बुधवार, मे १३, २०१५

बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद

बाबासाहेब पुरंदरे याना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. पुरंदरे हे शिवचरित्राचे अभ्यासक मानले जातात. त्यानी 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी लिहिली आहे. पुरंदरे यांच्या समर्थकांचे असे म्हणने आहे कि पुरंदरे यानी शिवराय घराघरात पोहचवले. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात पुरंदरे यांचा मोलाचा वाटा आहे.


याउलट पुरंदरे यांचे विरोधक असा दावा करतात कि पुरंदरे यानी शिवाजी महाराज घराघरात पोहचवले परंतु विकृत स्वरुपात. पुरंदरे यानी शिवराय, जिजाऊ यांची बदनामी केली आहे. तसेच त्यानी जेम्स लेनला चुकीची माहिती आणि संदर्भ पुरवले आहेत, असा पुरंदरे यांच्यावर आरोप आहे. ही पार्श्वभूमी पुरंदरे यांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करण्यामागे आहे. पुरंदरे याना संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा यासह अनेक मराठा संघटना विरोध करत आहेत. त्यामुळे या विषयावर उलटसुलट चर्चा चालू आहे. इतिहासाशी संबंधित असे अनेक वाद गेल्या काही वर्षात निर्माण झाल्याने महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे.

पुरंदरे यांचे वादग्रस्त इतिहासलेखन -
बाबासाहेब पुरंदरे यानी 'राजा शिवछत्रपती' ही भली मोठी कादंबरी लिहून महाराष्ट्रातील मराठी वाचकांवर प्रभाव निर्माण केला आहे. पुरंदरे यांची भाषा ओघवती आणि अलंकारिक असल्याने अनेक लोक आवडीने ही कादंबरी वाचतात. असे सांगितले जाते कि या कादंबरीच्या पाच लाख प्रती खपल्या आहेत. पुरंदरे यांची ही कादंबरी इतर कोणत्याही मराठी पुस्तकापेक्षा खूपच लोकप्रिय ठरली आहे. परंतु एवढ्याने पुरंदरे यांच्या कादंबरीची योग्यता मोजणे बरोबर नाही. इतिहासलेखन करताना ते किती निष्पक्ष पद्धतीने, पुर्वग्रह मनातून काढून लिहिणे गरजेचे असते. आपल्या मनातील कल्पना, धारणा इतिहासाच्या माथ्यावर मारणे हा खूप मोठा अपराध आहे. इतिहास हा विषयच अनेकजणाना रटाळ आणि कंटाळवाना वाटत असलेल्या तो थोडा अलंकारिक भाषेत लिहिला तर लोक आवडीने वाचतात. परंतु याचा अर्थ असा नाही कि इतिहासातील मूळच्या प्रसंग, पात्रामध्ये सोयीस्कर बदल करावा. इतिहासातील काही गोष्टी आपणाला अप्रिय असल्या, गैरसोयीच्या असल्या तरी त्या टाळता कामा नये. किंवा त्याचे स्वरुप बदलून सोयीस्कर इतिहास लिहिता कामा नये. हे सर्व संकेत इतिहास अभ्यासकाने पाळावे अशी अपेक्षा असते. परंतु पुरंदरे यांच्या शिवचरित्राकडे पाहिले तर असे दिसते कि पुरंदरे यानी सोयीस्कर इतिहास लिहिला आहे. ब्राह्मणी चष्म्यातून लिहिलेला इतिहास, शिवरायांच्या मुस्लिम सहकार्यांची उपेक्षा, काल्पनिक कथा-प्रसंग-पात्रे याना अग्रक्रम अशा पद्धतीच्या अनेक चुका पुरंदरे यांच्या इतिहासलेखनात आढळतात. त्यामुळे पुरंदरे यानी सदोष शिवचरित्र लिहिले याबद्दल शंका नाही. 

वैचारिक स्वातंत्र्य आहे कि नाही ?
पुरंदरे यांचे इतिहासलेखन सदोष आहे हे अनेकांप्रमाणे माझेही मत आहे. मात्र सर्वानी अशीच भूमिका घ्यावी हा अट्टहास योग्य नाही. पुरंदरे याना विरोध करण्याचा अधिकार मला आहे, त्याप्रमाणेच पुरंदरे यांचे समर्थन करण्याचा अधिकारही इतराना असायला हवा. संजय सोनवणी यानी पुरंदरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली हे त्यांचे वैय्यक्तिक मत आहे. सोनवणी हेही एक अभ्यासक आहेत. त्यामुळे tयानी जी भूमिका मांडली आहे तिचा वैचारिक प्रतिवाद करायला हवा. परंतु घडते उलटेच. सोनवणी सराना संपर्क करुन घाणेरड्या शिव्या दिल्या जातात. धमक्या दिल्या जातात. हा सांस्क्रुतिक दहशतवाद आहे. पुरंदरे यांच्याबाबतच्या माझ्या आणि सोनवणी सरांच्या भूमिकाही भिन्न आहेत. परंतु मला जसे वैचारिक स्वातंतत्र्य आहे, तसे ते सोनवणी सरानाही आहे याचे भान आम्ही ठेवले पाहिजे. सोनवणी सरानी पुरंदरे प्रकरणात लक्ष घालावे का, घातले तर नेमकी कोणती भूमिका घ्यावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका पटली नाही तर प्रतिवाद करण्याचे स्वातंत्र्य इतरानाही आहेच.

सांस्क्रुतिक दहशतवाद कशासाठी ?
आता अनेकजणाना सांस्क्रुतिक दहशतवाद हा शब्द आवडणार नाही. परंतु ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत ते पाहता हाच शब्द योग्य वाटतो. गेल्या काही वर्षात इतिहासातील वादांवरुन महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा या संघटना अनेकवेळा आक्रमक झाल्या. त्यानी इतिहासलेखनातील त्रुटी दाखवून देणे, इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी आग्रह धरणे गैर नाही. परंतु अशा वादात विरोधी गटाचे स्वातंत्र्य मान्य न करण्याच्या चुका घडतात. काही हिंसक घटना घडतात. ब्रह्मणानी चुकिचा इतिहास लिहिला हे पुराव्यानिशी दाखवून द्यायचे. जो वादाचा मुद्दा आहे तो चर्चेने सोडवायचा. परंतु बरेच वेळा आततायी क्रुती केली जाते. भांडारकर हल्ला प्रकरण, वाघ्या कुत्रा प्रकरण यामध्ये संभाजी ब्रिगेडने हिंसक आततायी क्रुती केल्या. चर्चेने प्रश्न सुटू शकतो यावर त्यानी विश्वास ठेवायला हवा. हिंसेला थारा दिल्याने सांस्क्रुतिक दहशतवाद निर्माण होतो.  उदा. वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून फेकणे. 

ब्राह्मण-मराठा-बहुजन वाद 
इतिहासातील प्रश्नांवरुन वातावरण तापण्यास ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची पार्श्वभूमी आहे. त्यातही ब्राह्मण-मराठा वाद असेच त्याचे स्वरुप आहे. ब्राह्मण इतिहासकारानी जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास लिहिला आणि मराठा/बहुजनांची बदनामी केली असे संभाजी ब्रिगेड म्हणत असते. त्यात तथ्यही आहे. परंतु वैचारिक मार्गाने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. त्यामूळे जातीजातीत शत्रुत्व निर्माण होणार नाही. ब्राह्मण-मराठा, ब्राह्मण-बहुजन, मराठा-दलित अशा वादानी कुणाचेच भले होणार नाही.

मराठा संघटनांची दुटप्पी भूमिका-
मराठा संघटनांच्या चुकिच्या भूमिका आणि मराठा वर्चस्ववाद यावर लिहिले असता सर्वच मराठा समाजाला दोष दिल्याचा आरोप केला जातो. कोणताही समाज संपूर्णत: वाईट किंवा संपूर्णत: चांगला नसतो. त्यामूळे चुकिचा इतिहास लिहिणारे, वर्चस्ववाद वाढवणारे जसे ब्राह्मण होते तसे समाजसुधारणा करण्यात अग्रभागी असणारे, फुले-आंबेडकरांच्या कामात त्याना मदत करणारेही ब्राह्मण होते. तसेच मराठा समाजातही चांगल्या आणि वाईट प्रव्रुत्ती आहेत. वर्चस्ववादी मानसिकेच्या मूठभर मराठ्यांवर टिका केली म्हणजे संपूर्ण मराठा समाजाला दोष दिला असे होत नाही. असो. तर मुद्दा हा आहे कि ब्रिगेडसारख्या संघटना स्वतला बहुजनवादी म्हणवून घेतात आणि मराठावादी भूमिका घेतात. 'मराठा तितुका मेळवावा, गुणदोषासहित स्विकारावा' असे ब्रीद असल्याने मराठ्यांच्या दोषावरही पांघरुण घातले जाते. दलित-सवर्ण वादात नेहमी दलितविरोधी भूमिका घेतली जाते. खर्डा, जवखेडे प्रकरणात हे दिसून आले. खैरलांजी प्रकरणातील आरोपीना मदत करणार्या, दलितविरोधी बोलणार्या, बाबासाहेब आंबेडकरांवर घाणेरड्या भाषेत टिका करणार्या शालिनीताई पाटील ब्रिगेडला जवळच्या वाटतात. का..तर ताई मराठा आहेत. ताईंचा विरोध करण्याचे धाडस ब्रिगेड दाखवत नाहीत. इतर मराठा संघटनानी दलितविरोधी भूमिका घेतली तरी त्यांचा कधी निषेध केला नाही. उलट मराठा संघटना, त्यांचे नेते यांचे काही चुकले तरी दुर्लक्ष करायचे, कारण ते मराठा आहेत म्हणून. दादोजी कोंडदेव वादात मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यानी दादोजींच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यावर मी फेसबूकवर लिहिले असता मला माझी पोस्ट डिलिट करायला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी भाग पाडले. कारण पवार आपले आहेत (म्हणजे मराठा आहेत ). आणि आता सोनवणी यानी पुरंदरे यांची बाजू घेतली तर त्यांच्यावर शिव्यांचा पाऊस हा दुजाभाव का ? हा मुख्य प्रश्न आहे. मराठा समाजातील राजकीय नेत्यांचे समर्थन करायचे. विलासराव देशमुख, आर. आर. आबा, नारायण राणे, शरद पवार, अजित पवार यांचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी गोपीनाथ मुंडे, भुजबळ, जानकर, आठवले याना शिव्या द्यायच्या. या नेत्यांबद्दल अफवा पसरवायच्या असे का ? आणि या गोष्टी घडतात, किंबहुना त्या जाणीवपोर्वक घडवल्या जातात याचा मी साक्षीदार आहे. मग अशा गोष्टींबद्दल लिहिले कि अनेकाना वाटते कि मराठाद्वेष केला. मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. पटत असेल तर बघा. त्यावर विचार करा. चुकत असेन तर दाखवून द्या. पण सभ्य, वैचारिक मार्गाने हे होऊद्या...

शेवटी इतकेच सांगणे आहे कि उथळ विचार न करता पूर्ण भूमिका समजून घ्या. आणि नंतर व्यक्त व्हा. चर्चेतून मार्ग निघतो यावर माझा विश्वास आहे. तुम्हीही ठेवायला हरकत नाही. फक्त भावना प्रामाणिक असल्या पाहिजेत.

-प्रकाश पोळ.

9 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes