शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२

संभाजी ब्रिगेडने विचार करावा

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेडची बदनामी करणे नाही हे लेख संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल. मी स्वतः संभाजी ब्रिगेडबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. त्यांच्या कार्याने विचाराने प्रभावित होवून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रश्न केवळ ब्रिगेडचा नाही. कोणतीही बहुजनवादी, पुरोगामी संघटना या माझ्यासाठी आदरणीय आहेत. वेळोवेळी अशा सर्व संघटनांमध्ये मी काम करीत आलो आहे. परंतु ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे ते स्वतःविरुद्ध एक अवाक्षरही खपवून घेवू शकत नाहीत. तुकोबा म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. हे निंदक दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी त्याची निंदा करणे. ही निंदा द्वेषभावनेतून केलेली असते. आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या चुका (अर्थातच आपल्या दृष्टीने) दाखवणे. याचा हेतू असा असतो की समोरची व्यक्ती, संघटना किंवा जो कुणी आहे, त्याने गांभीर्याने विचार करावा. पण विचार करण्यापेक्षा निरर्थक बडबड करणे सहज शक्य असते. ब्रिगेडने विचार करावा हाच माझा हेतू आहे.


वरील लेखात मी कुठेही वाघ्या कुत्रा धनगरांची अस्मिता आहे असे लिहिले नाही. किंबहुना हा लेख धनगर समाजाची बाजू घेवूनही लिहिलेला नाही. बहुजन समाजातील दोन घटकांमध्ये वाद निर्माण होण्यासारखी परिस्थितीती किती संयमाने हाताळायला पाहिजे हेच लोकांना कळत नाही.

वाघ्याला हटवण्याची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादाला कशी घातक आहे असा सवाल अनेकांना पडला आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे ध्येय काय आहे ? बहुजन समाजात एकी घडवून आणणे, त्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी प्रयत्न करणे हेच ना ? मग वाघ्याच्या मुद्द्यावरून बहुजन समाजात भांडणे लागणार असतील तर तो मुद्दा चळवळीला घातक नाही का ? वाघ्याचा पुतळा असा आततायी कृती करून आज काढण्यापेक्षा लोकशाही मार्गाने काढणे उचित झाले नसते का ? शासनाने समिती नेमून याप्रकरणी अभ्यास, पुरावे देवून सर्वसंमतीने वाघ्याचा पुतळा काढला असता तर एवढे वादंग माजले नसते. 

संभाजी ब्रिगेडबद्दल मी नोंदवलेले आक्षेप यापूर्वी अनेकांनी मांडले आहेत. तेव्हाही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. आणि आत्ताही देत नाहीत. हे आक्षेप महत्वाचे आहेत त्यामुळे निदान त्यांची समाधानकारक उत्तरे देता आली पाहिजेत. ती देत तर नाहीत, उलट टाळाटाळ करतात असा माझा अनुभव आहे. रेखाताई खेडेकर भाजपमध्ये असतात, हा आक्षेप आहे. त्यांच्या भाजपमध्ये असण्याला आक्षेप नाही तर रेखाताई भाजपमध्ये असताना ब्रिगेड भाजपविरुद्ध टीका करते आणि इतर लोक भाजपला पाठींबा द्यायला लागले की त्यांच्यावर भटांचा दलाल असा आरोप करण्यात येतो. म्हणजे मुख्य आक्षेप आहे तो ब्रिगेड रेखाताई (म्हणजे ब्रिगेड ची माणसे) आणि इतर यात फरक करतात, त्यांना समान न्याय लावत नाहीत हा. मग यावर विचार नको का करायला. 

कोणतीही व्यक्ती किंवा चळवळ सदा काळ योग्य असू शकत नाही. व्यक्ती आहे म्हंटल्यावर ती चुकणारच. संघटनाही व्यक्तीच चालवत असतात. त्यामुळे त्यांच्याही चुका होवू शकतात. मग अशा चुका कुणी लक्षात आणून दिल्या तर विचार करायला पाहिजे. एकतर आपले कसे बरोबर आहे हे तरी पटवून द्यावे किंवा चूक होत असेल तर ती स्वीकारून दुरुस्ती तरी करावी. आणि मला वाटते जी चळवळ होणाऱ्या चुकांपासून बोध घेत पुढे जाईल तीच समाजात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणेल.

2 टिप्पणी(ण्या):

chaitanya ahire म्हणाले...

दादा आपन संभाजी ब्रिगेड बद्दल लिहील आहे
ठिक आहे
संभाजी ब्रिगेड पुरंदरे ला विरोध करत
का ?
तर त्यांनी आई जिजाऊची बदनामी केली
ब्राम्हणांचा विरोध करते का? तर त्यांनी इतीहास त्यांना वाटेल तसा लिहीला आहे
मग काय गप्प बसुन मुग गिळायचे काय ?


chaitanya ahire म्हणाले...

दादा आपन संभाजी ब्रिगेड बद्दल लिहील आहे
ठिक आहे
संभाजी ब्रिगेड पुरंदरे ला विरोध करत
का ?
तर त्यांनी आई जिजाऊची बदनामी केली
ब्राम्हणांचा विरोध करते का? तर त्यांनी इतीहास त्यांना वाटेल तसा लिहीला आहे
मग काय गप्प बसुन मुग गिळायचे काय ?


टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes