शुक्रवार, डिसेंबर १२, २०१४

स्वराज, गीता आणि संविधान...

परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यानी भगवदगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. सुषमा स्वराज या एक जबाबदार नेत्या आणि केंद्रीय मंत्री असतानाही भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता तत्वालाच त्यानी आव्हान दिले आहे.

 स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये धर्माचे स्थान काय असावे, स्वतंत्र भारताचा कोणता धर्म असावा यावर बरीच चर्चा झाली. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकत्र राहत आहेत. भिन्नधर्मीयांची ही वैविध्यपूर्ण संस्क्रुती
जपण्याबरोबरच धर्माधिष्ठित व्यवस्था भारताच्या प्रगतीत अडथळेच आणू शकते हे घटनाकाराना माहीत होते. त्यामूळेच स्वतंत्र भारताचा कोणताही एक अधिक्रुत धर्म असणार नाही अशी भूमिका घेतली गेली.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील पहिलीच ओळ अशी आहे : 'आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा......'. मूळ घटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. तो 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केला. याचा अर्थ असा कि भारतीय राज्यसंस्थेचा कोणताही धर्म नसेल. धर्म ही बाब वैयक्तिक जीवनापुरती मर्यादित असेल. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कोणत्याही धर्माचा प्रचार, प्रसार आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य असेल. धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली जाणार नाही. प्रा. के. टी. शहा यानी ही दुरुस्ती सुचवली आणि ती मंजूर झाली.  
परंतु घटनेने मात्र सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्ष तत्व स्वीकारले होते. तश्या तरतूदीही घटनेत नमूद आहेत. घटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश आहे. यानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार कोणत्याही धर्माचा पुरस्कार करु शकते. व्यक्तीवर एखाद्या धर्माची, धार्मिक विचारप्रणालीची सक्ती करता येणार नाही अशी हमी घटनेनेच दिली असताना घटनेचीच शपथ घेवून राज्यकारभार करणार्या सुषमा स्वराज याना घटनेच्या मूलभुत तत्वांचाच विसर पडला कि काय ?

घटनेतील धर्मनिरपेक्षता हे तत्व घटनेच्या मौलिक संरचनेचा भाग असून घटनादुरुस्ती करुनही हा भाग बदलता येणार नाही अशा प्रकारचे निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. केशवानंद भारती वि. केरळ राज्य (1973), एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (1994) अशा खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या मौलिक संरचनेची व्याख्या करताना 'धर्मनिरपेक्षता' हे तत्व मौलिक असल्याचा उल्लेख केला आहे.

भारतीय संविधान या देशातील सर्वोच्च दस्तऐवज आहे. कोणत्याही धर्माचा ग्रंथ घटनेशी बरोबरी करु शकत नाही. स्वराज किंवा भाजपच्या इतर नेत्याना घटनेबद्दल किती प्रेम आहे ते जगजाहीर आहे. त्याना असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग त्यानी जरुर घ्यावा. मात्र कोणत्याही एका धर्माला झुकते माप देवून घटनेच्या मूलभुत तत्वानाच हरताळ फासू नये.

1 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

hindu dharmiy lokanchya soft mind nature cha aajkal sagle gairfaida ghet aahet. bhartat minority la jitke freedom aahe, titke jagat kuthlahi dharma minority la det nahi.
aajkal hindu dharmacahi saglyana alargy zali aahe.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes