मंगळवार, नोव्हेंबर ०३, २०१५

विकासाऐवजी वाचाळवीरच अधिक...

दै. लोकसत्ता, 2 नोव्हेंबर 2015

'कांग्रेस-डाव्यांची वैचारिक असहिष्णुता !' ही बातमी (लोकसत्ता, 2 नोव्हें.) वाचली. सध्या देशात काही ठिकाणी धार्मिक विद्वेषातून सुरु असलेल्या हिंसक घटना आणि त्याविरुद्ध समाजातील सर्व स्तरातून उमटणारा निषेधाचा सूर यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात कि कांग्रेस-डावे विचारवंत, तसेच काही सामाजिक कार्यकर्ते याना भाजप सत्तेत आलेली सहन झालेले नाही. त्यामुळेच भाजप व पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वैचारिक असहिष्णुता दाखवली जात आहे.

जेटली यांचे वरील विधान एकवेळ खरे मानता येईल. कारण कांग्रेस-डाव्यांनाही या घटनांचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वैचारिक असहिष्णुता दाखवली जाणे शक्य आहे. परंतु दोन दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय पतनामांकन संस्था 'मुडीज'ने भारतातील धार्मिक हिंसा आणि असहिष्णु वातावरण यावर टीका करुन पंतप्रधान मोदींनी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा जागतिक पातळीवर भारताची पत धोक्यात येवू शकते असा धोका व्यक्त केला आहे. कारण अशा असहिष्णु आणि अस्थिर वातावरणाचा परदेशी गुंतवणूकदारांवर प्रतिकुल परिणाम होवून ते गुंतवणूक करण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व बॅंकेचे गवर्नर रघुराम राजन यानीही सध्याच्या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही परिस्थिती देशाच्या आर्थिक विकासाला मारक आहे असे म्हंटले आहे. आता कांग्रेस व डाव्यांची भुमिका भाजपला ढोंगी वाटणे सहाजिक आहे. परंतु मुडीज, राजन, इंफोसिसचे नारायण मुर्ती हे लोक काय कांग्रेस-डाव्यांचे पाठिराखे नाहीत किंवा त्यांना काही राजकारण करायचे आहे असेही नाही. या तिघांच्या बोलण्याचा सार एकच आहे, तो म्हणजे सध्या भारतात जे काही चालले आहे ते देशाच्या प्रगतीला खीळ घालणारे आहे आणि सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. तेव्हा मोदी, जेटली आणि त्यांच्या सहकार्यानी वरील लोकांच्या मतांचा तरी 'गांभीर्याने' विचार करावा.

जेटली पुढे म्हणतात कि काही ठिकाणी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व सांस्क्रुतिक संस्थांवर कांग्रेस व डाव्यांचे वर्चस्व असून, तिथे दुसर्यांचे मतही ही मंडळी विचारात घेत नाहीत. कांग्रेस-डाव्यानी अनेक संस्थांचे राजकीयीकरण केले ही गोष्ट सत्यच आहे. परंतु लोकसभा निवडणूकीत भाजप नेहमी 'आम्ही कांग्रेस-डाव्यांपेक्षा कसे वेगळे आहोत' हे ठसवण्यासाठी प्रयत्न करत होता. असे असेल तर कांग्रेस-डाव्यानी ज्या चुका केल्या त्या भाजप का करत आहे ? कांग्रेस-डाव्यानी जसे अनेक संस्थांमध्ये आपल्या विचाराचे लोक घुसवले तोच प्रकार भाजप सध्या प्रत्येक संस्थेचे 'संघीकरण' करुन करत आहे. कांग्रेस-डाव्यांना नाकारुन जनतेने भाजपला बहुमत दिले असताना स्वत: वेगळी (पण सकारात्मक) वाट चोखाळायची सोडून भाजप कांग्रेस-डाव्यांच्याच मार्गाने जात आहे. मग कांग्रेस-डावे आणि भाजप यांच्यात फरक तो काय ?

जेटली असाही आरोप करतात कि कांग्रेस डावे आणि समाजातील काही विचारवंत हे भारत हा असहिष्णु समाज असल्याचा गैरप्रचार करत आहेत. जेटलींचा हा दावाही हास्यास्पद आहे. कारण असहिष्णु असल्याचा आरोप भाजप, संघ परिवार आणि धार्मिक उन्माद करणार्यांवर केला जातोय, संपूर्ण भारतीय समाजावर नाही. परंतु भाजपवर टीका म्हणजे देशावर आणि सर्व समाजावर टीका अशा प्रकारचा आभास भाजप व त्यांचे नेते करु पाहत आहेत. निवडणूकीत जरी जनतेने भाजपला जनादेश दिला असला तरी भाजप म्हणजे सर्व समाज नव्हे. वैचारिकद्रुष्ट्या तर भाजप सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करुच शकत नाही. त्यामुळे असहिष्णुतेचा आरोप होतोय ते भाजप, संघ परिवार आणि त्यांच्या वाचाळवीरांवर याची जाणीव भाजपने ठेवावी. परंतु एनकेन प्रकारे समाजाची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. कांग्रेस-डाव्यांवर भाजपने टीका करावीच परंतु आपले वेगळेपण विकासाच्या मार्गाने दाखवून द्यावे अशीच समस्त भारतीयांची इच्छा आहे

2 टिप्पणी(ण्या):

Ketumal म्हणाले...

Likhan changale ahe pan santulit bhumikecha abhav adhalun yet asalyakarnane apan adhik abhyas ani wyapak jiwananubhawanantar likhan karne uchit hoil.

Prakash Pol म्हणाले...

प्रिय केतुमाल जी,

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...आपल्या सारख्या व्यक्तींमुळे लिहिण्याची उर्मी मिळते. असो. आपण मला संतुलित लिहिण्यास सुचवले आहे. माझ्या भूमिकेला कुठे एकांगी सूर येत असेल तर मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. परंतु आपण बारकाईने पाहिले तर वरील लेखात मी संतुलित भूमिका घेतली असल्याचे दिसून येईल....

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes