रविवार, जुलै ३१, २०११

“आरक्षण” प्रश्नी उच्चवर्णीय मानसिकता ?

प्रकाश झा यांचा “आरक्षण” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोषित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने जे आरक्षण दिले आहे त्याच विषयावर हा चित्रपट असल्याने त्याबद्दल वाद निर्माण होणे साहजिक आहे. उलट निर्माण झालेला वाद हा प्रकाश झा यांच्याच पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कोणतीही चर्चा झाली नसती तर कदाचित हा चित्रपट खूप लोकांनी पहिलाच असता असे नाही. परंतु एका ज्वलंत विषयावर निर्माण केलेल्या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे आता या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. परंतु चर्चा झालीच नाही तर कदाचित एकांगी आणि द्वेषमुलक बाजू मांडली जावू शकते त्यामुळे या विषयी सखोल चर्चा आवश्यक आहे.

मुळात राखीव जागांची कल्पना मांडली महात्मा फुल्यांनी. मागास बहुजन समाजाला काही प्रमाणात राखीव जागा असाव्यात अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर १९०२ साली राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानात अब्राम्हणांना ५० % जागा राखीव ठेवल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  डॉ. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नामुळे घटनेच्या माध्यमातून मागास समाजाला राखीव जागा दिल्या गेल्या. १९९० नंतर मंडल आयोगाने ओबीसी ना राखीव जागा द्याव्या अशी शिफारस केली. जेव्हा-जेव्हा बहुजन समाजाच्या आरक्षणाचा विषय समोर आला तेव्हा-तेव्हा उच्चवर्णीय समाजाने त्याला कडकडून विरोध केला. राखीव जागांना विरोध करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु जेव्हा-जेव्हा राखीव जागांच्या विरोधात आंदोलने उभी राहिली तेव्हा राखीव जागांच्या विरोधाबरोबरच मागास समाजाचा द्वेष करण्याची प्रवृत्तीही दिसून आली. एम्स च्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन असो वा दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी. सर्व ठिकाणी मागास समाजाबद्दल एक द्वेषमुलक भावना दिसून येत होती. राखीव जागांच्या माध्यमातून प्रवेश घेणे म्हणजे गुणवत्ता नाकारणे अशा प्रकारचे समज पसरवले गेले. तथाकथित गुणवत्तेचे ढोल पिटले गेले. प्रसारमाध्यमे उच्चवर्णीय समाजाच्या ताब्यात असल्याने सर्वानी जातीनिष्ठ भूमिका घेवून राखीव जागांच्या विरोधात वातावरण तापवले. चित्रपट, नाटके, वृत्तपत्रे, इलेक्ट्रोनिक मेडिया इ. सर्वांवर उच्चवर्णीय ब्राम्हणांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या सर्व माध्यमातून वेळोवेळी राखीव जागांना विरोध करण्यात आला. मागास समाजाची बाजू कुणीही मांडली नाही. सामान्य माणूस टीव्ही आणि पुस्तकातून त्याच्यापर्यंत जे पोहचत असते त्यावर विश्वास ठेवतो. वरील सर्व माध्यमे ‘समाजमत’ आणि ‘समाजमन’ घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा माध्यमातून जर वेळोवेळी एकांगी, पुर्वग्रहदुषित माहिती समोर येत असेल तर ते बहुजन समाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे. किंबहुना बहुजन समाजाच्या विरोधात ते ठरवून राबवलेले षडयंत्र आहे.

प्रकाश झा एक उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आहेत. त्यांचे चित्रपट अतिशय लोकप्रिय असतात. त्यामुळे अशा एखाद्या चित्रपटातून जर राखीव जागांबद्दल चुकीचे समाज प्रसारित केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो. प्रकाश झा हे बिहार मधील एका उच्चवर्णीय ब्राम्हण कुटुंबात जन्माला आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांचा राखीव जागांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे ते चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल. परंतु बहुजन समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र सकारात्मक नाही हे त्यांच्या आधीच्या काही चित्रपटांमधून दिसून येईल. त्यांच्या “गंगाजल” या चित्रपटात ‘यादव’ (बिहार मधील पशुपालक अहिर समाज) हे खलनायक आहेत. “अपहरण” चित्रपटातील नायक ‘अजय शास्त्री’ उच्चवर्णीय आहे. म्हणजे खलनायक दाखवायचा असेल तर बहुजन समाजातील व्यक्तींची नवे वापरायची आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, प्रामाणिक न्यायाधीश, अन्यायाविरुद्ध लढणारा नायक अशा पात्रांना उछावार्नियांचे नवे द्यायची असे प्रकार चित्रपटातून नेहमीच होत असतात. जुन्या मराठी चित्रपटात ‘पाटील’ हा हमखास खलनायक असायचा. जुन्या हिंदी चित्रपटातील खलनायक ‘ठाकूर’ वगैरे असायचे. ‘पाटील’ काय किंवा ‘ठाकूर’ काय, दोघेही बहुजन समाजातील. या ‘पाटील’ किंवा ‘ठाकूर’ यांनी समाजावर अन्याय केला नाही अशातला भाग नाही. परंतु ब्राम्हणांनी काय कमी अन्याय-अत्याचार केलेत का ? त्यांना नाही कधी खलनायक म्हणून प्रोजेक्ट केले. थोडक्यात सांगायचा भाग असा कि चित्रपट, नाटके, कथा, कादंबऱ्या अशा सर्व माध्यमातून बहुजन समाज आणि त्यांच्या हिताच्या गोष्टींविरुद्ध उच्चवर्णीय लोक वातावरण तयार करतात. त्यामुळे प्रकाश झा यांनी “आरक्षण” चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर बहुजनांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणे स्वाभाविक आहे. 

अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी आरक्षण चित्रपट आधी आयोगाला दाखवण्यात यावा अशी भूमिका घेतली आहे. प्रकाश झा यांनी नकार दिल्यानंतर आयोगाने रीतसर नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्रातील मंत्री ना. छगन भुजबळ, आर. पी. आय. चे अध्यक्ष रामदास आठवले, गोपीनाथ मुंडे, जितेंद्र आव्हाड अशा लोकांनी आरक्षण चित्रपटात काही बहुजन विरोधी भाग असेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भारतात जे राखीव जागांचे समर्थक नेते आहेत त्यात मायावती, लालूप्रसाद यादव, शरद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान, करुणानिधी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, महादेव जानकर, जितेंद्र आव्हाड इ. लोकांनी हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी पाहिला पाहिजे. बहुजन समाजातील एखाद्या घटकाबाबत काही द्वेषमुलक भाग असेल तर तो तात्काळ काढून टाकण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

35 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes