मंगळवार, जुलै ०५, २०१६

हिंसाचार : एक दृष्टिकोन

हिंसाचाराचा उगम आपणाला टोळीजीवनापासूनच दिसून येतो. पूर्वीच्या काळी जेव्हा समाज टोळी जीवन जगात होता, तेव्हा दोन टोळ्यांमधील परस्पर संबंधात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा उद्भव दिसून येतो. त्या टोळ्यांमध्ये स्त्रिया तसेच शिकार अशा अनेक कारणांवरून झगडे होत असत. हिंसाचार हा टोळी जीवनाचा एक अविभाज्य भागच बनून गेला होता. टोळी जीवनातील रूढ संकेतांनुसार हा हिंसाचार समाजमान्य होता. म्हणजे एका टोळीने दुसर्या टोळीवर
हल्ला करून त्या टोळीतील स्त्रिया पळवून आणणे, त्या टोळीची शिकार पळवून आणणे, त्यासाठी छोट्या-मोठ्या लढाया करणे हे सर्व स्वाभाविकच होते. टोळी जीवनात हिंसाचाराला कोणीही चुकीचे समजत नसे, कारण समाज सुसंकृत नव्हता. संस्कृतीचा उगम अजून व्हावयाचा होता. अशा परिस्थितीत जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक वाटत त्या गोष्टी टोळी जीवनातील मानव करत होता. कारण त्याशिवाय त्याला जगणेच अशक्य बनले असते. स्वसंरक्षणासाठीही टोळ्या एकमेकांवर हल्ले करून प्रचंड हिंसाचार करत असत. 

परंतु मानवाला इतर प्राण्यांपेक्षा तल्लख मेंदू लाभल्याने मानवाने स्वतःच्या बुद्धीने अनेक गोष्टी केल्या ज्या इतर प्राण्यांना जमल्या नाहीत. उदा. मानवाने एक सभ्य संस्कृती निर्माण केली, त्या संस्कृतीची विशीष्ठ तत्त्वे होती. हि तत्त्वे सर्वांवर बंधनकारक असत. त्यातूनच पुढे धर्मव्यवस्था निर्माण झाली. शेतीचा शोध लागल्यानंतर मानवाचे भटकने थांबले. परिणामी माणूस एका जागी स्थिर झाला. वसाहती करून राहून लागला. टोळी जीवनातील हिंसाचार आता स्थिर झालेल्या मानवाला अडचणीचा वाटू लागला. हिंसाचार कमी झाला, मात्र पूर्णपणे थांबला नाही. फरक इतकाच पडला कि समाजाने काही नियम, कायदेकानून ठरवून घेतले. परंतु त्याच्या अधीन राहून सुद्धा हिंसाचार सुरूच राहिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि हिंसाचार हा आदिम काळापासूनच होत आलेला आहे. काळानुसार त्याचे स्वरूप बदलले. परंतु हिंसाचाराचे पूर्ण उच्चाटन झाले नाही. हिंसाचारमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर हिंसाचाराचा व्यापक अंगाने विचार करावा लागेल. हिंसाचार म्हटलं कि आपणाला फक्त शारीरिक हिंसाचारच आठवतो. परंतु मानसिक हिंसाचारही असू शकतो. किंबहुना शारीरिक हिंसेपेक्षा मानसिक हिंसाच जास्त घातक असते. शारीरिक हिंसा उघडपणे दिसून येते. त्याचे परिणाम थोड्या काळासाठी जाणवतात. याउलट मानसिक हिंसाचार उघडपणे दिसून येत नाही. त्याचे परिणाम दीर्घकाळासाठी जाणवतात परंतु ते भयावह असू शकतात. मानसिक हिंसाचाराचे सर्वात मोठे उदाहरण द्यायचे झाले तर ते भारतीय जातीव्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यात देता येईल. भारतातील जवळजवळ  साडेतीन  हजार जाती मानसिक गुलामगिरीत हजारो वर्षे जगत आल्या आहेत. त्यांचे मानसिक खच्चीकरण केले गेले. या जातींवर अनन्वित अत्याचार झाले. सत्ता, संपत्ती, ज्ञान अशा गोष्टींपासून या जातींना दूर ठेवण्यात आले. मानसिक हिंसाचारामुळे या जातींचा आत्मसन्मानच हिरावून घेतला गेला. आजही बहुतांशी जातींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. यावरून मानसिक हिंसाचाराची भयावहता आणि व्याप्ती दिसून येते.  

जगामध्ये आज जो काही हिंसाचार होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे धर्म, वंश, लिंग, भाषा यावरून होणारा भेदभाव हा आहे. धर्माचा तर हिंसाचाराशी अत्यंत जवळचा संबंध आहे. गेल्या काही वर्षात घडणाऱ्या दहशतवादी घटना, त्यांचा धर्माशी निकटचा संबंध, त्यात जाणारे निर्दोष लोकांचे बळी हे सर्व पाहता आपणाला धर्म, धर्माच्या नावाने होणारा दहशतवाद आणि त्यामाध्यमातून घडणारा हिंसाचाराची सांगड घालता येईल. धार्मिक दहशतवादाच्या ज्या काही घटना घडत आहेत त्यातल्या बहुतांशी घटनांच्या पाठीमागे धर्माचे अपुरे व सोयीस्कर आकलन कारणीभूत आहे. सध्या इसीस, अल कायदा, बोको हराम अशा काही कट्टर मुस्लीम संघटना दहशतीच्या जोरावर धर्मप्रसार करण्याचे मनसुबे बाळगून आहेत. 

दहशतवाद म्हणजे व्यक्ती किंवा मालमत्ता यांच्या विरुद्ध धमकावणे, जुलूम करणे, खंडणी मागणे अशा मार्गाने शक्ती किंवा हिंसेचा वापर करणे. प्रत्येक दहशतवादी कृत्यामध्ये हिंसाचार घडतच असतो. अनेकदा नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी कारवाया केल्या जातात. यामध्ये सामान्य लोकांना धमकावणे, जखमी करणे, ठार मारणे, त्यांच्या खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहचवणे अशा गोष्टींचा समावेश होतो. दहशतवादी गट किंवा व्यक्ती या अनेक कारणांनी असंतुष्ट असतात. कधी सामाजिक व्यवस्थेवरील राग, तर कधी राजकीय सत्ता उलथवून टाकण्यासाठी काही असंतुष्ट लोक सशस्त्र आणि हिंसक मार्गाचा अवलंब करतात. धर्माच्या नावाने पसरवला जाणारा दहशतवाद असो वा भारतातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढण्याचा दावा करणारे माओवादी-नक्षलवादी असोत, सर्वचजण आपापल्या ध्येयपूर्तीसाठी हिंसाचाराचा आधार घेतात. सध्या जगभरात इसिसने जो धुमाकूळ घातला आहे त्यावरून दहशतवादाची भीषणता लक्षात यावी. सिरियातील लोकनियुक्त सरकार पदच्युत करून इस्लामिक क्रांती करण्यासाठी इसीस सध्या जोरदार प्रयत्न करत आहे. आत्ताआत्तापर्यंत अमेरिका व काही युरोपीय देशांच्या पैशावर आणि शस्त्रांवर पोसल्या गेलेल्या या संघटनेला अमेरिका व युरोपीय देश विरोध करू लागले आहेत. काही देशांनी तर आपल्या सेना इसिसच्या विरोधात मैदानात उतरवल्या आहेत. इसीस आणि इतर देश यांच्या संघर्षात अनेक निरपराध नागरिक मारले जात आहेत. लाखो लोकांनी स्थलांतर केले आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित होत आहेत. स्त्रिया, बालके यांच्याप्रती मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा वापर करण्यात आला. हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने कुणालाच आपल्या जीवाची शाश्वती वाटत नाही.

गेल्या काही दिवसात युरोपात विशेषत: फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले झाले. यात अनेक निरपराध लोकांचा बळी गेला. माणसे किड्यामुंगीसारखी मरूनही हिंसाचाराचे हे थैमान थांबायचे नाव घेत नाही. भारताचा विचार केला तर गेल्या काही वर्षात दहशवादी हल्ल्यात वाढ झाल्याचे दिसून येते. २६/११ च्या जखमा अजूनही भरून आल्या नाहीत. १९९३ च्या दंगली, बॉम्बस्फोट यातील बळींना न्याय मिळाला का हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. गोधरा हत्याकांडाचा कलंक धुवून निघाला नाही. नक्षलग्रस्त भागात रोज हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. तेथील आदिवासी समाज नक्षलवादी आणि पोलीस अशा दुहेरी कात्रीत सापडला आहे. ईशान्य भारतातील परिस्थिती तर खूपच भयावह आहे. बोडो दहशवादी, नागा दहशतवादी आणि बरेचसे लहान-मोठे गट सशस्त्र मार्गाने आपला अजेंडा पुढे रेटत आहेत. बांगलादेशी स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे आसाममध्ये मोठ्या प्रमाणात मूलनिवासी विरुद्ध स्थलांतरित असा रक्तरंजित संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूनी झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत शेकडो बळी गेले आहेत. दहशतवाद आणि हिंसाचार तेथील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अफ्स्पा (Armed Forces Special Power Acts) मुळे तेथे सशस्त्र दलांना अनियंत्रित अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे बर्याचदा कारवाईच्या नावाखाली भारतीय सेनेकडूनही निरपराध लोकांना हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. गेली २०-२२ वर्षे इरोम शर्मिला या मणिपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अफ्स्पा कायद्याच्या विरोधात उपोषण करत आहेत. कारण या कायद्यामुळे माओवाद, हिंसक घटना तर थांबल्या नाहीतच, परंतु लष्कराकडून मोठ्या प्रमाणात मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

महिलांविरुद्ध होणार्या हिंसाचाराच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. आज जगभरात सर्वत्रच स्त्रियांना हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. युनिसेफच्या एका अहवालानुसार भारतात स्त्रियांवरील हिंसाचारात १२% वाढ झाली आहे. मागील चार वर्षात बलात्काराच्या घटना दहापटीने वाढल्या आहेत. जगभरात जवळजवळ ७०% स्त्रियांना कधी ना कधी शारीरिक, मानसिक वा  लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागते. हिंसाचार करणाऱ्यात स्त्रियांच्या विश्वासातील वा जवळचेच लोक आघाडीवर आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार अमेरिकेमध्ये एका वर्षात होणाऱ्या महिलांच्या हत्यांमध्ये त्यांच्या जवळच्या व्यक्ती (उदा. पती, भाऊ, मित्र, प्रियकर) दोषी आहेत. भारतात हुंड्यासाठी होणाऱ्या स्त्रीहत्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे. युरोपियन देशांमध्ये २८% महिला आपल्या जोडीदारांकडून होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक हिंसाचाराला बळी पडतात. २०१२ मध्ये दिल्लीयेथे झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले कि ९२% स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हिंसाचारचा सामना या ना त्या रुपात करावा लागतो. ८८% स्त्रियांना शाब्दिक हिंसाचाराचा सामना करावा कागतो. उदा. छेडछाड, अश्लील शेरेबाजी, शिव्या, अश्लील हावभाव वगैरे. जगभरात ७०० दशलक्ष मुलींचा बालविवाह होतो. त्यातील एक तृतीयांश मुलींचा विवाह  पंधराव्या वर्षाच्या आतच होतो. १२० दशलक्ष स्त्रियांना जबरदस्तीने लैंगिक संबंधांसाठी भाग पाडले जाते. यात स्त्रीच्या नवरा किंवा जवळच्या इतर नातेवाईकांकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. एकूणच स्त्रियांना मोठ्या प्रमाणात हिंसाचार सहन करावा लागतो. 

कोणताही समाज हिंसाचारापासून मुक्त नाही. समाजातील उपेक्षित घटक सर्वात जास्त प्रमाणात हिंसाचाराचे बळी पडत आहेत. यात बालके, स्त्रिया, अपंग, वृद्ध, मागास जाती-जमाती यांचा समावेश आहे. बालकांच्या बाबतीत घडणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण जगभरात खूपच जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, युनिसेफ अशा काही आंतरराष्ट्रीय संघटना बालकांचा हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी आणि एकूणच बालकांचा हिंसाचारमुक्त, भयमुक्त वातावरणात विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगभरातील ज्या देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता, राजकीय अस्थिरता आहे अशा ठिकाणी हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे. सध्या इसिसच्या प्रभावाखाली मध्य आशियातील अनेक देश, अफगानिस्तान, पाकिस्तान अशा देशात दहशतवादी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात बालकांचा बळी गेला आहे. काही आफ्रिकन देशात अल्पवयीन बालकांच्या सशस्त्र सेना उभारून त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणला जातो. म्हणजे एका बाजूला लहान मुले हिंसाचाराला बळी पडत आहे तर दुसर्या बाजूला त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे याबातीतले अहवाल पाहिले तर बालाकांप्रती घडणाऱ्या हिंसाचाराची दाहकता दिसून येईल. Violence Against Children- United Nations Secretary General's Study या अभ्यासात असे आढळून आले आहे कि बालाकांप्रती हिंसाचार हा सर्वत्रच होत आहे. जगभरातील प्रत्येक देशात, सर्वच सामाजिक स्तरात हिंसाचाराचे कमी-अधिक प्रमाण दिसून येते. बालकांच्या परिचित व्यक्तींकडूनच मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे असंही या अहवालात दिसून आले आहे. या हिंसाचारात बालकांना मारहाण, लैंगिक शोषण, उपाशी ठेवणे, अपमान करणे, त्यांच्याकडून बळजबरीने कामे करवून घेणे, त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल असे वर्तन करणे अशा गोष्टींचा समावेश होतो. सामाजिक, राजकीय अस्थिरता, आर्थिक-सामाजिक मागासलेपणा या गोष्टी बालकांप्रती होणाऱ्या हिंसाचाराला अधिकच हातभार लावत आहेत. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes