शनिवार, मार्च १७, २०१२

'आंबेडकर' समजून घ्या!

डॉ. भालचंद्र मुणगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.

अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;
जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांची समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्ट्या सखोल मीमांसा करून त्यांच्यामुळे केवळ अस्पृश्यांचेच नव्हे, तर सबंध भारतीय समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले आहे, हे प्रभावीपणे सांगणारे एक दष्टे विचारवंत; 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहून बुद्धांच्या समग्र तत्त्वज्ञानावर भाष्य करणारा आणि त्या तत्त्वज्ञानाचा प्रचलित मानवी समाजाला अत्यावश्यक असलेला संदर्भ सांगणारा एक तत्त्वज्ञ; राजकीय अर्थशास्त्र आणि प्रशासनाचे नावाजलेले प्राध्यापक; विधी महाविद्यालयाचे प्राचार्य; मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे एक निष्णात बॅरिस्टर; कोकणातील अन्यायकारक खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी.

१९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री. भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचे राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री! (अर्थात हिंदू कोड बिल हे राजीनाम्याचे एक प्रमुख कारण होते.) हे वर्णन आणखीही वाढविता येईल.

डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू मी थोड्याशा विस्ताराने इथे अशासाठी सांगितले की भारतातील एकही समाजघटक त्यांच्या ऋणातून मुक्त नाही. तरीही देशभर आणि सबंध जगात पसरलेले त्यांचे अनुयायी सोडले, तर एकूण भारतीय समाजाने त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची दखल घेतलेली दिसत नाही. अस्पृश्यांचे, फार तर दलितांचे पुढारी, आणि वस्तुस्थिती नाकारता येत नाही म्हणून 'भारतीय घटनेचे शिल्पकार' इथपर्यंतच त्यांची ओळख आहे. अनेकांना तर राखीव जागांच्या धोरणांचा आग्रह धरून त्यांनी गुणवत्तेची आणि कार्यक्षमतेची वाट लावली, असेच वाटते.

शेकडो वर्षांच्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या संकुचित आणि खंडित मनोवृत्तीचेच हे निदर्शक आहे. खरे पाहता, डॉ. आंबेडकर यांनी या देशाच्या जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचा अगदी मुळाशी जाऊन विचार केलेला आहे. इतकेच नव्हे, तर अशा प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, यासबंधी वेळोवेळी उपाययोजनाही सांगितली आहे. आर्थिक धोरण, संसदीय लोकशाही, परराष्ट्रीय आणि संरक्षणधोरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षणप्रणाली व विद्यापीठांची पुनर्रचना, पाणी-धरणे-वीजविषयक धोरण, नद्यांच्या पाणीवाटपावरून शेजारच्या राज्यातील तंटे... देशाचा अगदी एकही प्रश्न त्यांच्या नजरेतून सुटला नाही.

काळाच्या ओघात या उपाययोजनेचा पुनविर्चार वा तिची पुर्नमांडणी होणे शक्य आहे. उदा. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा कार्यक्रम सांगितला. समाजवादी क्रांती झाल्यानंतर ज्या ज्या देशांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण केले, तिथे तो प्रयोग यशस्वी झाला नाही. मात्र, हे जरी खरे असले, तरी भारतामध्ये केवळ २०-२५ टक्के मोठ्या व मध्यम शेतकऱ्यांच्या हातात ७० टक्क्यांहून अधिक शेतजमीन असल्यामुळे मुबलक अन्नधान्य पिकवूनही देशातील किमान एक-चतुर्थांश लोक दारिद्यरेषेखाली राहतात, ही गोष्ट आपल्याला नजरेआड करता येत नाही.

देशाच्या प्रश्नांचा इतका समग्र, विस्तृत आणि सखोल विचार त्यांनी का केला असेल? आणि तोही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागली तरीही? याचे एकच उत्तर आहे. डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. त्यांची राष्ट्रनिष्ठा शंभर नंबरी सोन्यासारखी होती. दोन-अडीच हजार वर्षांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध अगदी एकाकीपणे संघर्ष करणे, ही भारतीय इतिहासाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी होती. खरे म्हणजे, ती यशस्वीपणे निभावून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्यच त्यांच्या हातून घडले आहे.

हा आशय प्रत्यक्ष देण्याची संधी जेव्हा त्यांना घटनासमितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदामुळे मिळाली, तेव्हाही त्यांनी त्या संधीचे सोने केले. पर्वत, नद्या, डोंगर, फुले आणि फळे ही राष्ट्राच्या अस्मितेची प्रतिके आहेत, हे खरे. परंतु मुळात राष्ट्र ही संकल्पनाच माणसाने निर्माण केली. म्हणून राष्ट्राचा खरा नायक माणूस आणि राष्ट्र म्हणजे माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. आज भारतात (आणि जगात इतरत्रही) खऱ्या अर्थाने तसे ते नाहीत, ही त्यांची खंत होती. ते तसे का नाहीत आणि ते कसे निर्माण करता येतील, हे कळण्यासाठी या देशाने आंबेडकर समजून घेणे आवश्यक आहे.


आभार
प्रशांत म. गायकवाड 


(सदर लेख इथून संकलित केला आहे.) 

14 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes