शनिवार, नोव्हेंबर ०२, २०१३

नरेंद्र मोदींची बेगडी धर्मनिरपेक्षता


सध्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुका यावर अनेक जणांनी लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीचे वातावरण तयार करण्यासाठी अनेकांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. सध्या होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. सध्या भ्रष्टाचार, महागाई, खून, बलात्कार यासारख्या अनेक गोष्टींमुळे सत्ताधारी कॉंग्रेसच्या विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा फायदा करून घेण्यासाठी भाजपसह सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. एकंदर या निवडणुका म्हणजे काहीजणांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनल्या आहेत.


या संपूर्ण वातावरणात बाजी मारली आहे ते गुजरातचे सुपुत्र आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी. नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा सलग तिसऱ्या वेळी जिंकून आपली जादू अजून टिकून असल्यची जाणीव सर्वांनाच करून दिली आहे. बदलत्या काळात भाजपमधेही नेतृत्व या विषयावरून वाद उत्पन्न होत होते. शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावरून सुंदोपसुंदी निर्माण झाली होती. या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी अतिशय छानपणे केले. त्याला इतर राजकीय पक्ष विशेषतः कॉंग्रेस आणि नितीशकुमारांसारख्या लोकांनी खुपच सहकार्य केले. कदाचित मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित होण्यात या दोघांचाही अंतस्थ हेतू वेगळा असावा. कारण कॉंग्रेस आणि नितीशकुमार यांनी नकारात्मक पद्धतीने का होईना पण मोदींना मोठे केले. प्रसारमाध्यमांनी त्याला चांगलीच साथ दिली. आणि मोदी सर्व भारतभर प्रसिद्ध झाले. इतके की सध्या ६० % पेक्षा जास्त लोक मोदी हेच पंतप्रधान बनावेत असे म्हणत आहेत. मोदींच्या बाजूने प्रवाह इतका जोरात आहे की एखादा पुरोगामी या प्रवाहात सहजपणे पालापाचोळ्यासारखा उडून जावू शकतो.
मोदींची हवा तयार होण्यापाठीमागे (किंवा करण्यापाठीमागे) काही प्रमुख कारणे आहेत.

१.       पाहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे मोदींना भाजप नेते, एनडीए मधील मित्रपक्ष यांचा म्हणावासा पाठींबा नाही. आणि ही गोष्ट ज्या पद्धतीने मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली त्यावरून सहज लक्षात यावी. वाद इतका टोकाला गेला होता की सांस्कृतिक (?) असणाऱ्या संघाला खूप आटापिटा करून राजकीय भूमिका बजावावी लागली होती. आणि संघानेच मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यावर भाजपमधील वादळ काही प्रमाणात शांत झाले. तरीही अडवाणी नाराज राहिले ते राहिलेच. भाजपमध्ये मोदींपेक्षा अजूनही अडवाणींनाच जास्त पाठींबा आहे हे नक्की. तरीही मोदींची लोकप्रियता आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने गुजरात मध्ये सत्ता टिकवून ठेवली आहे ते पाहता भाजपला या नेतृत्वाची गरज होती.

२.     १९९१-९२ च्या दरम्यान संघाने अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून सूत्रे काढून घेवून ती आक्रमक अशा अडवाणींच्या हातात दिली. अडवाणींनी याचा पूरेपर फायदा घेत बाबरी मस्जिद, राममंदिर, रथयात्रा, मंडल विरुद्ध कमंडल अशा पद्धतीने आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेत वातावरण खूप तापविले होते. त्यानंतर काही वर्षातच भाजपची सत्ता आली हे विशेष. (सत्ता आल्यानंतर अडवाणी यांच्याऐवजी संघाने वाजपेयी यांच्या नावाला संमती दिली ही गोष्ट वेगळी.) तशीच परिस्थिती सध्या आलेली आहे. परंतु सध्या वाजपेयींच्या भूमिकेत अडवाणी आहेत आणि अडवाणींच्या भूमिकेत मोदी आहेत. म्हणजे अडवाणी फ्याक्टर आता उपयोगी पडत नाही हे लक्षात आल्यावर मोदींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

३.     मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याचा कॉंग्रेसलाही फायदा होणार आहे. २००४ पासून केंद्रात कॉंग्रेस आघाडी सरकार सत्तेत आहे. भ्रष्टाचार महागाई, स्त्रियांची सुरक्षितता, देशाची सुरक्षितता या प्रश्नावर कॉंग्रेस अडचणीत येवू शकते. आपल्या विरोधात काही प्रमाणात नकारात्मक मते तयार होऊ शकतात हे कॉंग्रेसला माहित आहे. अशा वेळी काही हुकुमी मते जर आपणाकडे असतील तर नकारात्मक मतांचा फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे मुस्लीम मते एकगठ्ठा आपल्याकडे वळवता यावीत यासाठी मुस्लिमांचे कट्टर विरोधक असणाऱ्या मोदींनाच भाजपने पुढे आणले पाहिजे. आणि तेच झाले. यामुळे मुस्लीम मते कॉंग्रेसकडे वळतील हे नक्की. कारण मुस्लीम मोदींना मते देण्याची शक्यता सध्या तरी धुसर दिसत आहे.

४.     भाजप किंवा संघालाही मोदींबद्दल विशेष प्रेम आहे अशातला भाग नाही. त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला तरी त्यांना मोदी म्हणजे निवडणुका जिंकून देणारे माध्यम असे वाटते आहे. आणि मोदींचा करिष्मा चालला आणि केंद्रात भाजप आघाडीचे सरकार आले तरी मोदींना पंतप्रधानपद मिळेलच याची खात्री कोणी देवू शकणार नाही. तरीही काळाची पावले ओळखून संघाने मोदींच्या नावाला पसंती दिली.

या आणि अशासारख्या काही कारणांमुळे मोदी हे खूप चर्चेत आहेत. आणि चर्चेत राहण्याचं कसब त्यांना चांगलच अवगत आहे. परंतु सध्या तर मोदी हे खुपच वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेली काही दिवस मोदी धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गात आहेत. निमित्त आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात मोठे स्मारक नर्मदा नदीत उभारण्याचे. सरदार पटेल हे धर्मनिरपेक्ष होते आणि कॉंग्रेसने बेगडी धर्मनिरपेक्षता दाखवण्यापेक्षा ती सरदार पटेल यांच्याकडून शिकावी असे आवाहन मोदी करत आहेत. वस्तुतः हा राजकीय डावपेच आहे हे कुणालाही कळेल. मोदींच्या तोंडात धर्मनिरपेक्षता ही भाषा अजिबात शोभत नाही. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ असाच हा प्रकार वाटतो. कारण राजकारणाचे एक तत्व आहे की विरोधी पक्ष किंवा गट ज्या मुद्द्यावर प्रामुख्याने जोर देवून प्रचार करतोय, एकतर तो मुद्दा नष्ट करा किंवा हायज्याक करा. आणि मोदी नेमके हेच करत आहेत. धर्मनिरपेक्षता हा कॉंग्रेसचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. आणि याच मुद्द्यावर मोदी आघात करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस निष्प्रभ होईल असा त्यांचा होरा आहे. ते काही प्रमाणात खरेही होऊ शकते. मात्र यानिमित्ताने मोदी सेक्युलर आहेत का हा प्रश्न मात्र कुणालाही पडत नाही ?

मोदी अलीकडे सेक्युलर भाषा करीत आहेत, परंतु ते भूतकाळ विसरायला तयार होतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण सेक्युलर भाषा ही त्यांची राजकीय व्यूहरचना आहे. तसे नसते तर गुजरात दंगलीबाबत मोदी यांनी समस्त मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागावी, मग बघू त्यांचे धाडस...आणि खरी धर्मनिरपेक्षता. मागे मोदी यांनी सद्भावना परिषद आयोजित केली होती. लाखो-करोडो रुपये खर्च करून मोदींनी चांगला इव्हेंट घडवून आणला. मुस्लीम लोकांना त्यात सामील करून घेवून, प्रसारमाध्यमे हाताशी धरून संपूर्ण जगभर आपल्या सद्भावनाचे प्रदर्शन केले. परंतु एका मुस्लीम व्यक्तीने त्यांना मुस्लीम टोपी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोदींनी त्याला नकार दिला. त्यानंतर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यावर मोदी आणि त्यांच्या समर्थकांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की फक्त मुस्लीम टोपी घातली म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला खरा कळवळा आहे असे होत नाही. मान्य आहे. पण मग टोपी घालायला नकार दिल्याने त्यांच्याबद्दल तुमच्या मनात घृणा, तिरस्कार आणि द्वेष आहे असे नाही का वाटत ? अनेक पक्षांचे राजकीय नेते विविध जनसमुदायात गेले की त्यांच्या संस्कृती, पेहराव यांच्याबद्दल आदर दाखवतात. आता हे राजकीय भावनेतून जरी होत असले तरी मोदींनी प्रामाणिक भावनेतून करायला काय हरकत होती ? परंतु मोदींनी टोपी घालायला ज्या पद्धतीने नकार दिला ती गोष्टच खूप काही सांगून गेली. नुकतेच मोदी पुण्यात येवून गेले. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला गाडीखाली चालणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली. म्हणजे मोदी यांच्या मनात मुस्लीम समुदायाबद्दल काय भावना आहेत हे दिसून येते. तरीही मोदी बेगड्या धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गात आहेत.

मोदींची धर्मनिरपेक्षता बेगडी आहे याचा अर्थ कॉंग्रेस प्रामाणिक आहे असा मात्र कोणी घेवू नये. याबाबतीत कॉंग्रेसची अवस्था मोदींपेक्षा वेगळी नाही.

5 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

kotya wadhi rupaye khanarya rashtrawadi pawar kaka pesha modi bare.

Mahendra Kamat म्हणाले...

What you write is called wishful thinking. You simply favour Congress and pretend to be neutral. What do you think? Are people of Gujarat and MP foolish? Appeasement of Muslims is secularism?

अनामित म्हणाले...

In conclusion: You will vote Congress-NCP again. Good luck .

Vijay म्हणाले...

Nice article. Now it is proved the true character of modi also.

Vaibhav Jadhav म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes