शनिवार, ऑगस्ट ०४, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग २

                                 बावला खून खटला
महाराजा तुकोजीराव होळकर (III)
   बावला खून खटला हे तुकोजीरावाच्या आयुष्यातील अतिशय दुर्दैवी प्रकरण होय. या प्रकरणात त्यांची खूप बदनामी झाली, त्यांना विनाकारण मनस्ताप सोसावा लागला. शेवटपर्यंत या खून खटल्यात तुकोजीरावांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा सापडला नाही, तरी कपाळकरंट्या लोकांनी तुकोजीरावच मुख्य आरोपी आहेत असे मानून या प्रकरणाची मांडणी केली .
बावला खून खटल्याची थोडक्यात कहाणी अशी की, 
मुमताज बेगम नावाची सुंदर नर्तकी तिचा प्रियकर अब्दुर कादर बावला याच्याबरोबर मुंबईतून फिरत होती. बावला हा मुंबईतील श्रीमंत व्यापारी होता. ते ज्या गाडीतून जात होते त्या गाडीला एका दुसर्‍या गाडीतून आलेल्या सात-आठ जणांनी अडविले. ते बहुदा मुमताजला नेण्यासाठी आले असावेत. ते मुमताजला गाडीतून खेचू लागल्यावर  बावलाने विरोध केला असता  त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हा सर्व प्रकार घडत असताना तिथून तरुण इंग्रज अधिकारी आपल्या गाडीतून जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ते थांबले आणि हल्लेखोरांना प्रतिकार केला. यात एक इंग्रज अधिकारी जखमीं झाला. परंतु हल्लेखोरांपैकी दोघाना पकडण्यात यश आले. मुमताज वाचली; मात्र बावला मरण पावला. यथावकाश उर्वरित सात आरोपीना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सेशन कोर्टात खटला चालू झाला.  
   
आरोपीच्या बाजूने बँ. जीनासारखे विद्वान होते. परंतु इंग्रज अधिकाऱ्यांच्या रोखठोक साक्षींमुळे सात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यातील तिघांना फाशी तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे आरोपींनी प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले. सायमन कमिशनचे सर जॉन सायमन हे तिथे आरोपींचे वकील होते. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही; आरोपींच्या शिक्षा कायम राहिल्या.

तुकोजीरावाना दोषी ठरविण्यासाठी एक काल्पनिक कथा निर्माण करण्यात आली आहे. टी पुढीलप्रमाणे, मुमताज ही तुकोजीरावांची रखेल होती. तिला त्यांच्यापासून एक मुलगीही झाली होती. परंतु तिला नर्सकरवी मारण्यात आले. मुलीच्या मृत्यूने दुखी झालेल्या मुमताजचे मन इंदूरमध्ये रमत नव्हते. त्यामुळे ती मुंबईला पळून आली. तिथे तिची ओळख अब्दुल कादर बावला याच्याबरोबर झाली आणि टी त्याच्यासोबत राहू लागली. इंदूरच्या महालातून पळून येवून मुमताजने इंदूरचा अपमान केला आहे, अशी तुकोजीराव आणि दरबाराची धारणा झाली. मग अपमानाचा सूड घेण्यासाठी एकतर मुमताजला परत इंदूरला आणणे किंवा संपवणे हा तुकोजीरावांचा हेतू होता. त्यातूनच पुढे बावलाचा खून झाला. ही कथा कोणी निर्माण केली ते ठवून नाही. मात्र या निराधार कथेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला. या कथेला कोणताही लिखित पुरावा नाही. केवळ ऐकीव गोष्टींचा आधार घेवून यावर नंतरच्या काळात अनेकांनी लिहिले.

ही झाली बावला खून खटल्याची थोडक्यात कहाणी. 

या खटल्यात तुकोजीरावाना कोर्टाकडून एकदाही बोलावणे आले नाही. परंतु काही व्यक्ती मात्र तुकोजीरावांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू पाहत होत्या. समाजातील पुढारलेल्या प्रतिगामी शक्तींना होळकर, गायकवाड, शाहू महाराज यांचे कधीही बरे वाटत नसे. या सास्थानिकांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे यांच्यावर अनेकांचा राग होता. बहुजन समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा द्वेष करणे, त्यांची बदनामी करणे यासारखी षडयंत्रे नेहमी राबविली जातात. ज्याप्रमाणे शाहू महाराजांचे सामाजिक कार्य दडपण्यासाठी घसरगुंडीच्या खोट्या कथा निर्माण केल्या, त्यांचा प्रचार-प्रसार केला, त्याचप्रमाणे तुकोजीरावांचे सामाजिक कार्य झाकोळून टाकण्यासाठी त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात कुणालाही तुकोजीरावाना या प्रकरणात थेटपणे गोवता आले नाही. तरी आपल्या हातातील लेखणीचा वापर करून अनेक प्रतिगामी लोकांनी समाजात तुकोजीरावांची एक आरोपी म्हणून प्रतिमा निर्माण केली. अनेक पुढारलेली ब्राम्हणी वर्तमानपत्रे तुकोजीरावांच्या विरोधात गरळ ओकत होती. एकही पुरावा नसताना केवळ तर्कबुद्धीने तुकोजीरावांची आरोपी म्हणून मांडणी केली जात होती. आरोपींच्या बाजूने जीना आणि सायमन यांच्यासारखे महागडे वकील उभे राहिले म्हणजे त्यांना तुकोजीरावांची आर्थिक मदत असणार असे समाज पसरवले गेले. त्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत. होळकरद्वेषाने पछाडलेल्या या माणसांनी तुकोजीरावांची यथेच्छ बदनामी केली. परंतु त्याचवेळी तुकोजीरावांच्या समर्थनार्थ देशभरातून फारसे कोणी उभे राहिले नाही. एकतर जनमत तयार करण्याचे साधन ब्राम्हणांच्या हातात. त्यांच्या वर्तमानपत्रांनी आग ओकायला चालू केली की आमची लढणारी लहान-मोठी पत्रेही थंडगार पडत. त्यामुळे तुकोजीरावांची बाजू नीटपणे समाजासमोर मांडली गेली नाही.

परंतु याला प्रबोधनकार ठाकरे मात्र अपवाद होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे संस्कार झालेल्या प्रबोधनकारांनी ‘प्रबोधन’मधून बावला खून खटल्यासंदर्भात सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याबाबतीत जनजागृती करण्यासाठी पाच-सहा पुस्तिका प्रसिद्ध केल्या. ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला आहे. प्रबोधनकारांच्या लिखाणावरून तुकोजीराव होळकर यांना बावला खून खटल्यात निष्कारण गोवण्याचा प्रयत्न चालू होता हे स्पष्ट दिसते. प्रबोधनकार ठाकरे यांचे "माझी जीवनगाथा" या पुस्तकातील बावला खून खटल्यासंदर्भातील उतारे पहा.वरील इमेज निट दिसत नसेल तर त्यावर क्लिक करावे.
‘नवाकाळ’ मध्ये खाडिलकरांनी ‘मुमताज खटल्याचा निकाल’ (२६ मे १९२५) आणि ‘होळकर गादी सोडणार’ (२६ फेब्रु. १९२६) असे दोन अग्रलेख लिहिले. ‘मुमताज खटल्याचा निकाल’ या अग्रलेखात खाडिलकर लिहितात, इंदूर चांगले शिकले सावरलेले आहे. इंग्रजी रिती-रिवाजात तरबेज आहे. चार-दोन तास गप्पागोष्टी करण्याची वेळ आली असता सुसंस्कृत मनाशी आपण बोलत आहोत असा भास झाल्यावाचून रहात नाही. तेच खाडिलकर पुढे लिहितात, पाहिजे त्याला पाहिजे तसे आपण राबवू शकतो आणि पैशाच्या व राजसत्तेच्या कारवाईला सीमा नाही, अशी धुंदी या सुसंस्कृत मनावर का चढावी? म्हणजे खाडिलकर तुकोजीरावाना एकीकडे सुसंस्कृतही म्हणतात आणि असंस्कृतही ठरवितात. पण त्यांचे सुसंस्कृत ठरवणे हे अनुभवाधारित आहे आणि असंस्कृत ठरविणे मात्र तर्काधिष्ठित आहे हे इथे लक्षात घ्यायला हवे. 

तुकोजीराव  होळकर यांच्या इतिहासाचे निपक्ष मूल्यमापन झाले पाहिजे. इतिहास संशोधकांनी या गोष्टीकडे लक्ष देवून यासंदर्भात संशोधन करावे.


                                          संदर्भ-
·                                                                                                                                                                                                                                                             होळकरांचा इतिहास- मधुसूदनराव होळकर.
·                                                                                                                                                                                                                                                             विश्वाचा यशवंत नायक- १३ ऑगस्ट १९९५
·                                                                                                                                                                                                                                                             माझी जीवनगाथा- प्रबोधनकार ठाकरे

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes