शनिवार, नोव्हेंबर १९, २०११

रेणुका, कार्तवीर्य आणि कर्ण यांच्यावर परशुरामाकडून अन्यायच....

हा परशुराम होता तरी कोण ? हा यशवंत रायकर यांचा दि. १४ ऑक्टोबरच्या अंकातील लेख आणि त्यावरील दि. २५ नोव्हेंबरच्या अंकातीलश्यामसुंदर गंधे यांची प्रतिक्रिया वाचली. धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे. मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. त्यात रायकर यांनी लिहिल्याप्रमाणे नरसंहाराचा उच्चांक गाठलेला असतानाही परशुरामाला आगळे दैवत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे परशुराम हा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु जर प्रामाणिक चिकित्सा करायची असेल तर परशुराम या व्यक्तीवर चमत्कारांची, काल्पनिक कथांची जी पुटे चढवली आहेत ती दूर करून परशुरामाचे चरित्र समजावून घ्यावे लागेल.


परशुरामाच्या आयुष्यात ज्या काही प्रमुख घटना घडल्या त्यात परशुरामाने रेणुकेचा केलेला शिरच्छेद ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले आणि आपल्या पाच मुलांना रेणुकेचा वध करण्याची आज्ञा केली. त्यापैकी फक्त परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आईचा शिरच्छेद केला. त्यानंतर जमदग्नी पराशुरामावर संतुष्ट झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंत झाली. एखादी व्यक्ती एकदा मरण पावल्यानंतर पुन्हा जीवंत होवू शकत नाही. त्यामुळे रेणुका पुन्हा जिवंत झाली हे पुराणकारांचे म्हणणे साफ खोटे आहे. त्यामुळे या कथेतील चमत्कारिक भाग वगळता परशुरामाने आईचा शिरच्छेद केला हेच एकमेव सत्य दिसून येते. रेणुकेचा तथाकथीत अपराध झाला होतं असे वादासाठी गृहीत धरले तरी शिरच्छेद करण्याची शिक्षा देण्याची काहीही गरज नव्हती. तरीही जमदग्नीच्या आदेशावरून रेणुकेला पश्चातापाची किंवा स्वतःची बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता परशुरामाने तिचा वध केला ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल. आणि याबाबतीत परशुरामाच्या कृतीचे कधीही समर्थन होवू शकणार नाही.

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केल्याच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. पण गमतीचा भाग असा आहे कि एकदा पृथ्वी निक्षत्रीय केल्यानंतर पुन्हा क्षत्रिय आले कोठून ? आणि जर संपूर्ण क्षत्रिय नष्ट झाले नसतील तर पृथ्वी निक्षत्रीय केली असे आपण कसे म्हणू शकतो ? म्हणजे पुराणकारानी इतक्या विसंगत कथा लिहिल्या आहेत त्यांचा बऱ्याच वेळा आपापसात ताळमेळ लागत नाही. हैहय वंशातील राजांचे भृगु हे पुरोहित होते. पण त्यांच्यात नंतर वैर उत्पन्न झाले. हैहय कुळातील कार्तविर्याने वसिष्टांचा आश्रम जाळला. त्यांनतर वसिष्ठाने त्याला शाप दिला कि, ‘भार्गवकुलोत्पन्न परशुराम तुझा वध करील’. यामुळे जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य हे वैर अधिक तीव्र झाले. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळविली. त्यामुळे रागावून परशुरामाने कार्तविर्याबरोबर युद्ध केले व त्याला ठार मारले. कार्तविर्याच्या मृत्यूने संतप्त होवून त्याच्या मुलांनी जमदग्नीचा वध केला. पित्याच्या वधाची बातमी कळताच परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली. आता या कथेत जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य यांचे वैर अधिक भडकून त्याचे पर्यावसान कार्तवीर्य आणि जमदग्नी यांच्या हत्येत झाले हे दिसून येते. परंतु यांनतर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली हे कितपत संयुक्तिक होते ? जमदग्नीच्या मृत्युनंतर परशुरामाने अंग, वंग, कलिंग, विदेह, दरद, त्रिगर्त, ताम्रलीप्ती, मालव इ. देशातील राजांचाही संहार केला. त्याच्या क्षत्रिय संहाराची वर्णने तर भयानक आहेत. इतका नरसंहार करणारा परशुराम आदरणीय कसा ठरावा ? समाजातील एखाद्या व्यक्तीशी, घटकाशी शत्रुत्व आहे म्हणून संपूर्ण समाजाचा संहार करण्याची ही कृती निंदनीयच म्हंटली पाहिजे. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळवली होती ही कार्तविर्याची चूक झाली. परंतु त्यासाठी कार्तविर्याची हत्या करणे म्हणजे किरकोळ चोरी करणाऱ्या चोराला फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे. कार्तविर्याने पळवलेली कामधेनु परत मिळवून किंवा त्याला आर्थिक दंड करून परशुराम कार्तविर्याला योग्य शिक्षा करू शकला असता. परंतु परशुरामाने कार्तविर्याची हत्या केली आणि हे वैर अधिक पेटले.त्याची परिणती पुढे हजारो क्षत्रियांच्या हत्येत झाली.

आपण ब्राम्हण आहोत असे भासवून कर्ण परशुरामाचा शिष्य बनतो. परंतु कर्णाचे सत्य एक दिवशी परशुरामास समजते. त्यानंतर परशुराम कर्णाला शाप देतो कि तुला आयत्यावेळी मंत्राचा विसर पडेल. त्यामुळे अर्जुनाकडून कर्ण मारला जातो. ही महाभारतातील कथा. इथे कर्ण हा जाती/वर्णव्यवस्थेचा बळी ठरला आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. कर्ण ब्राम्हण नाही म्हणून तो विद्या ग्रहण करण्यास अपात्र आहे असा परशुरामाचा समज होता. विद्या ग्रहण करण्यासाठी का होईना कर्ण खोटे बोलला ही त्याची चूकच होती. परंतु ब्राम्हण असल्याचे भासवून शिक्षण घेणे यापेक्षा ब्राह्मणेतरांना शिक्षणाचा अधिकार नाकारणे हा गंभीर अपराध म्हंटला पाहीजे. आपल्या शिष्याची छोटीशी चूक झाली आणि तीही कुणाला फसवण्यासाठी, कुणाचे नुकसान करण्यासाठी केलेली नव्हे तर शिक्षण घेण्यासाठी चूक केलेली असताना परशुरामाने कर्णाला इतका मोठी शिक्षा देणे संयुक्तिक वाटत नाही. शाप देण्याची कृती जरी काल्पनिक असली तरी त्यामागील जाणीवा, भावना अन्यायकारकच आहेत. रेणुका, कार्तवीर्य, कर्ण या सर्वांच्याबाबतीत परशुरामाने केलेला व्यवहार न्यायाचा नव्हता हे पुराणातील कथांवरून स्पष्ट होते. पराशुरामाच्या या कृती निश्चीतच समर्थनीय ठरणार नाहीत. परशुरामाच्या चरित्राकडे पाहायचे असेल तर बुद्धिवादी आणि चिकित्सक बनूनच पहावे लागेल आणि त्यासाठी श्रद्धेच्या पोकळ कल्पना आपणास बाजूला साराव्या लागतील.

15 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes