मंगळवार, डिसेंबर ०९, २०१४

'भाजपकडून मित्रपक्षांची उपेक्षा...'

महादेव जानकर 
भाजपने बहुजन समाजातील घटकाना सामावून घेण्यासाठी महादेव जानकर (रासप), रामदास आठवले (रिपाइं), राजू शेट्टी (स्वा. शे. संघटना) आणि विनायक मेटे (शिवसंग्राम) यांच्याशी निवडणूकपूर्व युती केली. हे घटकपक्ष छोटे असले आणि त्यांची ताकद मर्यादित असली तरी त्यांची एक ठराविक 'वोट बँक' आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी
भाजपने या पक्ष/संघटनाना सोबत घेतले. या सोशल इंजिनीरिंगचे खरे श्रेय गोपीनाथ मुंडे यांचे आहे. शरद पवारांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे नेते म्हणजे मुंडे. त्यानी संघाचे वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांच्या मदतीने 'माधव' (माळी-धनगर-वंजारी) असा यशस्वी पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणात राबविला. इथल्या मराठा वर्चस्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी त्यानी या समाजघटकाना प्रतिनिधित्व दिले. त्याआधारे त्यानी 1995 साली युतीची सत्ताही आणून दाखविली. सध्याही लोकसभा आणि विधानसभेला त्यानी दलित, मागासवर्ग, शेतकरी या समाजघटकाना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने विधानसभा निवडणूकांच्या आधीच मुंडेंचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर भाजपने मित्रपक्षांची ढाल पुढे करत शिवसेनेसोबतची पंचवीस वर्षांची युती तोडली. प्रस्थापित सरकारबद्दल जनतेत असलेली नाराजी, मोदींचा करिश्मा आणि छोट्या मित्रपक्षांची साथ या भरवशावर भाजपने निवडणूक लढवली आणि तब्बल 122 जागा त्याना मिळाल्या. रासपला एक जागा (दौंड) वगळता मित्रपक्षांचा कुणी उमेदवार निवडून आला नाही. परंतु त्यांच्या सहभागाचा भाजपला चांगलाच फायदा झाला. आणि हे भाजपलाही मान्य असावे. युती करताना भाजपने मित्रपक्षाना सत्तेत योग्य वाटा देवून सन्मानपूर्वक सामावून घेण्याचा शब्द दिला होता. परंतु नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मित्रपक्षांच्या पदरात उपेक्षाच आली. भाजपने याबाबतीत कॉंग्रेसचा आदर्श घेतलेला दिसतोय. आधी प्रादेशिक किंवा छोट्या पक्षांशी युती करायची, त्यांची मदत घेवून सत्ता मिळवायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांचीच उपेक्षा करायची, त्याना संपविण्याचे प्रयत्न करायचे. मित्रपक्षाना अपमानास्पद वागणूक देण्यात भाजप कांग्रेसप्रमाणेच डावपेच आखत आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपने मित्रपक्षांचा पुरेपूर वापर करुन घेतला. या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या भाजप उमेदवारांसाठी जेवढ्या सभा झाल्या तेवढ्या त्यांच्या स्वत:च्या उमेदवारांसाठीही होऊ शकल्या नाही. इतके असूनही भाजपने आपल्या मित्राना ठेंगाच दाखविला. परंतु त्यामूळे भाजपचे 'वापरा आणि फेकून द्या' हे धोरण दिसून आले. गोपीनाथ मुंडे आज असते तर भाजपचे आज झाले तसे नैतिक अध:पतन झाले नसते. कारण दिलेला शब्द पाळण्याचा त्यांचा स्वभाव होता. आता भाजपमध्ये त्या योग्यतेचे नेते राहिले नसल्यामूळे हे सर्व घडत आहे. आज जरी भाजपला सत्ता मिळाली असली तरी ही शेवटची निवडणूक नाही याचे भान त्यानी ठेवणे गरजेचे आहे.

6 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

दुर्दैवाने विधानसभा निवडणूकांच्या आधीच मुंडेंचे "आकस्मिक निधन" झाले.

हे विधान विवादास्पद आहे.

अनामित म्हणाले...

जानकर हे केवळ धनगरांचेच नेते आहेत आणि महायुतीशी कितीही लगट केली तरीही महायुतीचे नेते जानकर यांची ओळख धनगरांचा नेता यापलीकडे जाऊ देणार नाहीत. नागपूर काय आणि बारामती काय, शेवटी दोन्ही ठिकाणी धनगर समाजाचा वापरच करून घेतला जाणार आणि सत्तेची पाने मांडायची वेळ आली की धनगर समाजाच्या तोंडाला उष्ट्या पत्रावळ्याच पुसल्या जाणार.

हे विलेक्शनच्या आधी सांगितलं तवा तुमासनी पटलं न्हाय! आता उगा बोंब कशापायी मारता?

rohit म्हणाले...

Jankar obc leader ahet. he satya jyana pachat nahi ase lok tyancha dvesh karat ahet. jankar mothe zalele tumhala pahavat nahi ka?

अनामित म्हणाले...

जानकर यांचा द्वेष करावा इतके मोठे ते झालेले नाहीत. प्रश्न जानकर मोठे होण्याचा नाही तर धनगर समाजाला न्याय मिळण्याचा आहे. जानकर खरोखरच ओबीसींचे नेते असतील तर सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठी का उभा राहत नाही? आज एवढी वर्षे मराठा समाजाचे मंत्री होत आहेत तरी देखील सामान्य मराठा समाज खितपत पडलेलाच आहे. मग एका धनगराला मंत्री केले म्हणून लगेच धनगरांचे भले होईल काय? राजकीय प्रतिनिधित्व जातीनिहाय असणे गरजेचे आहेच. पण त्या जातींतील पिछाडीवर पडलेल्या समाजाला मिळणे हे अधिकच गरजेचे आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष केवळ धनगरांच्या आरक्षणाचा विषय हाती का घेतो? मराठा जाऊदे निदान मुस्लिम आरक्षणाला खुला पाठींबा का देत नाही? नेता म्हणवून घ्यायचे ओबीसींचा आणि मंत्रिपद मिळाले नाही की मात्र धनगर समाजावर अन्याय झाला म्हणून बोंबलत सुटायचे? अशाने कोण तुमच्या पाठीशी उभे राहील? सत्ता म्हणजे काय याची पुसटशी जाणीव सुद्धा ज्यांना झालेली नाही ते केवळ मंत्रिपदे मिळवण्यातच धन्यता मानणार!

अनामित म्हणाले...

Anonymous said... December 29, 2014 यांस..

सर्वप्रथम आपण जानकर साहेब यांच्यावर द्वेष'पूर्ण कमेंट्स करून जानकर साहेब हे नक्कीचं दखल घेणारे नेते झाले आहेत, हे मात्र समजले.

दूसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण लोकसंख्येप्रमाने आरक्षण मिळावे, हि महादेव जानकर साहेबांची मागणी तशी जुनीचं. मराठा सेवा संघ, मराठा महासंघ ,छावा मराठा युवा संघटना, शिवसंग्राम, शिवराज्य पक्ष मधील बड़े नेते व महत्वपूर्ण लोकांना याबाबत विचारावे. महादेव जानकर साहेब हे फार पूर्वीपासून मराठा आरक्षण समर्थक आहे, हे तेचं सांगतील.

आणि दूसरी गोष्ट म्हणजे महादेव जानकर साहेब यांना 'लोकबंधू' म्हणून सन्मान / गौरव हा स्व .एम. आर. खान साहेब यांनीचं केला. एम. आर. खान यांना सम्पूर्ण भारतभरातिल मुस्लिम तसचं बहुजन समाजात मानाचे स्थान होते.

अनेक मराठा व मुस्लिम समाजाचे नेते रा.स.पा'त फार पूर्वीपासून आजही कार्यरतचं आहे. जानकर साहेब धनगर / ओबीसी समाजाबरोबर सर्व बहुजन समाजाचे...राष्ट्रीय समाजाचे नेते आहेत.

असो....
शरद पवार यांनी मुस्लीम समाजाला आरक्षणात केवळ अडकविण्यासाठी हि वरील चाल केली होती. आता ते सर्वांना समजले आहे.
मराठा समाजाजाच्या मागासाला तसेचं सर्व बहुजन समाजाला मागास ठेवणारे शरद पवार साहेब सारखे काही सर्व समृद्ध व सदैव सत्त्तेत असणारे बडे नेतेचं जवाबदार आहेत.

मुळात आता कुठे...आणि फक्त एक जानकर तुम्हांस खपत नाही...यावरुन आपण किती संकुचितवादी हे मात्र दिसले.

असो....आपला प्रयत्न चांगला होता. पण आपण फेल ठरला.

अनामित म्हणाले...

"जानकर साहेब धनगर / ओबीसी समाजाबरोबर सर्व बहुजन समाजाचे...राष्ट्रीय समाजाचे नेते आहेत."
मग शपथविधीच्या दिवशी मुंबईतून बाहेर जाण्याची वेळ का बरे आली?

जानकर खरोखरच ओबीसींचे नेते असतील तर केवळ रासपच्या पाठींब्यावर भाजपला का बरे बहुमत मिळाले नाही? आठवले आणि राजू शेट्टी हे कोण आहेत? की जानकर सोडून इतर सर्व नेते हे संकुचित आणि जानकर मात्र तेवढे राष्ट्रीय?

"शरद पवार यांनी मुस्लीम समाजाला आरक्षणात केवळ अडकविण्यासाठी हि वरील चाल केली होती. आता ते सर्वांना समजले आहे. "
मग जानकर मुस्लिम आरक्षणाचे समर्थन करणार का? की केवळ धनगर आरक्षणाचाच मुद्दा पुढे रेटणार?


"आपण जानकर साहेब यांच्यावर द्वेष'पूर्ण कमेंट्स करून"
म्हणजे पवारांवर तुम्ही टीका केली की ते योग्य , न्याय्य आणि उदारमतवादी विचारांचे लक्षण असते. आणि जानकर यांच्यावर टीका झाली की तो मात्र त्यांचा द्वेष? केवळ एक प्रतिक्रिया दिल्याने जानकर यांचा मोठेपणा आणि माझा संकुचितपणा सिद्ध होत असेल तर मग पवारांवर तुम्ही टीका केल्याने पवारांचा मोठेपणा आणि तुमचा संकुचितपणाच सिद्ध होत नाही काय?

पवारांकडे मंत्रीपद नसतांना देखील त्यांच्याकडे बोट दाखवून जानकर यांच्यावरील टीकेचा रोख पवारांकडे वळवून नेमके काय साध्य होणार आहे? प्रश्न पवार आणि जानकर यांचा नाही तर आजपर्यंत सर्वच जमातींतील ज्या जनतेला विकासाची संधीच मिळाली नाही त्यांच्यासाठी ती संधी निर्माण करण्याचा आहे. असे कित्येक पवार आणि जानकर येतील आणि जातील पण सामान्य जनतेला त्याने काय फरक पडणार आहे हा खरा मुद्दा आहे. आणि त्यावर पवार, जानकर आणि इतर सर्वच नेत्यांचे समर्थक सोयीस्कर मौन बाळगून आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes