सोमवार, नोव्हेंबर २४, २०१४

ऐसे कैसे झाले भोंदू

देव कोणाला म्हणावं ? संत कोण आहे हे कसं ओळखावं ? या प्रश्नांची उत्तरे संत तुकोबानी साडेतीनशे वर्षांपूर्वीच दिली आहेत. तुकोबा म्हणतात,
"जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुला,
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा..."
साडेतीनशे वर्षांपूर्वी जे तुकोबांना उमगलं ते आज एकवीसाव्या शतकात आपणाला कळू नये यासारखी शोकांतिका नाही. दोन दिवसांपूर्वी हरियाणातील हिस्सार येथील रामपाल या तथाकथित बाबाला पोलीस कारवाई
करुन ताब्यात घेण्यात आले. या पोलीस कारवाईवरुन जे रणकंदन माजले ते एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथेला शोभेल असेच होते. कोण हा रामपाल ? त्याचा एवढा दरारा का ? त्याला आणि त्याच्या समर्थकांना इतका कसला माज आहे कि भारतीय न्यायव्यवस्थेला आव्हान देण्यापर्यंत त्याची मजल जावी ? या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर प्रथम या बाबाचा इतिहास पहावा लागेल.

हरियाणा राज्यातील सोनपत येथे 1951 साली रामपालचा जन्म झाला. पेशाने इंजिनीअर असलेल्या रामपालने काही वर्षे शासकीय सेवेत व्यतित केली. त्यानंतर त्याने नोकरी सोडून अध्यात्माचा मार्ग धरला. तर काहीजणांचं असं म्हणनं आहे कि रामपालला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. सत्य काय आहे ते अजून निश्चित माहीत नाही. तर या बाबाने नोकरी सोडल्यानंतर म्हणा किंवा त्याला कामावरुन काढून टाकल्यानंतर रोहटक जिल्ह्यातील करोंथा याठिकाणी आश्रम स्थापन केला (1999). हा रामपाल तसा हिंदूविरोधी म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदू तत्वज्ञानाला रामपालचा विरोध आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश याना तो मानत नाही. हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा तो कडवा टिकाकार आहे. इतकेच काय आर्य समाजाच्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर टीका करण्यामूळे रामपाल समर्थक आणि आर्य समाजी लोक यांच्यात संघर्षही झाला होता.

रामपाल स्वत:ला कबीराचा अवतार म्हणवून घेतो. सामान्य लोकाना अध्यात्माची मोहीनी घालून रामपालने करोडो रुपयांची माया जमा केली आहे. शेकडो एकर भूकंड, त्यावर पसरलेले काही एकराचे त्याचे साम्राज्य, हजारो शिष्य आणि लाखो भक्तगण हा सारा पसारा पाहिला तर रामपालच्या सामर्थ्याची प्रचिती येईल. त्याहीपुढे जावून आपल्या आश्रमात चालणारे अनेक काळे धंदे, भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासक यांच्या मेहेरबानीमूळे रामपालला मिळत असलेले अभय यामूळे त्याचा आत्मविश्वास वाढतच गेला. त्यातूनच त्याने व्यवस्थेशी संघर्ष करण्यासाठी आश्रमाच्या आतच तयार केलेली सशस्त्र सेना ही तर अधिकच चिंतेची बाब. या रामपालला अटक केल्यानंतर त्याच्या आश्रमात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या.
त्याच्या आश्रमातील अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण झाल्याचे उघड झाले. आश्रमातील स्वच्छतागृहात ठिकठिकाणी कॅमेरे बसवल्याचे आढळून आले. शस्त्रांचा साठाही आश्रमात सापडला. याच शस्त्र आणि दारुगोळ्याचा वापर रामपालच्या समर्थकानी पोलीसांशी संघर्ष करायला केला. इतके सगळे रामायण घडल्यानंतर रामपालला अटक झाली. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतू यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा विषय फक्त रामपालपुरता मर्यादित राहू नये.

भारतात बुवाबाजीचे पेव फुटले आहे. जिकडे पहावे तिकडे बुवाच बुवा दिसताहेत. फक्त एका रामपालवर कारवाई झाली म्हणून हा प्रश्न सुटेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. सध्या हरियाणात  भाजपचे सरकार आहे. भाजप हा कट्टर उजवा पक्ष असल्याने बुवा-बाबांच्या बाबतीत हा पक्ष थोडी नरमाईची भूमिका घेतो. आसाराम प्रकरणात त्याचा अनुभव आलाच आहे. आसारामविरुद्ध प्रतिक्रिया देणार्यात भाजपचे नेते दिसले नाहीत. उलट काही नेत्यानी आसारामचे समर्थनच केले. हिंदू धर्माच्या नावावर राजकारण करणार्या भाजपला हिंदू बुवा-बाबा-अम्मा-मातांना हात लावण्याची इच्छा नाही. रामपाल हिंदूविरोधी असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे सोपे गेले. तिथे हिंदू धर्म खतरेमे आला नाही. परंतु आज भारतभर इतके बुवा तयार झालेत कि विचारु नका. यातील बहुतांशी हिंदू असून हिंदू धर्मव्यवस्थेला मानणारे आहेत. या सर्वांचा भाजपला नेहमीच पाठिंबा असतो. नुकताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला तेव्हा यातील बरेच भगवेधारी व्यासपीठावर सन्मानाने बसले होते. या बुवा-बाबा-अम्मा-माता यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची अमाप संपत्ती. संत तुकोबा,गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी यांच्याकडे बौद्धिक संपत्ती होती. परंतु आजकालचे संत (?) पाहिले तर यांचा आणि बुद्धिचा काही संबंध आला असेल याची सुतराम शक्यता नाही.

या आजकालच्या भोंदूनी समाजाची नाडी ओळखून त्याना मानसिक गुलाम केले आहे. समाजातील बरेच लोक कोणत्या ना कोणत्या काळजीत असतात. त्याना काही अडचणी असतात. कुणाचे लग्न जमत नाही, तर कुणाला मूल होत नाही. कुणाचे आजारपण तर कुणाचे आणखी काही. अशावेळी दिर्घकालीन संकटाला कंटाळलेले लोक अगतिक होऊन या भोंदू बाबाना शरण जातात. कारण या भोंदू बाबानी त्याना लोकांच्या प्रत्येक समस्येवर आपल्याकडे उपाय आहे अशा प्रकारचा विश्वास दिलेला असतो. मूळात आपली शिक्षणपद्धती सदोष असून विवेकवादाचे शिक्षण आपल्याला मिळत नाही. त्यात लहानपणापासून होणारे देव-धर्म-अंधश्रद्धांचे संस्कार यामूळे तर लोक अंधश्रद्धेत लगेच गुरफटतात. भोंदू बाबानी किंवा बायानी केलेल्या अतर्क्य दाव्याना तर्काच्या, विवेकाच्या कसोटीवर घासून पहाण्याची कुवत सामान्य माणसामध्ये राहिलेली नसते. त्यामूळे ते अशा बाबा-बायांचे मानसिक गुलाम होतात. एकदा सामान्य लोक या भोंदूंच्या नादी लागले कि त्यांचे पूर्ण ब्रेन वाशिंग केले जाते. इतके कि या भोंदूंसाठी ते जीवही द्यायला तयार होतील. सामान्य लोकांच्या या मानसिक गुलामीचा फायदा घेत अनेक भोंदू लोक स्त्रियांचे, बालकांचे लैंगिक शोषण, गैरमार्गाने पैसा कमावणे, धाकधपटशाह दाखवून किंवा राजकीय-प्रशासकीय भ्रष्टाना हाताशी धरुन भूखंड लाटणे, त्यावर आपले साम्राज्य उभे करुन त्यातून काळे धंदे सुरु ठेवणे असे प्रकार करतात. परंतु सापडला तो चोर, आणि जो सापडत नाही तो साव या उक्तीप्रमाणे एखादा आसाराम, एखादा रामपाल गजाआड जातो. परंतु असे हजारो आसाराम आणि रामपाल खुलेआम फिरताहेत. त्याना कोणत्याही कायद्याची भीती नाही. आपल्यावर कारवाई होईल अशी शक्यताही त्याना वाटत नाही. आता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसतात त्यांच्यावर कशी कारवाई होणार आणि कोण करणार ?

रामपालचे गैरप्रकार अनेक वर्षांपासून सुरु आहेत. याची कुणकुण कुणालाच नसेल असे नाही. मात्र तरीही रामपालवर कारवाई होऊ शकली नाही. त्याच्याकडे असलेला अमाप पैसा, अध्यात्माच्या जोरावर त्याने जमा केलेले भक्तगण आणि राजकीय लागेबांधे यामूळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती. आता पाणी गळ्यापर्यंत आल्याने आणि कोर्टानेच त्याला अटक करायचे आदेश दिल्याने रामपालवर कारवाई झाली. कोर्टाने याप्रकरणी रामपालविरुद्ध अजामीनपात्र अटक वारंट काढले नसते तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता धूसर होती. त्यामूळे एक गोष्ट लक्षात येते की अशा प्रकारच्या भोंदू बाबा-बायांविरुद्ध कितीही ओरड झाली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. झालीच तर ती अपवादात्मक परिस्थितीतच होऊ शकते. या भोंदूंच्या आश्रमात काय चालते याची साधी चौकशीही होत नाही. त्यात या सर्व बाबीत धर्म डोकावत असल्याने गोष्टी अजून गुंतागुंतीच्या बनतात. त्यामूळे या बाबाना मोकळे रान मिळते. त्यात अनेक राजकारणी याच भोंदू बाबांच्या पायावर डोके ठेवायला जात असल्याने बाबाना अभय देणे ही राजकारण्यांचीही गरज बनते. म्हणजे राजकीय नेत्यानी बाबांचे रक्षण करायचे आणि त्याबदल्यात या बाबानी राजकारण्याना आशीर्वाद द्यायचे असे साटेलोट्याचे राजकारण असते. त्यात भारतीय जनतेसारखा अजब नमुना जगात शोधून सापडणार नाही. आसाराम, रामपाल गुन्हेगार आहेत हे माहीत नव्हते तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवला तर एकवेळ समजून घेऊ, पण यांचे काळे धंदे, शोषण उघड झाले तरी काही लोक या भोंदूंचे समर्थन करीत राहतात हे उद्वेगजनक आहे.

या बाबांची खरी ताकद ही सामान्य लोकांची मानसिक गुलामी ही आहे. एकदा सामान्य माणसाने ही गुलामी झुगारुन दिली तर देशातील भोंदूंचे किल्ले ढासळायला वेळ लागणार नाही. परंतु त्यासाठी आम्हाला भावी पिढीला विवेकवादी, विज्ञानवादी शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष डोकावणारा धर्म बाजूला केला पाहिजे. प्रशासन अधिक कार्यक्षम बनवून त्याना अशा भोंदूंवर कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे. जे राजकारणी भोंदूंच्या पायावर डोके ठेवतात त्यानाही मतदारानी घरी बसविले पाहिजे. हे सर्व झाले तरच या देशातील भोंदूगिरीला चाप बसेल. परंतु हे सर्व उपाय करण्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती कोण दाखवणार हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे.

5 टिप्पणी(ण्या):

Shankar Pol म्हणाले...

sundar....

Nikhil Bhalerao म्हणाले...

ह्याचा प्रत्यक्ष परिणाम समाजाच्या विचारसरणीवर होतोय असा म्हणण वावगं ठरणार नाही. जातीयवादी दरी ला खातपाणी घालणाऱ्या भोंदू बुवा बाबांन विरोधात सक्षम कायदा असणे अत्यंत गरजेचे, बाबांच्याच आशीर्वाद घेणाऱ्या सरकार कडून अशी अपेक्षा ठेवणे जरा कठीणच.

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद शंकर आणि निखिलजी....

Bhanudas Rawade म्हणाले...

अहो निखिलजी

हां बाबा एकच असतो आणि त्याचे भक्त हजारो आहेत
आता एक बाबाला दोष द्यायचा का त्याच्या भक्तानां दोष द्यायचा..???
कोण कोणत्या गोष्टीं साठी कायदे करायचे आता..??

किमान स्वताला सदसदविवेक बुद्धि असन्या साठी सुद्धा कायदा करायचा का..??

समाज मुर्ख आहे तर बाबाला दोष देण्यात काय अर्थ आहे

आता सरकार मधे असणारे लोक काय आभाळा मधून पडले आहेत का
आपल्या मुर्खपनाला बाबाला आणि सरकार का दोषी धरायच..??

आपण आहोत का प्रामाणिक
अहो सिग्नल ला उभ राहायच असा कायदा आहे ना अस्तित्वात

मग थांबतो का आपण सिग्नल ला नाही ना
आणि वर परत दोष कोणाला देणार चीरी मिरी घेणाऱ्या पोलिसाला

ना बाबा दोषी ना सरकार दोषी
दोष आपला आहे

प्रकाश पोळ म्हणाले...

@भानुदास जी...

दोष आपलाही आहे हे खरेच आहे. पण याचा अर्थ असा नाही कि या भोंदू बाबांचा दोषच नाही. फासणारा आणि फसवणारा दोघेही दोषी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes