रविवार, डिसेंबर १४, २०१४

दुखवटा न पाळण्याची कृती उन्माद नसून कर्तव्यभावना

'गोपीनाथगडा'ची बीडमध्ये पायाभरणी...ही बातमी (लोकसत्ता, 13 डिसेंबर) वाचली. यात असे म्हटले आहे कि, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर एक वर्ष दुखवटा न पाळता त्यांच्या समर्थकानी मुंडे यांची जयंती साजरी करुन उन्माद केला. भाजपमधील काही नेते आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे
धनंजय मुंडे यानीही हाच सूर लावल्याचे बातमीवरुन दिसून येते. सध्या काळ बदललेला आहे. चालू शतक हे विज्ञानाचे शतक आहे. समाजाची जीवनपद्धती अतिशय गतिमान झाली आहे. अशा धावपळीच्या, व्यस्त काळात एखाद्या व्यक्तीचा दुखवटा एक वर्ष पाळणे हा शूद्ध मुर्खपणा आहे. धनंजय मुंडे यांच्या म्हणण्यानुसार दुखवट्याच्या काळात एक वर्षभर नवीन कपडेही घालत नाहीत. यावरुन ते कोणत्या युगात वावरताहेत असा प्रश्न पडला आहे.स्वत: धनंजय यानीतरी हा नियम पाळला असेल का ? गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यापासून धनंजय यानी आजपर्यंत एकही नवा कपडा वापरला नसेल का ? निश्चितच वापरला असेल. मग मुंडे यांची जयंती साजरी करणे किंवा त्यांच्या आठवणी जाग्रुत ठेवण्यासाठी 'गोपीनाथगडा'ची उभारणी करणे यात गैर ते काय ? एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या दुखात बुडून कर्तव्यभावना विसरुन जाणे योग्य कि त्या व्यक्तीला अभिप्रेत असणारे कार्य पुढे घेवून जाणे योग्य ? कोणताही विवेकी माणूस हा गेलेल्या व्यक्तीचे दुख: पाळत बसणार नाही. याचा अर्थ गेलेल्या व्यक्तीबद्दल आपणाला प्रेम नाही असा होत नाही. यासंदर्भात एक बोलके उदाहरण देतो. ज्यावेळी नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियाना खूप दुख: झाले असणार. दाभोळकरांचे पार्थिव ससून रुग्णालयापासून साधनेच्या कार्यालयात नेताना अनिसच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दाभोळकरांची मुले हमीद आणि मुक्ता हे स्वत:चे दुख: विसरून कार्यकर्त्याना समजावत होते. दाभोळकर गेले म्हणून दुखवटा पाळत त्यांच्या पत्नी आणि मुले घरी बसली नाहीत. दुसर्या दिवसापासून त्यानी अनिसच्या कामात स्वत:ला झोकून दिले. ही कर्तव्यभावना जर पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी पाळली तर बिघडले कुठे ? त्यामुळे गेलेल्या व्यक्तीसाठी एक वर्ष दुखवटा पाळायला हवा होता आणि तो नाही पाळला म्हणून त्याला उन्माद म्हणणारे संकुचित प्रतिगामी मानसिकतेचे समर्थन करीत आहेत हे लक्षात घ्यावे.

प्रकाश लालासाहेब पोळ.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes