बुधवार, फेब्रुवारी २२, २०१२

स्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष का ?

सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण  म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-

आपल्या म्हणण्यानुसार मी ब्राह्मणद्वेष करतो. मोघम आरोप करण्यापेक्षा मी कधी ब्राम्हणांचा द्वेष केला ते सांगितले असते तर बरे झाले असते. तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही चिकित्सेला ब्राह्मणद्वेष समजता. सगळे ब्राम्हण वाईट असतात अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. किंवा ब्राम्हण आहे म्हणून एखाद्याला झोडपायचे असेही मी करत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल लिहिताना पारंपारिक, ऐकीव, खोट्या, मतलबी बाजूला न भुलता नवीन पुरोगामी भूमिका घेणे मला योग्य वाटते. त्यात एखाद्याचे हितसंबंध गुंतलेले असले तर अशा व्यक्तींना ही स्वतंत्र आणि पुरोगामी भूमिका पटत नाही. मग ते लगेच बोंब ठोकतात. जातीवाद आणि ब्राम्हणद्वेषाचा आरोप करतात.

शिवरायांच्या इतिहासाबद्दल लिहिताना शिवराय हे गोरगरीब प्रजेचे रक्षण करते होते असे सांगितले तर तुम्हाला तो ब्राह्मणद्वेष वाटतो. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शिवराय हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजे आम्ही संपूर्ण समाजाचे शिवराय मांडतो तर तुम्ही राजांना एका जातीचे रक्षणकर्ते म्हणून मांडता, यात किती फरक आहे. राजे सरावंचे होते. सर्व प्रजा त्यांना समान होती. ते सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असताना तुम्ही मात्र त्यांना ब्राम्हणांचे पालनकर्ते म्हणून सांगता तेव्हाच तुमच्या मनातील गुप्त हेतू स्पष्ट होतात. काहीही करून कर्तुत्ववान व्यक्तीला ब्राम्हणी व्यवस्थेपुढे बांधून टाकायचे हे आपले धोरण असते. त्यातून जर अशा व्यक्तींना मुक्त करून त्यांचे खरे चरित्र समाजासमोर मांडायचे म्हटले की आपली कोल्हेकुई सुरु होते.

शिवराय आणि एकूणच सर्व महापुरुषांचा इतिहास बऱ्याच प्रमाणात खोटा लिहिला गेला. याला बहुतांशी ब्राम्हण लेखक जबाबदार आहेत, कारण लेखणी त्यांच्याच हातात होती. आता नव्याने इतिहासाची पुनर्मांडणी करायची असेल तर पूर्वीच्या लेखकांनी काय चुका केल्या ते दाखवणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे खरा इतिहास मांडणेही आवश्यक आहे. त्यामुळेच रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु म्हणून आजपर्यंत शिकवले जात असताना नवीन संशोधनानुसार या दोघांचाही शिवाजी राजांशी गुरु-शिष्याचा संबंध नाही हे उघड झाले आहे. मग या दोघांना राजांच्या गुरुपदी बसविण्याचा खटाटोप इतिहासकारांनी का केला याचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. बहुजन समाजात कर्तुत्ववान माणूस जन्मू शकत नाही, आणि जर असा माणूस जन्माला आलाच आणि कर्तुत्ववान झालाच तर त्याचा गुरु/पिता ब्राम्हण असला पाहिजे. कारण ब्राम्हण मार्गदर्शक असल्याशिवाय बहुजन समाजातील व्यक्ती कर्तुत्व गाजवू शकत नाही हा ब्राम्हणी अहंकार/मानसिकता धोकादायक आहे. आमचा विरोध या मानसिकतेला आहे. चुका करणारे बहुतांशी ब्राम्हण होते त्यामुळे त्यांना दोष देणे म्हणजे ब्राह्मणद्वेष करणे नव्हे हे समजून घ्या. प्रामाणिक ब्राम्हण लोकांना आमचा विरोध नाही. उलट त्यांच्या नैतिक कार्यात आम्ही त्यांना सहकार्याच करू. मात्र निष्कारण खोटा इतिहास लिहिणारे, बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवणारे जे लोक असतील त्यांना आम्ही नेहमीच विरोध करू, मग त्याची जात/धर्म कोणताही असो. तुमच्या दुर्दैवाने अशा लोकांपैकी बहुतेक लोक ब्राम्हण असल्याने आम्ही नेहमीच ब्राम्हणांचा द्वेष करतो असे आपणाला वाटते पण ते खरे नाही.

मला वाटते आपण स्वतः आत्मपरीक्षण करावे. प्राचीन काळी ब्राम्हणांनी केलेल्या चुकांचे खापर आम्ही आताच्या ब्राम्हणांवर फोडणार नाही कारण पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राम्हणांना देणे अनैतिक आहे. परंतु आताच्या ब्राम्हणांनी स्वतः आत्मपरीक्षण करून आपण किती प्रामाणिक आहोत ते पहावे. बहुजन समाज, स्त्रिया यांच्याबद्दल आपली काय मते आहेत ती माणुसकीच्या पातळीवर उतरणारी आहेत काय हेही तपासावे. आणि स्वताच्या दोषावर पांघरून घालण्यापेक्षा तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.


(सदर प्रतिक्रिया शिवरायांचा आठवावा विचार... या लेखावर दिली होती.)

56 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes