शनिवार, ऑक्टोबर २५, २०१४

भय इथले संपत नाही...

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून काही शिकलो आहोत!

सोनई येथील तीन दलित तरुणांच्या हत्येचा खटला मुंबईत चालवू, वर्षभरात न्याय मिळवून देऊ, अशा मोठ-मोठ्या घोषणा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केल्या, पण प्रत्यक्षात सोनई हत्याकांडाचा खटला मोठ्या दहशतीत आज श्रीरामपूरमध्ये चालू आहे, या प्रक्रियेला काही काळात दोन वर्ष पूर्ण होतील. तिकडे खर्ड्याच्या जखमा अजून ताज्या आहेत. नितीन आगेच्या वेदनादायी किंकाळ्या संवेदनशील मनांची झोप उडवत असताना पाथर्डीतील जवखेडे खालसा गावात एका दलित कुटुंबियांची निर्घृण हत्या झाली आहे. याच मतदार संघातून भाजपच्या मोनिका राजळे विद्यमान आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सेना आणि भाजपचे सरकार असताना रमाबाई हत्याकांड घडलं आणि जाहीरपणे सरकारने गोळीबार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची बाजू घेतली होती. 

दलितांमध्ये या निवडणुकीत त्यांच्यावर आघाडी सरकारच्या काळात जे अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत, याचा दृश्य परिणाम सरकारमध्ये असलेल्या पक्षांच्या विरोधात झालेले मोठ्या प्रमाणातील मतदान यावरून हे स्पष्ट होते. नेवाश्यात सोनई हत्याकांडाचा रोष म्हणूनही दलित मतांचे ध्रुवीकरण होताना दिसते ज्यामुळे शंकरराव गडाख हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले दिसतात. नवीन सरकार अजून स्थापन होते न होते तोच जवखेडे खालसाचे भयंकर हत्याकांड समोर येताना दिसले. अहमदनगर जिल्हा हा दलित अत्याचारासाठी संवदेनशील झाला आहे हे आता सरकारने जाहीर करू अथवा न करू पण हे वास्तव तुम्हाला आम्हाला मान्य करावेच लागणार आहे. 

दोन वर्षापूर्वी नवीन वर्षाचे स्वागत होत असताना सोनईतील तीन दलित तरुणांची हत्या झाली, आता दिवाळी तोंडावर असताना जवखेडे त हे हत्याकांड झाले. एकूण परिस्थिती पाहता जवखेडे हत्याकांड हे सोनई आणि खर्डा प्रकरणाची आवृत्ती आहे, असे दिसून येत. 

हत्येची पार्श्वभूमी 

संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) हे गावाबाहेर असलेल्या जाधव वस्तीवर त्यांच्या नातेवाईकांसोबत राहत होते, संजय यांना एक धाकटा व एक थोरला भाऊ आहे, यांचे मुख्य घर वस्तीत आहे. त्यांच्यात जमीनीच्या समान वाटण्या झाल्या असून प्रत्येकाच्या वाटेला सव्वा एकर जमीन आलेली आहे. संजय जाधव हे गवंडी काम करीत असत, तसेच गावात मोलमजुरीचे कामही करत असत. शेताच्या आणि घराच्या योग्य वाटण्या झाल्यामुळे जमिनीवरून वाद नव्हते, असे त्यांचे नातेवाईक सांगतात. संजय आणि जयश्री यांचा सुनील (१९) हा एकुलता एक मुलगा dairy science अभ्यासक्रमाचे मुंबई येथे दीड वर्षापासून शिक्षण घेत होता. सुट्टीच्या काळात चार महिन्यातून एकदा तो घरी आई-वडिलांना भेटायला येत असे. संजय जाधव यांचे शेत मुख्य घरापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे, जेथे त्यांनी पत्र्याचे शेड असेलेल्या दोन खोल्या बांधलेल्या आहेत. 
सुनील जाधव 


संजय आणि जयश्री या दोघांचेही गावात कोणाशीही भांडणाचे वा ताणलेले संबंध नव्हते. आपण भलं आपलं कामभलं अश्या पद्धतीने ते राहत व मुलाला शिक्षणासाठी पैसे पाठवत. संजय आणि जयश्री यांच्या बाबत गावातील इतर जातीय लोकांच्याही चांगल्या भावना होत्या, असंच लोकांशी संवाद साधल्यावर लक्षात येत, परंतु या उलट सुनील बाबत मात्र लोक फारस चांगलं बोलताना दिसले नाहीत. त्याच्या गावातील प्रेम प्रकरणाबाबत मात्र लोक सूचक पद्धतीने सांगताना दिसतात. मात्र काही लोकप्रतिनिधी ही शक्यताही फेटाळून लावतात आणि त्याचे मुंबईलाच काही असेल, अशी शक्यता समोर आणतात. सुनील बाबत परस्पर विरोधी विधाने लोकांमधून येताना दिसतात त्यामुळे या खुनाचा संबंध हा सुनीलशी जोडला गेला आहे, असं स्पष्टपणे समोर येते. या गोष्टीला स्वतः पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी दुजोरा दिला आहे. त्याचे अनैतिक संबंध असण्याची शक्यता आहे, त्यादिशेने पोलिस तपास करत आहेत, सुनीलच्या मोबाईल मध्ये त्या प्रकारचे फोटो आणि इतर माहिती सापडल्याचे ते सांगतात. परंतु ही इतर माहिती काय आहे, हे स्पष्ट पणे तूर्तास कोणीच सांगत नाहीत.
जाधव यांचे शेतातले घर

घटना काय घडली?
 अंगणातले रक्त माती आणि बाजरीचे वैरण टाकून बुजवण्याचा प्रयत्न  केला.
याच विहिरीत मृतदेहाचे तुकडे करून टाकले गेले

  दिवाळीच्या सुट्टीनिमित्त सुनील गावी आला होता आणि त्याच दरम्यान अर्ध्या शेतात लावलेल्या बाजरीच्या काढणीचे काम सुरु होते त्यामुळे संजय, जयश्री आणि मुलगा सुनील हे शेतातल्या त्यांच्या खोलीमध्ये दोन दिवसापूर्वी राहायला गेले होते. शेतातल्या केवळ अर्ध्याभागात बाजरीचे पिक होते. खुनाच्या आदल्या दिवशी शेजारील कुटुंबाच्या शेतातील राखणीसाठी असलेल्या कुत्र्याला अज्ञात लोकांनी मारले. नेमके कोणी मारले, याची माहिती अजून उपलब्ध झाली नाही आणि दुसर्या दिवशी रात्री साधारण १२ - २ च्या दरम्यान जाधव कुटुंबियांचे खून करण्यात आले. शेतातील घराच्या अंगणात त्या तिघांचा खून करण्यात आला असावा, कारण खून केल्यावर इथे रक्त पडलेले होते ते आरोपींनी माती टाकून बुजून टाकले त्यावर बाजरीची वैरण टाकल गेली. तरी रात्रीत सगळे रक्त बुजवले जाणे शक्य नव्हते. 

जयश्री आणि संजय यांच्या मृतदेहाचे तुकडे करून शेतापासून ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या कोरड्या विहिरीत टाकले गेले, दरम्यान जयश्रीच्या शरीरात जीव असावा, कारण तिचा मृतदेह सापडला, त्याच्या एका हातात जवळच्या झाडाची तुटलेली फांदी होती. पोलिसांना हे मृतदेह मंगळवारी उशिराने सापडले, त्यात सुनील चे पाय आणि डोके शोधण्यासाठी आजूबाजूचा परिसर पोलिसांनी धुंडाळून काढला. बुधवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सुनीलचे तोडलेले पाय आणि अर्धे तोडलेले डोके दुसर्याच्या शेतात असलेल्या कोरड्या बोअरवेल पाईपमध्ये सापडले. 

खून केल्यावर मृतदेह नेस्तनाबूत करण्यासाठी गोठलेल्या रक्ताने हे काम अत्यंत सफाई ने करण्याचा प्रयतन केला गेला. दुसर्या दिवशी जाधव यांच्या घरातील शेळीच्या ओरडण्याने शेजारील वाघ बाई आपल्या मुली बरोबर घास कापण्यासाठी जात असतना त्यांना अंगणात रक्त दिसले तेव्हा त्यांनी गावात जाऊन सांगितले. त्यांना साप चावला असावा, असा संशय आल्याने काही लोक पाथर्डी, तिसगाव आणि अहमदनगर मधील रुग्णालयात शोधण्यासाठी आले. परंतु विहिरीकडे गेलेल्या लोकांना त्यात मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली.   

हत्या का झाली असावी?

हत्या का झाली, याबाबत शक्यता पलीकडे अजून काहीही गेलेले नाही, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, सुनीलचे अनैतिक संबंध असावेत, तशा बाबी त्याच्या मोबाइलमध्ये आढळून आल्या, असे म्हटले आहे, परंतु या इतर गोष्टी कोणत्या या बाबत ते स्पष्ट बोलायला तयार नाहीत.  सुनील दिसायला बर्यापैकी होता आणि त्याची राहणी ही खूप टापटीप होती. त्याचे तीसगावमधील मित्र त्याच्या दिलेरीची तारीफ करताना दिसले. त्याच्या फेसबुक account वर पहिले तर लक्षात येते की प्रेमाच्या भावना त्याच्या मनात होत्या आणि त्याचे प्रदर्शन आपल्याला त्यावर दिसूनही येते.

सुनीलचे चरित्र ठीक नव्हते, असे पोलिस सोडता कोणीही बोललेले नाही, सुनीलच्या अनैतिक संबंधातून हा गुन्हा घडला आहे, असे स्पष्ट केले जात आहे. खरे तर सोनई च्या हत्याकांडात त्या तीन तरुणांचे अनैतिक संबंध होते, तसाच आरोप झाला, नितीन आगेवर ही त्याच प्रकारचा आरोप झाला, खैरलांजी मध्येही भोतमांगे कुटुंबाच्या चारित्य्राचे हनन करण्यात आले. दलित आहेत म्हणून अनैतिकच असले पाहिजे, अशी मानसिकता घडवली गेली आहे, त्यातून हे आरोप होताना दिसतात. त्याचा दुसरा उद्देश हा केस दुर्बल करण्याचा आणि त्यामागे आंदोलन उभे राहू नये, असा असतो. खून झालेल्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे फार सोपे असते, ते जातीयवादी मानसिकतेतून होताना दिसतात. 

खर तर दलित तरुण शिकतो आहे, स्वाभिमानाने जगतो आहे, स्पर्धेत उतरून स्वतःच स्थान निर्माण करतो आहे, त्यातून सामाजिक प्रतिष्ठा तो निर्माण करतो, अश्या मुलाच्या प्रेमात कोणत्याही जातीची मुलगी पडण हे फार स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. परंतु केवळ दलित मुलगा उच्च जातीच्या मुलीशी प्रेम करून लग्न करू पाहण्याचं स्वप्न बाळगतो, हा विचारच उच्च जातीच्या  मानसिकतेला आणि त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेला धक्का लावतो. दलित माणूस उच्च जातीच्या मुलीशी लग्न करण्याचा विचारच त्यांना चुकीचा वाटतो. आणि मग हि खोटी प्रतिष्ठा आणि जातीचे "पावित्र्य" वाचवण्यासाठी टोकाचा क्रूर विचार अमलात आणला जातो. जात ही हिंसक संघटन शक्ती आहे, हे अशा घटनांतून वारंवार सिद्ध झालय. दलितांवर होणार्या या प्रतिक्रियात्मक हिंसेचे कोणत्याही पद्धतीने समर्थन कोणताही व्यक्ती करूच शकणार नाही.


अजून काही प्रश्न


१.       ज्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते, त्या व्यक्तीच्या नवर्याला ही तातडीने चौकशीसाठी का ताब्यात घेतले नाही, की त्याच घरातील इतर मुलीशी सुनीलचे प्रेम संबंध होते, हे दडवून ठेवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे?

२.       वरकरणी पाहता तीन व्यक्तींची हत्या करण्यासाठी कमीत कमी ८ ते १० व्यक्ती उपलब्ध असणे गरजेचे आहे. मग या व्यक्ती गावात बाहेरून आल्या असा दावा केला गेला आहे परंतु गावाच्या विशिष्ट भागामध्ये इतक्या सराईतपणे त्या कशा वावरू शकल्या ? (कोरडी विहीर, कोरडा बोअरवेल कसे ठावूक झाले) 

३.       त्या गावात आलेल्या कोणालाच कसे माहित नाहीत? त्यांना लपायला जागा कोणी दिली? त्या व्यक्ती जर सुपारी घेवून खून करणारी सराईत गुंडांची टोळी असेल तर त्यांना इतकी मोठी सुपारी कोणी दिली? त्यासाठीचा पैसा कसा उभा राहिला? त्यात गावातील इतर कोण मंडळी होती का?

४.       जर गावातील, शेजारील माणसेच या हत्येमागे होती, तर त्या घरात एवढे पुरुष आहेत का? कि गावातील कोणी मदत केली?  आणि गावातीलच लोक असतील तर त्यांना पकडण्यासाठी येवढा वेळ का घालवला जात आहे? येवढा मोठा हत्या घडत असताना रानातील आजूबाजूच्या लोकांना आवाज गेला नाही का?

५.       पत्रकारांसमोर येऊन पोलिस अधीक्षक लखमी गौतम प्रश्नांची उत्तरे द्यायला का घाबरतात? कि यात बाहेरून दबाव आणला जात आहे? 

गावाची पार्श्वभूमी 

गावातील काही प्रतिष्ठीत आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व्यक्तींशी चर्चा झाल्यानंतर गावात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव या आधी निर्माण झाला नव्हता, असे ते सांगतात. दिवाणी खटल्याशिवाय इतर कोणताही खटला गावात नाही. या गावात जातीय द्वेष नसताना इतरांनीही त्या पद्धतीने रिपोर्टिंग करू नये, अशी त्यांची विनंती वजा इच्छा दिसून आली. पण मग दलितच का एवढ्या क्रूरतेने मारले गेले, या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्या ऐवजी इतर जातीचा कोणी असता किंवा उच्च जातीचा असता तर अश्या प्रकारे त्याची क्रूर हत्या झाली असती का? दलित वस्ती अजूनही गावाबाहेरच का आहे? 

राजाभाऊ राजळे यांना या गावातून ९९ टक्के तर मोनिका राजळे यांना ९५ टक्के मतदान या गावातून झाल्याचे समजते. गावात मराठा आणि वंजारी जातीची संख्या मोठी असून त्यामागोमाग दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकवस्ती आहे. दलित वस्तीतून गावाबाहेर पडण्याचा मार्ग हा पूर्ण कच्चाच आहे. तर मुख्य रस्ता डांबरी आहे. पाथर्डी हा मराठा आणि वंजारी यांची मोठा संख्या असलेला तालुका जिथे भगवान बाबांचा गड आहे व वंजारी जातीच्या राजकारणाचे केंद्र आहे. नाथ संप्रदायाची परंपरा असलेले या पाथर्डीत या वेळी नवीन रीत सुरु झाली कि काय, असा प्रश्न पडतो. 

जाता जाता...

सोनई आणि खर्डा प्रकारणातील अनुभवातून अशा प्रकारे खून करणारे बनचुके झाले आहेत. सोनईची क्रूरता यात आहेच पण न्याय मागायलाही आई-वडिलांना त्यांनी मागे ठेवलेले नाही. पुरावेही त्यांनी नष्ट केले आहेत. हे प्रकरण सोनई आणि खर्ड्याच्या पुढील भाग आहे कि काय हा प्रथमदर्शनी पडणारा सवाल आहे. जर तसे असेल तर अशा प्रकारचे गुन्हे करणारे जर यातून शिकत आहेत मग दलित चळवळ आणि ऐकूनच संवेदनशील म्हणून घेणारा समाज का शिकत नाही, असा प्रश्न आहे. क्रमश: 


रिपोर्ट :  
हर्षल लोहकरे ( मुक्त पत्रकार)
कुणाल शिरसाठे ( कार्यकर्ता, अंनिस )

2 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

छान लेख वस्तुस्थिती मांडण्याचा उत्तम प्रयत्न

Unknown म्हणाले...

हिलिताना काही पण अंदाज लावून लिहिता येत की साहेब


आता सगळ खार समोर आल आहे।की

आता याच लेखाला तुम्ही स्वताच उत्तर दया आणि तपासून पहा की तुमच्या नजरेला कोणता चश्मा तुमच्या नकळत लागला आहे का.???

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes