गुरुवार, ऑक्टोबर २५, २०१२

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते  याचे काही पुरावे . 

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर
आणि पार्वती यांचा पुत्र असलेला गणपती मुळचा अनार्य संस्कृतीमधील आहे हे उघडच आहे. चित्रावशास्त्रींनी गणपती आणि निकुंभ एकच असल्याची माहिती वायुपुराणांच्या आधारे दिली आहे. निकुंभ हा एक दैत्य होता, हे प्रसिद्धच आहे. प्रल्हादाच्या एका पुत्राचे नावही निकुंभच होते. महाभारताने म्हटले आहे, हे भारतवंशजा, प्रल्हादाचे तीन पुत्र सर्वत्र प्रसिद्ध होते. विरोचन, कुंभ आणि निकुंभ, अशी त्यांची नवे होती. शिव आणि पार्वती यांनी बाणासुराला आपला पुत्र मानले होते आणि शिवाने त्याला गणपती होण्याचा वर दिला होता. याचा अर्थ असुरांमधील अत्यंत पराक्रमी आणि गणांचे प्रमुख असलेल्या व्यक्तींना गणपती म्हटले जात असे. बाणासुराप्रमाणेच त्याच्या आधीच्या पिढ्यांमधील अनेकांना ही पदवी देण्यात आली असेल, यात शंका नाही. स्वाभाविकच, प्रल्हादाचा पुत्र निकुंभ याला गणपती म्हणणे, हा त्याच्या पदाला व पराक्रमाला अन्वर्थक संज्ञा देण्याचा प्रकार म्हटला पाहिजे.

काळाच्या ओघात शंकराचेच वैदिकीकरण झाल्यामुळे गणपतीचे वादिकीकरण होणे अपरिहार्य होते. त्यामुळे वैदिकांनी ब्रह्मणस्पतीला गणपती मानले. स्वाभाविकच, वैदिकीकरण झालेल्या गणपतीचे स्वरूप मूळच्या गणपतीपेक्षा खुपच वेगळे झाले. गणपतीची ही वेगवेगळी अशी दोन रूपे ध्यानात घेवूनच गणपतीच्या व्यक्तिमत्वाचे आकलन करणे आवश्यक आहे. वैदिकीकरणाची पुटे दूर करूनच गणपतीचे अनार्य संस्कृतीमधील मूळ स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. (संदर्भ- बळीवंश- डॉ. आ. ह. साळुंखे, पान नं. ७९)

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या बळीवंश या ग्रंथात पान नं. २७२/७३ वर हरीवंशामध्ये आलेली बलीपुत्र बाणाची कथा दिली आहे. ही कथा हरीवंशाच्या ‘विष्णूपर्व’ या भागात आली आहे. वैशंपायनाने जनमेजयाला सांगितलेली ही कथा संवादरुपात आहे. या कथेतील महत्वाचा भाग असा, युद्धाची प्रशंसा करणाऱ्या बलीपुत्राला रुद्र आणि स्कंद यांचे सहाय्य होते.......महात्मा शंकराने त्याला वर दिला, त्यानुसार त्याला सदैव स्वतःचे (शंकराचे) सानिध्य लाभेल आणि अक्षय्य गाणपत्य (गणपती हे पद) लाभेल असे त्याने सांगितले. याच अर्थाचा सदर श्लोक डॉ. साळुंखे यांनी पान नं. ४२८ वर दिला आहे. तो असा, 
वासुदेवेन यत्र असौ रुद्र-स्कन्द-सहायवान | 
बलीपुत्रः रणश्लाघी जित्वा जीवन विसर्जितः ||
यथा च अस्य वर दत्तः शंकरेण महात्मना | 
नित्यं सानिध्यता च एव गणपत्यं तथा अक्षयम् ||

(हरिवंश १०६.५-६)


शंकराने बाणाला जे विविध वर दिले, त्यापैकी एक वर फार फार महत्वाचा आहे. बहुजनांना आपला वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने तो फार उपयुक्त ठरणारा आहे. बाणाने प्रमाथगणवंशामध्ये आपले स्थान प्रथम असावे आणि महाकाल म्हणून आपली ख्याती व्हावी, असे वरदान मागितले आहे. प्रमाथगण याचा अर्थ शत्रुना घुसळून काढणारा, विलक्षण पराक्रमी गण होय. बाण गणवंशामध्ये प्रथम होऊ इच्छितो, याचा अर्थ तो एका दृष्टीने गणपती होऊ इच्छितो. पुढच्या काळात गणपतीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलून त्याला ब्राम्हनानुकुल बनविण्यात आले असले, तरी गणपती हा मुळचा बहुजनांचा एक अत्यंत पराक्रमी असा पूर्वज होता आणि असे जे अनेक गणपती होऊन गेले असतील, त्यापैकी बाण हा एक अत्यंत महान गणपती होता, हे यावरून स्पष्ट होते. (संदर्भ : बळीवंश, पान नं. २८४)
 

6 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes