सोमवार, सप्टेंबर २१, २०१५

हिंसेचा प्रचार आणि विद्वेषी विचारसरणी सनातनवर बंदी घालण्यास पुरेशी नाही का ?

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणानी सनातन संस्थेच्या समीर गायकवाड आणि काही व्यक्तीना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सनातन संस्था या कट्टर हिंदुत्ववादी (खरेतर ब्राह्मणवादी) संघटनेवर बंदी घालण्याची मागणी समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे. पानसरे यांच्या हत्येतील सनातनच्या साधकांचा सहभाग अजून सिद्ध झालेला नाही, त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी चुकीची आहे असे सनातन म्हणते. एखाद्या कार्यकर्त्याच्या चुकीची शिक्षा
संघटनेला कशी देता येईल असा सवालही सनातनने केला आहे. सनातन प्रभात (२० सप्टें.) लिहिते कि एका विद्यार्थ्याची शिक्षा संपूर्ण वर्गाला कशी देता येईल, एखाद्या व्यक्तीच्या भ्रष्टाचाराची शिक्षा त्या सर्व कार्यालयाला कशी देता येईल ? याचा अर्थ सनातनचे साधक पानसरे हत्या प्रकरणी दोषी आहेत किंवा असू शकतात परंतु, त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून सनातनवर बंदी घालणे चुकीचे आहे असे तर सनातनला सुचवायचे नाही ना ?

मुळात सनातन वर बंदी घालण्याचा मुद्दा फक्त पानसरे (किंवा दाभोळकर आणि कलबुर्गीही ) यांच्या हत्येतील सनातनचा सहभाग सिद्ध होण्यापुरता मर्यादित नाही. या तिघांच्या किंवा तिघांपैकी एकाच्याही हत्येत सनातनचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग सिद्ध झाला तर सनातनवर बंदी घालावीच लागेल. परंतु सनातनवर बंदी घालण्यास मूळ कारण आहे ते सनातनकडून सातत्याने होणारा हिंसेचा प्रचार आणि प्रसार. सनातनची विद्वेषी विचारसरणीच लोकांची माथी भडकावण्यास जबाबदार आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनानंतरही दुसर्याच दिवशी सनातन प्रभात या दैनिकात 'दाभोळकराना आपल्या कर्माची फळे मिळाली' अशी मुक्ताफळे उधळली होती. महाभारत व इतर हिंदू धर्मग्रंथांचा हवाला देवून सनातन सातत्याने हिंसेचा प्रसार करते. सनातनच्या 'क्षात्रधर्म साधना' या पुस्तकात महाभारतातील एका श्लोकाचा संदर्भ देवून म्हटले आहे, 'जे धर्माचा उच्छेद करु पाहतात आणि अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्याना ज्याप्रमाणे देवानी महाभयंकर अशा दैत्याना मारले, त्याप्रमाणे ठार मारावे.' हिंदू धर्माची बदनामी करणारे धर्मद्रोही असून त्यांच्याविरोधात शस्त्र हाती घ्यावे असे आवाहन सनातन प्रभातने अनेकदा केले आहे. सनातनच्या मते हे धर्मद्रोही म्हणजे सर्व पुरोगामी, डावे, समाजवादी, परिवर्तनवादी, विवेकवादी तसेच मुस्लिम व ख्रिस्चन धर्मीय होत. 

पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्त्यांचे विचार असत्य आहेत असे सांगून सनातन म्हणते हिम्मत असेल तर पुरोगाम्यानी पोलिस संरक्षणाशिवाय फिरुन दाखवावे. (सनातन प्रभात, २० सप्टें.) सनातनला यातून नेमके काय सुचवायचे आहे ? दाभोळकर, कलबुर्गीनी पोलीस संरक्षण नाकारले आणि नंतर त्यांची हत्या झाली. त्याप्रमाणे पुरोगाम्याना संरक्षण नसेल तर त्यांच्याही हत्या होतील असेच सनातनला सुचवायचे आहे. सनातनचे हे वक्तव्य अप्रत्यक्षपणे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या कोणत्या प्रव्रुत्तीनी केल्या असतील याचे सुचक आहेत. या तिघांच्याही हत्या धार्मिक कारणातूनच झाल्या असाव्यात असा संशय यायला सनातनची वक्तव्ये किंवा लिखाण जबाबदार आहे. 

याआधीही गडकरी, रंगायतन, मालेगाव, मडगाव बॉम्बस्फोट किंवा मिरज दंगल आणि आता दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्याप्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची चौकशीही झाली आहे. रंगायतन-गडकरीमध्ये सनातनच्या साधकाना शिक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी ही फक्त एका समीर गायकवाडला अटक झाली म्हणून करण्यात येत नाही. सातत्याने समाजविघातक गोष्टींशी सनातनचे नाव जोडले जाणे, सनातने आपल्या वर्तमानपत्र आणि साहित्याद्वारे विद्वेषी विचारांचा व हिंसेचा प्रचार करणे, समाजात अंधश्रद्धा पसरवून समाजाला मानसिक गुलाम बनवणे आणि ब्राह्मणवादी-वर्णवर्चस्ववादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे ही कारणे सनातनवरील बंदीमागे आहेत. सनातनचे विचार भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत बसणारे नाहीत, उलट घटनाविरोधी आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी घातलीच पाहिजे. आणि त्यासाठी सनातनचा हिंसक आणि विद्वेषी विचारांचा प्रसार पुरेसा आहे.

3 टिप्पणी(ण्या):

Mobile App Developers म्हणाले...

Nice post, things explained in details. Thank You.

Bhanudas Rawade म्हणाले...

अगदी बरोबर आहे


पण अशाच जहल आणि द्वेष पसरावणाऱ्या विचारां पासून आपन पण थोड़ लांब राहील पाहिजे


नाही तर लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वता........

Bhanudas Rawade म्हणाले...

मला वाटत सनातन ने चालवालेला प्रकार चुकिचाच आहे


पण त्याही पेक्षा ज़रा आपल्या सारख्या विद्वान लोकांनी मुस्लिम दहशतवाद हया विषया वर पण लक्ष द्यावे

एक वेळ सनातनवाले लोक त्यांच्या बरोबर चर्चा केलि तर बदलतील पण
पण मुस्लिम दहशतवाद हां चर्चा करुण संपणार आहे का..??

जगाच्या पाठी वर हे लोक कोणाला शांतपने जगु देतायत का..??

आणि स्वता तरी शांत जगतायत का..??

ह्या सनातन वाल्यांचा विषय धड़ महाराष्ट्रा पुरता सुद्धा नाही

ते राहुद्या बाजूला

पण अमेरिका फ्रांस इंगलण्ड भारत रशिया कोणाला शांतता आहे का..??
का त्यांच्या पेक्षा पण आपल्याला सनातन ची भीति जास्त वाटते

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes