बुधवार, ऑक्टोबर २३, २०१३

मराठा आरक्षणाची दुसरी बाजू

दै. लोकसत्तामध्ये दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दलित चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांचा ‘असंविधानिक आणि अनाठायी मागणी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. मराठा समाज सर्व ठिकाणी सत्ताधारी आहे, त्याच्याकडून अजूनही दलित-आदिवासी, मागास समाजावर अन्याय अत्याचार चालू आहेत, तसेच हा समाज आरक्षणाच्या सामाजिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही असंविधानिक आणि अनाठायी आहे अशा स्वरुपाची मांडणी ज. वि. पवार यांनी आपल्या लेखात केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचा लेख दै. लोकसत्ताच्या दि. २३ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला. या लेखाचे नावच मुळी ‘नकारात्मक भूमिका नकोच!’ असे आहे. या लेखात शशिकांत पवार यांनी मराठा समाज आरक्षणाचा हक्कदार आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मांडणी करताना नकारात्मक भूमिका घेवू नये अशी मांडणी केली आहे. वरकरणी पाहता त्यांची ही भूमिका योग्य वाटत असली तरी त्यांनी मराठा आरक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या नादात मराठा समाजाची नकारात्मक बाजू साफ नजरेआड केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि एकूणच मराठा समाज यावर भाष्य करणारा हा लेख....

शशिकांत पवार आपल्या लेखाच्या सुरुवातीलाच ज. वि. पवार यांच्या लेखाला पूर्वग्रहदुषित म्हणत आहेत. ते म्हणत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ शशिकांत पवार यांच्या मराठा महासंघाने जाळले होते तो पूर्वग्रह नव्हता काय असे पवार यांना विचारावे वाटते. संपूर्ण लेखात पवार यांनी मराठा आरक्षणाची गरज प्रतिपादली आहे. परंतु हे सर्व लिहित असताना बहुतांशी प्रमाणात मराठा समाजाकडून दलित मागासांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याबद्दल पवार यांनी अवाक्षरही काढले नाही. उलट पूर्वीचा मराठा समाज आणि आत्ताचा मराठा यात जमीन आस्मानचा फरक आहे असे पवार म्हणत आहेत. मराठा महासंघाची पाळेमुळे ग्रामीण महाराष्ट्रात खूप खोलवर रुजली आहेत. महासंघाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना पवार यांना दलित अत्याचाराचे भयाण वास्तव दिसू नये ही शोकांतिका आहे. खैरलांजी येथे घडलेला अत्याचार हा दीड-दोनशे वर्षापूर्वी झाला नव्हता. त्या निर्घृण हत्याकांडात सामील असलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील यांनी किती आटापिटा केला हे पवार यांना माहित आहे. याच शालिनीताईंना बरोबर घेवून मराठा महासंघाने दलित-मागासांच्या राखीव जागांना टोकाचा विरोध केला. आरक्षणाला विरोध करता करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजावर बोचरी टिका शालिनीताई आणि मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. त्याचे पर्यवसान अनेक ठिकाणी सवर्ण-दलित यांचे संबध बिघडण्यात झाले. बाबासाहेबांवर इतक्या खालच्या पातळीवर जावून ताई आणि मराठा कार्यकर्ते चिखलफेक करत असताना शशिकांत पवार किंवा मराठा समाजाची एकही संघटना समोर येवून त्यांना थांबवू शकली नाही. उलट मराठा महासंघ, छावा यासारख्या संघटना शालिनीताईंच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ प्रत्यक्ष सामील नसले तरी तेही ताईंना विरोध करू शकले नाहीत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दलित-मागास समाजावर अन्याय-अत्याचार होत असताना सर्व मराठा संघटना मुग गिळून गप्प राहिल्या ही शोकांतिका आहे. पवार म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाच्या चळवळी सर्वसमावेशक होत्या तर इतक्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडूनही मराठा संघटना गप्प का याचे उत्तर त्यांनी द्यावे.

पूर्वीचा मराठा आणि आत्ताचा मराठा यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे हे पटवून देण्यासाठी पवार लिहितात कि ‘महाराची सावली पडली तरी पाणी टाकून घरी येणारा तत्कालीन हिंदू आज प्रेमविवाहाच्या जमान्यात दलित सून घरात नांदवतो, दलित जावयाचे पाय धुतो.’ खरे पाहता पूर्वीचा काळ बदललाय हे खरे आहे. प्रेमविवाहाचे प्रमाणही वाढलेले आहे. परंतु मराठा समाजाची दलित सून किंवा दलित जावई स्वीकारण्याची मानसिकता आहे काय याचा विचार केला पाहिजे. वास्तव दुर्दैवी आहे परंतु आजही दलित सून किंवा दलित जावई स्वीकारायला मराठा समाज तयार नाही. दलितच कशाला, ९६ कुळी मराठे ९२ कुळी असलेल्यांना स्वीकारत नाहीत तिथे दलित फार दूरची गोष्ट आहे. आणि खरोखर जर पवार यांच्या म्हणण्यात तथ्य असते तर साताऱ्याच्या आशा शिंदेला जीव गमवावा लागला नसता, प्रेमप्रकरणावरून सोनाई येथील मेहतर समाजाच्या तीन युवकांच्या शरीराचे अमानुषपणे तुकडे केले नसते, सातेगाव (नांदेड) येथे दलित प्रियकराचे डोळे चाकूने काढले नसते. या सर्व घटना काय दर्शवतात ? या अन्याय-अत्याचाराबद्दल मराठा संघटना कधी बोलणार आहेत कि नाही ? कि पूर्वीसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही या गोड स्वप्नातच आम्ही राहणार आहोत ?
आज महाराष्ट्रात मराठा समाज हा सत्ताधारी समाज आहे. राजकीय क्षेत्रात पूर्णपणे मराठा समजाचे वर्चस्व आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून सर्व महत्वाची मंत्रिपदे मराठा समाजाकडे आहेत. राजकारणात सक्रीय असलेली मराठा घराणी खूप प्रबळ आहेत. एखाद्या मुंडे-भुजबळांचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र मराठ्यांच्या हातात आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सहकार क्षेत्रातही पूर्णपणे मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. किंबहुना सहकार हा मराठा समाजाचे बलस्थान आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा सरपंच एकवेळ बिगर मराठा चालेल (आरक्षण असल्यामुळे चालवावाच लागतो) पण सहकारी सेवा सोसायटीचा चेअरमन मात्र मराठाच पाहिजे हे वास्तव आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मराठा समाजच सर्वोच्च स्थानी आहे. भारती, डी. वाय. पाटील, कृष्णा यासारखी विद्यापीठे आणि शेकडो शिक्षण संस्था मराठा समाजाच्याच मालकीच्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा अशा सर्व ठिकाणी मराठा समाज इतरांपेक्षा खूप वरचढ आहे. शिक्षणातसुद्धा मराठा मुले खूप पुढे आहेत. मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीपेक्षा निश्चितच जास्त शेती आहे. आणि आत्महत्या करण्यात मराठा शेतकऱ्याबरोबर बिगर मराठा शेतकरीही असतो. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार केला असता असे दिसते कि मराठा समाज सर्वच क्षेत्रात इतर बहुजन जातींपेक्षा नक्कीच पुढे आहे. त्यामुळे स्वतःला मागास सिद्ध करताना या सर्व सत्तास्थानांचा त्याग आपण करू शकतो का याचाही विचार व्हायला पाहिजे.

अजून एक मुद्दा पवार मांडतात, तो म्हणजे सर्व मराठे मुळचे कुणबी आहेत. मान्य आहे. परंतु ही काही वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. काळाच्या ओघात कुणबी आणि मराठा यांच्यातही खूप फरक पडला आहे. ज्या कुनब्यांकडे त्या काळात सत्तास्थाने होती त्यांनी स्वतःला मराठा असे अपग्रेड करून घेतले. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढली आणि मुळचा कुणबी कि जो धनगर-माळी यांच्या जवळपास गणला जात होता त्या स्थानापासून मराठा खूप पुढे गेला. मुळच्या मराठा या प्रदेशवाचक शब्दाला एका जातीचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचा उपयोग मराठा समाजाने इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी करून घेतला. ९६ कुळीचा गर्व बाळगत इतरांना हिणवण्यात धन्यता मानली. आजही अनेक मराठा व्यक्ती राजकीय, शैक्षणिक उद्देशासाठी कुणबीचे प्रमाणपत्र मिळवतात. कागदोपत्री जात कुणबी मात्र व्यवहारात मराठा असते कि नाही ? अशावेळी जात सांगताना आपण मराठाच सांगतो कि नाही ?

शशिकांत पवार म्हणतात कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली तेव्हा त्यांनी फक्त त्यांचा समाजच डोळ्यासमोर ठेवला. अनुसूचित जाती एवढेच लक्ष त्यांचेसमोर होते आणि त्यांनी इतर मागासांकडे दुर्लक्ष केले. परंतु पवार हे विसरतात कि बाबासाहेबांनी घटनेत कलम ३४० नुसार इतर मागास वर्गांच्या आरक्षांची तरतूद केली आहे. कलम ३४१ हे अनुसूचित जाती आणि ३४२ अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाबाबत आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी इतर मागास वर्गांच्या आरक्षणासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बाबासाहेबांनी इतर मागासवर्ग नजरेआड केला या पवार यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. उलट दलित-आदिवासी समाजाबरोबरच इतर मागासांसाठीही बाबासाहेबांनी घटनेत तरतुदी करून ठेवल्या आहेत. परंतु सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याची स्वातंत्र्यानंतर अंमलबजावणी केलीच नाही. बाबासाहेबांनी फक्त दलित समाजापुरते काम केले असे गैरसमज पसरवण्यात आले. शशिकांत पवार यांची वरील विधाने म्हणजे असाच प्रकार म्हटला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांच्या राम आणि कृष्णाची चिकित्सा या पुस्तकाचे भांडवल कुणी केले? त्यांचे ग्रंथ कुणी जाळले ? त्या काळात दलित समाजाविरोधात समाजमन कुणी कलुषित केले हे पवार यांनी सांगावे. मराठावाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करताना शेकडो दलितांची घरे जाळण्यात आली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले याची जबाबदारी कोण घेणार ? कि फक्त सकारात्मक बाजुच पाहण्याच्या नादात इतरांनी आमची नकारात्मक बाजू लक्षातच घ्यायची नाही का ? मराठा आरक्षणाचा विचार करत असताना या सर्व गोष्टींचाही विचार करावा.

मंगळवार, ऑक्टोबर ०८, २०१३

दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे द्या


ता. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अज्ञात मारेकर्यांनी निर्घृण खून केला. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरातून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनभावना लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश काढला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार आणि सर्व षड्यंत्र समाजासमोर आणण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना काहीच सुगावा लागलेला नाही.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes