शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१३

गणेशोत्सव- जल्लोष, उन्माद आणि बरंच काही

गणपती हा शब्दच गणपतीचे मूळ स्वरूप दाखवून देतो. गणांचा अधिपती तो गणपती असा सरळ, साधा अर्थ आहे. शिव-पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती वैदिकांसाठी सुरुवातीला विघ्नकर्ता होता. त्याने विघ्न आणू नये म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची आराधना करून होते. नंतरच्या काळात त्याचे मुळचे अवैदिक स्वरूप नष्ट होऊन त्याचे ब्राम्हणीकरण झाले. अवैदिक गणपतीचे वैदिक ब्रम्हणस्पतिबरोबर एकरूपत्व दाखवून गणेशाचे पूर्ण स्वरूप बदलवून टाकले. त्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक ग्रंथातून पूरक कथांची निर्मिती केली गेली.


प्राचीन काळापासून गणेशाची पूजा घरगुती पातळीवर होतच होती. अगदी अलीकडे पेशव्यांच्या दरबारातही गणपती पुजला जायचा. नंतर काही लोकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरु करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत असल्याने टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला पूरक म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची कल्पना उचलून धरली. त्यासाठी त्यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिले. टिळकांच्या प्रयत्नामुळे गणेश उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. समाज संघटीत व्हावा आणि त्याच्या माध्यमातून जनजागृती करून ब्रिटीशांची सत्ता या देशातून घालवून देवू असे टिळक वगैरे लोकांचे मत होते. म्हणजे गणेशोत्सव ही धार्मिक कमी आणि राजकीय गरज जास्त होती. अर्थात हा हेतू कितपत सफल झाला हाही संशोधनाचा भाग आहे.

१८९३ साली सुरु झालेल्या गणेशोत्सवात सध्या अमुलाग्र बदल झाले आहेत. हे बदल उत्सवाच्या स्वरुपात जसे झालेत तसे त्याच्या हेतुतही झाले आहेत. सध्या गणेशोत्सवाला बाजारी स्वरूप आले आहे. एक फार मोठी अर्थव्यवस्था या सर्वांच्या पाठीशी कार्यरत आहे. आणि या माध्यमातून आपले हितसंबंध साध्य करणाऱ्या लोकांना श्रद्धेशी काहीही देणेघेणे नाही. श्रद्धा ही फक्त बोलायची गोष्ट आहे. कारण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात समाजाचे बारकाईने निरीक्षण केले तर माझे म्हणणे सत्य असल्याचे कोणत्याही सुबुद्ध माणसाला पटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे श्रद्धेचा बागुलबुवा उभा करून त्याच्याआड या सर्व गोष्टी झाकून नेण्याचा प्रयत्नही केविलवाणा ठरेल. या दहा दिवसांच्या काळात कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीत झालेला बदल पाहता हा जल्लोष आहे कि उन्माद असा प्रश्न पडतो. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी याची प्रचीती आणून दिलीच आहे. एका महिला भक्ताला धक्काबुक्की करतानाचा त्याचा पराक्रम सीसी टीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. लागलीच कर्तव्यदक्ष गृहमंत्री आर. आर. आबांनी अशा प्रकारची अरेरावी केली तर कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी डरकाळी फोडली. पण डॉल्बीच्या आवाजात आबांची ही डरकाळी नेहमीसारखीच फेल गेली.

सध्या अनेक शहरांमध्ये गणेश मंडळे पाहिली तर हा श्रद्धेचा भाग नाही हे लगेच लक्षात येईल. शेकडो गणेश मंडळे लागतातच कशाला ? काही काही मंडळांमध्ये तर अक्षरशः चार फुटाचेही अंतर नाही. याचा अर्थ काय ? गणेश उत्सवाच्या माध्यमातूनही आपली वेगळी चूल प्रत्येकाला हवी असते. उत्सवाच्या माध्यमातून श्रेयवाद, आपले नेतृत्व त्या भागावर प्रस्थापित करण्याचे प्रयत्न दिसून येतात. आणि त्यासाठीच इतक्या मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळे अस्तित्वात आहेत. ग्रामीण भागातही एक गाव एक गणपती ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. कारण प्रत्येक गल्लीची एक अस्मिता असते. मग कार्यक्रमाचे नियोजन, श्रेयवाद यात मतभेद होऊन त्याचे पर्यवसान गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये होते. 

सध्या गणेशोत्सवची आवश्यकता आहे का ?

त्यामुळे या सर्व प्रतिकूल गोष्टींचा विचार करता सार्वजनिक गणेशोत्सवाची खरेच आवश्यकता आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे. माझे तर प्रामाणिक मत असे आहे कि सार्वजनिक गणेशोत्सव बंद व्हावेत. कारण गणेशोत्सव ही सध्याच्या समाजाची गरज नाही. असेल तर त्याचे हेतूही समजले पाहिजेत. सध्या या उत्सवाच्या माध्यमातून कोणत्या चांगल्या गोष्टी साध्य केल्या जातात तेही कळले पाहिजे.

परत मुद्दा येतो तो श्रद्धेवर. आमची श्रद्धा आहे मग आम्ही हा उत्सव साजरा केला तर बिघडले कुठे ? आम्हाला आमच्या धार्मिक भावना, श्रद्धा जपण्याचा पूर्णं अधिकार आहे अशा स्वरूपाचे स्पष्टीकरण दिले जाते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक आपल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार दिला आहे आणि तो कुणीही नाकारू शकत नाहीत. मात्र आपल्या श्रद्धा आणि धर्म भावनांचे प्रदर्शन करण्यात काहीच अर्थ नाही. ज्याला आपल्या श्रद्धा जपायच्या आहेत ते घरगुती गणपती बसवू शकतात. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमशक्तीही वाया जाणार नाही. आणि विनाकारण समाजाला वेठीस धरण्याचे प्रकारही होणार नाहीत.

ब्राम्हण समाज दीड दिवसांचा गणपती बसवतात. त्यांचा आदर्श इतर समाजानीही घ्यावा असे मला वाटते. कारण गणेशोत्सवामध्ये वेळ, पैसा, शक्तीचा अपव्यय होतो, राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान होते, गणेशोत्सवमधील खर्च अनुत्पादक गोष्टींवर केला जातो. हाच पैसा, वेळ, शक्ती विधायक कामासाठी वापरली तर बराच फायदा होईल.

श्रद्धा आणि करमणूक 

श्रद्धेचा तर अलीकडे गणेशोत्सवमध्ये मागमूसही दिसत नाही. सर्वत्र या उत्सवाचे बाजारीकरण झाले आहे. कारण यापाठीमागे फार मोठी अर्थव्यवस्था कार्यरत आहे. या माध्यमातून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जातात. कारण गणेशोत्सव ही सध्या राजकीय गरज बनलेली आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून तरुणाईचे संघटन केले जाते. त्यांचे ग्रुप तयार केले जातात. त्यांच्या माध्यमातून एखादा नेता आपली राजकीय पोळी भाजून घेत असतो. करमणूक म्हणाल तर हा कळस झाला. नाचायला, एन्जोय करायला हरकत नाही, परंतु पूर्ण २४ ते ४८ तास करमणूक, नाच या गोष्टी किळस आणणाऱ्या नाहीत काय. 

कित्येक तासांच्या गणेश विसर्जन मिरवणुका, डॉल्बीचा गोंगाट, सर्वत्र रस्ते बंद. अशाने लोकांची गैरसोय होत नाही का ? कि बहुसंख्यांक असणाऱ्या लोकांच्या या राजकीय, धार्मिक गरजा असल्याने सर्व खपून जाते ? अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीही पुण्यातील टिळक रोड खचाखच भरला होता. शेकडो मंडळे, त्यांचे गणपती, त्यांच्या डॉल्बी आणि सर्वांचे मिळून हजारो कार्यकर्ते. अशा परिस्थितीत त्या रस्त्याने एक रुग्णवाहिका जात होती. त्या रुग्णवाहिकेला तिथून निघताना किती अडचण होत होती. दहा मिनिटांचा रस्ता पार करायला त्यांना अर्धा तास लागला. रुग्णवाहिकेचा सायरनही डॉल्बीच्या गोंगाटात ऐकू येत नव्हता. रुग्णवाहिकेलाही रस्ता देण्याचे भान आमच्यात असू नये का ? एवढे आंधळे आम्ही कशाने झालो ?

मी हिंदू धर्मविरोधी आहे का ?

आता मी इतके लिहितोय म्हटल्यावर अनेकांना शंका येणार कि हा हिंदू धर्माचा विरोधक दिसतोय. तसे आक्षेप आतापर्यंत अनेक वेळा घेतले गेले आहेत. काहीही जणांना वाटतं कि हा नक्कीच बौद्ध असणार. मग सुरु होतो बौद्धांचा उद्धार. त्यामुळे मी कोण आहे ते स्पष्ट करणे गरजेचे आहे, कारण या माझ्या नावाने उगीच इतरांना दोष दिला जायला नको. मीही जन्माने हिंदू आहे. आणि मला हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा अधिकार आहे आणि तो कुणीही हिरावून घेवू शकत नाही. वर मी जी मते लिहिली आहेत ती माझी स्वतःची आहेत. त्यावर तुम्ही विचार करावा एवढीच माझी विनंती आहे. माझेच खरे आणि ते ऐकलेच पाहिजे असा हुकुमशाही अट्टाहास मी कधीच धरला नाही. फक्त शिव्या देण्यापेक्षा चर्चा करूया. या उत्सवाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्याही सांगा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे गणपती उत्सवात स्वतःला झोकून देवून सामील होतात त्यांनीच माझ्या विरोधात प्रतिक्रिया द्यावी. नाहीतर घरातला गणपती दीड दिवसात विसर्जित करायचा आणि इतरांनी मात्र त्यात दहा दिवस गुंतून राहावे असं मतप्रदर्शन करायचे हा ढोंगीपणा कृपया करू नका.

6 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes