रविवार, मार्च १५, २०१५

मुस्लिम आरक्षणाबाबत दुजाभाव का ?

कोंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा (16% ) आणि मुस्लिम ( 5% ) समाजाला आरक्षण बहाल केले. हा निर्णय निवडणूका समोर ठेवून घेतला गेला हे सर्वानाच माहीत आहे. सरकारच्या या निर्णयावर न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवले तर मुस्लिमांचे शैक्षणिक आरक्षण वैध ठरवले. परंतु त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले, मात्र मुस्लिम आरक्षण रद्द करुन टाकले. भाजप आणि संघ परिवाराचा मुस्लिम समाजाप्रती असलेला द्रुष्टीकोण कधी लपून राहिलेला
नाही. परंतु लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदीनी 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा दिल्याने अनेकाना वाटले की आता भाजप सर्व समाजघटकाना समान वागणूक देईल. परंतु फडणवीस सरकारने मुस्लिम आरक्षणाबाबत जो डाव खेळला आहे तो पाहता भाजप आपल्या ध्येयधोरणात बदल करु इच्छित नाही हेच दिसून आले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत.सरकारने जे प्रयत्न केले तसे प्रयत्न मुस्लिम आरक्षणाबाबत का केले नाहीत हा खरा प्रश्न आहे. याबाबतीत सरकारकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले की मुस्लिम आरक्षणात काही तांत्रिक अडचणी आहेत, त्याचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल. पण ही पळवाट आहे हे सर्वाना माहीत आहे. खुद्द न्यायालयाने मुस्लिम आरक्षण वैध आणि मराठा आरक्षण अवैध ठरवले असताना सरकारने नेमकी उलट क्रुती केली आहे. मराठा आरक्षण देण्यात जास्त अडचणी असताना सरकार त्यासाठी प्रयत्न करते मात्र तुलनेने कमी अडचणी असून मुस्लिम आरक्षणाबाबत नकारात्मक द्रुष्टीकोण असे का ? सच्चर समीतीच्या अहवालाने मुस्लिम समाजातील भयावह परिस्थितीवर प्रकाश पाडला आहे. हिंदू बहुजन समाजापेक्षाही मुस्लिम समाजाची शैक्षणिक परिस्थिती चिंताजनक आहे. शासन-प्रशासनातील मुस्लिमांचे प्रमाण खूपच कमी आहे. प्रशासकीय सेवांमध्ये IAS, IPS, IFS अशा पदांवर मुस्लिमांची संख्या अवघी 1-2% आहे. समाजातील सर्वच क्षेत्रात मुस्लिम समाजाचा सहभाग नगण्य आहे. अशा एका महत्वाच्या समाजघटकाला प्रगतीच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी स्वातंत्र्यापासून काय प्रयत्न झाले याचे उत्तर सर्वपक्षीय राज्यकर्त्यानी दिले पाहिजे. आरक्षणामूळे मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाहीत असा एक तोकडा युक्तीवाद नेहमी केला जातो. मान्य आहे. मग इतर जातीजमातीना दिलेल्या आरक्षणामूळे त्यांचे प्रश्न सुटतील असे का मानायचे ? आरक्षणामूळे जर प्रश्न सुटत नसतील तर सरकार मराठा आरक्षणासाठी का प्रयत्न करत आहे ? मुस्लिमांचे सर्व प्रश्न आरक्षण दिल्याने सुटणार नाहीत, परंतु हा समाज प्रगतीच्या प्रवाहात येण्यास मदत होईल. आरक्षणामूळे बहुजन समाजातील अनेक जाती जमातीनी आपला उत्कर्ष साधला आहे. त्यामूळे मुस्लिम आरक्षणाबद्दल असलेला संकुचित द्रुष्टीकोण आपणाला बदलावा लागेल. दुसर्या बाजूने मुस्लिम समाजातील   सुजाण, विवेकी व्यक्तीनी मुस्लिम समाजावरील धर्माचा पगडा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हिंदू बहुजनात ज्याप्रमाणे धर्म चिकित्सा झाली आणि त्यामूळे त्या समाजावरील धार्मिक पगडा काही अंशी कमी झाला, तसे मुस्लिम समाजाबाबत    व्हायला हवे. हा समाज प्रगतीच्या प्रवाहात  आणने ही सर्वांची जबाबदारी आहे.

7 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes