बुधवार, फेब्रुवारी २६, २०१४

मनाचे तळ शोधणारे चित्रपट

By कलमनामा 

जगभरात दरवर्षी अनेक चित्रपट महोत्सव होतात. त्यातल्या काहींचं स्थान फार प्रतिष्ठेचं आणि महत्त्वाचं असतं. अशाच वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवात अवघ्या १२ वर्षांत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने स्थान पटकावलेलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आता राज्य सरकारच्या अधिकृत महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. जगातला हा असा एकमेव चित्रपट महोत्सव आहे की ज्यात मराठी चित्रपटांचंही परीक्षण जागतिक पातळीवरील अमराठी परीक्षक करतात. यावर्षीच्या महोत्सवात सर्वात गाजलेला चित्रपट होता करमाळ्याच्या नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’. लोकमान्यता आणि आंतरराष्ट्रीय विद्वत्मान्यता असा मेळ फारसा कधीही जुळून येत नाही. मात्र इथे तो सुवर्णयोग जुळून आला आणि जागतिक परीक्षकांनी दिलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे महत्त्वाचे चार पुरस्कार आणि प्रेक्षकांच्या पसंतीची सर्वोत्तम पावती मिळालेला पाचवा पुरस्कार असे सगळे पुरस्कार जिंकणारा ‘फँड्री’ एकमेव चित्रपट ठरावा.


शक्तिशाली दलित संवेदना, समकाल आणि सखोल जीवनदर्शन यावरील श्रेष्ठ चित्रपट प्रेक्षकांनीही उचलून धरावा असं बहुधा पहिल्यांदाच होत असावं. आता हा चित्रपट तिकिटबारीवरही यशस्वी होवो हीच शुभेच्छा. मंजुळे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सोमनाथ अवघडे या यातल्या नायकाची भूमिका करणार्या अभिनेत्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. करमाळ्याजवळील केम या लहानशा खेड्यात ज्याचे वडील हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा घरात जन्मलेल्या आणि स्वतःही हलगी वाजवणार्या या मुलाने हा पुरस्कार मिळवला. तो अवघ्या चौदा वर्षांचा आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला पोलंडचा ‘पपुजा’ हा चित्रपट जोना कोस-क्राऊज आणि क्रायझ्सतोफ क्राऊज यांनी दिग्दर्शित केलेला होता. जिप्सी या भटक्याविमुक्त जमातीतील एका प्रतिभावंत कवयित्रीची ही सत्यकथा काळजाचा ठाव घेणारी होती. महाकवी तुकारामांच्या वाट्याला जे आलं तेच जगभरच्या प्रतिभावंतांच्या वाट्याला येत असतं. या अंधश्रद्ध, अभावग्रस्त भटक्या समाजाने तिला कविता लिहिते या गुन्ह्यासाठी जातिबहिष्कृत केल्यानंतर तिची झालेली ससेहोलपट, तिला सोसावा लागलेला तुरुंगवास आणि तिची विराट तडफड जगभरातील सगळ्या संवेदनशील माणसांची प्रातिनिधिक कहाणी बनते. १९१० साली जन्मलेली पपुजा १९८७ साली गेली. तिचं हे प्रदीर्घ आणि असामान्य जीवनचरित्र केवळ एक वृत्तचित्र न बनता एका श्रेष्ठ कलाकृतीच्या पातळीवर घेऊन जाण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. २०१३ सालचा हा चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. चित्रपटातील जिप्सी समाजाची भटकंती, संगीतमय जगणं, व्यसनं, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, निरक्षरता आणि कुपोषण यांचं संयत चित्रण मनाला आरपार भावणारं. अशा आदिवासीसदृश्य समाजात ही मुलगी जन्माला येते, तरीही अक्षरांचा ध्यास घेते, तिचा एका प्रौढाशी बालविवाह करून दिला जातो, ती पुढे एक प्रतिभावंत कवयित्री बनते. महायुद्धातील हिटलरी छळाला तिला सामोरं जावं लागतं. समाज तिला बहिष्कृत करतो. तिला मदत करणार्या जर्सी फिकोवस्की या संशोधकाने जिप्सींवर लिहिलेल्या समाजशास्त्रीय ग्रंथामुळे जिप्सींमधील अडाणीपणामुळे उठलेलं वादळ, त्यापोटी त्याला आणि पपुजाला सोसावा लागणारा छळ सारंच वेदनादायी. ताकदीच्या दिग्दर्शकांनी कथा, पटकथा, संवाद, छायचित्रण, जिप्सी संगीत, सशक्त व्यक्तिचित्रण आणि तगडा अभिनय यातून एक जागतिक कलाकृती साकार केलेली आहे. कोणाही संवेदनशील माणसाने चुकवू नये असा हा चित्रपट आहे.

या आठ दिवस चाललेल्या महोत्सवात ९ ते १६ जानेवारीच्या काळात ४८ देशांतील २१३ चित्रपटांचे अकरा चित्रपटगृहातून ३०० शो करण्यात आले. दहा हजार प्रेक्षकांनी रांगा लावून हे चित्रपट पाहिले. हा तरुणांचा महोत्सव होता. महोत्सवाच्या प्रेक्षकांचं सरासरी वय १९ वर्षं होतं.

जागतिक स्पर्धेतील १४ चित्रपट, ग्लोबल सिनेमा या गटातील ८२ चित्रपट, जगातील नामवंत दिग्दर्शकांच्या गौरवार्थ दाखवण्यात आलेले (जगभरातील) ३६ आणि ११ (भारतीय) तसंच एनएफडीसीचे पाच अभिजात चित्रपट, नॅशनल अर्काइव्जमधील पाच जुन्या महान कलाकृती, चौदा मराठी चित्रपट, विविध देशांची वैशिष्ट्यं दाखवणारे ३८ विशेष चित्रपट आणि इतर आठ असे एकूण २१३ चित्रपट ही पुणेकरांसाठी अविस्मरणीय मेजवानी होती. आठवडाभर रंगलेल्या ‘पिफ’चा समारोप मराठमोळ्या वातावरणात चित्रपट आणि कलावंतांचा गौरव करत झाला. ‘फँड्री’ आणि ‘पपुजा’ ही नावं जाहीर होताच सभागृहात अक्षरशः टाळ्यांचा पाऊस बरसला. चित्रपटाच्या टीमने ‘फँड्री’च्या नावाने चांगभलं अशा घोषणा देत एकच जल्लोष केला.समारोपानंतर ‘पपुजा’ पुन्हा दाखवण्यात आला. मुळची भारतीय असलेली जिप्सी ही जमात आणि त्यातली पपुजा आज जरी पोलंडमध्ये उपेक्षाच्या गर्तेत असली तरी या चित्रपटामुळे आता ती कधीही विसरली जाऊ शकणार नाही.

उत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणखी एक पुरस्कार इटलीच्या मिरको लोकॅटल्ली यांना ‘फॉरेन बॉडीज’ या चित्रपटासाठी देण्यात आला. कॅन्सरग्रस्त बालकाचा चिंतित पिता आणि दवाखान्यातील अरब पेशंटचा मित्र यांची आगळीवेगळी कहाणी म्हणजे ‘फॉरेन बॉडीज’. जागतिक चित्रपट स्पर्धा विभागातील विशेष पुरस्कार जागतिकीकरणाचे चीनवर झालेले परिणाम टिपणार्या ‘अ टच ऑफ सीन’ या चित्रपटासाठी झिया झँग-की यांना देण्यात आला. तसंच ‘हाऊस विथ टुरेट’लाही गौरवण्यात आलं.

जर्मनीच्या सिबेल बर्नर यांना ‘रोझी’ या चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी चित्रपटात प्रथमच काम केलं होतं. एका मनस्वी म्हातारीचा हा रोल त्यांनी अफलातून सादर केला होता. एक व्यक्ती आणि वल्ली म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारी ही वृद्धा बर्नर यांनी ज्या पद्धतीने उभी केली त्याला खरंच तोड नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून प्रेक्षकांनी ‘नाईट ट्रेन टू लिस्बन’ या जर्मनीच्या चित्रपटाची निवड केली.

सरहद्द गांधी म्हणजे भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांच्या जीवनावरील अमेरिकेच्या टेरी मक्लुहान यांनी २० वर्षं अपार मेहनत करून बनवलेल्या डॉक्युमेंट्रीने या महोत्सवाला फार मोठी उंची प्राप्त करून दिली. एखादं वृत्तचित्र चित्रपटापेक्षाही किती जबरदस्त असू शकतं त्याचा चालताबोलता पुरावा म्हणजे ही ९२ मिनिटांची डॉक्युमेंट्री होय. अशी महान डॉक्युमेंट्री मी आयुष्यात कधीही पाहिलेली नव्हती. अहिंसेच्या या पठाणी पुजार्याची ही कहाणी नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी आणि विरोधकांनीही अवश्य बघावी.

भारतीय चित्रपट जागतिक पातळीवर तसूभरही कमी नाही याचा प्रत्यय देणारे दोन महान भारतीय चित्रपट म्हणून जोय मथ्यू यांच्या मल्याळम् भाषेतील ‘शटर’ आणि खुशवंत सिंग यांच्या भारत पाक फाळणीवर आधारित कादंबरीवरून तयार केलेल्या ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या चित्रपटांचा खास उल्लेख करावा लागेल. मानवी जीवनातील अमाणूस क्रौर्य, अपार करुणा, असीम प्रेम, झुंडीचं मानसशास्त्र आणि धर्मांधता यांचा सुन्न करणारा अनुभव म्हणजे पामेला रूक्स यांचा ‘ट्रेन टू पाकिस्तान.’

एका रात्रीची श्वास रोखून धरायला लावणारी कहाणी म्हणजे ‘शटर.’ जगण्यातली समज वाढवणारी ही कलाकृती. मानवी नात्याची यातली उकल खरंच फार विलक्षण आहे.

चित्रपटाची भाषा जगाला कशी जोडते याचा अनुभव या महोत्सवाने दिला. जगभरचा माणूस भले भाषा, संस्कृती, विचारधारा, धर्म, पर्यावरण, आर्थिक स्थिती यानुसार वेगवेगळा असेल पण माणूस म्हणून त्याचा पिंड मूलतः एकच आहे. जगभर भली माणसं आहेत. कळवळ्याची माणसं आहेत. तशीच दुष्ट आणि क्रूर माणसंही सगळीकडेच आहेत. जगभरचे कलावंत या माणसाचा न संपणारा शोध आपल्या कलाकृतींमधून कसा घेत आहेत त्याचा पुण्यात बसून जगभर मारलेला आजच्या जगाचा फेरफटका या महोत्सवाने घडवलाच, पण जगण्याची समज उंचावली. माणुसकीवरचा विश्वास दृढ झाला. मानवी प्रतिभेची शिखरं बघता आली. आयोजक डॉ. जब्बार पटेल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना विशेषतः समर नखाते आणि मित्रांना खूप खूप धन्यवाद.
प्रा. हरी नरके

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes