सोमवार, ऑगस्ट १७, २०१५

भोंदूंच्या व्यवस्थेवर हल्ला होणार का ?

राधे मां
सध्या 'राधे मां' च्या तथाकथित पराक्रमांवर माध्यमांमध्ये मोठी चर्चा चालू आहे. गेल्या काही दिवसात आसाराम बापू, रामपाल अशा अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश झाला आहे. मूळात भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असताना अशा भोंदू बाबा-अम्मांची संख्या वाढत आहे ही गंभीर बाब आहे. 

एखाद्या भोंदूचे कारनामे उघड झाले त्यावर चार दिवस चर्चा होवून लोक तो विषय विसरुन जातात. माध्यमेही या विषयाची चर्चा करताना मूळ विषयाला हात घालत नाहीत. कारण हा प्रश्न एका आसाराम, रामपाल किंवा राधे मा पुरता मर्यादित नाही. अशा भोंदूंची एक समांतर धार्मिक, आर्थिक व्यवस्था तयार झाली आहे. या संपूर्ण व्यवस्थेबद्दल बोलायला अपवाद वगळता कुणीच तयार नाही. ज्या माध्यमांकडून ही अपेक्षा आहे ती माध्यमेही मूळावर घाव घालायला तयार नाहीत. वस्तुत: अशा प्रकरणात ज्या भोंदूंचे कारनामे उघड होतील (किंवा केले जातील ) अशांचीच चर्चा होते. बाकीच्या लोकांची चर्चा होत नाही. हे तथाकथित अध्यात्मिक गुरु, बुवा, बाबा, अम्मा स्वत:ला संत, देवाचे अवतार समजतात. असे असताना यांच्याकडे करोडो रुपयांची माया येतेच कशी ? यांच्या नावावर असलेले शेकडो एकरचे भूखंड कुठून येतात ? यांची आलिशान राहणी पाहून याना संत तरी कसे म्हणावे ? अल्प काळात यानी जमवलेल्या संपत्तीची चौकशी का होत नाही ? असे अनेक प्रश्न विवेकी माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही. तुकोबांच्या 'रंजल्या गांजल्याना आपले म्हणणार्याना साधू म्हणून ओळखावे' या व्याख्येत हे आजचे साधू (?) येतात का ? याचा विचार व्हायला हवा. 

सामान्य लोकाना नाडणार्या या भोंदूंवर सरकारने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. परंतू शासनातील अनेक मंत्रीच (मुख्यमंत्र्यांसहित) या भोंदूंच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर त्यांच्यावर कारवाई कशी होणार हा गहन प्रश्न आहे. देशातील बहुतांशी राजकीय नेते, अधिकारी, उच्चपदस्थ नेमाने अनेक भोंदूंच्या दर्शनाला हजेरी लावतात. तेव्हा अशा विवेक गहाण ठेवणार्या लोकांकडून भोंदूंवरील कारवाईची अपेक्षा तरी कशी करणार ? या भोंदूंसोबत अनेक लोकांचे विशिष्ठ हितसंबंध गुंतलेले असल्याकारणानेही भोंदूंच्या कारनाम्यांकडे डोळेझाक केली जाते. समाजातील अशिक्षित, अद्न्यानी वर्ग या भोंदूंच्या फसवणूकीचा बळी ठरतोच, पण सुशिक्षित लोकही यात मागे नाहीत. किंबहुना सुशिक्षित लोकांचाच या भोंदूंच्या दरबारात अधिक भरणा असतो. शेवटी सामान्य माणूसच बळी जातोय. त्याचेच रक्त शोषून हे भोंदू आपली साम्राज्ये उभी करताहेत. तेव्हा सामान्य माणसानेच याविरुद्ध ठामपणे उभे रहावे.

7 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes