गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१२

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक


अखेर रायगडवरील बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा पुतळा काढण्याला विरोध होता. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या देणगीतून वाघ्याचा पुतळा रायगडावर उभा करण्यात आला. (त्यासाठी होळकरांच्या कुत्र्याची दंतकथाही निर्माण करण्यात आली.) 

संभाजी ब्रिगेडच्या या मागणीविरुद्ध धनगर समाजाच्या संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. चर्चा, वाद-प्रतिवाद असे प्रकार सातत्याने चालू होते. त्यामुळे दोन समाजातील ऐक्य, सलोखा धोक्यात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी (२०११) ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा काढणार अशी घोषणा केली. त्याला महादेव जानकर आणि धनगर समाजाच्या संघटनांनी विरोध केल्याने हे प्रकरण जरा लांबणीवर पडले. त्यानंतर एका वर्षांनी (एप्रिल-मे २०१२) संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेवून ६ जून (शिवराज्याभिषेक) पूर्वी सरकारने वाघ्याचा पुतळा हटवावा; अन्यथा आम्ही तो हटवू अशी भूमिका घेतली. त्यावेळीही जानकर व धनगर समाजाने ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला. वाघ्याच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी जानकर व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाला निवेदने दिली. याप्रकरणी जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा. संजय सोनवणी आणि प्रा. श्रावण देवरे या अभ्यासकांनी वेळोवेळी ब्रिगेडच्या या भूमिकेस विरोध केला. कुत्रा हा अपमानास्पद प्राणी आहे ही भूमिका धनगर समाज व त्यांच्या समर्थकांना मान्य नव्हती. (वाघ्याप्रश्नी धनगरसमाजाची भूमिका सविस्तर वाचा.) कुत्र्याऐवजी घोड्याचा पुतळा असता तर काढला असता का? असा थेट सवाल प्रा. श्रावण देवरे यांनी विचारला.
 
प्रश्न पुतळ्याचा नाही, तो काढण्याच्या पद्धतीचा आहे
फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळ जर यशस्वी करायची असेल तर बहुजन समाजातील सर्व जाती एकत्र यायला हव्यात. बहुजन समाजात वाद निर्माण होतील असे प्रश्न अतिशय संयमाने आणि कौशल्याने हाताळले पाहिजेत. सर्व जाती-जमातींना विश्वासात घेवून वाटचाल केली पाहिजे. परंतु ब्रिगेडने वाघ्याच्या प्रश्नी घेतलेली भूमिका ही मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करणारी होती. प्रश्न केवळ वाघ्याचा नाही. आततायी भूमिका घेवून, कुणालाही विश्वासात न घेता आपलेच घोडे पुढे दामटायचे, बळाच्या जोरावर इतरांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करायचा या धोरणांमुळे दोन समाजात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. (फेसबुकवर याचा प्रत्यय आलाच आहे.) ही कटुता निर्माण होवू न देण्याची जबाबदारी पुरोगामी कार्यकर्त्यांवर राहील. वाघ्याप्रश्नी इतिहासकारांची समिती स्थापन करण्याची मागणी सर्वानी करावयास हवी होती. समिती स्थापन केल्यानंतर अभ्यास, चर्चा, वाद-प्रतिवाद होवून जे सत्य समोर येईल ते सर्वानी स्वीकारण्यास हरकत नव्हती. परंतु अशा लोकशाही मार्गाने जाण्याऐवजी ब्रिगेडने ठोकशाही भूमिका घेतली हे बहुजन समाजाचे दुर्दैव. दादोजी कोंडदेव प्रकरणी समिती नेमून समितीचा निर्णय आल्यानंतर कोंडदेव यांचा पुतळा काढण्यात आला. मग वाघ्याप्रश्नी इतकी गडबड का केली हे एक कोडे आहे.

वाघ्याप्रकरणी मराठा-धनगर वादाचे कारण नरके-सोनवणी ?
वाघ्याच्या मुद्द्यावरून मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद लावण्याचे काम नरके आणि सोनवणी करत आहेत असा आरोप ब्रिगेडकडून सातत्याने होत असतो. परंतु संभाजी ब्रिगेड आणि नरके-सोनवणी यांचा वाद दादोजी कोंडदेव पुतळा काढल्यानंतरचा आहे. ब्रिगेडचा छुपा मराठा अजेंडा हे या वादामागे मुख्य कारण होते. परंतु रायगडवरील धनगर समाजाचा पूर्वीपासून वाघ्याचा पुतळा हटवण्याला विरोध होता. त्यामुळे नरके-सोनवणी यांनी हा वाद भडकावला हा आरोप निराधार आहे. नरके-सोनवणी हे मराठेतर म्हणून त्यांच्यावर असा आरोप होत असेल. मग मराठा समाजातील काही पुरोगामी विचारवंत (त्यांची नावे उघड करून त्यांना वादात गुंतवण्याची माझी इच्छा नाही.) ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध करत होते त्यांच्याबाबत असेच म्हणता येईल काय ?

संभाजी ब्रिगेडवरील आक्षेप  
संभाजी ब्रिगेडच्या काही भूमिका आणि धोरणांमुळे मराठेतर बहुजन समाज आणि ब्रिगेडमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल ब्रिगेडने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. उलट Atrocity कायद्याचा गैरवापर होतोय म्हणून ब्रिगेडने वेळोवेळी आवाज उठवला. मराठा महासंघ, छावा, शिवसंग्राम या त्यांच्या सहकारी संघटनांनी सवर्ण-दलित वादात नेहमी सवर्णांची बाजू घेवून दलितांवर आणखी अन्याय केला. Atrocity च्या कायद्यात सुधारणा व्हावी हा ब्रिगेडचा मुद्दा वरवर पाहता संयुक्तिक वाटत असला तरी तो योग्य नाही. गावोगाव दलित समाजावर सवर्णांकडून होणार्या अत्याचाराकडे ब्रिगेडने दुर्लक्ष केले. 

मराठा आरक्षणाची मागणी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी लावून धरली आहे. मराठा समाजाला शैक्षणिक प्रतिनिधित्व पुरेसे नाही हे एकवेळ खरे मानले तरी चालेल, परंतु त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मात्र प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक आरक्षण देण्यास हरकत नसावी; मात्र राजकीय आरक्षण मराठा समाजाला देणे योग्य होणार नाही. त्यांच्या आरक्षण मागणीतही एकवाक्यता नसल्याने त्यांच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काहीजण म्हणतात मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, काही म्हणतात मूळ आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना लोकसंखेच्या प्रमाणात (हे प्रमाण २५ % पासून ४० % पर्यंत असते,) आरक्षण द्या. काहीजण म्हणतात हे आरक्षणच बंद करून टाका. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी एकीकडे आणि दुसरीकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या खटपटी. पण यामुळे मूळच्या ओबीसींवर अन्याय होतोय याकडे ब्रिगेडचे लक्ष नाही. मराठा समाजातील अनेकांनी निवडणुकीसाठी मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविले आणि सत्ता उपभोगली. म्हणजे ओपनमधून मराठे आणि ओबीसी कोट्यामधूनही मराठे अशी परिस्थिती अनेक ठिकाणी होती. जनजागृती करून ओबीसींच्या वाट्याचा घास न हिसकावण्यासाठी ब्रिगेडने प्रयत्न करायला हवा होता. परंतु तसे झाले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाज यांच्यावर सातत्याने जहरी टीका करणाऱ्या डॉ. शालिनीताई पाटील यांना मराठा सेवा संघाचा ‘मराठा भूषण’ पुरस्कार दिला गेला तेव्हा सर्वांचा आश्चर्य वाटले. परंतु हा पुरस्कार ताईना ताराराणी यांच्यावरील संशोधनासाठी दिला असल्याचे ब्रिगेडकडून सांगण्यात येते. जेव्हा ताई आरक्षण, डॉ. बाबासाहेब आणि दलित समाज यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर द्वेष निर्माण करत फिरत होत्या, तेव्हा ब्रिगेडने त्यांना विरोध केला नाही. याला ब्रिगेडचे काही लोक अपवाद आहेत. पण ब्रिगेडची आक्रमकता त्यावेळी कुठेही दिसली नाही. याला एक महत्वाचे कारण सांगितले जाते ते ताई मराठा म्हणजे बहुजन आहेत. तेव्हा त्यांना विरोध करून आपले मुख्य लक्ष ब्राम्हण आहेत, त्याकडे दुर्लक्ष करायला नको. ताई आणि बहुजन समाजात भांडणे लावून चळवळ संपवण्याचा ब्राम्हणांचा प्रयत्न आहे अशी थिअरी ब्रिगेडकडून मांडण्यात आली. उलट ब्रिगेडच्या सहकारी संघटनांनी मात्र शालीनिताईना व्यासपीठ निर्माण करून दिले.  म्हणजे चुकीच्या गोष्टीना उघड पाठींबा नाही पण विरोधही नाही अशी ब्रिगेडची अवस्था झाली होती.

दादोजी कोंडदेव वादात ब्रिगेडचे एक सहकारी मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दादोजी कोंडदेव मराठा होते असे म्हणून ब्रिगेडलाच धक्का दिला. तेव्हा त्यांच्या विरोधात (अर्थातच सभ्य भाषेत) मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केले होते. वीस-पंचवीस मिनिटात पंधरा-वीस प्रतिक्रिया आल्या. त्या बहुतांशी शशिकांत पवार यांच्या विरोधात होत्या. हे पाहून ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून, फेसबुकवर मेसेज करून पवार यांचेविरोधातील स्टेटस डिलीट करावयास लावले. कारण का तर पवार हे बहुजन आहेत. त्यांना विरोध करणे आपले काम नाही. आपले लक्ष ब्राम्हण असले पाहिजेत. मग जर शालिनीताई आणि पवार यांना बहुजन (की मराठा ?) म्हणून सॉफ्ट कॉर्नर मिळत असेल तर नरके-सोनवणी-देवरे यांनाच सातत्याने का टार्गेट केले जाते ? 

ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नेहमी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिताची भूमिका घेतली आहे. ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. आमची हरकत नाही, कुणाचीही नसावी. पण त्यामुळे राष्ट्रवादीचा मराठा अजेंडा राबवण्याच्या नादात मराठेतर समाजाला दुखावणाऱ्या भूमिका ब्रिगेड वारंवार राबविते. राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते आदरणीय शरद पवार, अजितदादा यांच्याविरोधात लिहायचे, बोलायचे नाही. लिहिले की तुम्ही भटांचे दलाल. परंतु त्याच वेळी भुजबळ हे राष्ट्रवादीचे असूनही त्यांना मात्र झोडपून काढायचे. हे सर्व इतर कोणत्याही मराठा संघटनांकडून झाले असते तरी आमची हरकत नव्हती. कारण इतर संघटना फुले-शाहू-आंबेडकरवादाचा प्रत्यक्ष पुरस्कार करत नाहीत. परंतु फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर आपली संघटना उभी आहे असे म्हणणाऱ्या ब्रिगेडने अशी दुटप्पी भूमिका घ्यावी याचेच आश्चर्य वाटते. ब्रिगेडसोबत असणारे लोक प्रामाणिक आणि पुरोगामी पण ब्रिगेडशी थोडे मतभेद झाले की ते आरएसएस आणि भटांचे दलाल ठरतात. (हा लेख वाचल्यानंतर मलाही आरएसएसचा एजंट ठरवतील यात शंका नाही.) अनेक मराठेतर विचारवंताना ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः खालच्या पातळीवर जावून शिवीगाळ केली आहे. हे फुले-शाहू-आंबेडकरवादाचे लक्षण निश्चितच नाही. 

ब्रिगेडचा हिंदुत्ववादी पक्ष-संघटना यांना खूप विरोध आहे. त्यामुळे पुरोगामी असणार्यांपैकी कुणी हिंदुत्ववादाच्या छत्राखाली गेला तर ब्रिगेडचा तिळपापड होतो. आठवले सेनेसोबत गेले तर त्यांनी आंबेडकरांच्या विचारांना काळीमा फसल्याची प्रतिक्रिया, जानकर यांनी मुंडेना पाठींबा दिला तर ते भटांचे दलाल. मग मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी आदरणीय रेखाताई खेडेकर या भाजपच्या आमदार कशा या प्रश्नाचे उत्तर ब्रिगेडकडून खुबीने टाळले जाते. त्यांना स्त्री असूनही खेडेकर साहेबांनी पक्ष निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे असे सांगण्यात येते. मान्य आहे. मग बाकीच्या लोकांना असे स्वातंत्र्य नाही का ?

ज्या ब्रिगेडला दादोजी कोंडदेव प्रकरणी अठरा-पगड जातींच्या सर्व संघटनांनी मदत केली, त्याच ब्रिगेडने इतर समाजांना विश्वासात न घेता वाघ्याला हटवण्याची कृती केली हा माझा आक्षेप आहे. वाघ्याचा पुतळा आज काढण्याऐवजी लोकशाही मार्गाने वर्षभराने जरी काढला असता तरी काय तोटा झाला नसता. परंतु बहुजन समाजातील ऐक्य धोक्यात न येण्याचा फायदा मात्र झाला असता. आमचे ऐकले तर लोकशाही नाहीतर ठोकशाही या मार्गाने चळवळ पुढे जाणार नाही. ती पुढे न्यायची की मागे याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. आपल्यावर होणाऱ्या टीका, आरोप गांभीर्याने घेवून त्याचा सांगोपांग विचार करायचा की आरोप, सुचना करणाऱ्यांची मुस्कटदाबी करायची हे ब्रिगेडने ठरविले पाहिजे. समाजातील ब्राम्हणांचे वर्चस्व जावून त्याच जागी मराठा येणार असतील तर तो फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव आहे. 

वाघ्याचा पुतळा तर काढला. अजून काही दिवस याचे पडसाद समाजात उमटत राहतील. प्रशासन तो पुतळा परत रायगडवर उभा करेल किंवा नाही. चार दिवस चर्चा होवून हा प्रश्न लोक विसरूनही जातील. परंतु अशा प्रकारच्या आततायी कृती बहुजन समाजाला जोडणार की तोडणार  हे येणारा काळच ठरवेल.

11 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes