बुधवार, ऑगस्ट २८, २०१३

सनातन विकृतीता. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सुसंस्कृत पुण्यामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. डॉ. दाभोलकरांचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात पसरत चालले होते कि संकुचित मनुवादी प्रवृत्त्तींनी त्यांची खूपच धास्ती घेतली होती. समाजाला जाती-धर्माची, अंधश्रद्धेची नशा पाजून आपली तुंबडी भरणारे महाभाग समाजात भरपूर आहेत. या महाभागांनी दाभोलकर आणि अंनिसबद्दल आजपर्यंत खूप अपप्रचार केला. दाभोलकर हयात असताना त्यांच्याबद्दल खूपच असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करण्यात येत होती. परंतु हिंदू धर्म-संस्कृतीचा ठेका घेतलेले हे लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा अनुभव साऱ्या महाराष्ट्राने दाभोलकरांच्या हत्येनंतर घेतला.

दाभोलकरांच्या हत्येने महाराष्ट्रच नव्हे तर देशाला धक्का बसला. राष्ट्रीय राजकारण, समाजकारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांनी दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. राज्यसभेतही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. दाभोलकरांचे सहकारी आणि पुरोगामी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मनुवादी, धर्मांध प्रवृत्तींचा निषेध करत होते. 

यावेळी दाभोलकरांचे वैचारिक (?) विरोधक असलेले सनातन संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सनातन वर सर्व स्तरातून होणारी टिका आणि आरोप यांचे खंडन करत होते. सनातन संस्थेची आजपर्यंतची कार्यपद्धती आणि विचारसरणी पाहता सनातन संस्थेचे नाव यात येणे स्वाभाविक आहे. पोलीस तपास करत असताना सर्व शक्यता पडताळून पाहत असतात. त्यातीलच एक शक्यता सनातन संस्थेचा यात सहभाग असू शकतो ही आहे. जर तसा सहभाग नसेल तर त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. सनातन संस्थेचे नाव सर्वांच्याच तोंडात का होते याचा विचार सनातनने केला पाहिजे. उठसुठ हिंदू धर्म-संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या सनातनने दाभोलकरांच्या मृत्युनंतर त्यांचाबद्दल असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करून आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडवले. हीच जर हिंदू संस्कृती असेल तर अशा संस्कृतीची, विचारधारेची आपणाला लाज वाटावी अशी परिस्थिती सनातनने निर्माण करून ठेवली आहे.

मरणान्तानि वैराणि !

मरणान्तानि वैराणि ! असे शीर्षक देवून सनातन प्रभातच्या २१ ऑगस्टच्या अंकात संपादक जयंत बाळाजी आठवले हे लिहितात, ‘आज सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची बातमी समजली, तेव्हा गीतेतील जातस्य हि ध्रुवो मृत्युः ! म्हणजे जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित असतो, या शिकवणीची आठवण झाली. नंतर कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून पुढील विचार मनात आले.

1.      1. जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात.
2.      2. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं.

ते पुढे लिहितात, ‘आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्वराने केलेली कृपाच आहे.’

‘डॉ. दाभोलकर ईश्वर मानत नसले, तरी ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.’

जयंत बाळाजी आठवले यांची सनातन प्रभातमधील ही खुनशी वक्तव्ये पाहता हिंदू धर्माचा अभिमान आणणारी कोणतीही व्यक्ती शरमेने मान खाली घालेल यात तिळमात्र शंका नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राम्हणी व्यवस्था, धर्म-परंपरा यांचा प्रचार-प्रसार करण्यात सनातन आघाडीवर असते. ब्राम्हणी विचार म्हटले कि बहुतांशी लोक पाठ फिरवतात, विरोध करतात. त्यामुळे हे सर्व हिंदू संस्कृती या गोंडस नावाखाली चालते. इथे बहुतांशी हिंदू आहेत आणि त्यांना आपल्या धर्माचा अभिमान असणार हे सनातनला चांगलेच माहित आहे. त्यातच सामान्य माणसाला धर्माची नशा पाजणे तुलनेने सोपे असते. ब्राम्हणी व्यवस्थेला विरोध करणऱ्या कार्यकर्त्यांना हिंदू धर्मद्रोही ठरवून त्यांची निंदानालस्ती केली जाते. असाच प्रकार दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या बाबतीतही सनातन संस्थेने नेहमी केलेला आहे.

सनातन संस्था आणि दाभोलकर हे एकमेकांचे वैचारिक विरोधक होते हे सर्वश्रुत आहे. एखाद्याचे विचार पटले नाहीत तर सभ्यतेच्या मर्यादा पाळून वैचारिक वाद घालायला काहीच हरकत नाही. समोरच्या माणसाबद्दल (जरी तो आपला वैचारिक विरोधक असला तरी) आदर बाळगला पाहिजे. आणि सनातनला हेच मान्य नसावे. नाहीतर दाभोलकरांच्या जाण्यानंतर सनातनला इतक्या उकळ्या फुटल्या नसत्या. 

जन्म आणि मृत्यू निश्चित असतात असं आठवले म्हणतात ते खरं आहे. कारण ते एक वैज्ञानिक सत्य आहे. त्यात कोणताही चमत्काराचा भाग नाही. परंतु आठवले पुढे मात्र असं म्हणतात कि जन्म मृत्यू प्रारब्धानुसार होतात आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ मिळतं. म्हणजे दाभोलकरांनी जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चालवले होते त्याचे फळ दाभोलकरांना त्यांची हत्या होवून मिळाले. म्हणजे दाभोलकरांची हत्या झाली हे योग्यच झाले कारण ते त्यांच्या कर्माचे फळ होते. म्हणजे दाभोलकरांची हत्या समर्थनीय आहे असे तर सनातनला सुचवायचे नाही ना ? आणि हत्येसारखे वाईट फळ दाभोलकरांना मिळाले म्हणजे त्यांचे कर्म चुकीचे होते, वाईट होते असे सनातनला म्हणायचे आहे का ?

पुढे तर आठवले अत्यंत धक्कादायक विधान करतात. अंथरुणाला खिळून किंवा शल्यकर्माने मृत्यू येण्यापेक्षा असा आलेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच आहे. आता दाभोलकरांना कसा मृत्यू आला. तर त्यांची गोळ्या घालून हत्या झाली. (तीही पाठीमागून. बहुदा दाभोलकरांचे तेज मारेकरी आणि त्यांच्या अंतस्थ प्रेरणांना सहन होत नसावे. उगीच दाभोलकरांच्या शरीरातून पुरोगामी विचारांची किरणे निघून त्यांचा तेजोभंग व्हायचा.) तर दाभोलकरांची झालेली हत्या ही त्यांच्यावर ईश्वराने केलेली कृपा असू शकते का याचे उत्तर एखादे शेंबडे पोरही देईल. आठवले यांच्यावरील विधानातून त्यांची दाभोलकरांच्या हत्येबद्दल काय भावना आहे हे लगेच समजून येते. ही मानसिकता आजची नाही. अगदी गांधीहत्येनंतरही काही लोकांना आनंद झालाच होता की.  गांधींच्या विचारांचा प्रतिवाद होवू शकत होता. जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. परंतु लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याकडून सभ्य वैचारिक प्रतिवादाची अपेक्षा कशी करावी ? गांधीना संपवले, दाभोलकरांना संपवले आणि नंतर त्यांच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त केला गेला हे कशाचे लक्षण आहे ? सुसंस्कृतपणाचे कि अतिरेकी उद्दामपणाचे ?

सनातनच्या याच अंकात दाभोलकर आणि अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचाही उल्लेख आहे. त्यांना परदेशातून आर्थिक मदत मिळत होती असाही आरोप करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन अशा भडकाऊ आणि तर्कविसंगत आरोपांचा समाचार घेणार आहे कि नाही ? राज्यकर्ते सनातनच्या अशा विषारी प्रचाराला लगाम घालणार कि नाही ? मागे सनातन प्रभातने महात्मा फुले यांची बदनामी करून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. तेव्हाही त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही हे कशाचे द्योतक आहे ? 

याच अंकात सनातन मध्ये दाभोलकरांच्या हत्येबद्दल काही जणांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सनातनवर सर्वांचा रोख वळलेला पाहून सनातनने सावकाश दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला. परंतु आपल्या सनातन प्रभातच्या अंकात संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया अशी आहे, “बरे झाले, एक हिंदू धर्मद्वेष्टा गेला.” तसेच सनातननेही स्वतःचे मत नोंदवले आहे. ते असे कि, ‘प्रसारमाध्यमे उगीच दाभोलकरांचा उदोउदो करत आहेत. त्यांच्या हत्येबद्दल फारसे कुणाला वाईट वाटलेले नाही. उलट हत्या झाल्यानंतर काही तासात चौकाचौकात जमून लोक अशा प्रतिक्रिया व्यक्त करत होते कि बरे झाले, हिंदू धर्मद्वेष्टा गेला. आता दाभोलकर जरी सनातन आणि त्यांच्या समविचारी लोकांचे वैचारिक शत्रू असले तरी दाभोलकरांच्या मृत्यूने त्यांना आनंद होणे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे. आणि ज्या धर्म-संस्कृतीचा टेंभा हे लोक मिरवतात त्याची हीच शिकवण आहे का ? असा आमचा सवाल आहे.

बहुजन समाजातील अनेक लोक सनातनच्या जाळ्यात अडकलेले आहेत. त्यांना सनातन संस्थेची विचारसरणी भलेही योग्य वाटत असेल. आणि तसे वाटत असण्यात काही गैर नाही. कुणालाही कोणताही विचार स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. फक्त त्यांनी इतकाच विचार करणे गरजेचे आहे कि सनातन किंवा इतर धार्मिक संघटना जो विचार मांडतात तो खरेच सर्व समाजाच्या भल्याचा आहे का ? जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे करून कुणाचे भले होणार आहे ? या निरर्थक संघर्षातून काय साध्य होणार आहे ? या गोष्टींचा विचार करावा. हिंसा माणसाला विकृत बनवते. आणि जिथे वैचारिक प्रतिवाद शक्य आहे तिथे तर हिंसेचा मागमूसही नको. गांधींना संपवून त्यांचे विचार संपत नाहीत. त्याचप्रमाणे दाभोलकरांना मारून त्यांचे विचार मरणार नाहीत. भलेही गांधीवधाप्रमाणे ‘दाभोलकर वध’ असा शब्दप्रयोग सुसंस्कृत पुण्यात रूढ होऊ दे. समाजातील तरुण, सुजाण लोकांनी एकच विचार करावा कि समतेचा, शांततेचा, अहिंसेचा, विवेकाचा मार्ग योग्य कि हिंसा, द्वेष, अविवेकाचा मार्ग योग्य ? सारासार विचार करून तटस्थ मनाने, आपला धर्म-जात डोक्यातून काढून केवळ माणुसकीच्या भूमिकेतून विचार करावा आणि मगच आपण कशा पद्धतीने वाटचाल करायची आहे ते ठरवावे.

7 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes