शुक्रवार, ऑगस्ट १२, २०११

मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ?

आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने अथक परिश्रम घेवून घटना लिहिली. बाबासाहेब या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने मागास, शोषित घटकांच्या हक्क-अधिकारांना कायदेशीर रूप देण्यात बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी मागास घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठराविक राखीव जागांची तरतूद केली. आरक्षणाची सुरुवात झाल्यानंतर मागास समाजाचे मेरीट साहजिकच खुल्या वर्गातील इतर मुलांपेक्षा कमी होते. कारण इथल्या अभिजन ब्राम्हण वर्गाने पिढ्यानपिढ्या त्यांना शिक्षण, संपत्ती आणि इतर सामाजिक, राजकीय, आर्थिक अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे ज्यांना नीट शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, ज्यांना दोन वेळेला पोटभर अन्न मिळत नाही त्यांची तुलना ए. सी. मध्ये बसून अभ्यास करणाऱ्या, अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या मुलांशी करणे चूकच आहे. परंतु आजपर्यंत भारतात अशाच प्रकारे समान संधी न मिळालेल्या दोन घटकांची एकमेकांशी खोटी तुलना करून मेरीट चा बागुलबुवा निर्माण केला.

भारतात आजपर्यंत अभिजन वर्गाला १०० % आरक्षण समाजाच्या सर्व क्षेत्रात उपलब्ध होते असे असूनही त्यांना म्हणावी तशी देशाची किंवा समाजाची प्रगती साधता आली नाही. आजपर्यंत जे-जे महत्वाचे शोध लागले आहेत ते परदेशातील शास्त्रज्ञांनी लावले आहेत. विमान, रेल्वे इंजिन, पंखा, इस्त्री, वीज, सायकल, दूरदर्शन संच, रेडीओ, कॉम्पुटर आदी अनेक महत्वाचे शोध परकीय शास्त्रज्ञांनी लावले आहेत. आमच्या शास्त्रज्ञांना तसे शोध का लावता आले नाहीत ? आमचे विद्वान मात्र वेदांत किती ज्ञान आहे, नवनवीन शोध आहेत त्याच्या हाकाट्या पिटत राहिले. जर त्यांच्या ठिकाणी मेरीट खच्चून भरले आहे तर अजून देश विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांच्या मागे का आहे ? आजपर्यंत सर्व समाजासाठी निस्वार्थी भावनेने झटणारे महामानव बहुतांशी बहुजन समाजातूनच पुढे आलेले आहेत. आजही अनेक बडी मंडळी आपला वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी परदेशातील दवाखान्यात जातात. जर इथल्या एम्स किंवा इतर ठिकाणच्या लोकांना मेरीट चा पुळका आहे तर त्यांनी अंतर्मुख व्हायला हरकत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि अगदी कालपरवा सोनिया गांधी उपचारासाठी का परदेशी गेले ? इथे खुल्या वर्गातील लोकांकडे मेरीट नाही कि काय ? 

त्यामुळे मेरीट च्या गप्पा खोटारड्या आहेत. बहुजन समाजात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची मांडणी केली जाते हे वरचेवर दिसून आले आहे. आणि वेळ पडताच मेरीट च्या समर्थकांचेच  मेरीट उघडे पडते. त्यामुळे बहुजन वर्गाला मेरीट च्या गप्पा सांगण्याचा प्रयत्न कुणी करू नये. हिम्मत असेल तर आधी स्वतःचे मेरीट सिद्ध करा.

21 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes