सोमवार, फेब्रुवारी १६, २०१५

दाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा ?

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या झाली. दाभोळकरांचे मारेकरी पोलीसाना सापडू शकले नाहीत. निदान या प्रकारामागे कोणत्या शक्ती होत्या याचाही अंदाज पोलीसाना आला नाही. हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे. त्यानंतर बरोबर दिड वर्षानी कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी, डाव्या विचाराच्या नेत्यावर खुनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे अण्णा आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर
जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे हीच समाधानाची बाब. परिवर्तनवादी विचारवंत, कार्यकर्त्यांवर इतक्या सहजपणे होणारे हल्ले पाहून खरोखरच आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय कि आणखी कुठे असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. एका बाजूला पुरोगामी चळवळी क्षीण होत असताना, त्यांची ताकद विभागली जात असताना जातीयवादी, धर्मांध शक्ती मात्र प्रबळ होत आहेत. केंद्रात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर या जातीयवादी शक्तीना मोकळे रानच मिळाले आहे. त्यांची विधाने, कृती पाहिल्या तर ते समाजाला मध्ययुगीन मानसिकतेत नेत असल्याची खात्री पटते. बुद्ध, चार्वाक, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांचा परिवर्तनवादी विचार जोरकसपणे मांडणारे, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटणारे कार्यकर्ते, विचारवंत यांचा जीव सध्या धोक्यात आहे. सतीश शेट्टी, नरेंद्र दाभोळकर अशा कितीतरी लोकानी आपले बलिदान देवून सर्वसामान्य माणसांचे जीवन सुकर केले आहे. त्यांचे मारेकरी आपणाला अजून सापडत नाहीत. खरोखरच त्यांचे मारेकरी सापडू शकत नाहीत कि त्यांच्यापाठीशी असणारी कुणी शक्ती त्याना वाचवत आहे हाच प्रश्न चळवळीतील कार्यकर्त्याला पडला आहे. पुरोगामी चळवळ क्षीण झाली असताना जे काही मोजके लोक समाजहिताची कळकळ बाळगून जातीय, धर्मांध, भ्रष्ट प्रव्रुत्तीविरुद्ध लढा देत आहेत त्यानाच संपवणे घ्रुणास्पद आहे. दाभोळकरांच्या खूनाने महाराष्ट्राला पन्नास-शंभर वर्षे मागे नेले. फुले-आंबेडकरी विचारधारेवर हल्ले होत असताना शासन (मग ते कोणत्याही पक्षाचे असो) निमूटपणे या गोष्टी पाहत असेल तर ते आक्षेपार्ह आहे. सतीश शेट्टी आणि दाभोळकरांच्या मारेकर्याना पकडण्यासाठी जी संवेदनशीलता शासनपातळीवर दाखवायला हवी होती ती दिसली नाही. पानसरे अण्णांवर झालेल्या हल्ल्यानंतरही हल्लेखोराना पकडण्यासाठी तत्परता दाखवली जाईलच असे नाही. तसा देखावा मात्र केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले कि पोलीसांच्या दहा टीम हल्लेखोरांचा तपास करत आहेत. हल्लेखोर सापडावेत या प्रामणिक भावनेने शासन यंत्रणा वापरली तरच हल्लेखोर सापडतील. फक्त देखावा करुन काहीही साध्य होणार नाही. आपले पोलीस इतके निष्क्रीय अजिबात नाहीत. एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, स्फोट झाला तर आरोपी लगेच सापडतात. काही तासात अटकसत्र सुरु होते. कुठे बलात्कार झाला, खून झाला तरीही आरोपी सापडतात. मग शेट्टी, दाभोळकर प्रकरणातील आरोपीच  काही महिने, वर्षे उलटून गेली तरी का सापडत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर न मिळण्याइतपत पुरोगामी कार्यकर्ते नक्कीच अडाणी नाहीत. या हल्लेखोरांच्या मागे नक्कीच मोठी शक्ती/यंत्रणा कार्यरत असली पाहिजे. यांचे लागेबांधे खूप वरपर्यंत असले पाहिजेत. आता सामान्य माणसाने दबाव वाढवल्याशिवाय शासन यंत्रणा हलणार नाही. आज समाज शांत राहिला तर त्याची किंमत त्याना, त्यांच्या   भावी पिढ्याना पुढील काळात चुकवावी लागेल. महात्मा गांधींच्या हत्येपासून सुरु झालेला हा सिलसिला पानसरे अण्णांपर्यंत चालू राहिला आहे. सुदैवाने पानसरे अण्णा आज वाचले. परंतू त्यांच्या जीवाचा धोका टळलेला नाही. हल्लेखोर सापडले नाहीत तर अशा हिंसक प्रव्रुत्तीना अजून बळ मिळेल. शेट्टी आणि दाभोळकरांचे हत्यारे सापडले असते तर कदाचित आज पानसरे अण्णांवर हल्ला झाला नसता. परिवर्तनवादी   कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात आहे. दाभोळकर, पानसरे अण्णा यांच्यानतर आता पुढचा नंबर कोणाचा आहे ?

-प्रकाश पोळ.

3 टिप्पणी(ण्या):

Amit म्हणाले...

"महात्मा गांधींच्या हत्येपासून सुरु झालेला हा सिलसिला"
हा सिलसिला गांधी नव्हे तर सम्राट हर्षवर्धन याच्या काळापासून सुरु आहे. विचारांची लढाई विचारांनी लढणे ज्यांना अशक्य आहे ते असली कृत्ये करतच राहणार. कोणत्याही विचारसरणीला राजाश्रय लाभण्याआधी लोकाश्रय लाभावा लागतो.
"नवसे कन्या पुत्र होती | मग का कारणे लागे पती || " असा प्रश्न पडणाऱ्या विठ्ठलभक्त तुकारामाला डोक्यावर घ्यायचे आणि मुख्यमंत्री त्याच विठ्ठलाला नवस करतांना कौतुकाने पहायचे ही आपल्या समाजाची अवस्था आहे. जिथे समाजालाच आत्मभान नाही तिथे राज्यकर्त्यांना कुठून येणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? आपली नेमकी ओळख काय असावी हे ज्यांना स्वत:च्या डोक्याने ठरवता येत नाही त्यांच्यावर इतरांनी सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामी लादणे हे संयुक्तीकच म्हणावे लागेल.

अभिजीत पाटील म्हणाले...

पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्या महाराष्ट्रात पुरोगामी नेत्यावर असा भ्याड हल्ला होणे ही राष्ट्रासाठी खरच लाजीरवानी बाब आहे.दाभोलकरांचे मारेकरी अजुनही सापडले नाहीत, कॉमरेड पानसरे यांसारख्या नेत्यावर हल्ला होने ह्या घटना निंदनीय आहे.अशाने सामान्य लोकांचा कायद्यावरून विश्वास तर उडेलच तसेच उद्या कोण पुरोगामी नेता बनन्याचे धाडस करणार नाही.पोलीसांनी आता युद्ध पातळीवर तपास सुरु करून त्या "माथेफ़िरू" हल्लेखोरांना पकडून आपण जाग्रुत असल्याची साक्ष द्यावी.
तीव्र निषेद....

अनामित म्हणाले...

आवो फुडचा लंबर कोनाचा म्हनून काय इचारता? फुडचा लंबर आपल्या समद्यांचा ! नथूरामच्या इरोधात त्वांड खोलायच म्हनजे पाप की हो ! नथुराम हिरो होनार म्हनजे होनारच. समद्यांनी गप-गुमान रहायचं. न्हाईतर,
तुका म्हणे भोग सरे | कधी दाभोलकर कधी पानसरे ||

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes