सोमवार, जानेवारी ११, २०१६

मालदा प्रकरण, कमलेश तिवारी आणि मुस्लिमांची आक्रमकता

७ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक होवून रस्त्यावर आला होता. जवळजवळ अडीच लाखांचा समुदाय रस्त्यावर येवून अतिशय हिंसक पद्धतीने व्यक्त झाला. अखिल भारतीय हिंदू महासभेचा स्वयंघोषित नेता कमलेश तिवारी याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी समाज माध्यमामध्ये अश्लाघ्य टिपण्णी केल्याने वाद निर्माण झाला. काय होता हा प्रकार , नेमकी कुणाची चूक होती जरा सविस्तर पाहूया. 


सुरुवात आझम खान पासून-

आझम खान हे समाजवादी नेते स्वतःला मुस्लिम समाजाचे तारणहार समजतात. या देशात आपणच एकमेव आहोत ज्यांना मुस्लिम समाजाविषयी खूप काळजी आहे असे आझम खान यांना वाटत असावे. त्यामुळेच कुठेतरी बोलताना खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांविषयी अश्लाघ्य टिपण्णी केली. संघाचे लोक समलैंगिक असतात म्हणून ते लग्न करत नाहीत अशा प्रकारचे घाणेरडे वक्तव्य आझम खान यांनी केले. खान यांचा संघाला असलेला विरोध समजू शकतो. संघाच्या विचार, कार्याला अनेक व्यक्ती विरोध करत असतात. संघाला विरोध करणे हा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु असा विरोध कोणत्या मार्गाने करावा याचेही काही संकेत आहेत. एखाद्या व्यक्तीला विरोध आहे म्हणून त्याची बदनामी करणे, त्याला मारहाण करणे किंवा ठार करणे अशा प्रकारे विरोध असू नये. तर तो सभ्य वैचारिक मार्गाने असावा. परंतु उत्तरप्रदेशच्या जातीय-धर्मवादी राजकारणाला सरावलेल्या आझम खान यांना कुठला वैचारिक मार्ग माहित असावा ? ते प्रथमपासूनच वादग्रस्त विधाने करण्यात पटाईत आहेत. त्यामुळेच त्यांनी संघाला वैचारिक विरोध न करता संघ स्वयंसेवक समलैंगिक असल्याने लग्न करत नाहीत अशा प्रकारचे घृणास्पद मत व्यक्त केले. 

स्वयंघोषित हिंदू नेता कमलेश तिवारी-

जसे आझम खान हे वाचाळाच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत तसेच अनेक हिंदुत्ववादी नेतेही त्यांची
कमलेश तिवारी
बरोबरी करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे कमलेश तिवारी. आता हे कमलेश तिवारी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. कारण तिवारी कुणी मोठा माणूस नाही कि ज्याचे नाव संपूर्ण देशाच्या तोंडी असेल. भारतात ढिगाने असणाऱ्या शेकडो स्वयंघोषित हिंदू नेतांपैकी हे एक महाशय. यांचे मूळ नाव लक्ष्मीकांत. गाव सीतापुर. सध्या वय आहे ४५ वर्षे. परंतु अगदी शालेय वयापासूनच हा कट्टर हिंदुत्वाकडे झुकल्याचे सांगण्यात येते. वयाच्या बाविसाव्या वर्षी याने 'हिंदू टायगर फोर्स' नावाची कट्टर हिंदू संघटना स्थापन केली होती. मुस्लिमद्वेष हा तिवारी याच्या जीवनाचा पाया होता. त्यातूनच त्याने 'मुस्लिम भारत छोडो आंदोलन' अशा प्रकारचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे १९९७ मध्ये तिवारीला तुरुंगाची हवा खावी लागली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने लग्न केले. त्यानंतर तो सीतापुराहून तो लखनौला आला. तो अखिल भारतीय हिंदू महासभा या संघटनेत सामील झाला. त्याला हिंदू महासभेचा उत्तरप्रदेश महासचिव बनविण्यात आले. लखनौच्या हिंदू महासभेच्या कार्यालयातच तो आणि त्याचे कुटुंब राहत आहे. 

वकिलीचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या तिवारीचे अवघे कुटुंब हिंदू महासभेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्याने लखनौ विधानसभाही एकदा लढवून पाहिली. मात्र त्याला अवघी १७०० मते मिळाली. त्यानंतर मात्र त्याने राजकारणाचा नाद सोडून कट्टर हिंदुत्व समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले. तो आत्तापर्यंत जवळजवळ आठ वेळा तुरुंगात जावून आला आहे. अशा या तिवारीने आझम खानाला प्रत्युत्तर म्हणून आझम खानाने संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल वापरलेली विधाने मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी वापरली. त्यातून मुस्लिम समाजाच्या भावना भडकल्या. कमलेश तिवारीला धार्मिक भावना भडकावणे आणि दोन समाजात द्वेष पसरवणे या आरोपाखाली अटक केली आहे. मात्र यातून मुस्लिम समाजाचे समाधान झाले नाही. त्यामुळेच त्यांनी मालदा जिल्ह्यात आणि देशभर मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून आंदोलने केली. काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती त्या हिंसाचारात जखमी झाल्या.

पैगंबरांच्या बदनामीचे पडसाद-

कमलेश तिवारी याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक टिपण्णीचे पडसाद देशात अनेक ठिकाणी उमटले. मालदा जिल्ह्यात मुस्लिम समुदायाने काढलेल्या मोर्चात तब्बल अडीच लाख लोक सहभागी झाले होते. साहजिकच लोकांच्या भावना भडकावण्यात आल्या आणि जमाव आक्रमक झाला. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३४ वर बस आणि काही गाड्यांची जाळपोळ केली. यातून पोलिसांच्या गाड्याही सुटल्या नाहीत.  जमावाने रेलवे रूळ उखडून रेल्वे वाहतूक बंद पाडली. तेथील पोलीस स्टेशनही जमावाच्या रागाला बळी पडले. आक्रमक आणि हिंसक बनलेल्या जमावाला काबूत आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची जमावातील काहींशी हमरीतुमरी झाली. यातून परिस्थितीत नियंत्रणात येण्याऐवजी अधिकच बिघडली. यात काहीजण जखमी झाले तर सार्वजनिक मालमत्तेचे खूप नुकसान झाले.

चूक नेमकी कुणाची-

आता घडल्या प्रकारात चूक नेमकी कुणाची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संघाबद्दल अश्लाघ्य टिपण्णी करणारे आझम खान, आझम खान यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया म्हणून पैगंबरांची बदनामी करणारे कमलेश तिवारी, तिवारीसारख्या वाचाळ माणसाने पैगंबरांची बदनामी केली म्हणून रस्त्यावर उतरणारा मुस्लिम समाज आणि भावी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून परिस्थिती हाताळण्यात कमी पडणारे प. बंगालचे ममता बेनर्जी सरकार या सर्वांचीच सदर प्रकरणी चूक आहे. 

आझम खान यांचा संघाला असणारा विरोध सर्वश्रुत आहे. त्यांना संघाला वैचारिक विरोध करण्याचा अधिकार जरूर आहे. मात्र कुणावरही अश्लाघ्य टिपण्णी करणे, विरोधकांची बदनामी करणे हा प्रकार चुकीचा आहे. अशाने समाजात धर्माधर्मात, जातीजातीत द्वेष निर्माण होवून त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात याची जाणीव आझम खान यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याला नसेल असे नाही. खान यांच्यापेक्षा तिवारीची परिस्थिती वेगळी नाही. तिवारी हे स्वतःला हिंदू महासभेचे कट्टर नेते म्हणवून घेतात. त्यांना नेतागिरी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हिंदूंचे त्यांना जे काही भले करायचे असेल ते त्यांनी भारतीय राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे. मात्र विचार वेगळे असले तरी खान आणि तिवारी यांची वैचारिक जातकुळी एकच....ती म्हणजे कट्टर धर्मांधता आणि भडक मांडणी करून धार्मिक ध्रुवीकरण करणे आणि त्यामाध्यमातून समाजाला भडकावणे. आझम खान जे बोलला त्याबद्दल टीका करून खान याला प्रत्युत्तर देणे तिवारीला शक्य होते. मात्र अशाने समाज कसा भडकून उठणार ? समाज भडकण्यासाठी काहीतरी भडक विधाने करणे भाग असते. त्यामुळेच तिवारीने आझम खान याच्या वक्तव्याला विरोध म्हणून पैगंबरांची बदनामी केली.

समाज म्हणजे 'मुकी बिचारी मेंढरं, कुणीही हाका'-

कमलेश तिवारीच्या प्रक्षोभक विधानांमुळे मुस्लिम समाज भडकून उठला. अर्थात त्यांना भडकवण्यासाठीविविध मुस्लिम नेते, मुल्ला, मौलवी, इमाम तयार होतेच. समाजमाध्यमातून तिवारी याच्याविरुद्ध प्रचार प्रसार होवून मुस्लिम समाजात रागाचे वातावरण तयार झाले. पैगंबराना प्राणापेक्षा प्रिय मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या रागाला मुस्लिम नेत्यांनी हवा दिली. त्यातून देशभर मोर्चे काढण्यात आले. मालदा येथील अडीच लाखाच्या मोर्च्याला हिंसक वळण लागले. झाले काही हिंदू धर्माभिमानी लगेच जागे झाले आणि हा प्रकार योग्य आहे का असा प्रश्न विचारू लागले. दीड वर्षापूर्वी फेसबुकवर शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी झाली म्हणून हिंदू राष्ट्र सेना आणि शिवसेना यांनीही हिंसक आंदोलन केले. यात पुण्यात हडपसर भागात मोहसीन शेख नावाच्या निरपराध मुस्लिम तरुणाचा बळी गेला. अगदी अलीकडे घडलेले दादरी प्रकरण तर सर्वश्रुत आहे. या दोन प्रकरणात हिंदू समाज आक्रमक होवून त्यात अनुक्रमे मोहसीन शेख आणि अखलाख यांचा जीव गेला.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते कि कोणताही एक समाज अशा प्रकरणात दोषी नाही. हिंदू असो व मुस्लिम, दोघांच्याही भावना भडकतात, दोघेही भडकलेल्या भावना हिंसक पद्धतीने व्यक्त करतात हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. या समाजाला भडकवण्यास जबाबदार असणारे नेते नामानिराळे राहतात आणि हे समाज मात्र एकमेकांविरुद्ध भांडत बसतात. एकमेकांचे जीव घेतात. त्यांना हे कळतच नाही कि आपल्या नेत्यांना ना हिंदूंचे भले करायचे आहे ना मुस्लिमांचे. त्यांना फक्त मतपेढीचे राजकारण करून सत्ता मिळवायची असते. मुकी जनता, बिचारी प्रत्येक नेत्याच्या अपप्रचाराला भुलते आणि त्यांच्या षडयंत्राला बळी पडते. तेव्हा समाजानेच अशा ढोंगी नेत्यांचे षड्यंत्र ओळखले पाहिजे. हिंदुनी मुस्लिमांना आणि मुस्लिमांनी हिंदुना दोष देणे बंद करा. दोघांनीही आत्मपरीक्षण करून, प्रसंगी एक पाउल मागे घेवून, विचारपूर्वक वाटचाल करावी असे मला वाटते. यासाठी सर्वच जाती-धर्मातील सुजाण, विवेकी लोकांनी एकत्र येवून सामोपचाराने मतभेदांवर मार्ग काढला पाहिजे. आपल्या धर्मातील धर्मांधता कमी करून समाजाला विवेकवादी बनविण्यासाठी आता त्या-त्या धर्मातील तरुणानी पुढे यावे. अशा वेळी शाहीर संभाजी भगत यांच्या 'माणूस मारला' या कवितेच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत..

नाही हिंदू गं मारला, नाही मुस्लिम मारला
माणूस मारला, माझा माणूस मारला......


3 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes