बुधवार, ऑक्टोबर ०८, २०१४

राजकीय नेत्यानी ढोंग बंद करावे

युती आणि आघाडी तुटल्याने सर्वच राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे. शिवसेना-भाजप युती अबाधित असताना या दोन पक्षांची वाटचाल एकाच दिशेने चालू होती. परंतू जशी युती तुटली तसे हे पक्ष एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करु लागले. उद्धव ठाकरे यानी मोदी, अमित शहा आणि इतर भाजप नेत्याना लक्ष्य केले. तर मोदी, शहा वगळता इतर भाजप नेत्यानी मात्र उद्धव याना धारेवर धरले. लोकसभेच्या वेळी राज ठाकरेंचे मोदीप्रेम ऊतू जात होते. भाजप नेत्यानी फटकारुनही राज ठाकरे यानी मोदीना
पाठींबा दिला. मोदी हे विकासपुरुष असल्याने ते देशाचा सर्वांगीण विकास करतील असे राज म्हणत असत. मग चारच महिन्यात राज याना उपरती होऊन मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असल्याचा साक्षात्कार कसा काय झाला ? कांग्रेस आणि राष्ट्रवादीचीही अवस्था वेगळी नाही. गेली पंधरा वर्षे सत्तेसाठी एकत्र राहूनही आज या दोन पक्षांची भाषा पाहिली तर हे कधीकाळी एकत्र होते कि नाही असा प्रश्न पडावा. मुख्यमंत्री चव्हाण हे अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचा आरोप करणार्या राष्ट्रवादीला कधीही सरकारमधून बाहेर पडावेसे वाटले नाही का ? त्यावेळी त्यांची नैतिकताअ, स्वाभिमान हे सर्व कुठे होते ? कांग्रेसही राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. मग अशा भ्रष्ट पक्षाबरोबर आघाडी करुन कांग्रेस कशी काय सत्तेत राहिली हे एक कोडेच आहे.

सारांश इतकाच कि या सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची नैतिकता कमालीची खालावली आहे. निवडणूक प्रचारातील भाषणबाजी पाहिली तर याची साक्ष पटेल. वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या सर्वच पक्षांच्या जाहिराती तर खोटेपणाचा कळस आहेत. आघाडी सरकारच्या पंधरा वर्षात टोल बंद करता आला नाही, मात्र राष्ट्रवादीने शंभर दिवसात टोल बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. अश्याच लबाड्या सर्व पक्षानी केल्या आहेत. स्वत:चे नैतिक अध:पतन झाले असताना जनतेचे अध:पतन करण्याचा विडा यानी उचलला आहे. गोरगरीब लोकाना जेवण, दारु, पैसे यांचे अमिष दाखवण्याचे पाप होत आहे.

काही स्वार्थापोटी तर काही नाईलाजापोटी राजकीय पुढार्यांच्या चालीला बळी पडत आहेत. परंतु यामुळे समाजाचे नुकसान होत असून स्वाभिमानी आणि बलशाली भारत घडवण्यात या गोष्टींचा प्रमुख अडथळा आहे. कारण अशा पद्धतीने समाजाला लाचार बनविले तर तो देशाच्या जडणघडणीत काय योगदान देवू शकेल ? राज्यकर्त्यानी या सर्व गोष्टींचे भान बाळगून निवडणूकीतील आचरटपणा बंद करावा ही नम्र विनंती.

-प्रकाश ला. पोळ,
कराड, सातारा

3 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीत देखील हे खरे आहे का हो? की राष्ट्रीय समाज पक्ष तेव्हढा चांगला आणि बाकी सारे ढोंगी, बेईमान ! ही सोयीस्कर विभागणी आधीच केली आहे?

Prakash Pol म्हणाले...

@Anonymus
वरील विवेचन सर्वच राजकीय पक्षाना लागू आहे अगदी राष्ट्रीय समाज पक्षालाही. परंतु विवेचन करताना मर्यादित ताकद असणार्या लहान सहान पक्ष, संघटनांचा उल्लेख केला नाही इतकेच. परंतु विवेचन मात्र सर्वाना ग्रुहित धरुनच केले आहे. तीच गोष्ट राजकीय नेत्यांच्या बाबतीत. राजकीय नेत्यांवर केलेली सामान्य टीका ही महादेव जानकराना ही लागू आहे. उदा. पुरोगामी विचार मानणार्या, फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी नाळ असणार्या जानकरानी भाजप सारख्या मुलतत्ववादी पक्षाला पाठींबा द्यावा ही गोष्ट चुकीची आहे. आणि माझेही तेच मत आहे. याबाबतीत राष्ट्रीय समाज पक्ष किंवा महादेव जानकर यांच्याबाबत वेगळी भुमिका व इतरांबाबत वेगळी भुमिका हे मला अभिप्रेत नाही. परंतु सर्वसामान्य परिस्थितीत मांडणी करताना मर्यादित ताकद असणार्या किंवा कमी प्रभाव असणार्या सर्वांचाच उल्लेख करणे शक्य नसते. त्यामुळे आपण उगीच आरोप करु नयेत.
आपले खरे नाव आणि ओळख सांगितली असती तर चर्चेला खरा अर्थ प्राप्त झाला असता. असो .

calf म्हणाले...

फारच छान पोळ साहेब

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes