सोमवार, ऑक्टोबर ३१, २०११

यशवंतराव होळकर आणि इतिहासाचा विपर्यास

महाराजा यशवंतराव होळकर
या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही खंडेराव यांना बदनाम केले. खंडेराव व अहिल्यामाई यांचे पुत्र मालेराव हे व्यसनी, माथेफिरू रेखाटले. तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर यानीही आपल्या कार्याने सर्वांना प्रेरित केले आहे. या देशातील  क्रांतिकारक आणि अखेरचा सार्वभौम राजा असणारा यशवंतराव होळकर याच्या बलिदानाची काडीमात्र पर्वा न करता त्यालाही माथेफिरू रेखाटले. जणू काय होळकरांच्या खानदानालाच माथेफिरू बनण्याचा शाप होता.  होळकर घराण्यातील अनेकांनी सामान्य लोकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. तरीही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. 

एक अहिल्यामाई यांचे नाव घेण्यापुरतेच होळकरांचे कर्तुत्व आहे असे सर्वांना वाटते. तसा समज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. खंडेराव, मालेराव, तुकोजी, यशवंतराव, विठोजी होळकर यांचा संघर्ष समाजासमोर आलाच नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे सांगताना आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेकडो उदाहरणे देतो, परंतु आम्हाला क्रांतिकारी भिमाबाई होळकर आठवत नाहीत. भिमाबाई कोण होत्या हेही आम्हाला माहित नाही. आणि जे माहित आहे ते चुकीचे माहित आहे. खंडेराव, मालेराव, यशवंतराव सारेच कसे काय माथेफिरू ठरतात ? आणि माथेफिरू असूनही आभाळालाही लाजवेल असे कर्तुत्व या महामानवानी गाजवले कसे ? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे.

यापुढील काळात इतिहास लिहिताना या उपेक्षित क्रांतीकारी, बहुजन नायकांना न्याय देण्याचा प्रयत्न शिक्षित आणि जागृत बहुजन समाजाने केला पाहिजे. होळकर घराण्यातील कर्तुत्ववान पुरुष आणि स्त्रियांची खूप उपेक्षा झाली आहे. त्यांच्यावर इतिहास लेखकांनी आणि समाजाने अन्यायच केला आहे. त्यांचे वारसदार म्हणून नाव संगणारे आपण त्यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे. सध्या या बाबतीत एक उत्कृष्ट म्हणावा असा प्रयत्न जेष्ठ लेखक संजय सोनवणी यांनी केला आहे. भारतीय इतिहासातील एक अजरामर व्यक्तिरेखा असणारे यशवंतराव होळकर यांचे चरित्र सोनवणी यांनी रेखाटले आहे. यशवंतरावांचे चरित्र लिहीत असताना सोनवणी यांच्यासमोर काही प्रमुख अडचणी होत्या. आजपर्यंत यशवंतराव होळकर या माणसाचे जे चरित्र आपणाला माहित आहे ते म्हणजे लुटारू आणि पुणे जाळणारा यशवंतराव. पुण्याशी असणारे यशवंतरावांचे हे वैर सर्वज्ञात आहे. परंतु त्यामागील नेमकी कारणमिमांसा सोनवणी यांनी केली आहे. यशवंतराव यांच्यावर जो पुणे जाळल्याचा आरोप केला जातो तो धादांत खोटा आहे हे सोनवणी यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले आहे. पुणे जाळणे तर दूरच, सामान्य माणसाला कोणताही त्रास होता कामा नये असा आदेशच यशवंतराव यांनी काढला होता. पुणे युद्धाच्या दरम्यान शिंदे यांच्या एका सरदाराचा वाडा जाळण्यात आला होता. याव्यतिरिक्त पुणे जाळले हा अपप्रचार आहे हे सोनवणी यांनी पुरावे देवून मांडले आहे. यशवंतराव होळकर हे राजे बनायला सर्व बाजूंनी समर्थ असतानाही त्यांना सत्तेची कोणतीही लालसा नाही हे यशवंतरावांचे चरित्र वाचताना पदोपदी जाणवते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होळकर संस्थानाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे श्रेय यशवंतराव होळकर यानांच जाते. 

यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. त्यांचे मोठे बंधू विठोजीराव यांना पुण्यात हत्तीच्या पायाशी देवून ठार मारले. अतिशय क्रूरपणे केलेल्या विठोजीच्या हत्येला पुणेकर साक्षी होते. विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. मानवतेला लाजवणारे हे कृत्य पुण्यनगरीत घडले. कोणाच्याही तोंडातून ब्र बाहेर पडला नाही. विठोजीच्या हत्येचा पुण्यात निषेध झालाच नाही. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले. पुण्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडून पळालेला बाजीराव इतिहासात खलनायक ठरत नाही, मात्र पुण्यातील सामान्य जनतेला कोणीही धक्का लावता कामा नये असा आदेश आपल्या सैन्याला देणारा, पदोपदी अपमान, अन्याय सहन करून या राष्ट्रासाठी, राष्ट्रातील सामान्य जनतेसाठी नेहमी चर्चेची तयारी ठेवणारा यशवंतराव खलनायक ठरला. इतका कि सकाळी उठल्यानंतर यशवंतरावाचे नावही घेवू नये असा प्रघात पडण्याइतपत. पुण्यावर होळकरी आली होती, म्हणजे यशवंतरावांनी पुणे बेचिराख करून टाकले अशी मांडणी केली गेली. पुणेकर यशवंतरावाविरुद्ध केलेल्या या अपप्रचाराला बळी पडले. अनेक वर्तमानपत्रे आजही हाच खोटा इतिहास प्रमाण मानून लेखन करत आहेत. 

नतद्रष्ट इतिहास लेखक आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणारे लोक यांनी जरी यशवंतरावाच्या स्मृतीना करपू दिले तरीही काही लोकांनी खरे यशवंतराव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे. शाहीर अमर शेख म्हणतात,
" शिवराया मागं होळकर फक्त ऐकला
महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला
अमरनें दिला ! मुजऱ्याला चला...
यशवंतराव होळकर बोला,
चांगभल बोला !!!!! "  

आजपर्यंत यशवंतरावाचे, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे निपक्षपाती मूल्यमापन क्वचितच झाले आहे. यशवंतराव होळकर हे भारतीय भूमीत जन्माला आलेला एक हिरा आहे. आजपर्यंत या हिऱ्यावर उपेक्षेची, जातीद्वेषाची राख जमा झाली होती. ही राख झटकून यशवंतरावांचे खरे आणि निर्मळ चरित्र समाजासमोर आले पाहिजे. ऐतिहासिक पुरावे, कागदपत्रांच्या आधारे खऱ्या इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान बहुजन समाजाने स्वीकारले पाहिजे. अन्यथा त्यांच्या थोर महापुरुषांचा इतिहास असाच कलंकित केला जाणार. या पक्षपाती इतिहासाला नतदृष्ट इतिहासकार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आपणही जबाबदार आहोत. आपण कधी खऱ्या इतिहासाची आस धरली नाही हा आपला गुन्हा आहे. इथून पुढील काळात बुद्धीजीवी वर्गावर खरा आणि निपक्षपाती इतिहास लिहिण्याची जबाबदारी आहे. तो जर आप लिहिणार नसू तर भावी काळात आमच्या महापुरुषांना बदनाम केले म्हणून प्रस्थापित वर्गाच्या नावाने खडे फोडण्याचाही आपणाला अधिकार नसेल.

अधिक माहितीसाठी वाचा – 

अखेरचा सार्वभौम राजा : महाराजा यशवंतराव होळकर

महाराज यशवंतराव होळकर - यशवंत नायक मासिक

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले ना लुटले...

विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या...

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

7 टिप्पणी(ण्या):

अहिल्यादेवी युवा मंच यमगरवाडी म्हणाले...

पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. ‘इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..’ असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.

Unknown म्हणाले...

प्राणाची बाजी लावून देशासाठी लढणारा
मराठी मातीन पुन्हा एकदा महाराजा पाहिला
महायोद्धा.. महापराक्रमी एक दूरदर्शी राजा
ज्यांनी इंग्रजांची ईभ्रत ज्यांनी टांगली वेशीला
अटकेपार तोड नव्हती त्यांच्या झंझावाताला
इंग्रजांना नमविले आपल्या शौर्य सामर्थ्याने
हरला ना कधी.. ना केला तह या शूरवीराने
"झुकला तो संपला" हा एकच बाणा उराशी
तिरक्या नजरेने पाहिलात तर मिळवू मातीशी
करारी नजर तशीच निधडी पहाडी छाती
ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमाला चारली माती
साक्षर करण्या जनतेस... अभय दिले नारी जातीला
सार्वभौम राज्य केले... उंच फडकवलं महाराष्ट्र ध्वजाला
दचकले होते इंग्रज नमले होते ज्यांच्या पराक्रमाला
महाराजा यशवंतराव होळकर म्हणतात अशा वाघाला
कवी- गणेश पावले (मुंबई)
9619943637

Netaji Dudhal Creation's म्हणाले...

खुप छान
नेताजी दुधाळ सांगली
यशवंतसेना सांगली जिल्हा प्रसिद्धि प्रमुख
9096632743

Unknown म्हणाले...

खुप मस्त आहे

Unknown म्हणाले...

सूंद

Unknown म्हणाले...

Very meaningful and nicely expressed, plz can you put some more poems or qoutes about yashwantrao holkar's life. I need it for a speech competition

Unknown म्हणाले...

खूप छान वाटले आज असे काही माजा राजा बाबत स्तुती केली तर😘😘

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes