रविवार, ऑगस्ट २१, २०११

प्रबोधनकारांविषयी हे माहीत आहे का ?

प्रबोधनकारांविषयी सर्वसामान्यपणे माहीत नसलेल्या या काही गोष्टी. प्रबोधनकार विविधांगी आयुष्य जगल्यामुळे अशा विस्मयचकित करणा-या गोष्टी खूप आहेत. त्यातल्या या काही महत्त्वाच्या गोष्टी.

- प्रबोधनकारांचा जन्म पनवेल शहरातला. आयुष्याची पहिली जवळपास वीस वर्षं ते तिथेच होते. पण आज तिथे त्यांचं एक साधं स्मारकही नाही.

- ठाकरेंचं मूळ आडनाव घोडपकर. नाशिक जिल्ह्यातल्या घोडप या किल्ल्याचे ठाकरे हे किल्लेदार होते. त्यामुळे ते घोडपकर होते. त्यांच्या आजोबांपर्यंत हे आडनाव सुरू होते. वडिलांनी प्रबोधनकारांचं नाव शाळेपासून ठाकरेच लावलं.


- प्रबोधनकारांनी कायम के. सी. ठाकरे असं नाव वापरलं. यातली के आणि सी ही इंग्रजी आद्याक्षरं नाहीत. तर केशव सीताराम या नावातली मराठी आद्याक्षरं आहेत.

- प्रबोधनकारांचं मूळ गाव रायगड जिल्ह्यातलं पाली. अष्टविनायकांतल्या बल्लाळेश्वराचं हे पाली. तिथे ठाकरेंच्या नावाची एक विहीरही अद्याप आहे. काही जणांनी ठाकरे मूळचे मध्य प्रदेशातल्या पाली गावचे असल्याचा दावा केला होता, पण ते चुकीचं आहे.

- प्रबोधनकारांच्या मागील किमान चार पिढ्यांमधे प्रत्येकाने काहितरी समाजोपयोगी कामाचा वसा उचललेला दिसू येतो.

- प्रबोधनकार शिक्षणासाठी कल्याण, मुंबई, बारामती तसंच मध्य प्रदेशातलं देवास इथे गेले. पण फीसाठी केवळ दीड रुपया कमी पडल्यामुळे ते मॅट्रिक होऊ शकले नाहीत आणि त्यांचं वकील होण्याचं स्वप्न भंग पावलं.

- आपल्या एका बालमैत्रिणीचं लग्न म्हाता-याशी होतंय, म्हणून बारा वर्षांच्या केशव सीताराम ठाकरेने लग्नाचा मंडप जाळला होता.

- शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी विद्यार्थी नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यासाठी छोटेखानी छपाईचं यंत्रही बनवलं होतं.

- घरांवर नावाच्या पाट्या रंगवण्याची पद्धत पनवेलमधे नव्हती. कमाई व्हावी म्हणून प्रबोधनकारांनीच अशा पाट्या रंगवून देण्याचा उद्योग पनवेली सुरू केला.

- टांग्याच्या पाट्या रंगवणं, रबरस्टॅम्प बनवणं, पोष्ट ऑफिससमोर बसून मनीऑर्डरचे फॉर्म भरून देणं, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, पोर्ट्रेट पेंटिंग, इंग्लिश स्पिकिंगचे क्लास घेणं, मशिन दुरुस्त करणं, टायपिंग, भाषणं लिहून देणं, निवडणुकीचे जाहिरनामे लिहिणं असे अनेक उद्योग प्रबोधनकारांनी आयुष्यभर केले.

- प्रबोधनकार आपल्याला समाजसुधारक आणि लेखक पत्रकार म्हणून प्रामुख्याने माहीत आहेत. पण त्यांच्या बहुरंगी आयुष्याचे अनेक पैलू आहेत. समाजसुधारक, धर्मसुधारक, शिक्षक, पत्रकार, लेखक, प्रकाशक, अनुवादक, नाटककार, संपादक, इतिहास संशोधक, नाटककार, भाषाविद, वक्ते, नाट्यनिर्माते, मालक, टायपिस्ट, फोटोग्राफर, पुरोहित, नेते, अभिनेते, चळवळे, चित्रपट पटकथा संवाद लेखक, पब्लिसिटी ऑफिसर, संगीततज्ज्ञ, चित्रकार अशा अनेक भूमिका ते आवडीने जगले.

- प्रबोधनकारांनी नऊ वर्षं सरकारी नोकरीही केली. पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या ऑफिसात ते टायपिस्ट म्हणून लागले आणि रेकॉर्ड सेक्शन इन्चार्ज असताना त्यांनी नोकरी सोडली.

- लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर यांना प्रबोधनकार गुरुस्थानी मानत. छत्रपती शिवाजी, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गौतम बुद्ध हे त्यांचे प्रेरणास्रोत होते. देवासच्या शाळेतील शिक्षक गंगाधर शास्त्री आणि केरळकोकिळकार नारायण कृष्णाजी आठल्ये यांना ते आपले गुरू मानत.

- प्रबोधनकारांनी पहिलं नाटक संगीत सीताशुद्धी लिहिलं, तेव्हा ते अवघे २४ वर्षांचे होते.

- छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या सामाजिक चळवळींमधे प्रबोधनकार हे सहप्रवासी होते.

- रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिक्षण संस्था. तिचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधनकारांना गुरू मानत. त्यांच्या कार्याचा पूर्ण आराखडा दादरच्या खांडके बिल्डिंगमधे प्रबोधनकारांच्या स्वाध्याय आश्रमाच्या खोलीत आखला गेला.

- ब्रिटिशकाळी सरकारी नोकरीत असताना नियतकालिक काढता येत नसे. पण प्रबोधनकारांचा ऑफिसातलं काम इतकं चांगलं होतं, की त्यांना नोकरीत राहून प्रबोधन काढण्याची खास सवलत देण्यात आली.

- पण लवकरच सरकार विरोधात लिहिण्यात मर्यादा येतात म्हणून तसंच ऑफिसातल्या राजकारणाला कंटाळून सरकारी नोकरी सोडली.

- प्रबोधन हे पाक्षिक अवघं सहा वर्षं चाललं. पण त्याचा प्रभाव इतका होता, की केशव सीताराम ठाकरेंना प्रबोधनकार हे विशेषण कायमचं लागलं.

- प्रबोधनकारांनी पुण्यात असताना लोकहितवादी नावाचं एक साप्ताहिकही वर्षभर चालवलं होतं.

- प्रबोधनमधे सेक्सॉलॉजी या विषयावरही लेख छापून आलेत.

- प्रबोधन बंद झाल्यावर त्यांनी कधीच स्वतःचं पत्र काढलं नाही. मात्र ते विविध नियतकालिकांत विपुल लिहित राहिले.

- गजाननराव वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीचे प्रचारक म्हणून प्रबोधनकार अनेक वर्षं काम करत होते. त्यांनी वैदिक विवाह विधीचे संपादनही केले. त्याचे पुरोहित म्हणून त्यांनी वैदिक पद्धतीने अनेक लग्नंही लावली. आजही ही वैदिक विवाह विधी प्रचलित आहे.

- गोव्यातली देवदासी प्रथा संपवण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करणारं पहिलं निवेदन गवर्नर जनरला प्रबोधनकारांच्याच अध्यक्षात देण्यात आलं.

- प्रबोधनकारांनी वीस पंचवीस विधवा विवाह लावून दिल्याचाही संदर्भ आहे.

- प्रबोधनकार पट्टीचे वक्ते होते. समाजजागृतीसाठी व्याख्यानं देत ते महाराष्ट्रभर फिरले. इंदूरपासून गोव्यापर्यंत आणि धुळ्यापासून बेळगावपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार होता.

- प्रबोधनकारांना संगीताची उत्तम जाण होती. ते दिलरुबा आणि सतार उत्तम वाजवत.

- प्रबोधनकारांनी पाच नाटकं लिहिली. संगीत सीताशुद्धी, संगीत विधिनिषेध, काळाचा काळ, टाकलेलं पोर आणि खरा ब्राह्मण ही ती नाटकं.

- संत एकनाथांच्या जीवनावरचं खरा ब्राह्मण हे नाटक खूप गाजलं. त्यावर बंदी टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण खरा ब्राह्मण सगळ्याला पुरून उरलं आणि लोकप्रिय झालं.

- वयाच्या अवघ्या तेहतीसाव्या वर्षी त्यांनी कोदण्डाचा टणत्कार हा ग्रंथ लिहित इतिहासाचार्य राजवाडेंसारख्या असामीशी पंगा घेतला. त्यात त्यांनी ब्राम्हणेतरांविरुद्ध केलेल्या आरोपांवर उत्तरं दिली. त्याविषयी व्याख्यानं देताना ते ब्राम्हणेतर आंदोलनाशी जोडले गेले.

- प्रबोधनकारांनी दादरमधे स्वाध्याय आश्रम नावाची संस्था सुरू केली. त्यातून हुंडा विध्वंसक संघ आणि गोविंदाग्रज मंडळ अशा आणखी संस्थांना सुरुवात झाली. गोविंदाग्रज मंडळाने अनेक ग्रंथ छापले.

- हुंडा घेऊन लग्न होत असेल तिथे हुंडा विध्वंसक संघाचे तरुण गाढवाची वरात घेऊन जात आणि हुंडा परत घ्यायला लावत. ही चळवळ प्रबोधनकारांच्या नेतृत्वात जवळपास तीन वर्षं सुरू होती.

- प्रबोधनकारांनी वक्तृत्वशास्त्र या विषयावर मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला. १९१९ साली हा ग्रंथ आला, तेव्हा तो बहुदा कोणत्याही भारतीय भाषेतलाही या विषयावरचा पहिलाच ग्रंथ असावा. या पुस्तकांचं लोकमान्य टिळकांनीही कौतूक केलं होतं. कीर्तनकारांना हे पुस्तक वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

- राजकारणाचं ब्राम्हणांचं वर्चस्व संपवलं, म्हणून प्रबोधनकारांना महात्मा गांधींविषयी आदर होता. पण ब्राम्हणेतर आंदोलनातले सगळे नेते काँग्रेसकडे ओढून घेतल्यामुळे त्यांना गांधीजींवर रागही होता. त्यांनी अकोला येथे आंदोलकांना गुंगारा देत गांधीजींना सभास्थानी पोहोचवलं होतं.

- नथुराम गोडसेच्या अग्रणी या नियतकालिकात लिहाण्याचा आग्रह त्यांना झाला होता. पण महात्मा गांधींना मिस्टर गांधी असं लिहिण्याचा संपादक नथुराम गोडसेचा हट्ट मान्य नसल्यामुळे त्यांनी त्यात कधी लिहिलं नाही.

- महाराष्ट्रीय पद्धतीच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक प्रबोधनकार होत. गुजरात्यांचा गरबा आणि बंगाल्यांची देवीपूजा आधीपासून होतीच. पण त्यांनी मराठी पद्धतीची मूर्ती आणून सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची पद्धत सुरू केली. दादरच्या खांडके बिल्डिंगमधे त्यांनी सुरु केलेला उत्सव अजूनही सुरूच आहे.

- सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, वा. रा. कोठारी, आचार्य अत्रे आणि भाई माधवराव बागल यांना संयुक्त महाराष्ट्राचं पंचायतन म्हणून ओळखलं जाई. ते कोणत्याही पक्षाशी जोडलेले नव्हते. त्यांनी स्वतंत्रपणे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला नैतिक बळ आणि वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलं.

- पंडित नेहरूंनी ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी या पुस्तकात छत्रपती शिवरायांना वाट चुकलेला देशभक्त म्हटलं. त्याविरुद्ध प्रबोधनकारांनी मराठी आणि इंग्रजीत जोरदार आघाडी उघडली. त्यामुळे नेहरूंनी आपलं मत मागे घेतलं आणि माफी मागितली.

- रेल्वेत खिडकी हातावर पडल्यामुळे त्यांचा हात निकामी पडला होता. त्यामुळे त्यांनी जवळपास पन्नास वर्ष टाइपरायटरवर लिहिलं.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या आजारात प्रबोधनकारांना बोलावून घेतलं. सगळे पक्ष एकत्र आले नाहीत तर काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्र देणार नाही, असं आवाहन केलं. ही मुलाखत प्रबोधनकारांनी छापल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीला आकार आला.

- ब्राम्हणद्वेष्टे मानल्या गेलेल्या प्रबोधनकारांनी समर्थ रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिलंय. पण ते सध्या उपलब्ध नाही.

- शिवाजी पार्कवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी प्रबोधनकारांच्या नेतृत्वातच प्रयत्न झाले.

- न्यूज डे सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे शंकर्श विकलीच्या धर्तीवर इंग्रजी कार्टून मॅगझिन काढणार होते. पण व्यंगचित्र साप्ताहिक मराठीच हवं हा आग्रह प्रबोधनकारांचा. मार्मिक हे नावही त्यांचंच.

- तसंच शिवसेना हे नावही प्रबोधनकारांनीच दिलेलं.

- परप्रांतीयांच्या विशेषतः दक्षिण भारतीयांच्या विरोधात प्रबोधनकारांनी १९२२ साली पहिला लेख लिहिला होता. इतकच नाही तर स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावं, यासाठी त्यांनीच सरकारदरबारी यशस्वी प्रयत्न केले.

प्रबोधनकार  वरून साभार.....

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes