सोमवार, जुलै १८, २०१६

कोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता

गेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला  जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत होता. दोन  दिवसापूर्वीच नगर जिल्ह्यातील कोपर्डी ता. कर्जत येथील एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी विकृत पद्धतीने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. अतिशय शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया अत्याचार प्रकरणात ज्या पद्धतीने अत्याचार करून त्या निरागस मुलीची, तिच्या देहाची विटंबना करण्यात आली तोच प्रकार इथेही दिसून आला.

निर्भया प्रकरण पूर्ण देशभर गाजले. आरोपीना कडक शिक्षा झाल्या. बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार याविरुद्ध समाजमन भडकले. इतके की अशा पद्धतीचे विकृत कर्म करताना कुणालाही धडकी भरावी. त्या घटनेनंतर यासंदर्भातला कायदाही व्यापक आणि कडक बनवला. तरीही कोपर्डीत निष्पाप मुलीच्या अब्रूला हात घालताना त्या नराधमांना कसलीच भीती वाटली नाही. त्या मुलीच्या आर्त किंकाळ्यांनी त्यांचे हृदय पिळवटून निघाले नाही. त्यांनी तिच्यावर अमानवी पद्धतीने अत्याचार करून निर्दयतेच्या साऱ्या मर्यादा पार केल्या.

समाजातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर प्रसारमाध्यमे जागी झाली. सुरुवातीला या घटनेचे गांभीर्य प्रसारमाध्यमांना समजले नव्हते. राजकीय पक्ष, नेत्यांनाही या प्रकरणी मुलीला न्याय मिळवून  देण्यासाठी प्रयत्न करावा असे वाटले नाही. ज्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाला तिला, तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यापेक्षा वैय्यक्तिक हिशेब चुकते करण्यात काहींनी धन्यता मानली. ही घटना एका विकृत आणि वासनांध मानसिकतेतून झाली असताना काही बहाद्दरांनी आरोपींची जातही शोधली. मुलीला न्याय मिळाला पाहिजे ही भावना राहिली बाजूला आणि सोयीस्कर जातीय मांडणी करण्यात काहीजण मश्गुल झाले. काही राजकीय नेत्यांनी काहीही शहानिशा न करता यातही राजकारण करण्याची संधी सोडली नाही. फेसबुक व तत्सम समाजमाध्यमातून या प्रकरणी भरपूर चर्चा झाली. ती बऱ्याच अंशी उथळ आणि जातीय होती. परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता काहींनी जातीय भावना भडकावण्यास सुरुवात केली.

याआधीही महाराष्ट्रात काही ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. खैरलांजी प्रकरण अजून आपण विसरलेलो नाही. खैरलांजीमध्ये माय-लेकींवर बलात्कार करून त्यांच्याही देहाची विटंबना करण्यात आली होती. घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या देहाचे पुरलेले अवशेष बाहेर काढून शव विच्छेदन केले गेले. त्यामुळे बलात्कार झाला होता ही गोष्टच न्यायालयात सिद्ध होऊ शकली नव्हती. खैरलांजी प्रकरण हे विकृत जातीय मानसिकतेतून झाले होते हे सर्वच मान्य करतात. त्यामुळे त्याबाबत चर्चा करताना जातवास्तव मांडले जात असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे कसे म्हणता येईल ? खर्डा, जवखेडा प्रकरणातही दलितांवर अत्याचार झाले त्यापाठी जातीय मानसिकता होती. त्यामुळेच त्या-त्या प्रकरणात विश्लेषण करताना जातवास्तव आणि त्याअनुषंगाने होणारे अन्याय-अत्याचार याची चर्चा केली गेली. यात कोणत्याही एका समाजाला दोष देण्याचा हेतू असू शकत नाही. किंवा त्या प्रकरणातील आरोपी ज्या जातीचे होते त्या जातीलाच संपूर्णपणे दोषी धरायचे असाही प्रकार नव्हता. परंतु खैरलांजी, खर्डा आणि जवखेडे या तिन्ही प्रकरणात मराठा-दलित असा वाद उफाळून आला. त्याला दोन्हीकडच्या काही संधीसाधू लोकांनी खतपाणी घातले. या प्रकरणात काही मराठा संघटना आरोपींच्या बाजूने उघडपणे उभ्या राहिल्या. त्यांना कायदेशीर मदत करण्यापासून सर्व गोष्टी या संघटनांनी केल्या. खैरलांजी प्रकरणात पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून आरोपीना सर्व प्रकारची मदत करण्यात माजी मंत्री शालिनीताई पाटील  व छावा, मराठा महासंघ अशा संघटना आघाडीवर होत्या. संभाजी ब्रिगेडसारख्या स्वतःला पुरोगामी, बहुजनवादी म्हणवून घेणाऱ्या संघटना तटस्थ होत्या. अपवाद वगळता ब्रिगेडमधील कोणी खैरलांजीवर आक्रमक झाले नाही. उलट शालिनीताई पाटील यांना "मराठा पुण्यभूषण" हा पुरस्कार मात्र देऊ केला. या सर्व प्रकरणात अप्रत्यक्षपणे सवर्ण समाजातील  अत्याचारी मानसिकतेबद्दल बोलले गेले. त्याचेच उट्टे काढण्याची संधी काहींना कोपर्डी प्रकरणामुळे मिळाली.

सध्या कोपर्डीत जी अमानुष घटना घडली आहे ती काळजाचा थरकाप उडवणारी आहे. कोणत्याही सुहृदय माणसाला याचे वैषम्य वाटेल. सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले हेही खरे आहे. समाजमन या प्रकरणी आक्रमक झाल्यानंतर त्यांनी बातम्या द्यायला चालू केल्या. तसेच सर्व समाज या घटनेने पेटून उठला असेही झाले नाही. निर्भया प्रकरणी ज्याप्रमाणे देश पेटून उठला, तसा उठाव कोपर्डी प्रकरणात दिसला नाही. महिलांचा आवाजही घुमला नाही. की महाराष्ट्र पेटून उठला नाही. परंतु सामाजिक भान असणाऱ्या बहुतांशी व्यक्तींनी या घटनेचा निषेधच केला आहे. अशा प्रकरणी सार्वत्रिक आवाज न उठण्याची कारणे मी याआधीही लिहिली होतीच. घटना घडली की दोन्ही बाजूच्या व्यक्तींची जात कोणती आहे याचा शोध आधी घेतला जातो. नंतर स्वतःची जात लक्षात घेत सोयीस्कर मांडणी केली जाते. ज्या घटना जातीय मानसिकतेतून होतात त्याची चर्चा करताना जातवास्तव मांडणे गैर नाही. मात्र जातीचा काहीही संबंध नसताना केवळ विकृत आणि वासनांध मानसिकतेतून घडलेल्या घटनेलाही जातीचे कोंदण लावण्याचा प्रकार 'ग्रेटच' म्हणायला हवा. याबाबत फेसबुकवर अनेक विचारवंत (?) आणि तथाकथित बहुजनवादी यांच्या उथळ आणि विक्षिप्त प्रतिक्रिया पाहून घडलेल्या घटनेचे त्यांना काही गांभीर्य नाही हे जाणवेल. अशा लोकांना सोयीस्कर मांडणी करून सामाजिक कलह निर्माण करायचा असतो असेच त्यांच्या भूमिकेवरून वाटते. यातील अनेक लोक माझे चांगले मित्रही आहेत. परंतु त्यांच्या भूमिका मात्र अतिशय गलिच्छ आणि जातीय आहेत. ज्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळवून देणे राहिले बाजूलाच. या महाभागांनी आरोपींची जात शोधून (तीही खरी की खोटी माहीत नाही ) त्यांच्या जातीवरच निशाणा लावला. का ? तर म्हणे दलित अत्याचाराच्या प्रकरणात मराठा समाजाला टार्गेट केले जाते. म्हणून हे आता दलितांना टार्गेट करणार. कारण आरोपी म्हणे दलित समाजातील आहे. परंतु आरोपींनी सदर विकृत काम करताना जातीचा हिशेब मनात ठेवून अत्याचार केला का ? सदर प्रकरणात कुठेही जातीय भावना असल्याचा इंचभर पुरावाही कुणी दिला नाही. तरीही दलित समाज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना दूषणे देतच अनेकांनी आपला राग व्यक्त केला. कोपर्डी प्रकरणामुळे काहींनी मागचे हिशेब चुकते करून घेतले.
 
फेसबुकवर एकाने लिहिले, "शिवरायांची तलवार खाली ठेवून आम्ही बाबासाहेबांची घटना हातात घेतली. आमचे काही चुकले तर नाही ना ?" काय अर्थ होतो या ओळींचा ? बाबासाहेब मराठा समाजाने स्वीकारले ही स्वागतार्ह गोष्ट आहे. असे असताना राज्यघटना स्विकारण्याच्या आपल्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उभे करण्याचे लॉजिक काय असेल ? समजा आरोपी दलित समाजातील होता असे गृहीत धरून चालू. परंतु त्यामुळे बाबासाहेब, आंबेडकरी विचार आणि राज्यघटना कुठे दोषी ठरतात ? की राज्यघटना स्वीकारल्यामुळे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यात अडचणी येणार आहेत का ? नक्कीच नाही.. उलट घटनात्मक मार्गानेच आपण पीडितेला न्याय मिळवून देऊ शकतो. मग अशी विधाने करण्यात काय हशील ? अजून एक पोस्ट बघा, ''शिकायचे सोडून संघटित झालेल्या आणि संघर्ष करायचा सोडून दारू पिऊन बलात्कार करू लागलेल्या खेचरांचा केवळ ते कुठल्यातरी समाजातील आहेत म्हणून साधा निषेधसुद्धा करायचा नाही असा काही नियम आहे का ? त्यांना निषेधातसुद्धा सवलत पाहिजे का ?" किती जातीयवादी विधाने आहेत ही. यात पीडितेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आहे ? की अशा प्रकारच्या निर्दयी, अमानुष घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काही उपाययोजना आहेत ? पूर्णपणे जातीय मानसिकतेतून आणि सूडबुद्धीने लिहिलेली ही वाक्ये आहेत. अशा लोकांना पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराचे काहीही सोयरसुतक नसते. त्यांना केवळ जातीय हिशेब चुकते करायचे असतात. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा बाबासाहेबानी दिलेला मूलमंत्र केवळ दलित समाजालाच नव्हे तर सर्वांसाठीच अनुकरणीय आहे. अशा महान विचारांची विटंबना कोणत्या शब्दात केली गेलीय तेही लोकांनी पाहावे. याच मित्राने एका पोस्टमध्ये 'बाबासाहेबांची लेकरे' या शब्द प्रयोगाचा आधार घेऊन त्यांना 'डुकरे' असे संबोधले. यात काहीतरी समाजभान दिसते का ?

एकाने लिहिले, "बलात्कार करायचा तर त्याच्या आई-बहिणीवर करावा, आमच्या आई-बहिणीकडे बघायचं नाही " प्रत्यक्ष बलात्कार करणाऱ्या मानसिकतेपेक्षा ही मानसिकता काय कमी आहे का ? बलात्कारी व्यक्तीची आई आणि बहीण यासुद्धा स्त्रियाच आहेत. एक स्त्री म्हणून त्यांनाही आपण सन्मान दिलाच पाहिजे. झाल्या प्रकारात त्यांचा काही दोष आहे का ? ज्यांनी हा अपराध केला त्याला कायदा शिक्षा देईल ना ? परंतु अशा प्रकारे कुणाच्या आई-बहिणीची इज्जत काढण्याचा आपणाला काय अधिकार ? काहींनी सदर घटनेचा बादरायण संबंध सैराटशी जोडला. सैराटमध्ये सवर्ण समाजाच्या अन्याय्य मानसिकतेचे चित्रण केले आहे. तर काहीजणांनी यानिमित्ताने सैराटवर तोंडसुख घेतले आणि आता उलट सैराट काढणार का असा प्रश्नही विचारला ? एकाला तर फुले-शाहू-आंबेडकरी, पुरोगामी विचारसरणी स्वीकारल्याचा खूपच पश्चाताप झाला. त्याने लिहिले, "आता बस झाला बहुजनवाद, आता फक्त मराठा वाद." अजून एकाने तलवारी पुन्हा हातात घेण्याची भाषा केली. तर काहींनी बलात्कार करणाऱ्याचे लिंगच कापून टाकावे असा सल्ला दिला. धनंजय मुंडेंनी काहीही शहानिशा न करता आरोपीच्या नावाशी साधर्म्य असलेल्या मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्याबाबत संभ्रम निर्माण केला. राम शिंदेंच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर शिंदे यांच्यासोबतचा फोटो टाकला होता. केवळ नावात साम्य आहे एवढ्या एकाच गोष्टीवरून मुंडे यांनी शिंदे यांचा राजीनामा मागितला. नंतर आरोपी आणि शिंदे यांचा कार्यकर्ता या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे सिद्ध झाले. हे उदाहरण एवढ्यासाठीच दिले की इथेही पीडितेला न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकीय हिशेब चुकते करण्याची एक संधी म्हणून कोपर्डी प्रकरणाकडे पाहिले गेले.

कोपर्डी प्रकरण खरेच दुर्दैवी आहे. याबाबत जितका राग व्यक्त करू तितका कमीच ठरेल याचीही जाणीव आहे. पण म्हणून घटनात्मक मार्ग सोडून हिंसेचा पुरस्कार किंवा ज्या घटनेत काहीही जातीय संबंध नाही त्याचा जातीशी संबंध जोडून सामाजिक कटुता निर्माण करणे हे चुकीचे आहे. मागे मी सह्याद्री बाणावर जवखेडा-खर्डा प्रकरणावर लिहिले होते. त्या लेखातील काही भाग असा होता-

"सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकरणात शोषित, पिडीत व्यक्तीच्या, कुटूंबाच्या मागे सर्व समाज उभा रहात नाही. ज्या जातीतील व्यक्तींवर अन्याय झाला आहे त्यांचे ते पाहून घेतील ही समाजविघातक व्रुत्ती सामान्य माणसात आढळते. हाही द्रुढ जातीव्यवस्थेचा परिपाक होय. अर्थातच याला काही सन्माननीय अपवादही आहेत. परंतू बहुतांशी समाज मात्र अशा प्रकरणात शांतच राहतो. दलित अत्याचाराच्या सर्व घटनांमध्ये अत्याचार करणारे बहुजन समाजातीलच असतात. जातीव्यवस्था हा जरी इथल्या ब्राह्मणी व्यवथेचा परिपाक असला तरी त्यामाध्यमातून अन्याय करणारे बहुजन समाजातीलच घटक आहेत हेहे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. अन्याय करणारा बहुजन आहे ब्राह्मण, मराठा आहे कि ओबीसी हा वाद न करता अशा प्रकारच्या प्रव्रुत्तीना कठोर शिक्षा होऊन पिडीताना न्याय मिळावा म्हणून सर्व समाजाने आग्रही राहिले पाहिजे." (संदर्भ- खैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे...)

हीच माझी सर्व प्रकरणात भूमिका आहे. अत्याचार करणारा कोणत्याही जातीचा असो. पीडित व्यतीची जात-धर्म काहीही असो. आपण माणूस म्हणून आणि समाजाचा एक जागृत घटक म्हणून अशा प्रकरणी व्यक्त होऊ शकत नाही का ? सदा सर्वकाळ आपल्या मनात असणारी जात आपण अशा संवेदनशील घटनेबद्दल बोलत असताना बाजूला ठेवू शकत नाही का ? आपल्या मनातील जातीय हिशेबाला  तिलांजली देऊ शकत नाही का ? इतके सारे लिहिल्यानंतरही काही महाभाग माझी जात काढायला टपलेत. खैरलांजी, खर्डा, जवखेडे प्रकरणातील आरोपी किंवा पीडित माझ्या जातीचे नव्हते, तरीही माणूस म्हणून मी व्यक्त झालो. नुकत्याच घडलेल्या 'कोल्हापूर ऑनर किलिंग ' प्रकरणात ब्राह्मण मुलगा आणि त्याच्या बायकोची निर्घृण हत्या झाली. तेव्हाही मी माझ्या जातीचा विचार न करता व्यक्त झालो. शिवरायांची बदनामी झाली तेव्हाही मी व्यक्त झालो. आणि आता कोपर्डी प्रकरणात मुलगी किंवा आरोपींची जात कोणती हा प्रश्न न पडता मी व्यक्त होतोय. कधी मला ब्राह्मणद्वेषी म्हटले जाते तर कधी मराठ्यांचा द्वेष करतो असे आरोप केले जातात. कधी माझ्या आंबेडकरी विचारांवर असणाऱ्या निष्ठेवर शंका घेतली जाते. तरीही या सर्व गोष्टींचा विचार न करता एक माणूस म्हणून मी व्यक्त होत आलोय आणि होणार. माणुसकीच्या नात्याने व्यक्त होणारे माझ्यासारखे अनेक आहेत हेही मला माहीत आहे. स्वतःची इतकी वकिली करण्याचे कारण म्हणजे मी जे लिहिलेय त्याच्यावर चर्चा न करता अनेकजण माझ्या हेतूवरच चर्चा करतील. ब्राम्हण, मराठा अथवा दलित कुणावरही अन्याय झाला तर मी या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले आहे. कधीच एका कोणत्या जातीला दोष दिलेला नाही. कृपा करून तसा गैरसमज करून घेऊ नका.

कोपर्डी प्रकरणाची चर्चा करताना काही अज्ञानी लोकांनी उलट-सुलट मांडणी करून समाजमन कलुषित केले आहे. जाती-पातीचा विचार ना करता आपण माणूस म्हणून  पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहू. तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. महात्मा फुलेंनी आयुष्यभर ब्राह्मणी विचारसरणीविरुद्ध संघर्ष केला. तेच महात्मा फुले म्हणतात, 'मांग-ब्राह्मणासी धरावे पोटाशी'. त्याच फुल्यानी ब्राह्मणांच्या विधवांच्या अर्भकाचा जीव वाचावा म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. एवढा उदात्त वारसा असताना त्यांचेच नाव घेऊन आपण जातीय मानसिकतेला कुरवाळत बसलो तर नुकसान आपलेच आहे. नंतर भविष्यात पश्चाताप करण्यालाही अर्थ उरणार नाही असे काही आपल्या हातून आत्ता घडू नये एवढीच इच्छा.

33 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes