गुरुवार, फेब्रुवारी ११, २०१६

सोनसाखळीनंतरचे प्रश्न...


दै. लोकसत्ता, ११ फेब्रूवारी २०१६

एका शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुरवानंद स्वामी याना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस उपस्थित होत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यानी एक भक्तीगीत गायले असता त्यांच्यावर खूष होवून या अध्यात्मिक बाबानी हवेतून हात फिरवून एक सोन्याची साखळी काढली आणि सौ. फडणवीस याना दिली. आश्चर्य म्हणजे त्यानी ती साखळी चक्क स्वीकारली. 

आपण अंधश्रद्धा मानत नसून श्रद्धेने ती साखळी स्वीकारल्याचे त्यांचे म्हणने आहे. आपले पती एका घटनात्मक पदावर असताना ( आणि तेही राज्याच्या प्रमुखपदी ) आपण जाहीररित्या ती साखळी स्वीकारुन अंधश्रद्धेलाच खतपाणी घालत आहोत हे सौ. फडणवीस यांच्या ध्यानात यायला हवे होते. हा संपूर्ण प्रकार पाहून काही प्रश्न मनात आले.

१. शैक्षणिक संस्था मुलांचे भवितव्य घडवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात विद्न्याननिष्ठ आणि प्रयत्नावर विश्वास ठेवणारे विद्यार्थी घडवणे शिक्षण संस्थांचे काम आहे. एकीकडे विद्यार्थ्याना विद्न्यानाचे नियम शिकवायचे आणि दुसरीकडे वैद्नानिक सिद्धांतांचे उल्लंघन करणार्या बाबा-बुवा- मातांचा गौरव करायचा अशी दुटप्पी भूमिका शिक्षणसंस्था निभावत आहेत. त्यापेक्षा त्यानी शिक्षणसंस्था बंद करुन अध्यात्मिक आश्रम काढलेला बरा.

२. सौ. फडणवीस यानी ती साखळी स्वीकारुन अंधश्रद्धेला मान्यताच दिली आहे. ती साखळी स्वीकारण्याऐवजी त्या बाबाना चमत्कार सिद्ध करुन दाखवण्याचे आव्हान त्यानी द्यायला पाहिजे होते. सौ. फडणवीस याना जी मते पटतात ती स्वीकारण्याचा अधिकार जरुर आहे. मात्र आपण सार्वजनिक जीवनातील मोठी व्यक्ती आहोत आणि बरेच लोक आपले अनुकरण करण्याची शक्यता असते ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

३. स्वामी गुरवानंद यानी हवेतून सोन्याची साखळी, अंगठी, खडे आणि काय काय काढले असेल. या सर्व गोष्टींऐवजी त्यानी लोकसत्ताच्याच व्यंगचित्रात म्हटल्याप्रमाणे पाणी काढून दाखवावे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना तुम्ही जर अन्न आणि पाणी चमत्काराने निर्माण करु शकला तर सर्व समाज तुमचा रुणी राहील. गुरवानंद स्वामी आणि भारतातील सर्व चमत्कारी सिद्ध पुरुष आणि स्त्रिया यानी देशातील लोकांच्या समस्या ओळखून त्याचे निराकरण करावे. भविष्य जाणणार्या एकाही स्वामीला पठाणकोट हल्ल्याचे भविष्य कळू नये ? भारतात रोज कुठून ना कुठून दहशतवादी घुसत आहेत, त्याचा थांगपत्ता एकाही चमत्कारी बाबाला लागू नये ? देशातील बहुतांशी जनता भूकेने आणि तहानेने व्याकूळ झालेली असताना या चमत्कारी लोकाना अन्न-पाणी निर्माण करता येवू नये ? जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात असताना भारतीय अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खात आहे. त्याची घसरण या बाबाना रोखता येवू नये ? आश्चर्यच आहे ना ? जर या बाबा लोकांचे चमत्कार खरे असते तर सध्या निर्माण झालेल्या समस्या दिसल्या नसत्या. त्यामुळे समाजाने भोंदूंच्या नादी न लागता अभ्यास व प्रयत्नवाद यावर विश्वास ठेवायला हवा

2 टिप्पणी(ण्या):

प्रकाश पोळ म्हणाले...

'सोनसाखळीनंतरचे प्रश्न' (११ फेब्रू .) या माझ्या पत्रावरील 'बाऊ नको, बाकीच्या अंधश्रद्धा उखडा ' (१२ फेब्रू.) हे पत्र वाचले. पत्रलेखकाने पत्रात दोन मुद्दे मांडले आहेत. पहिला म्हणजे सौ. फडणवीस समाजात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून वावरत नसून एका मोठ्या बॅंकेच्या अधिकारी म्हणून वावरत आहेत. तसेच त्याना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. सौ. फडणवीस या कोणत्याही भूमिकेतून समाजात वावरत असल्या तरी अंधश्रद्धेचे जाहीर उदात्तीकरण करणे कधीही समर्थनीय ठरणार नाही. त्याना असणारे वैयक्तिक स्वातंत्र्य कुणीही नाकारणार नाही, मात्र अनिष्ठ काल्पनिक गोष्टी, चमत्कार, अंधश्रद्धा याला जर कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संमती देत असेल तर त्यावर टीका झाली पाहिजे. सौ. फडणवीस यानी अंधश्रद्धेचे प्रत्यक्ष समर्थन केले नसले तरी गुरवानंद स्वामींकडून सोनसाखळी स्वीकारुन (आणि तीही जाहीर कार्यक्रमात) त्यानी या खोट्या चमत्काराला मूक संमती दिली आहे असे वाटते.

पत्रलेखकाने मांडलेला दुसरा मुद्दा हास्यास्पद आहे. समाजात इतर प्रकारच्या अंधश्रद्धा अस्तित्वात असताना या प्रकरणाचा एवढा बाऊ करण्याची गरज आहे का असा प्रश्न ते विचारतात. समाजात इतर अंधश्रद्धा आहेत आणि त्याला वेळोवेळी विरोधही होत असतो. त्या अंधश्रद्धांकडे बोट दाखवून फडणवीस यांचे केविलवाणे समर्थन करणे चूकीचे आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या पत्रातील टीका सौ. फडणवीस या व्यक्तीवरील नसून अंधश्रद्धेच मूक समर्थन करण्याच्या प्रकारावरील होती. इतके जरी लक्षात घेतले तरी याबाबत शंका राहणार नाही.

Nishree Jain म्हणाले...


Nice Post.
indiaregisters provides domain registration, domain registration in india,cheap domain registration, domain registration in hyderabad.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes