शनिवार, एप्रिल १५, २०१७

अजून किती हुंडाबळी हवेत ?


दुर्दैवी शीतल वायाळ 


भिसे वाघोली जि. लातूर येथील शीतल वायाळ या मुलीने हुंड्याच्या भितीने आत्महत्या केली. मनाला अतिशय चटका लावणारी अशी ही घटना मराठवाड्याच्या
भूमीत घडली. फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई यानी ज्या महाराष्ट्राला आपल्या विचार आणि कृतीतून पुरोगामी हे बिरुद मिळवून दिले त्या महाराष्ट्राची मान आज शरमेने खाली गेली. मराठा कुणबी समाजातील शीतलने समाजात चालणाऱ्या हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथांना कंटाळून आपले जीवन संपविले. आज एकविसाव्या शतकात भारत महासत्ता बनण्याची स्वप्ने पहात असताना अशा प्रकारे स्त्रीजीवनाची उपेक्षा होत आहे ही चांगली गोष्ट नाही. आत्महत्येपूर्वी शीतलने जी चिठ्ठी लिहिली आहे त्यात शितल म्हणते, "मराठा समाजातील या अनिष्ठ रूढींना कंटाळून मी आपले जीवन संपविले आहे" या प्रकरणानंतर समाजात हुंडा, त्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि एकंदरच समाजाची मानसिकता याबद्दल भरपूर बोलले, लिहिले जाईल.

शीतलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी 
राजकीय नेते शीतलच्या गावाला, घराला भेटी देती. फोटो काढतील. काही लोक पैशाच्या किंवा इतर स्वरुपात मदत करतील. समाजाचा असंतोष cash करुन सत्ता मिळविण्यासाठी खुबीने उपयोग करुन घेतला जाईल. परंतु हुंड्यासारख्या अनिष्ठ आणि कालबाह्य परंपरा संपविण्यासाठी कुणीच ठोस पुढाकार घेणार नाही. समाज चार दिवस चर्चा करुन सर्व विसरुन जाईल आणि पुन्हा एकदा दुसऱ्या शीतलच्या मृत्युची वाट पाहील. शीतलने आपले जीवन संपविले. खरतर हा समाजाने, समाजाच्या प्रतिष्ठेच्या चुकीच्या संकल्पनानी केलेला खून आहे. याच चुकीच्या गोष्टीनी शीतलला आपली जीवनयात्रा संपवायला भाग पाडले.

हुंडा ही अनेक वर्षांपासून समाजाला लागलेली कीड आहे. फक्त मराठा समाजातच हुंडा घेतला जातो असं नाही. सर्वच जातींमध्ये हुंड्याची प्रथा अस्तित्वात आहे. जातीची समाजातील प्रतिष्ठा जितकी जास्त हुंड्याचे प्रमाण तितके जास्त. मराठा समाज इतर जातींच्या तुलनेत प्रतिष्ठित मानला जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात हुंड्याचे प्रमाण जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सांगली, सातारा, कोल्हापूर भागात हुंड्याची पद्धत जवळजवळ नामशेष झाली आहे. माझे मराठवाड्यात भरपूर मित्र आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, संविधानाचा अभ्यास करणारे, समाजसुधारक वाचणारे माझे मित्र अधिकारी होतात तेव्हा त्यांचा दर ठरलेला असतो. हे अधिकारी भरपूर हुंडा घेतात. अगदी पाच लाखापासून २५-३० लाखापर्यंत हुंडा घेतला जातो. यासहित एकूण लग्नाचा खर्च बघता एका मुलीसाठी ३०-५० लाख खर्च येतो. गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर यानी आपल्या मुलींची लग्न कशी करायची? हुंड्यासाठी लांबत असलेले लग्न, आई-बापाची तगमग बघून कोणत्या मुलीची जगायची उर्मी राहील. आपल्या लग्नासाठी आपला बाप रोज थोडा थोडा मरतोय हे बघुन त्या मुलीला जीव द्यावासा वाटणार नाही का ?

या सर्व प्रकारानंतर एकही युवक उभा राहून मी हुंडा घेणार नाही असे म्हणू शकत नाही यातच सारे आले. मराठा असो किंवा इतर कोणताही समाज असो, आपल्या समाजाच्या आरक्षण, सत्तेत सहभाग अशा गोष्टींसाठी जसे आपण भांडतो तसेच समाजातील अनिष्ठ परंपरांच्या विरोधात लढा उभारणार आहोत का? मराठ्यांचे लाखांचे क्रांतीमोर्चे निघाले. हुंड्याच्या विरोधात असा क्रांतीमोर्चा निघणार आहे का? आपल्या समाजातील युवक वर्गाचे आपण प्रबोधन करणार आहोत कि नाही?

हुंडा घेणारे, स्त्रियांना त्रास देणारे अशांच्या विरोधात आपण सामाजिक दबाव तयार करणार आहोत कि नाही? आणि याची सुरुवात स्वत:पासून करायला काहीच हरकत नाही. शीतलच्या बलिदानाला साक्षी मानून आजपासून प्रतिज्ञा करुया कि मी हुंडा घेणार नाही, सर्व स्त्री वर्गाचा आदर करेन आणि समाजात घडणाऱ्या अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीना ठाम विरोध करेन ..... आपण  स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडविला तर समाज नक्की बदलेल.... शीतल तुझे बलिदान व्यर्थ जाणार नाही....

15 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes