी स्त्रीच लागते, पण लग्न करताना मात्र तिच स्त्री वर्जिन आहे की नाही याकड़े सर्वात जास्त लक्ष दिलं जातं. आपण विज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या पण लोकांची विचार करण्याची पध्दत मात्र हा विज्ञान नाही बदलू शकला. आज आपण २१व्या शतकात राहत असलो तरी ही अनेकांना व्हर्जिनीटी बद्दल फार काही माहिती नाही.

पुर्वीपासुन चालत आलेली व्हर्जिनीटीची व्याख्या आजही अनेक ठिकाणी तिच समजली जाते. मग व्हर्जिनीटी म्हणजे नक्की काय? स्त्रीयांच्या योनीमध्ये एक पातळ पड़दा असतो. मेड़ीकल भाषेत योनीला व्हजायना आणि पड़दयाला हायमन म्हणतात. तो पड़दा जेव्हा फाटतो (हायमन स्पिल्ट होतो) तेव्हा स्त्री आपली व्हर्जिनीटी गमावते. हायमन स्पिल्ट फक्त शारीरिक संबंधानेच होतं अस नाही. योगा- जिम, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग, आणि जिम्नाॅस्टिक अशा अनेक कारणांमुळे हायमन स्पिल्ट होऊ शकते. पण आपला हा समाज स्त्री आपली व्हर्जिनीटी फक्त आणि फक्त शारीरिक संबंधामुळेच गमावते असे ठामपणे आजही समजतो. आपल्या ह्या देशात आजही लग्नाच्या पहिल्या रात्री किंवा लग्नानंतर शारीरिक संबंध झाल्यावर ती स्त्री वर्जिन नाही अस समझल्यावर कितीतरी मुलांनी आपल्या बायकोला सोड़ून दिलय अस आपण आज ही ऐकतो, ही गोष्ट ग्रामीण भागातच होते अस नाही तर शहरी आणि त्यातच उच्च शिक्षीत मुलांकड़ून मोठ्या प्रमाणात होते.

अजुन किती दिवस आपण स्त्रीयांच्या व्हर्जिनीटीचा शोध घेणार आहोत. भविष्यात जर स्त्रीयांनीच गुगलच्या मदतीने पुरूषांच्या व्हर्जिनीटीचा शोध घेण्यास सुरूवात केली तर, पुरूषांचा पुरूषार्थ हे सहन करू शकतो का? ड़ाॅक्टरच्या माहिती नुसार पुरूषांची व्हर्जिनीटी समजणे अवघड़ असते, किंवा ते कळत नाही. जर स्त्रीला आपला पती वर्जिन आहे की नाही असे जाणून घेण्याची इच्छा नसते, मग हा पुरूष समाज कधी ह्या बुरसटलेल्या विचारातून बाहेर पड़णार आहे. रक्ताच्या ड़ागावरून स्त्रीच चारित्र्य ठरवणारया ह्या पुरूष समाजाची मागासलेली मानसिकता कधी बदलणार आहे की नाही? आजच्या वैज्ञानिक युगात स्त्री- पुरुष समानता किंवा स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे, असे आपण अनेकवेळा ऐकतो- बघतो. मग लग्न करताना स्त्रीला व्हर्जिनीटी ह्या एका गोष्टीवरून अजूनही दुय्यम स्थान का दिले जाते.

व्हर्जिनीटी ह्या गोष्टी विचार करताना स्त्री आत्मनिर्भर नाही होऊ शकत का? पुरूषी अहंकार आणि मानसिकता ह्यात आपण कधी विकसित होणार आहोत की फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान यातच आपण प्रगती करणार आहोत.

मी लिहलेला हा लेख काहींना आवड़ेल किंवा आवड़णार ही नाही. कहींच्या मते हा निव्वळ टाईमपास असेल किंवा काहींना मी फक्त मुलींच्या बाजूने विचार करून लिहिलय असही वाटेल. पण आयुष्याचा जोड़ीदार निवड़ताना व्हर्जिनीटी ह्या गोष्टीला आपण किती महत्व दयावं ह्यावर विचार करणं खरच गरजेचं आहे. 

-सोनाली केदू भवर

2 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

हा लेख तर सर्व पुरूषांनी वाचायलाच हवा.

Unknown म्हणाले...

छान लेख आवडला मला

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes