गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१६

JNU मधील कथित देशद्रोह...

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयु) विद्यार्थ्यांचा कथित देशद्रोह आज चर्चेचा विषय बनला आहे. रोहित वेमुलाचे प्रकरण शांत होते न होते तोवर जेएनयुमधील कन्हैय्या कुमार याचे हे प्रकरण उभे राहिले. (या गोंधळात येवू घातलेल्या अर्थसंकल्पाबद्दल एकही जण चर्चा करत नाही ही सरकारच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.) 


तर मुद्दा असा आहे कि जेएनयुमधे एका कार्यक्रमात  अफझल गुरुला फाशी दिली तो दिवस जेएनयुमधील काही डाव्या संघटनानी साजरा करायचे ठरवले. अफझल गुरुची फाशी म्हणजे न्यायलयीन हत्या आहे असा आरोप त्यानी या कार्यक्रमात केला. त्यानी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अफझल गुरुबाबत त्यानी अशी भूमिका घेण्याचे नेमके कारण समजले तर त्याबद्दल निश्चितपणे आपणाला काही भूमिका घेता येईल. परंतु तोवर उतावीळ होवून त्या विद्यार्थ्याना देशद्रोही ठरवणे चुकीचे आहे. परंतु याचे भान ना राजनाथसिंग याना राहिले ना इतर भाजप नेत्याना. अभाविपबद्दल तर बोलायलाच नको. त्याना अशा प्रकारचे वाद निर्माण करण्यासाठीच नेमले आहे कि काय अशी शंका येते. तर भाजप, अभाविप किंवा संघ परिवारातील व्यक्ती/संघटना हे सर्वाना देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत फिरत असतात. याच उजव्या लोकांचा आदर्श असणार्या नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली. त्या अर्थाने गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी आणि देशद्रोही आहे. अशा गोडसेवर नाटक काढून त्याचे उदात्तीकरण केले जाते. त्याला फाशी दिली तो दिवस बलिदान दिन, शहीद दिन म्हणून साजरे केले जातात. खुलेआम नथुरामचे समर्थन करुन गांधीहत्या हे पुण्यकर्म असल्याचे सांगितले जाते. नथुरामचे नाव रस्ते, पूल,  वास्तू याना देण्याचे प्रयत्न केले जातात. देशद्रोही नथुरामच्या समर्थनाचे इतके प्रयत्न होत असताना जेएनयुमधील विद्यार्थ्यानी अफझल गुरुविषयी सहानुभूती बाळगली म्हणून आरोप करण्याचा अधिकार नथुरामच्या समर्थकाना कसा असेल ? भाजप आणि संघ परिवाराने एकदा आपल्या निष्ठा तपासून पहाव्या. मोदी एकीकडे गांधीजींचे गुणगाण गाणार आणि त्यांच्या इतर सहकार्यानी मात्र नथुरामचे पोवाडे गायचे हा दुटप्पीपणा किती दिवस चालणार आहे ? आपणाला गांधींचा वारसा हवा आहे कि नथुरामचा हे आम्हाला ठरवावे लागेल ?

दिड वर्षापूर्वी कॉंग्रेसची दशकभराची सत्ता नेस्तनाबूत करुन भाजप सरकार (खरेतर मोदी सरकार ) सत्तेवर आले. त्यानंतर अनेकवेळा देशात विविध ठिकाणी जातीय-धार्मिक वादाचे मुद्दे निर्माण झाले. मुझफ्फरनगर दंगल, अखलाक हत्या प्रकरण, आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल बंदी, रोहित वेमुल्ला आत्महत्या,  आरक्षण मागणीसाठी विविध जातींची हिंसक आंदोलने आणि आता जेएनयुमधील कथित देशद्रोहाचे प्रकरण अशी भली मोठी यादी सांगता येईल. अर्थात आधी कधीच अशा प्रकारच्या घटना घडल्या नव्हत्या अशातला भाग नाही. मात्र या सर्व घटना हाताळण्यात सध्याचे मोदी सरकार एकतर कमी पडले किंवा त्यानी जाणीवपूर्वक चुकीच्या प्रकारे या प्रकरणाचे नियंत्रण केले. यातील अनेक प्रकरणांत सरकारी पातळीवरुन झालेला अनावश्यक हस्तक्षेप आणि सत्ताधारी पक्षातील वाचाळवीर यानीच जाणीवपूर्वक तेल ओतले असे दिसून येईल. भाजप पक्ष स्वत: देशभक्त असल्याचा आव आणून प्रत्येक प्रकरणात आपल्या वैचारिक विरोधकाना देशद्रोही संबोधत आहे. अशा परिस्थितीत एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधार्यानी द्यावीत. 

१ अफझल गुरु याच्या कथित समर्थनावरुन भाजप सरकारने कन्हैय्याकुमार याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच अफझल गुरुला शहीद मानणारा पीडीपी पक्ष भाजपला कसा काय चालतो ? पीडीपीची अफझल गुरु आणि एकुणच काश्मीर प्रश्नावर अनेकदा वादग्रस्त भूमिका घेवूनही केवळ सत्तेसाठी भाजप पीडीपीला उराशी कवठाळत आहे का ?

२. जसा अफझल गुरु देशद्रोही आहे तसाच महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हाही देशद्रोहीच नाही का ? भाजपचा अफझल गुरुला विरोध आहे आणि नथुराम गोडसेचे समर्थन ते कसे करतात ? भाजप आणि संघ परिवाराने एकदा नथुराम गोडसेप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी. 

३. नथुराम गोडसे याचा फाशीदिन हा बलिदान दिन, शहीद दिन म्हणून साजरा करणार्यांवर भाजप सरकार देशद्रोहाचे कलम लावणार का ?

४. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या मारेकर्यांचेही खुलेआम समर्थन होत असताना त्यावर काही कारवाई का होत नाही ?

वरील प्रश्नांची उत्तरे भाजपला द्यावी लागतील. देशभक्ती सक्ती करुन लादता येत नाही. हिटलरच्या नाझी व्यवस्थेचे मुलभूत सूत्रही आत्यंतिक देशप्रेम आणि त्याला वंशवादाची जोड हे होते. जर भाजप सरकार टोकाच्या देशप्रेमाला धर्मवादाची जोड देवून त्याची सक्ती नागरिकांवर करणार असेल तर देशात अराजक निर्माण होईल. भाजप सरकार संघाचा सामाजिक अजेंडा राबवू पाहत आहे. परंतु त्यामुळे देश पुन्हा एकदा विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा राहील याची जाणीव भाजप आणि प्रधानसेवक नरेंद्रजी मोदी यानी ठेवावी.

2 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

manachai laaj nahi tya lokana,janachi pan soadli nhaitar thoditari deshasathi kalval dakhvali asti, pan tumhala hyach lokancha pulka ka yeto te samjat nahi.

sandeep thorat म्हणाले...

Mala vatate tumhi India after Gandhi he pustak vachayla have ya Congress be geli kittyek varsh rajya kele ya deshavar ya deshachi kiti pragati jhali Congress ne fakt jativad va dharmvadala khatpani ghatle va aple pik kadhle yacha sarasar vichar jhala pahije purn mahiti ghevun Congress nech ya deshatil pratishthit padannahi chaplushi shikavli udaharnarth Rashtrapati pad ya goshthincha vichar karayla hava Arakshan - kharokharach arakshanacha fayda garju vidyarthi kinva lokanna jhala ka Karan jya samajatil lok pudhe gele tyanni kadhi aplya samajatil bakichya lokanna pudhe annyasathi kadhi vichar kela nahi mhanun ambedkaranni swatah fakth 10 varshansathi arakshan sangitale hote pan Congress ne geli 60 varsha tasach chalu tgevlay yala Karan Kay ase anek mudde ahet mhanun bjp var fakt tashere odhun kahihi honar nahi ethe fakt eka konachihi baju ghene va dosh dene chukiche tharel but deshachya vikasasathi bjp chi avashyakta ahe he tyanchya kamavarun Manya karave lagel gelya kalacha vichar karta

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes