शनिवार, ऑक्टोबर ०३, २०१५

हिंदुत्ववादी उन्माद थांबणार कधी ?

उत्तरप्रदेशात महम्मद अखलाक आणि त्याचा मुलगा दानिश याना हिंदू धर्माभिमान्यानी बेदम मारहाण केली. महम्मद अखलाक हा ठार झाला तर त्याचा मुलगा दानिश गंभीर जखमी आहे. अखलाक हा गोमांस खातो अशा प्रकारची अफवा पसरल्याने (कि पसरवल्याने) हिंदू जमाव बेभान झाला. त्यानी या बाप-लेकाना घरातून ओढून काढून बेदम मारहाण केली. जीवाच्या आकांताने हे दोघे ओरडत असताना, त्या घरातील स्त्रिया त्यांच्या जीवाची भिक मागत
असताना एकाही माणसाला त्यांची दया आली नाही. धर्मद्वेषाची नशा त्यांच्यात इतकी खोलवर भिनली होती कि त्यात बिचार्या अखलाकचा जीव गेला. तो गोमांस खात होता ही अफवाच होती हे नंतर स्पष्ट झाले. परंतु तोपर्यंत जमावाने आपला कार्यभाग साधला होता. दिड वर्षापूर्वी पुण्यातही शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फेसबूकवरील बदनामीचे निमित्त झाले आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या नालायकानी मोहसीन शेख या उच्चशिक्षित निरपराध तरुणाचा बळी घेतला. मोहसीन किंवा अखलाक यांचा काय दोष होता ?  त्यांचा जन्म मुस्लिम धर्मात झाला हा त्यांचा दोष होता का? केवळ मुस्लिम आहेत म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. परंतु महेश शर्मासारखे केंद्रीय मंत्री जेव्हा सदर घटनेला एक अपघात समजावे अशी वक्तव्ये करतात तेव्हा परिस्थितीचे गांभिर्य अजूनच वाढते. यानिमित्ताने दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला म्हणजे या देशात मुस्लिम किंवा इतर अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत का ? आणि दुसरा प्रश्न म्हणजे बहुसंख्यांक हिंदूंचा हा उन्माद कोणी थांबवणार आहे कि नाही ?

वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसते कि मुस्लिम या देशात सुरक्षित नाहीत. सर्वच ठिकाणी मुस्लिमांच्या जीवाला धोका आहे असेही नाही. मात्र अलिकडे असे प्रकार प्रकर्षाने घडू लागले आहेत. मग असे प्रकार थांबवणार कोण ? शासन-प्रशासन, हिंदू बहुसंख्यांक कि खुद्द मुस्लिम ? शासनाची अशा प्रकारातील भूमिका नेहमी संदिग्ध राहिली आहे. मग ते पुरोगामी महाराष्ट्रातील कांग्रेस-राष्ट्रावादीसारखे फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करणारे शासन असो किंवा उत्तरप्रदेशातील समाजवादी सरकार असो. मूळ प्रश्नाला भिडून त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा घडल्या प्रकारातही राजकारण करु पाहणारे दळिद्री पक्ष आणि त्यांचे नेते पिडीताना न्याय देण्यात पूर्ण अपयशी ठरले आहेत. भाजप, शिवसेनेसारख्या धर्मांधांचे उघडउघड समर्थन करणार्या उजवे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास अशी घोषणा देतात, मात्र त्याना खरोखर सर्वाना बरोबर घेवून जायचे आहे असे सध्याच्या परिस्थितीवरुन वाटत नाही. नरेंद्र मोदी आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत. काही नमोभक्त यात मोदींचा काय दोष असेही म्हणतील. खरा दोष मोदींचाच आहे. एका बाजूला महात्मा गांधींचा जयजयकार करायचा. धर्मनिरपेक्षता, अहिंसा, सहिष्णूता यांचे गोडवे गायचे आणि दुसर्या बाजूला संघ परिवार, सनातन, विहिंप, बजरंग दल व आपल्याच पक्षातील, मंत्रीमंडळातील वाचाळवीर आणि त्यांच्या उन्मादाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे हा मोदींचा गंभीर दोष आहे. परदेश दौर्यातून जर वेळ मिळालाच तर स्वत:च्या देशात काय चालू आहे याची माहिती मोदीनी घ्यावी. मुस्लिम व्यक्तींची खुलेआम कत्तल होत असताना देशाचा प्रमुख म्हणून मोदीनी त्या समाजाला आश्वस्त करायला हवे. अखलाकच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियानी ते गाव सोडायचा निर्णय घेतला आहे. कारण भविष्यात अशा घटना घडणार नाहित याची हमी त्याना कोण देणार ? ती हमी शासनप्रमुख म्हणून मोदीनी दिली पाहिजे. दुसर्या बाजूला बहुसंख्यांक हिंदूंचीही भूमिका संतापजनक आहे. धर्माच्या नावावर सर्रास निरपराधांचे मुडदे पाडले जात असताना हिंदू समाजही शांत आहे. धर्माच्या ठेकेदारानी चालविलेला उन्माद म्हणजे आमचा धर्म नव्हे असे ठणकावून सांगण्याचे धाडस हिंदू का दाखवत नाहीत ? कि धर्मांधांच्या या दुष्कृत्याला हिंदूंचे समर्थन आहे ? हिंदूंच्या नावाने मूठभर नादानानी केलेल्या पापांमूळे संपूर्ण हिंदू धर्म बदनाम होतोय याचे भान हिंदूना यायला हवे. मुस्लिमांच्या हत्येचा निषेध सोडा पण अशा प्रकारामूळे जर हिंदू सुखावले जात असतील तर ही धोक्याची घंटा आहे. आज जर हिंदूनी या धर्मांध प्रवृत्तीना विरोध केला नाही तर धर्मांधतेचे हे भूत भावी काळात भारताला गाडल्याशिवाय राहणार नाही.

5 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes