शनिवार, ऑगस्ट ०४, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग ३

तुकोजीरावांचा आंतरधर्मीय विवाह

तुकोजीराव होळकर (III)
बावला खून खटल्यानंतर  १९२६ मध्ये तुकोजीराव यांनी गादी सोडली आणि युरोप-अमेरिकेकडे रवाना झाले. तिथेच त्यांची ओळख मिस मिलर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि तुकोजीरावानी मिलर यांच्याशी लग्न करायचे ठरविले. १९२८ मध्ये तुकोजीराव मिलर यांना घेवून भारतात आहे. त्यांनी तिच्याशी रीतसर लग्न केले. मिलर यांनी हिंदू धर्म स्वीकारला. लग्नानंतर त्यांचे नाव शर्मिष्ठादेवी असे झाले. तुकोजीराव आणि शर्मिष्ठादेवी आयुष्यभर एकत्र राहिले. परंतु त्यांच्या लग्नाबद्दलही जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम चालू आहे. इंटरनेट वर अनेक ब्लॉगधारकांनी बावला खून
खटला आणि तुकोजीरावांचे लग्न याबद्दल लिहिले आहे. त्यापैकी काहींनी तुकोजीरावांच्या तथाकथित घटस्फोटाबद्दल लिहिले आहे. पण त्याला काहीएक पुरावा नाही. तुकोजीरावांना त्यांच्या लग्न प्रसंगी भारतातील कर्मठ हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला. का तर महाराज एका ख्रिश्चन युवतीशी विवाह करीत होते. तुकोजीरावानी तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सल्ला विचारला होता. यावेळी बाबासाहेबांनी तुकोजीरावाना खूप मदत केली. 

बाबासाहेबांचे एक सहकारी सत्यशोधक हरी पिराजी धायगुडे गुरुजी यांनी या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात, सन १९२८ ची गोष्ट. इंदूरच्या श्रीमंत तुकोजीराव होळकर महाराज यांनी अमेरिकेतून येताना तेथील मिस मिलर या अमेरिकन मुलीस घेऊन आले, त्यांना तिच्याशी लग्न करणे होते. त्यांनी डॉ. बाबासाहेबांना सल्ला विचारला. बाबासाहेबांनी श्री. धोंडीबा गायकवाड यांना मुद्दाम बारामतीस पाठविले. मी व माधवराव अहिवळे मुंबईला गेलो. बाबासाहेब मला म्हणाले, तुकोजीराव होळकर हे धनगर समाजातील आहेत, तुम्ही त्यांना त्यांचे लग्नाचे बाबतीत मदत करावयास पाहिजे. मी होय म्हणता, मला पत्र लिहावयास सांगितले मी पत्र लिहिले. ते बाबासाहेबांनी श्री. चित्रे यांचेसोबत बेंगलोरला तुकोजीराव महाराजांकडे पाठविले. महाराजांचे तारेवरून मी बेंगलोरला जावून त्यांना भेटलो. चित्रे मजबरोबर होते.

बारामतीस येवून चोहोकडे दौरा काढला व बारामतीस धनगर समाजाची परिषद ७-६-१९२८ रोजी भरविली. डॉ. बाबासाहेब त्या परिषदेला उपस्थित होते. त्या लग्नास समंतीवजा ठराव पास केला. व धनगर पंचांची निवड केली. ता. १३-३-१९२८ रोजी नाशिक येथे डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी मिस मिल्लर यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली. व आमचे धनगर पंचांनी त्या बाईला धनगर करुन घेतले. ता १७-०३-१९२८ रोजी वडवाई येथे लग्न झाले. त्या लग्नाकरता मी महाराष्ट्रातून स्पृश्य-अस्पृश्य मिळून पाचशेवर लोक नेले होते.   

तुकोजी होळकर यांच्या आयुष्यातील ही एक क्रांतिकारी घटना म्हणावी लागेल. या घटनेकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहायचे ते आपण आधी ठरविले पाहिजे. कारण संस्थानिक लोकांकडे पहाण्याचा दृष्टिकोण  थोडा वेगळा असतो. संस्थानिक पैशाच्या, सत्तेच्या जोरावर रगेल आणि रंगेल जीवन जगतात हा एक समज समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. बरेचसे संस्थानिक अशा पध्दतीचे सुखोपभोग घेतही असतील. सामाजिक किंवा राजकीय सुधारणाशी त्याना काही देणे-घेणे नसते. परंतु काही संस्थानिकानी मात्र केवळ सुखी जीवन न उपभोगता समाजिक कार्यात बहुमोल योगदान दिले आहे. तुकोजीराव होळकर यांच्याही सामाजिक कार्याकडे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे. तुकोजीराव हे केवळ सुखी जीवन उपभोगणारे संस्थानिक नव्हते हे त्यांच्या जीवनचरित्राचा निष्पक्ष आढावा घेतला तर दिसून येईल. तुकोजीराव होळकर आणि एकूणच होळकर घराण्यातील राजे यांनी जातीपातींचा विचार केला नाही. अगदी मल्हारराव, अहिल्याबाई यांच्यापासून ते तुकोजीराव यांच्यापर्यंतच्या राजांनी जातीभेदाला थारा दिला नाही. म्हणूनच महाराष्ट्रात पेशवाईच्या माध्यमातून दलित, अस्पृश्य समाजाला जनावरांची वागणूक दिली जात असताना होळकरांच्या राज्यात मात्र जातिभेदाचा फैलाव दिसत नाही. तुकोजीरावानी आपल्या चार मुलींपैकी एकीचे लग्न पटियालाच्या राजपुत्राबरोबर लावून दिले. दुसरीचे लग्न कागलच्या घाटगे घराण्यात लावून दिले. आपला मुलगा यशवंतराव याच्यासाठी राजर्षी शाहू महाराजांची सख्खी चुलत बहिण पसंद केली. तुकोजीराव हे जाती-पातीच्या पलीकडे जावून विचार करणारे राजे होते.

आज  तुकोजीराव होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी संदर्भसाधने अतिशय दुर्मिळ आहेत. परंतु त्याचा शोध घेवून अभ्यास केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी समोर येतील. 

                                                   संदर्भ-
·                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        होळकरांचा इतिहास- मधुसूदनराव होळकर.
·                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        विश्वाचा यशवंत नायक- १३ ऑगस्ट १९९५
·                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        धायगुडे गुरुजींचा बाबासाहेबांशी पत्रव्यवहार

2 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes