गुरुवार, ऑक्टोबर २७, २०११

समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा

आज बलिप्रतिपदा ! शेतकरी, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजा ! त्याच्या पुनरागमनाचा हा दिवस ! या दिवशी बहुजन स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” आजचा दिवस बळीराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला तर जातीयवादी इडा-पीडा घालवण्यासाठी बहुजनांना लढण्याची प्रेरणा मिळेल. या निमित्ताने बळीराजाचे महत्व प्रतिपादन करणारा प्रा. श्रावण देवरे यांचा लेख “सह्याद्रीबाणा”च्या वाचकांसाठी देत आहोत.
-    प्रकाश पोळ.

बळीराजा
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.


बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे 
भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन-परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.

बाहेरून आलेल्या परकीय आर्यभटाने कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकावले. तेव्हापासून आपण सर्व दुःखात आहोत. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन (विष्णूचा अवतार ?) याने बळीराजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही भाकडकथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग आदी आपल्या फायद्याचे आयोग हे आर्यभट आजही दडपून टाकत आहे. आज या बळीराजाचे रूप असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. या आर्यामुळे देशात जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेवून सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. म्हणून आज बळीपूजनाच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करुया व बळीराष्ट्राच्या निर्मितीचा निर्धार करुया.

बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासाचा धसका जातीयवाद्यांच्या छातीत कायमचा घर करून बसलेला असल्याने जेव्हा जेव्हा बळीराजा पाताळातून वर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्याला पुन्हा पाताळात गाडण्यासाठी प्रयत्न सुरु करतो. प्रत्येक दसऱ्याला जातीयवादी आर्य लोक कणकेचा बळीराजा बनवून ठार मारतात. हे कर्मकांड झाले, परंतु या कर्मकांडाला आधुनिक संदर्भ देवून तो वर्तमानातील संभाव्य बळीराजांना सतत पाताळात गाडण्यासाठी प्रयत्न करीत असतो. कालेलकर आयोग, मंडल आयोग गाडणे म्हणजे वर्तमानातील संभाव्य बळीराजांना गाडणे होय. आज ज्याला बळीराजा म्हंटले जाते ते शेतकरी दररोज हजारोंच्या संख्येने आत्महत्या करीत आहेत.

इतिहासातील बळीराजा हा आर्य आक्रमकांविरुद्ध लढता-लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच पसंद करतो आहे. लढाई सुरु करण्याआधीच तो पराभव मान्य करतो आहे. त्याची लढण्याची प्रेरणाच हरवली आहे, कारण त्याचा क्रांतिकारक लढ्याचा इतिहास हरवला आहे. त्याची लढाऊ ओळख हरवली आहे. म्हणून आज बहुजन बुद्धीजीविनी ब्राम्हणी इतिहासाला पुसून काढण्यासाठी खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे. हा इतिहास ब्राम्हणी साहित्यात शोधण्याऐवजी बहुजनांच्या रुढी व परंपरांमध्ये शोधला पाहिजे. त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खुरटून काढलीत तर अस्सल इतिहास आपणाला सापडल्याशिवाय राहत नाही. बहुजनांच्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट करावयाच्या असतील तर त्यांचे देव फेकून उपयोग नाही. तर त्यांच्या देवाचा अभ्यास करून त्यामागील क्रांतिकारक इतिहास शोधून काढला पाहिजे. तरच बहुजन माणूस आपल्या देव्हाऱ्यातील दगडांना देव न मानता केवळ ऐतिहासिक महापुरुष म्हणून मान्यता देईल व त्यांची पूजा करण्याऐवजी त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेईल.

यासाठी प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. त्याशिवाय जातीयवाद्यांनी लादलेल्या रुढी, परंपरा दगडाचे देव आणि बहुजनांचे खरेखुरे ऐतिहासिक देव यातील फरक कळणार नाही. हा फरक ज्या दिवशी बहुजनांना समजेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आर्य ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष सुरु होईल.

इतिहास लिहिण्याची प्रथा फार अलीकडची असल्याने मानव समाजाने आपला इतिहास मिथके आणि रुढी, परंपरांच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. शासक-शोषक प्रस्थापितांना आपली व्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने एकतर या रुढी, परंपरा मदत करतात किंवा ज्या मिथके परंपरा व्यवस्थेच्या विरोधी आहेत त्या विकृत करण्याचा वा दडपण्याचा ते प्रयत्न करतात. शोषित-शासित विस्थापितांच्या बुद्धीजीवी वर्गाला या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणा याच विकृत केलेल्या इतिहासातून शोधाव्या लागतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि, “ब्राम्हणांनी वर्ण जातीव्यवस्था कशी असावी याबाबत भरपूर भाकडकथा लिहिल्या, परंतु ही व्यवस्था अक्षी अस्तित्वात आली हे मात्र लिहून ठेवले नाही, ते जर लिहून ठेवले असते तर ही व्यवस्था नष्ट करणे सहज सोपे झाले असते.”

भारतीय समाजच्या जडणघडणीचा इतिहास वारंवार विकृत करण्याच्या एकतर्फी प्रयत्नामुळे व खोटा इतिहास रूढ केल्यामुळे आज वर्णव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करताना खूप अडचणी येत आहेत. त्यातीलच सर्वात मोठी अडचण म्हणजे Identity  ची ! त्याशिवाय संघर्ष उभाच राहू शकत नाही. आपण कोण ? आपले शत्रू कोण ? हे समजल्याशिवाय व्यवस्था समजत नाही व त्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा राहू शकत नाही. याउलट वर्ण-जाती समर्थक बुद्धीजीविनी ब्राम्हणी अन्वेषण पद्धतीने इतिहास लिहून तो रूढ केला. त्यामुळे ब्राम्हण हे परकीय नसून आपलेच भारतीय व धर्मबंधू असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. आर्यांनी आपली Identity पुसून भारतातीलच मूळ असलेली ब्राम्हण (ब्रम्हण) ही Identity स्वीकारली. त्यामुळे त्यांना ब्राम्हणी वर्चस्वाची वर्ण-जातीव्यवस्था सहज निर्माण करता आली व लादता आली.

आज आपण ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा अनेक Identities  घेवून वर्ण-जातिव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु या संघर्षासाठी आवश्यक असलेली कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींची व ओबीसींची फौज तुमची कोणतीही Identity घेवून लढायला तयार नाही. मुस्लीमद्वेषाचा ब्राम्हणी इतिहास अधिकृत असल्याने त्यांनी आपली Identity हिंदू म्हणून स्वीकारणे स्वाभाविक आहे. या देशातील ओबीसी, जनता “हिंदू Identity” घेवून मुस्लिमांच्या विरोधात लढू शकते, उच्चवर्णीयांच्या विरोधात नाही. कोणत्याही सामाजिक व सांस्कृतिक संघर्षात Identity हा कळीचा मुद्दा आहे. ही Identity इतिहासातून येते. त्यातूनच लढण्याची प्रेरणा मिळते. वर्तमानकाळ फक्त लढ्याची साधने, धोरणे व डावपेच ठरवत असतो. सत्य इतिहास, अचूक Identity व प्रेरणा ही शस्त्रे नसल्यास सामाजिक व सांस्कृतिक संघर्ष  उभा राहूच शकत नाही. पाच हजार वर्षांपासून भरण-पोषण होत असलेली वर्ण-जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक व सांकृतिक संघर्षाशिवाय पर्यायच नाही. 

तात्यासाहेब महात्मा जोतीराव फूले यांनी बळीराजाचे जे प्रतिक आपणास दिले आहे, त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघार्षाचीच पार्श्वभूमी आहे. परंतु या दृष्टीकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हावयाचा आहे. तात्यासाहेबांनी सिद्ध केलेला द्वंदात्मक ऐतिहासिक भौतिकवादातून वर्णजातिव्यवस्थेच्या संघर्षाची जी मांडणी केली त्याची सुरुवात बळीराजापासून होते. सर्व मांडणी पुढ्यात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धीजीविना बळीराजाचे सांस्कृतिक महत्व फारसे लक्षात आले नाही. परंतु ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते आणि म्हणूनच पाच हजार वर्षापासूनच्या ब्राम्हणी विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे. या लढ्यात अग्रभागी आहेत ग्रामीण स्त्रिया, ज्या आजही ब्राम्हणी इडापीडा घालण्यासाठी बळीच्या राज्याची आस जिवंत ठेवत आहेत. कोण होता हा बळीराजा ?

दसऱ्याच्या दिवशी बळीराजाचा कपटाने खून झाला. परकीय आर्य वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे. दसऱ्यानंतरचा २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा ! या दिवशी बळीराजा आपल्या दुखी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नावे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते.

प्रत्येक युगात आपल्या शेतकरी, कष्टकऱ्यांना ब्राम्हणी पिदेतून मुक्त करण्यासाठी बळीराजा नवे रूप, नवे नाव व नवे तत्वज्ञान घेवून जन्माला येत असतो. बुद्ध, शिवाजी, फूले, शाहू, आंबेडकर, पेरियार, वि.पी. सिंग, कांशीराम हे बळीराजाचेच कार्य पुढे नेण्यासाठी झिजले. परंतु त्यांच्या क्रांतिकार्यात अडथळे आणण्यासाठी नवे वामनही जन्म घेत असतात. हा केवळ दोन व्यक्तींमधला संघर्ष नाही. विषमतावादी विरुद्ध समतावादी अशा दोन व्यवस्थेमधला हा  संघर्ष आहे. स्वामी विरुद्ध गुलाम, जमीनदार विरुद्ध कुळ, भांडवलदार विरुद्ध कामगार, ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर असे अनेक प्रकारचे संघर्ष प्रत्येक युगात झाले आहेत व होत आहेत. प्राचीन काळी वामनानी कर्मकांड, अंधश्रद्धा, पोथी-पुराणे अशी हत्यारे वापरली. त्यात आता मंदिर-मशीद वाद, जातीय दंगली, सेज अशा नव्या हत्यारांची भर पडली आहे. आता प्रत्येक कष्टकऱ्याने रणमैदानात उतरले पाहिजे.

बळीपुजनानिमित्त आज बळीराजाची स्मृती जागवूया ! त्याच्या पराक्रमापासून प्रेरणा घेवून समाजातील जाती-वर्ण व स्त्री-पुरुष विषमतेविरुद्ध लढूया ! 

जय बळीराष्ट्र ! बळीराजा चिरायू होवो !

5 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes