बुधवार, फेब्रुवारी २६, २०१४

फॅंड्री : या एल्गाराचा दाहक स्फोट .....!

फॅंड्री : या एल्गाराचा दाहक स्फोट .....!
काल फॅंड्री पाहिला. पाहिला म्हणजे खरे तर पडद्यात घुसून पात्रांपैकी एक पात्र होऊन अनुभवला. कारण मुळात हा चित्रपट नाही. कोणत्याही संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा हा विस्फोट आहे. हा चित्रपट नाही. हजारो मिती असलेला, वास्तव असुनही प्रतिकात्मक असलेला म्हणुन सर्वांचा अनुभवपट आहे.

वरकरणी दाहक असला आणि जातीव्यवस्थेचे भिषण वास्तव मांडणारा हा चित्रपट असला तरी तो त्याहीपार जातो. त्यामुळे तो वैश्विकही बनतो. मानवाची चिरंतन वेदना ज्या पद्धतीने साकार होते तिला तोड नाही.

आपल्या समाजातील "आजकाल कोठे राहिलीय जातपात?" असे मुखंडांसारखे विचारणा-यांनी आपल्या मनातील अदृष्य पण सतत वावरणा-या जातीयवादाला प्रथम प्रश्न करावा. वैदिक धर्माने हिंदूत घुसवलेली उच्च-नीच्च भावना कोणत्या थराला जावून पोचली आहे याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारावा आणि मग वैदिक संस्कृतीचे गोडवे गावेत. या चित्रपटात मराठे वैदिक उच्चवर्णीयतेचे प्रतिनिधित्व करतात. पण हा चित्रपट जातीयवादाबद्दल पात्रांच्या मुखातून क्वचितच बोलतो. तो दाखवतो. पण जातीयवादाच्या तीव्रतेपेक्षा या चित्रपतातील प्रतिकात्मकता अधिक महत्वाची आहे.

फ्यंड्री म्हनजे कैकाडी भाषेत डुक्कर. जवळपास ३०% चित्रपट हा गांवातील माजलेले डुक्कर जब्याचे कुटुंबिय कसे पकडतात हे विभिन्न दृष्टीकोनांतुन दाखवतो. हे डुक्कर एक प्रतीक बनते. म्हणजे देवाच्या पालखीला भर मिरवणुकीत मुसंडी मारून पाडनारे हे डुक्कर मुळात मानवी श्रद्धा या केवढ्या तकलादू आणि कामचलावू असतात हे दाखवते. डुक्कराचा मैत्रीनीला स्पर्श झाला म्हणून तिच्यावर गोमुत्रशिंपण ते आंघोळ घालायला लावणारी शालु डुक्कर पकडण्याचा धंदा असणा-या जब्याची होऊ शकत नाही हे एक सामाजिक वास्तव...पण देवाची पालखी मात्र डुक्कराने पाडूनही देव मात्र पवित्र...पालखी तशीच पुढे निघते हे एक वास्तव.

याच संपुर्ण प्रसंगात शालुचे लक्ष वेधण्यासाठी बेभान हलगी वाजवनारा...नाचनारा जब्या उर्फ जांबुवंत आणि बाप सांगतो म्हनून शेवटी मस्तकावर मिरवणुकीला उजेडासाठी ग्यसबत्त्या घेनारा अश्रुपुर्ण जब्या...मानहानी...सर्वत्र मानहानी...

आणि मानाच्या...आत्मसन्मानाच्या निरंतर शोधात असलेले हे कैकाडी कुटुंबिय...आणि त्यांचाच नव्या पिढीचा, सजग पण हतबल प्रतिनिधी हा जब्या.

जब्या प्रेमात पडलाय कोणाच्या? एका उच्चवर्णीय मुलीच्या कि प्रत्येक माणुस पडतो त्या सुखद...आल्हाददायक पण अप्राप्य अशा भवितव्याच्या? शालू या चित्रपटात जब्याशी एकदाही बोलत नाही. त्याने लिहिलेली असंख्य प्रेमपत्रे तिच्यापर्यंत कधीच पोचत नाहीत. किंबहुना तिच्याकडे पाहण्याचीही अनुमती त्याला नाही. शालुही एक प्रतीक बनून जाते ते त्यामुळेच!

प्रत्येक मानसाचा आपल्या भवितव्याशी असाच संघर्ष सुरू असतो. पण तरीही भवितव्य एवढे निर्दय असते कि ते कोणालाही संपुर्ण प्राप्तीचे सुख उपभोगू देत नाही.

गांवात इतिहासाचे भरपूर अवशेष आहेत. पडके वाडे...भुयारे..देवड्या...या इतिहासाची या, सर्वच गांवात दिसनारी बाब, म्हनजे या हगनदा-या आहेत. इतिहास हगनदारी आहे हे दाखवणा-या दिग्दर्शकाला सलामच केला पाहिजे. आणि याच हगनदारीत रानवट डुक्करही पकडायचे आहे. "तमस" या भिष्म साहनींच्या कादंबरीची सुरुवातच एक डुक्कर पकडण्याच्या अंगावर काटे फुलवणा-या प्रसंगाने सुरू होते. येथेही तसेच अंगावर काटे फुलवनारे...

आणि तमाशाई विद्यार्थी ते गांवातल्या प्रौढांचे विविध ढंगी...उपहासात्मक प्रतिक्रियांचे...

का पकडायचे आहे ते डुक्कर? देवाची पालखी पाडली म्हनून कि कोणाच्या हगत्या ढुंगनाला त्या डुक्कराने चावा घेतला म्हनून?  उत्तर अनिर्णित आहे पण डुक्कर पकडले गेलेच पाहिजे. आणि कचरू माने (जब्याचा बाप) ती कामगिरी घेतो कारण मुलीच्या लग्नाला हुंड्याचे पैसे कमी पडत आहेत...येथे मिळतील म्हनून. त्याची डुक्कर पकडने हा पेशापेक्षा जगण्याची अपरिहार्यता आहे. सारे कुटुंबिय त्याने या डुक्कर पकडण्याच्या मोहिमेत घेतले आहेत.

जब्याला ते अपरिहार्यपने मान्य करावे लागले तरी त्याचे मन त्यात नाही. त्याचे सारे लक्ष शालुकडे आहे. तिने तरी हे दृष्य पाहू नये यासाठीचा पराकोटीचा प्रयत्न आहे. डुक्कराच्या स्पर्शाबाबत तिची घृणा त्याला माहित आहे. त्याच वेळीस डुक्कर पकडण्याची गरजही त्याला माहित आहे. तथाकथित असभ्य व्यवसाय सोडून मेहताची कोक-कुल्फी सायकलवरून विकण्याचा अयशस्वी उद्योगही त्याने करून पाहिलेला आहे. या अपयशाचे कारण म्हणजे "काळ्या चिमणी"चा शोध!

त्याच्याच प्रौढ मित्राने सांगितलेला हा तोडगा. काळ्या चिमनीला मारून तिला जाळूण तिची राख शालुवर टाकती कि शालू त्याची होईल. येथे दिग्दर्शक एक नवी पुराकथा...मिथक तयार करतो. कोणाचे तरी बलिदान दिल्याखेरीज यश नाही हाच तो अर्थ! याला अर्थातच भारतीय अंधश्रद्धेचे पदर असले तरी मिथक तेच राहते.

काळी चिमणी आणि तिचा शोध चित्रपटाचा पुर्वार्ध व्यापतो. सोबत गांवजीवन आहेच.

डुक्कर पकडायचा प्रसंग! सारे कुटुंबिय सामील. हगनदारीत सदणा-या इतिहासातील जीवघेणी धामधूम. जब्याचे लक्ष शालुकडे. डुक्कर पकडण्यात त्याला रस नाही...कुटुंबाची अपरिहार्यता असली तरी.

आणि कच-या साकारणा-या किशोर कदमला सलाम. एकच प्रसंग. शाळेत राष्ट्रगीत सुरु होते...जब्या बाजुलाच...तो ताट्‍ह उभा राहतो...बापालाही नाईलाजाने उभे रहावे लागते...डुक्कर अगदी आटोक्यात...सहज पकडता येईल असे...आणि राष्ट्रगीत सुरु असल्याने हलताही येत नाही...ती तगमग...तो आविर्भाव...ती जीवघेणी तडफड किशोर कदमांनी ज्या पद्धतीने अभिव्यक्त केली आहे केवळ तेवढ्याच साठी त्यांना ओस्कर मिळाले पाहिजे!

ते डुक्कर...म्हनजे सामाजिक व्यवस्थेची कीड मानली गेलेले द्रव्य, सर्व सामाजिक आघात उरावर घेत ते पकडतात.  शालुने जब्याला डुक्कर पकडतांना पाहिले आहे. तिच्या दृष्टीने तो मनोरंजनाचा खेळ आहे...कारण तिचे असे जब्यावर प्रेमच नाही...पण जब्याच्या (सोमनाथ अवघडे) दृष्टीने ती सर्वस्व आहे. एकमेव वांच्छित स्वप्न आहे.

आता ते स्वप्न साकार होणे असंभाव्य आहे याची विषण्ण करणारी जाणीव आणि स्वत:च्या बहिणीबाबत उद्गारले गेलेले असभ्य उद्गार...

याचा कडेलोट जब्या एक पत्थर फेकतो आणि तेथेच होतो आणि आपल्याला उत्तर मिळते.

व्यवस्था विरुद्ध एक माणूस याचा हा अंत नसुन आरंभ आहे. खरे तर हा चित्रपट जेथे संपतो तेथेच याची सुरुवात आहे. व्यवस्थेवर नव्हे तर आपल्या मनातील विषमतेच्या घाणीवर फेकलेला तो पत्थर आहे. तो पत्थर वैश्विक यासाठी आहे कि आपले समग्र वैश्विक मानवी जीवन हे उदार हृदयी गांधीवादाकडे जात नसून पराकोटीच्या विषमतावादी जागतिकीकरणाकडे जात आहे. सामान्य माणसांची जीवनविषयक स्वप्ने अपूर्णच राहण्याचा अभिशाप घेत उद्ध्वस्ततेकडे वाटचाल करत आहेत. आपण स्वत:च डुक्कर, म्हणजे डुक्करांच्या व्यवस्थेचे भाग आणि डुक्कर पकडत डुक्करांनाच (तथाकथित मानवांना) अभय देणारे आपण...माणसाच्या देवतांनाही धुत्कारनारी डुक्करे आणि त्या डुक्करांनाच घाबरणारी मानवी जमात...डुक्करांचा स्पर्श विटाळ माननारी मानवी ही जमात....तेही कोणत्या? रानवट आक्रमक डुक्करांना घाबरनारी ही मानवी जमात...

आपलीच नव्हे, वैश्विक समाजव्यवस्था अशा स्वार्थनिपूण डुक्करांनी भरलेली आहे. काळी चिमणी अस्तित्वात नाही. शालू मिळुच शकत नाही. सारे शेवटी स्वप्न! रानटी डुक्करांना पकडणारे पायतळी तुडवण्यासाठीच असतात. या डुक्करांच्या जगात!
पण तेही एल्गार करतात!

या एल्गाराचा दाहक स्फोट म्हणजे जब्याने हाणलेला पत्थर!

मी दिग्दर्शक नागराजजी मंजुळे यांना विनम्र मानाचा मुजरा घालतो. जब्या साकार करणारा सोमनाथ अवघडे
नागराजजी मंजुळे
हा जब-याच. या चित्रपटातील सर्वच स्त्रीया जगातील अद्वितीय सुंदर महिला तर आहेतच पण त्यांना त्यांच्या सहज अभिनयासाठी सलाम. किशोर कदमांना...जो बाप त्यांनी साकार केला...बाप माणुस...ओस्कर मिळायलाच हवे असा महान कलावंत...

मित्रांनो, या चित्रपटाचे एवढेच नाहीत...प्रत्येक नजरेतून उमगतील असे अगणित पैलू आहेत. मी फोटोग्राफी, पार्श्वसंगीत...याबद्दल लिहिले नाही...ते या अनुभवपटाचे सहज भाग म्हणून येतात...

सा-या टीमला विनम्र अभिवादन...मला माझे जग पुन्हा उलगडून दाखवल्याबद्दल!

संजय सोनवणी

मनुष्य व्हावे !

वर्तमानात जगणारा माणुसच

इतिहास आणि भविष्याकडे

डोळसपणे पाहू शकतो...

आणि नेहमीच आनंदीही राहू शकतो....!

मनाचे तळ शोधणारे चित्रपट

By कलमनामा 

जगभरात दरवर्षी अनेक चित्रपट महोत्सव होतात. त्यातल्या काहींचं स्थान फार प्रतिष्ठेचं आणि महत्त्वाचं असतं. अशाच वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवात अवघ्या १२ वर्षांत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने स्थान पटकावलेलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आता राज्य सरकारच्या अधिकृत महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. जगातला हा असा एकमेव चित्रपट महोत्सव आहे की ज्यात मराठी चित्रपटांचंही परीक्षण जागतिक पातळीवरील अमराठी परीक्षक करतात. यावर्षीच्या महोत्सवात सर्वात गाजलेला चित्रपट होता करमाळ्याच्या नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’. लोकमान्यता आणि आंतरराष्ट्रीय विद्वत्मान्यता असा मेळ फारसा कधीही जुळून येत नाही. मात्र इथे तो सुवर्णयोग जुळून आला आणि जागतिक परीक्षकांनी दिलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे महत्त्वाचे चार पुरस्कार आणि प्रेक्षकांच्या पसंतीची सर्वोत्तम पावती मिळालेला पाचवा पुरस्कार असे सगळे पुरस्कार जिंकणारा ‘फँड्री’ एकमेव चित्रपट ठरावा.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes