सोमवार, ऑक्टोबर १७, २०११

अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद

अग्निवेश का बाहेर पडले ?
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहेत. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी देशात प्रभावी जनलोकपाल कायदा मंजूर करणे, परदेशातील काळा पैसा भारतात आणणे, निवडणुकांच्या पद्धतींमध्ये बदल घडवणे आणि हे सर्व अंमलात आणण्यासाठी उपोषण, मौनव्रत, सरकारवर टीका, राजकीय-सामाजिक दबाव अशा मार्गांचा अवलंब करणे असे सर्व वातावरण आहे. अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे.

देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे हीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. कारण सर्वात जास्त नुकसान आणि त्रास सहन करावा लागतो तो या सामान्य लोकानांच. त्यामुळे अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी जे करताहेत त्यामुळे आपले जीवन सुखकर बनेल या भाबड्या आशेने अनेकांनी अण्णांकडे डोळे लावले आहेत. त्यामुळे अण्णा, त्यांचे सहकारी किंवा त्यांच्या आंदोलनाची चिकित्सा करायची म्हटले तर बरेच लोक भुवया विस्फारून पाहतात. परंतु सत्यशोधन हा जागृत माणसाचा गुणधर्म आहे. त्यामुळे जो माणूस कुणाचा गुलाम नाही, कुणाचा भक्त नाही तो माणूस जर चिकित्सा करू लागला तर काय चुकले ?

अण्णांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर या देशातील प्रसारमाध्यमांनी रात्रंदिवस अण्णा हजारेच दाखवले. अण्णांचे उपोषण चालले होते त्या १०-१२ दिवसाच्या कालावधीत टीवी वर फक्त अण्णा, अण्णा आणि अण्णा. अण्णांना जणू काय यांनी देवत्व बहाल करून टाकले. अण्णा हजारे उपोषण करत होते, तेव्हा अण्णांच्या सहकार्यांपैकी का कुणी उपोषणाला बसले नाहीत. वयस्कर अण्णांना उपोषणाला बसवून त्यांचे सहकारी असणारे केजरीवाल, बेदी मात्र खावूनपिवून भाषणे ठोकत असत. यांच्या बोलण्याला तर सुमार राहिला नव्हता. केजरीवाल आणि बेदी बाईंनी तोंडाला फेस येईपर्यंत भाषणे ठोकली. ग्रामीण भागातील बहुजन नेत्यांची टिंगल टवाळी करत आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन केले. हे दोघे आपल्या तोंडाची वाफ घालवत असताना अण्णा मात्र त्यांना एका शब्दाने बोलत नव्हते याचेच जास्त आश्चर्य वाटत होते. त्यावेळी अण्णा बोलायचे ते फक्त घोषणा देण्यासाठी. अण्णा घोषणा द्यायचे आणि बेदी, केजरीवाल सरकार बरोबर चर्चा करायचे. गोपीनाथ मुंडे अण्णांना भेटायला गेले तर या बेदी बाईंनी चक्क 'चोर आया' म्हणून त्यांची निर्भत्सना केली. पत्रकारांनी स्पष्टीकरण विचारले तेव्हा म्हणाल्या, 'मैने उनको पहचाना नही.' पहिली महिला आयपीएस अधिकारी. कर्तुत्ववान महिला अधिकारी. सर्व देश फिरलेला. भरपूर अनुभव गाठीशी. आणि गोपीनाथ मुंडे, भाजपाचे खासदार. देशात ओबीसीचे नेते म्हणून ओळख. तरीही या खासदाराला माजी आयपीएस अधिकारी असलेल्या किरण बेदी यांनी ओळखले नाही. आश्चर्य वाटते ना ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख अण्णांच्या स्टेजवर येवून गेले. खरेतर तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण संघाचे स्वरूप, त्यांचे कार्य आणि विचारसरणी या सर्वांना विरोध करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. समाजावर ब्राम्हणी वर्चस्व लादण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल तसा मार्ग अवलंबणे ही संघाची कामे. संघ ही ब्राम्हणी विचारांची संघटना असल्याने बहुजन समाज संघापासून फटकून असतो. अण्णांना संघाचा पूर्ण पाठींबा आहे. आणि अण्णानाही ते मान्य आहे. त्यामुळे बहुजन समाज अण्णांकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. अण्णांच्या लोकपाल बिलात बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांना काहीच जागा नाही हे लक्षात आल्यानंतर तर बहुजन समाजातील अनेक जागृत घटकांनी अण्णांच्या या बिलाला विरोध केला. 

अण्णांचे जुने सहकारी असणारे अनेकजण आता अण्णांच्या सोबत नाहीत. अण्णांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत अनेकांनी त्यांच्याशी काडीमोड घेतली आहे. काहीजणांना तर अण्णांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः हाकलून लावले आहे. टीम आण्णा म्हणजे केजरीवाल, बेदी आणि प्रशांत भूषण यांच्या शिवाय अण्णांचे पानही हलत नाही. अण्णांच्या या कोर टीम शिवाय अण्णा कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेवू शकत नाहीत. अण्णा मुळातच हेकेखोर आहेत. बोलताना अण्णा बऱ्याच वेळा चुकतात. केजरीवाल आणि बेदी यांना तर आपण स्वतःच अण्णा असल्याचा भास होत असेल. केजरीवाल यांच्या समर्थकांनी तर आता त्यांना भावी पंतप्रधान ठरवून टाकले आहे. (कदाचित किरण बेदी यांना गृह मंत्रालय आणि प्रशांत भूषण यांना न्याय खाते मिळू शकते.) अविचाराने बडबडणे किती धोकादायक आहे ते प्रशांत भूषण यांना समजले आहे. त्यांना जी मारहाण झाली ती अतिशय दुर्दैवी होती. परंतु जबाबदार व्यक्तीनीही बोलताना तोंडावर संयम ठेवला पाहिजे. पण अण्णा आणि त्यांची टीम यापैकी कुणाचेच आपल्या तोंडावर नियंत्रण नाही.

अण्णा कॉंग्रेसला विरोध करतात. अण्णा म्हणतात येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करू नका. मग मतदान करायचे कुणाला ? कॉंग्रेसचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी भाजपला ? कि अण्णा त्यांचे स्वताचे उमेदवार उभे करणार ? अण्णांनी राजकीय भूमिका घ्यायला हरकत नाही. तसा त्यांना पूर्ण अधिकार आहे, परंतु अमुक एका पक्षाला पाडा किंवा त्यांना मते देवून नका असे सांगताना ज्यांना आपण पाठींबा देणार आहोत त्यांच्या स्वच्छ कारभाराची खात्री अण्णा देणार काय ? मागे अण्णांनी असे वक्तव्य केले होते कि भाजपने जनलोकपाल बिलाला पाठींबा दिला तर भाजपला पाठींबा दिला जाईल. मग कॉंग्रेस ने या बिलाला पाठींबा दिला तर कॉंग्रेसला पाठींबा देणार का ? किंवा भाजपने या बिलाला पाठींबा देवून ही भ्रष्टाचार केला तरी भाजपचे समर्थन करणार का ? या प्रश्नांची उत्तरे अण्णांना द्यावी लागतील.

कॉंग्रेसच्या किंवा इतरांच्या भ्रष्ट नेत्यांबद्दल अण्णा बोलतात पण भाजप बद्दल अण्णांनी एवढा सोफ्ट कॉर्नर का घेतला आहे ? कालच येडीयुरप्पा यांना अटक झाली. आणि दररोज पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर भरभरून बोलणारे अण्णा मौनव्रत धारण करून बसले आहेत ?  मौनव्रत धारण करण्याने प्रश्न सुटणार नाहीत. उलट अण्णांनी बोलले पाहिजे. त्यांची मते जनतेपर्यंत पोहचली पाहिजेत. प्रशांत भूषण यांच्यासंदर्भात अण्णांची काय भूमिका आहे, येडीयुराप्पा आणि भाजपच्या इतर भ्रष्टाचाराबद्दल अण्णा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (मी कॉंग्रेस चा समर्थक नाही आणि भाजपाचाही नाही. मला जेवढा कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा राग येतो तेवढाच भाजपच्या भ्रष्ट आणि जातीयवादी धोरणांचाही येतो. पण अण्णा मात्र भाजपच्या भ्रष्ट कारभार आणि जाती-धर्मवादी विचारांकडे का दुर्लक्ष करत आहेत तेच समजत नाही.) अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करत असताना त्याबद्दल जर काही प्रश्न उपस्थित झाले तर किमान त्यांना उत्तरे तरी द्यावीत. त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याने अण्णांची विश्वासार्हता धोक्यात येत आहे.

अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, बहुजन जनतेबद्दल काहीही देणेघेणे नाही अशा प्रकारची टीका व्हायला लागल्यानंतर अण्णांचे उपोषण सोडवायला एक दलित आणि एक मुस्लीम मुलगी बोलावण्यात आली. आणि त्यांच्या जात-धर्म सर्वांना कळेल अशा पद्धतीने पसरवले गेले. म्हणजे दलित आणि मुस्लीम मुलीच्या हातून लिंबू-पाणी पिले म्हणजे तुम्हाला या घटकांचा कळवळा आहे असे सिद्ध होत नाही. समाजातून टीका व्हायला लागल्यानंतर अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे शहाणपण सुचावे याचेच जास्त आश्चर्य वाटते. संसदेत लोकपाल बिलावर चर्चा चालू असताना शरद यादव म्हणाले, अण्णा महाराष्ट्रातील असून त्यांना महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी माणसे दिसली नाहीत. (आणि त्यानंतर अण्णांनी या महामानवांची नावे घेतली) अण्णांनी कधीही जातीव्यवस्था, धार्मिक दंगली आणि दहशतवाद अशा सामाजिक प्रश्नी भूमिका घेतली नाही. याचे कारण काय ?  

अण्णांचे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाताळत असल्याचीही टीका अनेकांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी अण्णांना भेटून गेले. त्यांचे स्वयंसेवक हे अण्णांबरोबर होते आणि आहेत. अण्णांचे सहकारी केजरीवाल आणि संघाचे जवळचे संबध असल्याचे मागे दै. सकाळ मध्ये आले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीय ही संघाशी संबंधित आहेत. त्यातच अण्णांचे भाजपला विरोध न कारणे, त्यांच्या भ्रष्टाचारावर न बोलणे यासारख्या बाबीतून या आंदोलनात संघाचा हात असल्याचा संशय अनेकांना येतोय. अण्णांनी आजवर महाराष्ट्रात अनेक आंदोलने आणि उपोषणे केली. त्यावेळी जरी त्यांना आज इतकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचले होते. भ्रष्टाचार आणि अनैतिक मार्गांविरुद्ध असलेला लढा लढताना एकेकाळी अण्णांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिलेदार सध्या कुठे गायब आहेत तेच कळत नाही. यातील काहीजण अधूनमधून टीवीवर किंवा वर्तमानपत्रातून अण्णांचे आंदोलन, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे सहकारी आणि एकूणच अण्णांची भूमिका (सुरुवातीची आणि सध्याची) याचे विश्लेषण करताना दिसतात. जो माणूस अण्णांच्या पाठीशी आहे, त्यांच्या हो ला हो म्हणतो, तो चांगला. जरा वेगळी भूमिका घेतली कि तो गद्दार. अण्णांचे आजवरचे सहकारी असणारे देसरडा आज अण्णांबरोबर का नाहीत ? स्वामी अग्निवेश हे आजपर्यंत नव्हे आत्तापर्यंत अण्णांबरोबर होते. ते आज का बाहेर आहेत. आजवर आपले सहकारी असणाऱ्या या लोकांना बरोबर घ्यावे असे अण्णांना का वाटले नाही ? सरकारचा हेर म्हणून अग्निवेश यांना टीम अण्णाने बाहेर काढावे आणि अग्निवेश यांनी अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर ब्राम्हणवादाचा आरोप करावा याला काय म्हणावे. जेव्हा स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला होता तेव्हाच अग्निवेश यांना अण्णांचे मौन खटकले होते. नंतर टीम अण्णा आणि अग्निवेश यांच्यातील मतभेद वाढतच गेले आणि त्याचे पर्यावसान अग्निवेश यांच्या हकालपट्टीत झाले. देसरडा आणि अग्निवेश दोघानीही अण्णांच्या आंदोलनावर ब्राम्हणवादाचा शिक्का मारला आहे. तो शिक्का पुसण्यासाठी तरी अण्णांनी तोंड उघडावे. 

अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद
स्वामी अग्निवेश म्हणतात-
- अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद आहे.
- अण्णांच्या आंदोलनावर संघाचा प्रभाव आहे.
- लोकपाल बिलात दलित, आदिवासी, मुस्लीम यांना प्रतिनिधित्व हवे.
- सर्व निर्णय अण्णा आणि अरविंद केजरीवाल घेतात. कोर समितीला महत्व नाही.
- अण्णांच्या आंदोलनात लोकशाही नाही. अण्णा व्यक्तिवादी आहेत.
- महाराष्ट्रातील कोणताही मोठा सामाजिक कार्यकर्ता अन्नासोबत नाही.
स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे त्यांना टीम अन्नामधून बाहेर काढल्यानंतर केले आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद करून काहीजण या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करतील. परंतु वरील प्रश्न वारंवार विविध सामाजिक कार्यकर्ते, दलित, बहुजन संघटना विचारत होत्या. हे मुद्दे जरी स्वामी अग्निवेश यांनी टीम अण्णाबरोबर झालेल्या वादानंतर मांडले असले तरी ते अतिशय महत्वाचे आहेत. या मुद्द्यांचे स्पष्टीकरण अण्णा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिले पाहिजे.

32 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes