शनिवार, फेब्रुवारी ११, २०१२

बुद्ध धम्म , वादविवाद: काल आज आणि उद्या

प्राचीन काळी बौद्ध भिक्खुंमध्ये धम्मा विषयी वादविवाद निर्माण होत असत , काही तत्व, आचार विचार विषयी मतभिन्नता निर्माण होत असे तेव्हा ते वाद मिटविण्यासाठी धम्म संगीतीचे आयोजन करण्यात येत असे. या संगीति अनेक महिने, वर्ष चालत असत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर चार महिन्या नंतर प्रथम धम्म संगीतीचे आयोजन शिशुनाग वंशातील राजा 'अजातशत्रू' यांनी राजगृह येथे केले होते. स्थविर उपाली आणि बुद्धांचा आवडता शिष्य आनंद यांची या संगीतीसाठी प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. ही संगीति सात महिने चालली. मानवाच्या कल्याणासाठी भदंत आनंद यांच्या मार्गदर्शना खाली बुद्ध तत्व प्रणाली तयार करण्यात आली. द्वितीय (दुसरी) धम्म संगीति बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर शंभर वर्षांनी संपन्न झाली. 'महावंश' व 'विनयपिटक' या ग्रंथान्वये ही संगीति शिशुनाग घराण्यातील राजा 'कालाशोक' यांच्या राजवटीत वैशाली येथे संपन्न झाली. किनार नसलेले आसन ठेवणे , सोने चांदी ग्रहण करणे , झिंग न येणारे मद्द पिणे या सारख्या गोष्टी भिक्खुनी कराव्या कि करू नयेत? अशा दहा मुद्द्यावरून भिक्खुमध्ये वाद निर्माण झाला होता. वैशाली येथील वाळूकाराम विहारात रेवत-स्थविर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या संगीति मध्ये वादविवाद निर्माण झालेल्या दहा ही गोष्टी नाकारण्यात आल्या. व भिक्खूनी त्याचे आचरण करू नये असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

तृतीय धम्म संगीति बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर २३६ वर्षांनी म्हणजे सम्राट अशोकाच्या राज्यभिषाका नंतर १८ वर्षांनी पटलीपुत्र येथे अशोकाराम विहारात 'मोगलीपुत्त तिस्स' यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली. काही भिक्खू आणि भिक्खुणी यांच्या मुळे संघात दुफळी पडली होती. त्या मध्ये पांढरी कौपिन वापरणारे विरुद्ध केशरी कौपिन वापरणारे असे दोन तट पडले होते. विभज्ज्वादी व अविभज्ज्वादी यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. तर 'दिपवंस' मध्ये 'पातीमोक्कविधी' म्हणजेच मुक्ती मिळविण्यासाठी भिक्खुणी घ्यावयाची प्रायश्चित मालिका परत सुरु करावी असे कारण दिले आहे. बौद्ध धम्माचे शुद्धीकरण करणे हा या धम्म संगीतीचा उद्देश होता. या संगीति नंतर हजारो भिक्खुणा संघातून हाकलून देवून संघ शुद्ध करण्यात आला.

चौथी धम्म संगीति इ.स. च्या पहिल्या शतकात कनिष्काच्या राजवटीत घेण्यात आली. या धम्म संगीतीत महायान आणि हिनयान असे दोन तट धम्मात पडले. महायानानी बुद्धांची मूर्ती अस्तित्वात आणली . आजची बुद्ध मूर्ती व तिची पूजा ही संकल्पना महायानांची तर हिनयान बुद्धांचे पदचिन्ह या सारख्या प्रतीकांची पूजा करीत. महायानांमध्ये कर्मकांड अस्तित्वात आले तर हिनयान त्या पासून अलिप्त राहिले.

* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , धम्म आचरण आणि आपण . :- 
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह घेतलेली धम्म दीक्षा ते ६ डिसेंबर १९५६ ला महापरीनिर्वान ,म्हणजे धम्म दीक्षे नंतर धम्माच्या कार्यासाठी बाबासाहेबांना केवळ ५० दिवसांचा अल्प कालावधी मिळाला. बुद्ध आणि त्यांचा धम्म , २२-प्रतिज्ञा या सारखे अत्यंत महत्वाचे अनमोल ग्रंथ आणि आचार संहिता आपणास दिली असली तरी बाबासाहेबांना दीर्घ आयुष्य लाभले असतेतर आज ज्या गोष्टी बद्दल आपणामध्ये आप-आपसात वादविवाद ,संभ्रम , मतभेद आहेत ते निश्चितच राहिले नसते.

* आजच्या वेगवेगळ्या प्रसंगी केले जाणारे धम्मविधी पहिले तर हिंदू धर्माच्या विधिना पर्यायी विधी बौद्ध धम्मात निर्माण केले गेले आहेत काय? अशी शंका येते. आणि असे विधी करण्याची खरोखर आवशकता आहे काय ? याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. त्रिसरण- पंचशील पालीतच असावे याबद्दल दुमत असता कामा नये परंतु इतर गाथांचे पालीचे अर्थ पाली न शिकलेल्यांना समजत नाहीत . पालीतील अर्थ न समजल्या मुळे या गाथा अशिक्षित , अल्पशिक्षित , आणि शिक्षिताना ही कर्मकांड वाटले तर नवल वाटायला नको. अर्थात त्याला सन्माननीय अपवाद ही आहेत.

* 'ध्यानधारणा'/विपश्यना या विषयीचा वादविवाद सद्ध्या झडतो आहे. फेस बुकवर तर हा वाद अधिकच रंगला आहे. तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडले जात आहेत. मुद्द्यात काही नाविन्य नाही पण अशा रीतीने मांडले जात आहेत कि जणू आम्हीच धम्माचे गाढे अभ्यासक आहोत , धम्माचे जणू आम्हीच भाष्यकार आहोत. इतरांना त्याचे काही ज्ञानच नाही अशा अविर्भावात दोन्ही बाजूने वाद-विवाद नव्हे वितंडवाद चालू आहे. मला इथे कुणाचाही अवमान करायचा नाही , वाद-विवाद ही निरोगी समाज मनाची , प्रौढत्वाची, सुसंस्कृत पणाचे लक्षण असले तरी वादविवादात सहभागी झालेल्यांचा धम्मावर व बाबासाहेबांवर खरोखर गाढा अभ्यास आहे? ते बाबासाहेबांच्या व बुद्धांच्या तत्वज्ञानाचे प्रवक्ते बनण्या इतके अभ्यासू विद्वान आहेत काय? असेल तर माझे काही म्हणणे नाही पण खरो खर आपला गाढा अभ्यास नसेल तर इतका दीर्घ वादविवाद(वितंडवाद) करण्यात काही अर्थ आहे काय? त्यामुळे नवोदितांची दिशा भूल होत नाही काय? आपण यातून नेमके काय साध्य करणार आहोत?

* यामुळे निर्माण होणारे काहीधोके:-   
हा सर्व वादविवाद पहिल्या नंतर असे वाटायला लागले आहे की आंबेडकरी राजकीय व सामाजिक चळवळीचे तुकडे जसे तथाकथित नेत्यांनी केले आहेत तसेच धम्म चळवळीचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. धम्म चळवळ समाज मनात रुजण्या आधीच तचे तुकडे झालेले पाहायला मिळतील. असे काही होवू नये म्हणून सर्वांनी सजग राहायला हवे, शब्द प्रयोग जपून करायला हवेत. आणि आपल्या हातून धम्म चळवळ तुटणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायला हवी.

*आज नव्याने धम्म संगीतीची आवशकता निर्माण झाली आहे :-

हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी पुन्हा एकदा धम्म संगीतीची आवशकता निर्माण झाली आहे असे मला वाटते. या साठी धम्माचा व बाबासाहेबांच्या साहित्याचा ज्यांचा सखोल अभ्यास आहे अशा अभ्यासकांनी ,विद्वानांनी एकत्र येवून वर्ष दोन वर्ष चालेल अशा धम्म संगीतीचे आयोजन करावे व अभ्यासा अंती , चिंतन मननातून आजची व २१ व्या शतकाला गवसणी घालणारी धम्माची आचार संहिता बनवावी जी विश्वातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक असेल. हे सर्व करताना 'बुद्ध आणि त्याचा धम्म' ,व बाबासाहेबांचे धम्म विषयक विचार, भाषणे केंद्रस्थानी असावेत.

या बद्दल आपली मते आवश्य नोंदवा! आपणास काय वाटते ते स्पष्ट पणे मांडा.

नमोबुद्धाय!
लेखक- Ashok Handore
 

3 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes