मंगळवार, सप्टेंबर ०२, २०१४

दहशतवादाची रुपे- पुस्तक परिक्षण

-महावीर सांगलीकर

दहशतवाद हा आज जगापुढील मोठा प्रश्न झाला आहे. पण दहशतवाद ही जगाला अजिबात नवीन नाही. त्याची मुळे प्राचीन काळापर्यंत जातात. प्रख्यात लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या 'दहशतवादाची रूपे' या नवीन पुस्तकात आपल्याला माहित असलेल्या आणि नसलेल्याही अनेक प्रकारच्या दहशतवादाचा इतिहास मांडला आहे. लेखकाचा निष्कर्ष असा आहे धर्मवाद हाच जगातील दहशतवादाचे मुख्य कारण आहे. हा निष्कर्ष मांडण्याआधी लेखकाने वेगवेगळ्या धर्मांच्या इतिहासात त्या-त्या धर्मियांनी कसा दहशतवाद केला याची विस्ताराने चर्चा केली आहे.
या पुस्तकाची सुरवातच 'सनातनी हिंदू दहशतवाद' या प्रकाराने झाली आहे. ही गोष्ट कांही वाचकांना खटकू शकते, पण हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म असल्याने आणि धर्म आणि दहशतवादाचा जवळचा संबंध असल्याने लेखकाने सर्वात अगोदर हिंदू दहशतवादावर प्रकाश टाकला आहे. लेखकाने म्हंटले आहे की हिंदू दहशतवादी नसतात हा गैरसमज दूर व्हावा यासाठी हे प्रकरण सुरवातीला घेतले आहे. यात वैदिकांनी सिंधू संकृतीचा केलेला नाश, रामायणातील सांस्कृतिक दहशतवाद, हिंदुंनी बौद्धांचे केली शिरकाण, हिंदुंनी पंथवादातून (शैव-वैष्णव) केलेला दहशतवाद अशा अनेक गोष्टींचा लेखकाने उहापोह केला आहे. पण लेखकाने प्राचीन भारतात बौद्धांनी आणि जैनांनी केलेल्या दहशतवादाची अजिबात चर्चा केलेली दिसत नाही. तसेच हिंदूंनी जैनांच्या केलेल्या कत्तलींचा पुस्तकात उल्लेख नाही. इ.स.च्या आठव्या शतकानंतर दक्षिण भारतात जैनांच्या विरोधात हिंदुंनी अनेक दहशतवादी कारवाया केल्या. अर्थात याला कांही प्रमाणावर जैन लोकही जबाबदार होते.

पण येथे हा प्रश्नही उद्भवतो की याला आपण हिंदू दहशतवाद म्हणायचे का? की दुसरा शब्द मिळत नसल्याने हिंदू हा शब्द वापरणे भाग पडते? तसेच असावे, कारण हिंदू हा शब्द मुळात परकीय, आणि दुसरा शब्द सापडत नसल्याने तो परकीयांनी इथल्या लोकांना संबोधण्यासाठी वापरला. हा शब्द रुळलेला असल्याने लेखकाने तोच वापरलेला असावा.

पुस्तकाच्या दुस-या प्रकरणात लेखकाने ज्यूंच्या दहशतवादाची चर्चा केली आहे. ज्यूंचा धर्मही हिंदू धर्माप्रमाणेच पुरातन. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांच्यांही अगोदरचा. हिटलरने दुस-या महायुद्धात लाखो ज्यूंचे शिरकाण केले हे आपल्याला माहीत आहे, पण प्राचीन काळापासून ज्यूंनी कशा प्रकारे दहशतवादी कारवाया केल्या याची बहुतेक लोकांना फारशी माहिती नाही. लेखकाने ज्यूंच्या दहशतवादाचा इतिहासच मांडला आहे. ज्यूंनी अलीकडच्या काळात म्हणजे २०व्या शतकात केलेल्या दहशतवादाचीही अनेक उदाहरणे या प्रकरणात आहेत. लेखकाने म्हंटले आहे की ख्रिस्ती आणि इस्लाम हे धर्म मुळात ज्यू धर्मातूनच निघाले असल्याने त्यांना दहशतवादाचा वारसा ज्यू धर्मातूनच मिळाला आहे.

ख्रिस्ती दहशतवादाची चर्चा करताना लेखकाने अनेक ख्रिस्ती दहशतवादी संघटनाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेसारखे ख्रिस्ती देश जागतिक पातळीवर दहशतवाद कसा जोपासतात याची विस्ताराने माहिती दिली आहे. अमेरिकेने अलीकडच्या काळात इतर देशांवर जी आक्रमणे केली त्यात ख्रिस्ती देश दिसत नाहीत, अमेरिका ज्या देशांना शत्रू मानतो ते देश मुस्लीम किंवा कम्युनिष्टच असावेत हा केवळ योगायोग नाही. कम्युनिष्ट देशांत देवाला आणि धर्माला स्थान नसते हे आपल्याला माहीतच आहे. ख्रिस्त्यांच्या भारतातील दहशतवादाची माहिती देतांना त्यांच्या फुटीरतावादावर चर्चा केली आहे.

अमेरिकेसारखा देश केवळ ख्रिस्ती दहशतवादच जोपासतो असे नाही, तर तो ज्यूंच्या दहशतवादाला देखील पूर्ण समर्थन देतो.

यानंतर लेखकाने मुस्लीम दहशतवादाची चर्चा केलेली आहे. त्यासाठी दोन वेगळी प्रकाराने लिहिली आहेत. एका प्रकरणात जागतिक स्तरावरील मुस्लीम दहशतवादाची चर्चा केली आहे तर दुस-या प्रकरणात भारतातील मुस्लीम दहशतवादाची. मुस्लिमांच्या दहशतवादाचा इतिहास, त्यांच्या दहशतवादी संघटना, मुस्लीम मानसिकता यांची लेखकाने केलेली चिकित्सा मुळातच वाचण्यासारखी आहे. पण लेखकाने असेही म्हंटले आहे की मुस्लिमांचा दहशतवाद हा प्रतिक्रियात्मक दहशतवाद आहे. जागतिक पातळीवर ज्यू आणि ख्रिस्ती दहशतवाद्यांच्या आणि भारतात हिंदू दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे मुस्लिमांनाही दहशतवादी बनावे लागले.

८०-९०च्या दशकात भारतात खलिस्तानी दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. लेखकाने शिखांच्या या दहशतवादावरही चर्चा केली आहे. या प्रकरणात शिखांच्या दहशतवादामागील पार्श्वभूमी, हा दहशतवाद कसा सुरू झाला, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, प्रधान मंत्री इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकाकडून झालेली हत्या, त्यानंतर भारतात शिखांचे झालेले शिरकाण, पंजाब पोलिसांनी दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू केलेली निष्ठूर एनकौंटर मोहीम यांची माहिती आहे. लेखकाने म्हंटले आहे की खलिस्तानवादी शिखांचा हा दहशतवाद अजूनही सुप्त अवस्थेत जिवंत आहे, आणि पुढे तो पुन्हा डोके वर काढू शकतो.

विविध धर्मियांच्या या दहशतवादांची चर्चा केल्यावर लेखकाने धार्मिक दहशतवादाची सर्व व्यापकता आणि दहशतवादाचे मुख्य कारण कालबाह्य धर्म हेच आहेत या विषयांवर दोन स्वतंत्र प्रकरण लिहिली आहेत. शिवाय एका प्रकरणात आत्म घातकी दहशवादाची मानसिक चिकित्सा केली आहे. सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक दहशतवादावरही लिहिले आहे. पण या पुस्तकात लेखकाने नक्षलवाद, माओवाद, श्रीलंकेतील तमिळ दहशतवाद या विषयांना स्पर्श केला नाही. असो.

या पुस्तकासाठी लेखकाने बरेच कष्ट घेतलेले दिसतात. लेखकाची लेखनशैली आकर्षक आहे, आणि त्याहूनही त्याने प्रत्येक विषयावर जे भाष्य केले आहे ते मुळातच वाचण्यासारखे आहे.

दहशतवादाची रूपे
लेखक: संजय सोनवणी
पाने १५२, किंमत: १५० रुपये
प्रकाशक: पुष्प प्रकाशन, कोथरूड, पुणे ३८
फोन: ९८६ ०९९ १२०५

वितरक:
भारत बुक सर्व्हिस
१७८८ सदाशिव पेठ
देशमुख वाडी, पुणे ४११ ०३०
फोन: ०२० ३५५४९०३२

1 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

tuza doka tapsun ghe, aaja kal kunala pan publicity pahije ase tuzyasarkhi bindok baralat astat, world madhe bhartat minority la jevadhe freedom aahe titke baki kuthech nahi, hindu lokanchya sahishnu manovrutticha gairfaida tyamule minority ghet aahe ani deshache ahujn tukde padnyache swapna pahat aahet, tyasathi tumchyarasrkhi lok fus detat he deshaceh badluck aahe.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes