सोमवार, ऑगस्ट १२, २०१३

संजय सोनवणी साहित्य संमेलन निवडणुकीच्या रिंगणात

संजय सोनवणी

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नुकताच श्री. संजय सोनवणी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. साहित्यिक व प्रकाशक म्हणून श्री. सोनवणी यांचा साहित्याशी वयाच्या १३ व्या वर्षापासून संबंध असल्याची माहिती नुकतीच मला मिळाली. वयाच्या अवघ्या १३ वर्षापासून ते आजतागायत सातत्याने लेखन करणारा इतका मोठा लेखक या अलीकडच्या ३० – ३५ वर्षांत दुसरा कोणी आहे का ? लेखक म्हणून श्री. सोनवणी यांचे काही गुणविशेष या ठिकाणी सांगण्याचा मोह मला आवरत नाही. साहित्यात आजकाल वेगवेगळे जातीय प्रकार पडत चालले आहेत. कथा – कादंबरीचा लेखक ब्राम्हण असेल तर त्याचे कथानक ब्राम्हणी जातीपुरते मर्यादित असते, किंवा मग जास्तीत जास्त मराठा समजाला केंद्रस्थानी ठेऊन केलेले असते. हाच नियम जवळपास इतर जातींच्या लेखकांना लागू होतो. या पार्श्वभूमीवर ‘ असुरवेद ‘ व ‘ आणि पानिपत ‘ या कादंबऱ्यांचे नायकत्व दलित वर्गीयांना देण्याचे कार्य श्री. सोनवणी यांनी केले. खरे तर या ठिकाणी जातीपातीचा 
मुद्दा अनावश्यक आहे पण जातींनी विभागलेल्या या समाजाला जर सोनवणी यांचे कार्य समजावून सांगायचे असेल तर या दलित समाजाशी त्यांचा दुरान्वये देखील संबंध नाही. तरीही त्यांनी हे धाडस दाखवले. होय, याला धाडसचं म्हणावे लागेल. कारण यात नेहमीच्या धाटणीप्रमाणे खुनशी पाटील नाहीत कि गोडबोलणारे भटजीबुवा नाहीत. अत्यचार सहन करणारे दलित या कादंबऱ्यांमध्ये दिसून येत नाहीत उलट स्वकर्तुत्वाने चमकणारे दलित वर्गीय यातील खरे नायक आहेत. याहीपलीकडे जाऊन श्री. सोनवणी आपल्या ‘ महार कोण होते ? ‘ या ग्रंथात महार समाजाच्या निर्मितीविषयी एक महत्त्वाचा सिद्धांत तर मांडला आहेच पण ज्या पुरुषसूक्ताच्या आधारे आजवर समाजाचे चार वर्णांत विभाजन केले गेले होते ते पुरुषसुक्त कसे प्रक्षिप्त आहे, हे पुराव्यासह त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या ठिकाण मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने लिहावे वाटते कि, स. १९५६ साली बाबासाहेबांच्या निधनाने त्यांचे जे कार्य खंडित झाले होते ते पुढे नेण्याचे कार्य अर्धशतकाने का होईना पण नियतीने श्री. सोनवणी यांच्या हस्ते पार पाडून घेतले. याखेरीज ‘ दहशतवादाची रूपे ‘ या आपल्या शोध निबंधवजा ग्रंथात सोनवणी यांनी, जागतिक दहशतवादाची जी चिकित्सा केली आहे ती देखील अभ्यासनीय अशीच आहे. दहशतवादाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्वरूप विविध धर्मांच्या उदय – अस्तासोबत आणि धार्मिक संघर्षात कसकसे बदलत गेले याचा त्यांनी संदर्भ ग्रंथांच्या आधारे आढावा घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. तसेच एक इतिहास संशोधक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी केलेल्या लेखन कामगिरीचा उल्लेख आधी आलेला आहे, पण मराठी वाचकांना इतिहास म्हटले कि फक्त शिवशाही व पेशवाई आठवते. तर या काळाच्या बाबतीत देखील सोनवणी यांनी जे कार्य केले आहे ते अजोड असे आहे. उदा. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा उध्वस्त करण्याचे जे प्रयत्न अलीकडच्या २ - ३ वर्षात झाले,त त्यावेळी वाघ्याच्या अस्तित्वाविषयी ठोस पुरावे मांडणाऱ्यांमध्ये फक्त एकटे सोनवणी हेच होते ! हि घटना गेल्या वर्षातीलच आहे आणि जवळपास सर्व महाराष्ट्र प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे या घटनेचा साक्षीदार आहे. यशवंतराव होळकर हे एक उत्तर पेशवाईमधील अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व. या ऐतिहासिक पुरुषाला शक्य तितके बदनाम करण्याचे प्रयत्न इतिहासकारांनी केले होते. प्रातःस्मरणी ज्याचे नाव घेऊ नये अशा लोकांच्या यादीत यशवंतरावाचा समावेश करण्यात आला होता, त्यावरून त्याच्याविषयी किती गैरसमज लोकांच्या मनात रुजवला गेला होता याची कल्पना करावी. परंतु, याच यशवंतरावाचे खरेखुरे पण संक्षिप्त असे चरित्र श्री. सोनवणी यांनी लिहून एका इतिहास नायकाचा खऱ्या अर्थाने उद्धारच केला आहे असे म्हणता येईल. यापूर्वी श्री. ना. सं. इनामदार यांनी आपल्या ‘ झुंज ‘ या कादंबरीमधून यशवंतरावाचे जे चित्रण केले होते ते प्रशंसनीय असले तरी त्याची प्रतिमा आहे तशीच ठेऊन वाचकांची सहानुभूती मिळवणारे असे होते. त्या उलट श्री. सोनवणी यांनी अस्सल पत्रे आणि संदर्भ साधनांच्या आधारे लिहिलेले यशवंतरावाचे चरित्र अधिक सरस आहे. 

प्रकाशक म्हणून सोनवणी यांची कामगिरी तर अधिकचं वेगळी आहे. नव्या लेखकांना आधार देणारा प्रकाशक अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल. स. १८९३ साली प्रसिद्ध झालेले मुरलीधर अत्रे लिखित ‘ सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र ‘ स. २०१३ मध्ये पुनःप्रकाशित करणे हे व्यावसायिकदृष्ट्या सध्याच्या कोणत्याही प्रकाशकाला न परवडणारी गोष्ट. याचे कारण असे कि, या चरित्राची एकही परत भारतात उपलब्ध नव्हती. त्याहीपलीकडे म्हणजे मल्हारराव होळकरावर असे कोणी लेखन केले आहे याची फारशी कोणाला माहितीही नव्हती. विशेषतः, पानिपत अभ्यासकांना तर नाहीच नाही ! या पार्श्वभूमीवर श्री. सोनवणी यांच्या कार्याचे वेगळेपण लक्षात येते.
ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून श्री. सोनवणी यांनी केलेल्या लेखनाचा आढवा घ्यायचा म्हटले तरी तो एक वेगळा ग्रंथच होईल. परंतु, आपली विविध विषयांवरील संशोधने, जोडीला कथा – कादंबरी लेखन सुरु असताना प्रासंगिक घटनांवर सातत्याने लेखन करून लोकांना विचार करण्यास भाग पाडण्याचे महत्त्वाचे कार्य श्री. सोनवणी वेळोवेळी पार पाडत आले आहेत. माझ्या मते, हि त्यांची कामगिरी अवर्णनीय अशीच आहे. कारण, वाचकांना विचार करायला भाग पाडणारे लेखन आजकाल कितीजण करतात हाच खरा संशोधनाचा विषय आहे. असो, एक लेखक आणि प्रकाशक म्हणून नवोदितांच्या ( लेखक – प्रकाशक या अर्थाने ) नेमक्या काय समस्या आहेत याची त्यांना जितकी जाण आहे व त्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचे जे धैर्य त्यांच्या अंगी आहे ते लक्षात घेता साहित्य संमलेनाच्या अध्यक्षीयपदी निवडून येण्यातच साहित्य क्षेत्रातील नवोदित आणि उपेक्षित लेखक वर्गाचे खरे हित आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तर असे हे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीय निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत, ते भरघोस मतांनी निवडून येवोत अशी माझी मनोमन इच्छा आहे.

लेखक- संजय क्षीरसागर.

5 टिप्पणी(ण्या):

Vikas म्हणाले...

1956 no 1756 please correct it.

स. १७५६ साली बाबासाहेबांच्या निधनाने त्यांचे जे कार्य खंडित झाले होते ते पुढे नेण्याचे कार्य अर्धशतकाने का होईना पण नियतीने श्री. सोनवणी यांच्या हस्ते पार पाडून घेतले.

Vikas म्हणाले...

श्री. सोनवणी भरघोस मतांनी निवडून येवोत अशी माझी मनोमन इच्छा आहे.

Vikas म्हणाले...

ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
HAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद विकास जी......

Vikas म्हणाले...

निषेध!
निषेध!
निषेध!
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, सनातनवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध!

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes