गुरुवार, जानेवारी २८, २०१६

रोहित वेमुला- काही प्रश्न आणि उत्तरे

वसतिगृहातून निलंबित पाच विद्यार्थी, मध्यभागी रोहित
रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यापैकीच काही आक्षेपांचा घेतलेला परामर्श...

१. आपला पहिला मुद्दा असा आहे कि गरीब घरातील विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यांनी इतर चळवळी करत बसू नये. जर इतर गोष्टी करायच्या असतील तर त्या शैक्षणिक संस्थांच्या बाहेर कराव्या.


- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित आणि त्याचे सहकारी स्वतःच्या हक्काची, स्वाभिमानाची लढाई लढत होते. या जात-धर्माधारित व्यवस्थेत दलित, अल्पसंख्यांक, उपेक्षित, मागास वर्ग यांना टिकून राहायचे असेल तर संघर्ष केलाच पाहिजे. रोहितचा संघर्ष हा समतेसाठी, मानवमुक्तीसाठी तसेच संविधानातील स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी होता. रोहित अभ्यासाव्यतिरिक्त इतर राजकारण करत होता असेही नाही. आपला अभ्यास सांभाळून त्याने संघर्ष चालू ठेवला होता. तो पीएच. डी. चा शिष्यवृत्तीप्राप्त छात्र होता. त्याचे इतर सहकारीही शिष्यवृत्तीप्राप्त पीएच. डी. चे विद्यार्थी होते. याचा अर्थ त्यांनी या विषमतावादी व्यवस्थेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे म्हणजे राजकारण करणे नव्हे. आपली मते मांडणे, चळवळ करणे याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विद्यार्थ्याने फक्त अभ्यासच करावा असे नाही. विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. तेव्हा त्यांनी न्याय्य हक्कांसाठी संघर्षरत असणे हे देशाच्याच भल्याचे आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू अशा अनेकांनी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. त्यामुळेच समाजातील विषमता काही प्रमाणात का होईना कमी झाली. रोहित आणि त्याचे सहकारी हा वारसा पुढे नेत असताना त्यांच्या संघर्षाला अनावश्यक राजकारण म्हणून नाके मुरडणे हे आपल्या अभिजन मानसिकतेचे लक्षण आहे.

२. रोहितला वसतिगृहातून निलंबित केले तरी तो सुधारला नाही असे आपण म्हणता. त्याच्या आंदोलनाबद्दल आपले आक्षेप आहेत.
- वर सांगितल्याप्रमाणे रोहित आपल्या हक्कांची लढाई लढत होता. त्याचा मार्ग संविधान आणि लोकशाही प्रक्रियेशी सुसंगत होता, त्यामुळे त्याबद्दल कुणालाच तक्रार असण्याचे कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितला वसतिगृहातून निलंबित केले तेच मुळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या दबावामुळे असा आमचा सर्वांचा आक्षेप आहे. ज्या कथित मारहाण प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्याने तक्रार केली होती ती मारहाण झालीच नव्हती असे तेथील विद्यार्थी, सुरक्षारक्षक यांचे म्हणणे आहे. तसेच आपणाला मारहाण झाल्याचा बनाव करून अभाविप'चा कार्यकर्ता हॉस्पीटलमध्ये दाखल झाला. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला कोणतीही बाह्य इजा झाली नसल्याचा अहवाल दिला आहे. अभाविपचा कार्यकर्ता अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाला होता. त्यामुळे रोहितविरुद्ध जो काही बनाव करून त्याला गुंडाच्या पातळीवर नेवून बसवले जात आहे हे षड्यंत्र आहे.

३. अनेक दलित व अल्पसंख्यांक लोकांना हिंदूंचा द्वेष करायला शिकवले जाते.
- मुळात ब्राह्मणी व्यवस्थेने दलित-अस्पृश्य, आदिवासी यांना कधीही चांगली आणि समतेची वागणूक दिली नाही. त्यामुळे दलितांना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागला. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, कांशीराम हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. ब्राह्मणी व्यवस्थेचे बिनपगारी शिपाई म्हणून आमच्याच ओबीसी बांधवांनी दलित-अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार केला. दगड मारणार ओबीसी मात्र त्यापाठी मेंदू असायचा ब्राह्मणाचा. अर्थात काहीही असले तरी ब्राह्मण आणि अत्याचार करणारे ओबीसी दोघेही दोषी आहेत. अर्थात याला काही सन्माननीय अपवादही आहेत. आंबेडकरी चळवळीत काम करणारे, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले अनेक ब्राह्मण आणि ओबीसी आहेत. तर मुद्दा असा आहे कि ज्या घटकांनी पिढ्यानपिढ्या एखाद्यावर अन्याय केला तर त्या घटकाने आपणाविरुद्ध थोडाही आवाज काढू नये हे अपेक्षा खूप चुकीची आहे. दलित-अल्पसंख्यांक अन्यायाविरुद्ध बोलले तर ते नैसर्गिक मानले पाहिजे. काही घटक समाजात द्वेष पेरण्याचे काम करत असतीलही. मात्र त्यामुळे संपूर्ण चळवळीला आणि उपेक्षितांच्या संघार्षालाच नाकारणे चुकीचे आहे.

४. जगात सर्वत्र अल्पसंख्याकांना फारसे हक्क नाहीत, मात्र भारतात त्यांना जास्त हक्क, सुविधा आणि फायदे मिळतात असे आपण म्हणता.
- हा तर आपला आणि व्यवस्थेच्या समर्थकांचा गोड गैरसमज आहे. भारतात हिंदुबहुल राजकारण प्रामुख्याने चालते. दलित-अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन केल्याचे फक्त नाटक केले जाते. सत्तेवर कॉंग्रेस असो वा भाजप. दोघांचीही धोरणे दलित-मागास-अल्पसंख्यांक यांच्यावर अन्याय करणारीच आहेत. गेल्या दोन वर्षात घडणाऱ्या घटना पहिल्या तर हिंदुत्ववादी शक्तींना किती बळ आलंय ते दिसून येईल. मुस्लिम-दलितांच्या राजरोस हत्या होत आहेत, त्यांना आत्महत्या करायला भाग पडत आहे आणि वरून त्यांनी नाकासमोर बघून चालावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हे कशाचे लक्षण आहे ? भारतातल्या बहुसंख्यांक राजकारणाचीच ही परिणती नव्हे काय ?

५. पाणी मी रहकर मगरमच्छ से वैर नही रखना चाहिये.
- याचा अर्थ प्रथापित, अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध बोलायचेच नाही का ? समोर चुकीचे घडत आहे आणि आपण गप्प बसायचे का ? आणि जर गप्प न बसता संघर्षाचा मार्ग निवडला तर त्याला संपवण्याचा प्रयत्न होणार का ? दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, रोहित या सर्वाना गप्प बसण्याचा मार्ग उपलब्ध होता. परंतु ही व्यवस्था राजरोस नैतिक मूल्यांचे खून पाडत असताना गप्प राहणे वरील व्यक्तींना योग्य वाटले नाही. या संघर्षात आपल्या जीवाचे बरे-वाईट होवू शकते याचीही जाणीव त्यांना होती. तरीही त्यांनी संघर्ष केला. दाभोळकरांना संपवले म्हणून पानसरे गप्प बसले नाहीत. पानसरेना गोळ्या घातल्या म्हणून कलबुर्गी शांत राहिले नाहीत. आणि या तिघांच्याही मारेकर्यांना पकडावे म्हणून प्रयत्न करणारा रोहितही शांत राहिला नाही. सर्वाना माहित आहे कि या संघर्षात काहीही होवू शकते. परंतु हा लढा आमच्या स्वार्थासाठी नाही. तर उदात्त मानवी मूल्यांसाठी आहे. त्यामुळे आम्हीही रोहितच्याच मार्गाने हा लढा लढत राहू. भले आपण काहीही करा....
-------------------------------------------------------------------------------------------------------

Tags:-

rohit vemula, bandaru dattatrey, amedkar students association, amedkar-periyar study circle, smriti irani, narendra modi, akhil bhartiy vidyarthi parishad, haiderabad central university, vice chancellor apparav, ramchandra, bjp, abvp, rss, vhp, hindu ideology, sucide of rohit vemulla, murder of rohit vemula, arvind kejariwal, rahul gandhi, dalit scholar murdered at hiederabad, dalit activist protest against abvp, atrocities against dalits, progressive movement.

दलित चळवळ, रोहित वेमुला, रोहित वेमुलाची आत्महत्या, दलित विद्यार्थ्याची आत्महत्या, हैदराबाद विद्यापीठ, दलित अत्याचार, बंडारू दत्तात्रेय, स्मृती इराणी, नरेंद्र मोदी, भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन, आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल, दलित विद्यार्थ्यांची हकालपट्टी.

1 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

मागास वर्गीयाने आत्महत्या केली की लगेच इतरांची जात काढली जाते. पण ह्या देशात ह्याने एकट्यानेच आत्महत्या केली काय?
गल्लीतील गुंडांना घाबरून तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुली जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा त्या गुंडांची जात का काढली जात नाही?
शेतकरी लाखोंच्या संख्येने आत्महत्या करत असतांना जे नेते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरवतात त्यांची जात का काढली जात नाही?
ज्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे एका बिल्डरने आत्महत्या केली त्या नेत्यांची जात का काढली जात नाही?

स्वत:च्या जातीतला / गटातला माणूस गेला की इतरांची जात काढणे हे बहुजन मानसिकतेचे लक्षण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes