मंगळवार, सप्टेंबर ०२, २०१४

मागोवा दलीत चळवळीचा

वैभव छाया.अभ्यासक आणि विचारवंत 

राजा ढाले - नामदेव ढसाळ यांच्या वादाची परिणीती  ही पँथरच्या फुटीत परावर्तीत झाली. राजा ढाले हे विद्यापीठी य शिक्षणातले मास्टर... तर नामदेव ढसाळ महाविद्यालयाचं तोंड देखील न पाहीलेला. पण त्याच्या कवितेनं भल्या भल्या सनातनी विद्यापीठांची बुरूजे मोडकळीला आणली होती. संघटनेत कोणाला जास्त भाव मिळतो या कारणास्तव उडालेल्या ठिणगीचं रुपांतर विस्तवात झालं. कालांतराने ह्या दोघांनीही त्यांच्या वादाला बुद्ध विरूद्ध मार्क्स असा मुलामा चढवण्याचा प्रय़त्न केला. पण ढाले आणि ढसाळ यांच्या वैयक्तिक इगो प्रॉब्लेम मुळे पँथर फुटली आणि पँथरचे कार्यकर्ते देशोधडीला लागले. यात दोषाचा सर्वात मोठा हिस्सा हा ढालेंच्याच वाट्याला यायला पाहीजे. 


पँथरच्या फुटीनंतर पालापाचोळ्यासारख्या इस्ततः बिखरलेल्या पँथरला पुन्हा नवसंजीवनी देण्याचं काम प्रा. अरूण कांबळेंनी केलं. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह पूर्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने तमाम आंबेडकरी संघटनांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशा प्रकारचा ठराव देखील मंजूर केला गेला. एव्हाना पँथर देखील फाटाफुटीला बळी पडली होती. या फाटाफुटीमुळे राज्यभरातील पँथर्स मध्ये खदखदणार्‍या अंसोताषाला प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद मस्के, कमलेश यादव, उमाकांत रणधीर, मारुती सोनवणे, डी.एम. गायकवाड सारख्या खमक्या तरुणांनी वाचा फोडली. या सर्व तरुणांनी एकत्र येवून औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत पँथर ला पुन्हा एकदा जीवदान मिळवून दिले. त्यावेळी झालेल्या बैठकीत पँथरची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर हाच मुख्य अजेंडा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि पुलोद प्रयोगाचे प्रणेते असेलेले शरद पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. पण त्याला योग्य तो प्रस्ताव न मिळाल्याने संतापलेल्या पँथर्सनी मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. नामांतर मोर्चास महाराष्ट्रातील खेड्यापांड्यातून लाखोंच्या संख्येने पँथर सहभागी झाले होते. त्या पँथरच्या ताकदीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधीमंडळात संम्मत करताच त्याच रात्री मराठवाडा पेटला.

उदगीर, जळपोट, नांदेड या शहरात व तेथील खेड्यापाड्यांतील दलितांवर अतिशय अन्याय , अत्याचार केले गेले. पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे, `` सांग पोच्या तू जयभिम करणार का'' पोचिरामला इतक्या वेदना होत असतानाही म्हणाला, `` जयभिम म्हणणार''. नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्यानंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जयभिम' म्हणून ओरडायचा नंतर दुसराही तोडला तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते.पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यातही पोचीराम जयभिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, ``पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जयभिम करणार का? जयभिम'' म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच जयभिम हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुलाही लाज वाटेल असा प्रकार केला होता. जनार्दन मेवाडे यांनाही हाल हाल करुन ठार केले होते.असे असतानाही मराठवाड्यातील नामांतराबाबतची दंगल पत्रकारांना लिहूदेखील वाटत नव्हती.

अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ यांच्या जातीयवादी मानसिकतेमुळे हजारो घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शेकडो तरूणांना प्राण गमवावे लागले. कालांतराने अतिजातीयवादी बनलेल्या शिवसेनेने आणि बाळ ठाकरे यांनी नामांतर विरोधात उडी घेत विरोध अजून तीव्र केला. बाबासाहेबांना निजामाचे हस्तक म्हणणारे बाळ ठाकरे यांनीच घरात नाही पीठ तर कशाला मागता विद्यापीठ सारख्या विखारी घोषणा दिल्या. पँथरच्या उभरत्या काळात पँथरचा लोगो असलेला चित्ता रंगवणारे, पँथरला जनमानसात अनुकूल प्रतिमा मिळावी म्हणून मार्मिक मधून व्यंगचित्र रेखाटणारे बाळ ठाकरे अतिशय संधीसाधू बनून नामांतर लढ्याच्या विरोधात गेले. नामांतराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काँग्रेस च्या पुढारयानी जब्बर विरोध केला. वयोवृध्द पुढारी  काँग्रेसचे अण् त्यांची तरुन मुले शिवसेनेचेम्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजु शिवसेना + काँग्रेस ह्या नराधमांचा  तब्बल सोळा वर्ष जातीयवाद्यांचा नंगानाच ह्या महाराष्ट्राने पाहीला. जगातला तिसरा मोठा लाँग मार्च देखील अनुभवला. तरी देखील नामांतर होण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 92 च्या दंगली, 93 चे बाँम्बस्फोटांनंतर सेनेची महाराष्ट्रातली वाढती ताकद लक्षात घेऊन शरद पवारांनी नामांतराचा निर्णय अंमलात आणला. यामागे केवळ वोट बँक पॉलिटिक्स होती. पण आधीची सोळा वर्षे स्वतःच्या सोयीनुंसार नामांतराचा विषय भिजत पडू दिला. 

नामांतर आंदोलनात आपली एक पीढी नेस्तानाबूत झाली. त्या जखमा जोवर आपण त्या शहिदांच्या घरात जाऊन पाहत नाही तोवर त्यांची सल आपल्याला बोचणार नाही. नामांतराचा इश्श्यू शरद पवारांच्या मनात असते तर चुटकीसरशी सोडवू शकले असते. कारण प्रा. अरुण कांबळे यांनी नामांतर नव्हे तर नामविस्तार सुचवले होते. पण त्यांनी त्याला ताणता येईल तेवढे ताणले. रामदासजी आठवले यांचे संघटन कौशल्या मुळे व शिवसेनेची वाढती ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी पँन्थर सोबत युती करुन आठवले यांना राज्यात कँबीनेट मंत्रीपद देण्यात आले. व नामांतराचा नव्हे तर नामविस्तराचा प्रश्न सोडण्यात आला.नामांतर प्रकरणात संघ, मनूवादी, सेना जेवढी जबाबदार आहे तेवढीच त्यांच्या कृत्याकडे दूर्लक्ष करणारी काँग्रेस देखील जबाबदार आहे. आज त्याच काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत. 

आता तरी तुम्ही कमीतकमी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित व त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (कुठलाही गट) या पक्षात सामील होऊन पोचिराम आणि चंदर कांबळेचे तुटलेले अवयव ,खैरांजली सारखे व इतर या पुढे होणारे दलीत अत्याचार रोखण्यासाठी कटीबध्द रहा...!


3 टिप्पणी(ण्या):

Aanand Kokare म्हणाले...

हे चालूच आहे जोपर्यंत संपुर्ण समाज जागा होत नाही तोपर्यंत हे होनारच

अनामित म्हणाले...

अय्या ! हे सर्व घडत असतांना शत-प्रतिशत वाले कोठे बरे होते? आणि गोमूत्राने चौक शुद्ध करणारे कोठे मज्जा करत होते?

अनामित म्हणाले...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना उपदेश मंत्र दिला
शिका,संघटित राहा,संघर्ष करा
हया ज्याप्रकारच्या निंदनीय घटना
घडल्या या वरील तिन बाबीचा अभाव
दलित शिक्षणात मागसलेला आहे
दलित चळवळ संघटनानी
हेल्प लाईन सुरू करावी
अशा मनूवादी लोकांना धडा शिकवता यईल
खून का बदला खून
या विचार सरणीचा प्रत्येक दलिताने अनुसरन करावे
तेव्हाच असे तीड पूज्या मनुवादीय जातीय निंदनीय
क्रूत्य करण्यास घाबरेल
जय भिम

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes