शनिवार, जानेवारी ३०, २०१६

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे राजकारण

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित आणि त्याचे सहकारी स्वतःच्या हक्काची, स्वाभिमानाची लढाई लढत होते. या जात-धर्माधारित व्यवस्थेत दलित, अल्पसंख्यांक, उपेक्षित, मागास वर्ग यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष केलाच पाहिजे. रोहितचा संघर्ष हा समतेसाठी, मानवमुक्तीसाठी तसेच संविधानातील स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी होता. रोहित अभ्यासाव्यतिरिक्त इतर राजकारण करत होता असेही नाही. आपला अभ्यास सांभाळून त्याने
संघर्ष चालू ठेवला होता. तो पीएच. डी. चा शिष्यवृत्तीप्राप्त छात्र होता. त्याचे इतर सहकारीही शिष्यवृत्तीप्राप्त पीएच. डी. चे विद्यार्थी होते. याचा अर्थ त्यांनी या विषमतावादी व्यवस्थेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे म्हणजे राजकारण करणे नव्हे. आपली मते मांडणे, चळवळ करणे याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विद्यार्थ्याने फक्त अभ्यासच करावा असे नाही. विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. तेव्हा त्यांनी न्याय्य हक्कांसाठी संघर्षरत असणे हे देशाच्याच भल्याचे आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू अशा अनेकांनी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. त्यामुळेच समाजातील विषमता काही प्रमाणात का होईना कमी झाली. रोहित आणि त्याचे सहकारी हा वारसा पुढे नेत असताना त्यांच्या संघर्षाला अनावश्यक राजकारण म्हणून नाके मुरडणे हे आपल्या अभिजन मानसिकतेचे लक्षण आहे. रोहितची आत्महत्या हा राजकीय बळी आहेच परंतु जातीयही आहे. या प्रकरणाला जातीय रंग देवू नये असे म्हणणार्यांची कीव करावीशी वाटते. कारण असे म्हणणाऱ्याना एकतर भारतातील विषमतावादी व्यवस्थेचा नीट परिचय नाही किंवा ते भारतातील जातवास्तव जाणीवपूर्वक नजरेआड करत आहेत. जातवास्तव ही भारताची खूप मोठी समस्या आहे. इथे प्रत्येक गोष्टीत व्यक्तीची जात आडवी येते. कारण जन्माने मिळणारी ही जात व्यक्तीच्या मरणानंतरही त्याचा पिच्छा सोडत नाही. माणसाच्या जन्मानंतर एकदा त्याला जात चिकटली कि तिचा त्याग करण्याचा प्रश्नच येत नाही. इथे माणसाला धर्म बदलता येईल. पण जात कधीच बदलता येत नाही. याचे ठसठशीत उदाहरणच बघायचे झाले तर धर्मांतरित मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मात पाहायला मिळेल. हिंदू धर्मातून वरील धर्मात गेलेल्या लोकांचा केवळ धर्म बदलला, परंतु नवीन धर्मातही त्यांच्या जाती आजतागायत कायम राहिल्या आहेत. जात ही भारतीय परंपरेतील अपरिवर्तनीय व्यवस्था बनली आहे. इथली जवळजवळ सर्वच क्षेत्रे जातीवादाने बरबटली आहेत. रोहितसकट त्याचे पाचही मित्र दलित होते हा केवळ योगायोग आहे का ? ते सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होवून समतेसाठी संघर्ष करीत होते ही त्यांची चूक होती का ? भारतीय समाजातील जातवास्तव आणि त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामाविषयी रोहित आणि त्याच्या सहकार्यांचा लढा चालू होता हा त्यांचा दोष होता का ? रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या संघर्षाच्या केंद्रस्थानीच जात ही व्यवस्था होती. जातीवर श्रेष्ठत्व ठरवणारी व्यवस्था तर त्यांना बदलायची होती. पण मग या व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना हे थोडीच पटणार आहे. रोहितचा त्यांच्याशी संघर्ष अटळ होता. रोहितचा अभाविपशी झालेला संघर्ष याच प्रकारचा होता. रोहितच्या आत्महत्येचे समर्थन होवू शकणार नाही मात्र त्याच्यासारख्या चळवळीत मुरलेल्या व्यक्तीला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरत नसेल तर गांभीर्याने विचार केला पाहिजे.


रोहितच्या आत्महत्येनंतर देशभर निषेध आणि आंदोलने याने वातावरण ढवळून निघाले. कॉंग्रेस, भाजप, डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तिकडे धाव घेतली. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल तसेच अनेक दलित नेतेही तिकडे धावले. रोहितच्या आत्महत्येचे भांडवल करून आपले राजकीय विरोधक असलेल्या भाजपवर हे सर्व लोक निशाना साधू लागले. परंतु गमतीची गोष्ट अशी कि रोहितवर विद्यापीठाने कारवाई केल्यानंतर तब्बल बारा दिवस रोहित आणि त्याचे सहकारी थंडी-वाऱ्यात कुडकुडत रस्त्यावर राहिले. रस्त्यावर राहून त्यांनी आपले आंदोलन पुढे चालवले परंतु ते व्यवस्थेपुढे झुकले नाही. तेव्हा यातील एकालाही रोहित किंवा त्याच्या सहकाऱ्यांना मदत करावीशी वाटली नाही. तेव्हा रोहितवर अन्याय झाल्याचा साक्षात्कार एकाही राजकीय पक्षाला आणि दलितांच्या नावाने गळा काढणाऱ्या नेत्याला झाला नाही याचेच आश्चर्य वाटते. आणि आता मात्र रोहितचा बळी गेल्यानंतर या सर्वांनाच कंठ फुठ्ला आहे. आज देशात अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये, विद्यापीठात अनेक रोहित न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. रोहितच्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या राजकीय धेंडाना अनेकांचा मारुती कांबळे होण्यापासून वाचवणे शक्य आहे. परंतु अशा प्रकरणात ते लक्ष घालणार नाहीत. कारण मुळात त्यांना दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलण्यात, त्याविरुद्ध काहीतरी ठोस कार्यवाही करण्यात काहीच स्वारस्य नाही. धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणारी कॉंग्रेस, स्वतःला पुरोगामी म्हणवणारे डावे असो वा आम्हीच दलितांचे एकमेव तारणहार आहोत असा आभास निर्माण करणारे बसप, रिपाईचे सर्व गट-तट असो, या या सर्वांनाच दलित अत्याचाराचा इवेन्ट बनवायचा आहे. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे हा. जिवंत माणसांवर अन्याय होत असताना एकही राजकीय पक्ष वा नेता समोर येत नाही आणि दलितांनी आत्महत्या केल्यानंतर मात्र सर्वजण कंठशोष करतात. आज रोहितच्या आत्महत्येबद्दल सत्ताधारी  भाजपला जबाबदार ठरवणारे कॉंग्रेस आपल्या कार्यकाळात किती दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या हे सोयीस्कर विसरत आहे. कॉंग्रेस आणि भाजपची अवस्था म्हणजे एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशीच आहे. त्यातल्या त्यात तुलना करायचीच झाली तर दगडापेक्षा वीट मऊ इतकाच काय तो फरक. कॉंग्रेस निदान तोंडदेखलेपणे तरी दलितांबद्दल दोन अश्रू ढाळते. भाजपकडे तितकेही शहाणपण नाही असेच म्हणावे लागेल. डाव्यांची तर अवस्था खूपच बेकार आहे. भारतीय जात-वास्तव सोयीस्कर नजरेआड करणारे डावे दलित अत्याचाराबद्दल बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. रोहितने डाव्या विद्यार्थी संघटनेचा केलेला त्याग हा त्याने  डाव्यांच्या  ढोंगी पुरोगामित्वाला दिलेली चपराकच होय. पण यातूनही शहाणे होतील ते डावे कसले. रोहितने  डाव्यांची संगत का सोडली या मुद्द्याला ते जाणीवपूर्वक बगल देणार आणि रोहितच्या आत्महत्येचे भांडवल करून त्याचा काही राजकीय लाभ मिळवता येतो का याचे गणित मांडणार. दलित पक्ष आणि नेते यांची अवस्था तर ना घर का ना घाट का अशी झाली आहे. अर्थात ती त्यांच्याच पापाची फळे आहेत. रामदास आठवले यांच्यासारख्या महाराष्ट्रातील मातब्बर दलित नेत्याला हैदराबाद विद्यापीठ परिसरातून माघारी पाठवले यावरून दलित समाजामध्ये दलित नेत्यांविषयी काय भावना आहेत हे दिसून येते. बसप, रिपाईचे सर्व गट यांच्यासह दलितांचे तारणहार म्हणवणारे सर्वच पक्ष पदांच्या तुकड्यासाठी आत्मसन्मान विसरले आहेत. त्यांच्या राजकीय फायद्यापुढे एक काय असे कितीतरी रोहित बळी गेले तरी त्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. महाराष्ट्रासह देशभर दलितांवर अनन्वित अत्याचार होत असताना यातील एकही नेता किंवा पक्ष आवाज उठवत नाही. मात्र दलितांचा मारुती कांबळे झाला कि यांना दलित अत्याचाराचा साक्षात्कार होतो. पण दलितांचा मारुती कांबळे होवू नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न झाल्याचे उदाहरण क्वचितच सापडेल. इथली विषमतावादी व्यवस्था दलितांचा मारुती कांबळे करीत आहे. मात्र अशा अनेक मारुती कांबळेना हुतात्मा करण्याचे काम आपण सर्वजण करीत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या निष्ठा, आपली नैतिकता तपासायची वेळ आली आहे. 

9 टिप्पणी(ण्या):

Dr. Shashi Desle म्हणाले...

अगदी योग्य विश्लेषण केले बघा. congress, bjp, cpi, cpm, rpi सर्वानाच टोले हाणलेत. मी सहमत आहे. सह्याद्री बाणा खरा आंबेडकरी ब्लॉग आहे.

Kattar vaidik म्हणाले...

Tumhala dusare kam nahi ka? roj uthun jat-dhamachya navane galaa kadhata ? narkat jal ashane. Prayaschitt ghyayche asel tar bramhan bhojan ghala ani mala bolvayla visru nka.

अनामित म्हणाले...

बामण महाराज गप्प बसा जरा. तुमचा काळ गेला आता.

द ग्रेट मराठा म्हणाले...

जय शिवराय. सुंदर ब्लॉग.

रिकामटेकडा म्हणाले...

प्रकाश पोळ साहेबाना इतर धंदे नाहीत. त्यामूळे त्यांचे कुणीही मनावर घेऊ नका

अनामित म्हणाले...

प्रकाश तुझा ब्लॉग मी नेहमी वाचतो. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा तु सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे चालवतोय्स याचा आम्हाला अभिमान आहे. ऱोहितच्या आत्महत्येचे आणि त्यानंतरच्या राजकारणाचे तू केलेले विश्लेषण तुझ्या प्रगल्भ बुद्धिमतेची आणि पुरोगामी विचारांची साक्ष देते. गेली पाच वर्षे तू ब्लोगच्या माध्यमातून बहुजनांचे प्रबोधन करत आहेस. Really hats off you.
- Prof. Dinesh Mane,
- Sangola.

अनामित म्हणाले...

जssरा थांबा. थोड्या दिवसांनी ह्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा होईल आणि त्याचा प्रसाद घ्यायला हेच दलितांचे नेते उभे राहतील. जी काही निदर्शने, उपोषणे करायची असतील ती पुरोगामी कार्यकर्त्यांनी त्या वेळी स्वत:च्या नेत्यांसमोर करावीत.

अनामित म्हणाले...

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/fir-registered-against-youth-who-burnt-tricolour/articleshow/50803589.cms

Read new at above link.
Hich ka tumchi vichardhara.

Nishree Jain म्हणाले...Nice Post.
indiaregisters provides domain registration, domain registration in india,cheap domain registration, domain registration in hyderabad.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes