बुधवार, ऑगस्ट १०, २०११

'आरक्षण' चित्रपट आणि मेडीयाचा पक्षपात

दिनांक ८ ऑगस्ट २०११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टार न्यूज या वाहिनीवर आरक्षण या चित्रपटाच्या निमित्ताने 'नोकरीमध्ये आरक्षण असावे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रकाश झा, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सहभागी झाले होते. याच दिवशी आय. बी. एन. लोकमत वाहिनीवर 'आरक्षण चित्रपटाला विरोध योग्य आहे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा. हरी नरके (विभागप्रमुख- महात्मा फुले अध्यासन, पुणे विद्यापीठ), हेमंत देसाई (पत्रकार आणि समीक्षक), संजय पवार (लेखक), रामदास आठवले (अध्यक्ष- आरपीआय) आणि प्रकाश झा (चित्रपट निर्माता) इ. लोक सहभागी झाले होते. या दोन्ही चर्चा पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या चर्चांचे स्वरूप आणि विषय आरक्षणाबद्दल मनात किंतु ठेवून ठरवले गेले होते असे वाटते. 'आरक्षण' या बहुचर्चित चित्रपटाच्या वादावरून हे दोन्ही विषय चर्चेला आणले होते. परंतु या विषयांच्या ऐवजी 'आरक्षणाला किंवा मागास घटकांच्या विकासाला विरोध करणे योग्य आहे का ?' किंवा 'मागास समाजाची बदनामी चित्रपटाच्या माध्यमातून करणे योग्य आहे का ?' अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांना का करता येत नाहीत हा प्रश्नच आहे.

स्टार न्यूज वर जी चर्चा झाली ती अतिशय भंपक स्वरुपाची होती. या चर्चेत  बहुजन, मागास समाजाचा ट्विटरवर अपमान करणारे चित्रपट क्षेत्रातील विद्वान प्रकाश झा साहेब आणि सामाजिक जाणीवेचा गंधही नसणारे अमिताभ बच्चन साहेब आणि दीपिका पदुकोण  सहभागी झाले होते. ''नोकरीमध्ये आरक्षण असावे का ? या विषयावर सुमारे अर्धा तास एक जोरदार बहस  (बहस हा शब्द स्टार न्यूज चा) झाली. साधारणतः एखाद्या विषयावर वादविवाद स्वरुपात  चर्चा करायची झाली तर दोन्ही बाजूचे त्या क्षेत्रातील अभ्यासू लोकांचा सहभाग असतो. पण स्टार न्यूज च्या या बहस मध्ये तीन विद्वान आणि तिघांचाही आरक्षणाला विरोध. कशी होणार बहस ? पण स्टार न्यूज ला त्याचे काय ? रोज एखाद्या शहरात नवी बहस आयोजित करायची म्हणजे आरक्षणाला  विरोध करण्याचा आपला मनसुभाही पूर्ण होतो आणि आरक्षण चित्रपटाची जाहिरातबाजीही होवून जाते. दुहेरी फायदा. असो. भरीसभर म्हणजे या चर्चेत 'भारतीय क्रिकेट टीम मध्ये आरक्षण असावे का '  अशीही चर्चा रंगली. अर्थात हि चर्चा उपहासात्मक होती. बहुजनांना खिजवण्यासाठी होती हे चर्चा पाहताना सरळसरळ जाणवत होते. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या या तिघांनीही आरक्षणाला स्पष्ट विरोध दर्शवला. दीपिका पदुकोण तर म्हणाली 'आरक्षणापेक्षा मेरीटला अधिक महत्व हवे.' म्हणजे आरक्षणाचा लाभ घेनाऱ्याकडे मेरीट नसते कि काय ? हे मेरीट म्हणजे नक्की काय या विषयावर दिपिकाकडे क्लास लावला पाहिजे. यावेळी प्रकाश झा हि आरक्षणाच्या विरोधात होता. पण ६.३० च्या चर्चेत आरक्षणाला विरोध करणारे झा ९.४५ च्या आयबीएन लोकमत वरील चर्चेत मात्र 'आरक्षण एक संविधानिक सत्य आहे, सामाजिक वास्तव आहे' वगैरे सारवासारव करताना दिसले. म्हणजे एखादी गोष्ट आपणाला पसंत नसेल परंतु आपण टी बदलू किंवा संपवू शकत नसू तर एक कटू वास्तव म्हणून स्वीकारतो. आरक्षण हे प्रकाश झा च्या दृष्टीने एक कटू वास्तव आहे. परंतु महामहीम निखिल वागळे साहेबांनी याचा अर्थ असा काढला कि प्रकाश झा आरक्षणाच्या विरोधात नाहीत. धन्य ती पत्रकारिता आणि धन्य ते निखिल वागळे साहेब.

या दोन्ही वाहिन्यांनी ज्या पद्धतीने हे विषय हाताळले आणि चर्चा पुढे रेटली ते पाहता या वाहिन्यांना बहुजनांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही हे स्पष्ट दिसून आले. आयबीएन लोकमतवरील  चर्चेदरम्यान निखिल वागळे भलतेच आक्रमक झाले होते. प्रा. हरी नरके राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला प्रकाश झा यांनी चित्रपट दाखवण्यास दिलेला नकार आणि आयोगाचे महत्व वगैरे सांगत होते. त्यांना मध्येच थांबवून निखिल वागळे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण चित्रपटाची जी पोस्टर्स जाळली त्याबद्दल विचारात होते आणि फुले-शाहू-आंबेडकरी लोकांनी मूळ विचारधारा विसरून मनगटशाही दाखवत असल्याच्या चकाट्या पिटत  होते. हरी नरके महत्वाच्या मुद्द्याचे विश्लेषण करायला लागले कि वागळे त्यांना भलत्याच मुद्द्यांकडे डायव्हर्ट करत होते. हरी नरके यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच प्रकाश झा यांनी ट्विटर वर काय मुक्ताफळे उधळली ते सांगितले. मग इतका संतापजनक भाग वागळे यांनी चर्चेत कधीही उर्धृत केला नाही आणि प्रकाश झा उशिरा या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतरही त्यांना एका शब्दाने वागळे यांनी विचारले नाही. म्हणजे कार्यक्रमात सहभागी झालेल्या आरक्षण समर्थकांना कोंडीत आणि कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि आरक्षण विरोधक किंवा सनातनी लोकांना मात्र पूर्ण विचारस्वातंत्र द्यायचे, त्यांची अडवणूक करायची नाही हि निखिल वागळे यांची आदर्श पत्रकारिता आहे का ?

रामदास आठवले तर दिल्लीतून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी एक-दोन वाक्ये बोलतात न बोलतात तोवर त्यांचा आवाज बंद केलाच म्हणून समजा. जर या माणसांना आपली स्पष्ट भूमिका मांडून द्यायची नाही तर चर्चेला कशाला बोलवायचे ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ज्यांना पुळका आला आहे अशा विद्वानांना आणि आरक्षण चित्रपटाच्या टीम ला बोलावले असे तरी चालले असते. या दोन्ही चर्चेत आरक्षण समर्थकांबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले. काही महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले तर काही निरर्थक मुद्द्यांवर चर्चेचे गुऱ्हाळ चालवले गेले. त्यामुळे एकूणच मेडीयाच्या या पक्षपाती धोरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्यांची चर्चा पुढील भागात.

3 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes