गुरुवार, नोव्हेंबर २०, २०१४

गांधीजी कि नथुराम ?

'मी नथुराम...' नाट्यप्रयोगास सोलापूरात कांग्रेसचा विरोध (दै. लोकसत्ता, 12 नोव्हेंबर) ही बातमी वाचली. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केल्याने भारतीय जनमानसात नथुराम खलनायक बनला आहे. पुरोगामी, गांधीवादी, समाजवादी विचारांच्या व्यक्तीनी वारंवार नथुराम गोडसेच्या या क्रुतीची निर्भत्सना केली आहे. परंतु संघ परिवारातील व्यक्तीनी मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नथुरामचे समर्थनच केले आहे. 

गांधीजी आणि नथुराम यांचे अनेक बाबतीत मतभेद होते हे जगजाहीर आहे. असे मतभेद असण्यातही काही गैर नव्हते. परंतु एखाद्या व्यक्तींच्या विचाराला विरोध असेल तर वैचारिक वादविवाद किंवा घटनात्मक मार्गाने विरोध करणे योग्य आहे. परंतु नथुरामने गांधीजींची हत्या करुन हा विरोध व्यक्त केला. नथुरामन गांधीजींची केलेली हत्या कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरु शकत नाही. नथुराम समर्थकानी नथुरामला निर्दोष ठरवण्यासाठी आणि गांधीहत्येचे समर्थन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. 'गांधीवध' हा शब्दप्रयोग रुढ करणे हा त्याच प्रयत्नांचा एक भाग होता. 'मी नथुराम..' या नाटकाच्या माध्यमातूनही अप्रत्यक्षपणे नथुरामचा उदो-उदो करुन गांधीहत्येचे समर्थन केले जाते. 

सध्या पंतप्रधान मोदीनी चालविलेली गांधींची भलामन, स्वच्छता मोहिमेसाठी केला जाणारा गांधींच्या नावाचा वापर आणि संघ परिवारातील काही व्यक्तीनी नथुरामचा उदोउदो करण्याचा चालविलेला प्रयत्न या परस्पर विसंगत बाबी आहेत याचे भान या सर्वानी ठेवले पाहिजे. गांधीजी आणि नथुराम यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पहाण्यापेक्षा विचारसरणी म्हणून पाहिले पाहिजे. या दोघांची विचारसरणी म्हणजे दोन भिन्न टोके होत. एकाच वेळी आपण या दोघाना स्वीकारु शकत नाही. गांधीजी कि नथुराम यातील एक पर्याय आपणाला ठरवावा लागेल. मोदीनी गांधींच्या नावाचा जो जयघोष चालविला आहे त्या पार्श्वभूमीवर संघ परिवाराने यातला ठोस पर्याय निवडून विसंगती दूर करावी. 

नथुराम समर्थकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरुर आहे. परंतु गांधींची बदनामी, त्यासाठी इतिहासाची मोडतोड आणि गांधीहत्येचे समर्थन या गोष्टी अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाहीत याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. एकट्या नथुरामचेच गांधींशी मतभेद होते असे नाही. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस अशा अनेक नेत्यांचेही गांधींशी टोकाचे मतभेद होते. तरीही या लोकानी गांधींचा योग्य तो आदर राखत घटनात्मक मार्गाने आपले मतभेद व्यक्त केले. परंतु नथुरामने मात्र गांधींना मारुन त्यांचे विचार संपवायचा प्रयत्न केला. गांधीहत्येपासून आजपर्यंत विविध मार्गाने गांधीहत्येचे समर्थन करण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु आता भाजप आणि संघ परिवाराने बेगडी भूमिका सोडून याविषयी आपली भुमिका जाहीर करावी. अन्यथा मोदीनी चालविलेला गांधींचा जयघोष हा राजकीय सोयीसाठी आहे हे सिद्ध होइल.

1 टिप्पणी(ण्या):

Mitesh Take म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes